महाराष्ट्र मंडळ वार्तापत्र

मंडळातील घडामोडी

रौप्य महोत्सवी सांगता सोहळा

४ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्र मंडळ, सिंगापूरची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाली. गेले वर्षभर मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. या महोत्सवाचा सांगता सोहळा 3 व ४ ऑगस्ट रोजी , ग्लोबल इंडिअन शाळेच्या पुंगोल येथील संकुलात पार पडला. उद्घाटनाला सिंगापूरमधील भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त माननीय श्री. जावेद अश्रफ आणि सिंगापूरच्या वित्त व शिक्षण उपमंत्री श्रीमती इंद्राणी राजा ह्यांची खास उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे महाराष्ट्र मंडळ होंगकोंग, महाराष्ट्र मंडळ बँकॉक,आणि महाराष्ट्र मंडळ मलेशिया यांचे प्रतिनिधी सुद्धा या महोत्सवात सहभागी झाले होते.

दिवस पहिला – सकाळी 8 वाजता ढोल, ताशा आणि लेझीम च्या गजरात दमदारपणे सोहळ्याची सुरवात झाली. मंडळातील सभासद उत्साहाने ह्या यात्रेत सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे श्री. जावेद अश्रफ आणि उपमंत्री श्रीमती इंद्राणी राजा ह्यांचे पारंपारिक मराठी पद्धतीने औक्षण करून स्वागत केले गेले. सर्व उपस्थित सभासदांचे सुद्धा गुलाब पाण्याचा शिडकाव करून, तसेच पेढे देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. जावेद अश्रफ, मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष अंबिके, मंडळाचे सल्लागार श्री. हर्षवर्धन भावे आणि सौ. अपर्णा टेमुर्णीकर ह्यांनी दीप प्रज्वलन करून समारोहाचे उद्घाटन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऋतुगंध च्या रौप्य महोत्सवी विशेष अंकाचे प्रकाशन झाले. 

मंडळातील युवा वर्ग अर्थात ‘अरुण -तरुण’ च्या समूहाने प्रभावीपणे सादर केलेल्या महाराष्ट्रगीताने कार्यक्रमाची दमदार सुरवात झाली. सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ह्या प्रसंगी मंडळाचे सदस्य श्री श्रीकांत जोशी व श्री. रवींद्र परचुरे ह्यांचा देखील सत्कार करण्यात आला. 

प्रमुख पाहुणे माननीय श्री जावेद अश्रफ आणि उपमंत्री श्रीमती इंद्राणी राजा यांची समयोचित भाषणे झाली. श्री जावेद अश्रफ यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र मंडळाचा सिंगापूर मधील इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी असल्याचा आवर्जून उल्लेख आणि कौतुक केले.
मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष अंबिके यांनी सुद्धा मंडळाची आजपर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील योजना याबद्दल आपले मत मांडले. यानंतर चा विशेष कार्यक्रम म्हणजे पूर्व आशियाई बृहनमहाराष्ट्र मंडळाची स्थापना. होंगकोंग, बँकॉक,मलेशिया, आणि सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष यांनी एकत्र येऊन या निर्णयाची घोषणा केली आणि भविष्यात एकत्रितपणे काही उपक्रम करण्याचे तसेच परस्परांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 
पूर्व आशियाई महाराष्ट्र मंडळांना एकत्र आणण्यात आपल्या मंडळाने पुढाकार घेतला हि निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. टाळ्यांच्या कडकडाटात ह्या निर्णयाचे स्वागत झाले आणि सकाळचे सत्र संपल्याची घोषणा झाली. उपस्थित मंडळी सहभोजनासाठी रवाना झाली. 

कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्राची सुरवात झाली ‘ऋतुरंग’ ह्या कार्यक्रमाने. सृष्टीतील सहा ऋतूंच्या सोहळ्यांवर आधारित कथ्थक नृत्याचा कार्यक्रम. पं. रोणू मुजुमदार ह्यांच्या बासरीच्या सुरावटीत महाकवी कालिदासांच्या ‘ऋतुसंहार’ च्या धनंजय बोरकर ह्यांनी केलेल्या भावानुवादातील काही भाग, वृंदा टिळक ह्यांच्या ऋतूंवरील कविता गुंफल्या होत्या. ह्या कविता स्वरबद्ध केल्या होत्या रोहित परांजपे, मृणाल परांजपे आणि तनुजा साने ह्यांनी. 

नृत्यदिग्दर्शिका होत्या भूपाळी देशपांडे कुलकर्णी, केतकी द्रविड मोगरे आणि सोनाली नाईक. विनय पराडकरांनी कार्यक्रमाचे सुयोग्य निवेदन लिहिले होते आणि हे निवेदन सादर केले श्यामल भाटे आणि विनय पराडकर ह्यांनी. नृत्यदिग्दर्शकांचे कौशल्य आणि सर्वच नर्तिकांची मेहनत यामुळे अतिशय सुंदर नृत्याविष्कार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले. 

यांनतर रंगमंचाचा ताबा घेतला आपल्या पाहुण्या मंडळींनी, अर्थात मलेशिया, बँकॉक, आणि हॉंगकॉंग महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांनी. एकपात्री प्रयोग, नाट्यप्रवेशाचे सादरीकरण, नकला, नृत्ये असा भरगच्च कार्यक्रम घेऊन हि मंडळी आली होती. हॉंगकॉंग मंडळाने उत्तोमोत्तम नृत्ये सादर करून मराठी चित्रपटातील नृत्याचा प्रवास उलगडून दाखवला. एकापेक्षा एक उत्तम कार्यक्रम सादर करून ह्या मंडळींनी सिंगापुरी मराठी जनांची मने जिंकून घेतली. 

मध्यंतरात चहा आणि बटाटेवड्यांचा आस्वाद घेऊन मंडळी परतली ती एका विशेष कार्यक्रमाच्या उत्सुकतेने. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि त्यांचे सहकलाकार सादर करत असलेला ‘धरोहर’ हा तो कार्यक्रम. राहुल देशपांडे यांनी या कार्यक्रमात त्यांचे आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या स्मृती जागवल्या. अभंग, उपशास्त्रीय संगीत, आणि नाट्यप्रवेशासहित नाट्यसंगीत असा विविधांगी अविष्कार सादर केला. त्यांना साथ दिली सहकलाकार प्रियांका बर्वे यांनी. त्याचबरोबर प्रियांका बर्वे यांनी त्यांच्या आजी मालती पांडे यांची काही भावगीतेसुद्धा सादर केली.

अशा प्रकारे रौप्य महोत्सवाचा पहिला दिवस मावळला तो दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांच्या औत्सुक्यपूर्ण प्रतिक्षेत.

दिवस दुसरा – 

४ ऑगस्ट या दिवसाची सुरुवात झाली तीही एका विशेष कार्यक्रमाने. शब्दगंध – शब्दचित्र या कार्यक्रमात सिंगापूरच्या शब्दगंध या उपक्रमातील कवींनी व इतरही कवींनी त्यांच्या निवडक कविता सादर केल्या आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री अच्युत पालव यांनी सुलेखन आणि चित्रकला यांचा समर्पक आणि मनोवेधक मिलाफ घडवून त्या कवितांच्या अनुषंगाने चित्राविष्कार सादर केले. 

त्यानंतर श्री पालव यांनी उपस्थित प्रेक्षकांना सुलेखन कलेची मनोरंजक भाषेत ओळख करून दिली आणि सुंदर प्रात्यक्षिकेसुद्धा दाखवली. हा कार्यक्रम खूपच रंगला.

रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने एका छोट्याश्या खाद्यमेळाव्याचे आयोजन पण केले होते. महोत्सवात महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी होती. यात मुंबईचा सुप्रसिद्ध वडापाव, , पाणीपुरी, भेळ, मसाले भात, मठ्ठा, पुरणपोळी यासारखे मराठमोळे पदार्थ तर होतेच शिवाय केक,दाबेली ,नुडल्स या सारख्या पदार्थांनी पण हजेरी लावली होती. याशिवाय कुल्फी, कैरीचे पन्हे अश्या थंडगार पदार्थांना सुद्धा भरपूर प्रतिसाद मिळाला. 

दुपारच्या सत्रात मंडळाच्याच यशस्वी रंगकर्मी चमूने सादर केले प्रा. वसंत कानेटकर लिखित सदाबहार अभिजात नाटक ‘प्रेमा तुझा रंग कसा’. आपल्या नेहमीच्याच अनुभवाप्रमाणे नाटक अतिशय रंगतदार झाले आणि प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद नाटकाला मिळाला. विशेष म्हणजे मंडळाच्या स्थापनेच्या पहिल्या वर्षीसुद्धा हेच नाटक सादर केले गेले होते. मंडळाच्या अनेक जुन्या जाणत्या सभासदांना या नाटकाने पुन:प्रत्ययाचा आनंद मिळवून दिला.

कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात अध्यक्ष श्री. संतोष अंबिके यांनी सर्वांचे आभार मानले. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरने एक महत्वाचा टप्पा अतिशय यशस्वीपणे पार केला, तोही एकदम दिमाखात....! ढोल ताशाच्या गजरात दोन दिवस चाललेल्या ह्या रौप्य महोत्सव सांगता सोहळ्याची समाप्ती झाली. 

श्रावणसरी – 
परदेशात राहूनही आपली संस्कृती जपली जावी तसेच पुढच्या पिढीला मंगळागौरीचे महत्व कळावे ह्या हेतूने मंडळात ‘श्रावणसरी’ मंगळागौरीच्या खेळांचा हा कार्यक्रम केला जातो. १८ ऑगस्ट रोजी kentvale hall इथे हा कार्यक्रम साजरा झाला. दरवर्षी ह्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. पारंपारिक वेशात नटून मंगळागौरीचे पूजन आणि मग विविध खेळ ह्यात महिलांनी फार उत्साहाने भाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी पुरणपोळी आणि मसालेभात असे खास मराठी पदार्थ असलेल्या सुग्रास भोजनाचा सगळ्यांनी आस्वाद घेतला. 

गणेशोत्सव – 

मंडळाचा गणेशोत्सव ग्लोबल इंडियन स्कूल,पुंग्गोल इथे २ ते ६ सप्टेंबर ह्या दरम्यान साजरा झाला. 2 तारखेला सकाळी मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष अंबिके ह्यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दररोज संध्याकाळी गणपती दर्शन आणि आरती ह्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 

४ तारखेला ‘जे जे उत्तम’ हा साहित्य वाचनाचा कार्यक्रम झाला. पु.लं. देशपांडे ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून पुलंचे साहित्य हा विषय यावेळेस निवडण्यात आला होता. नाट्यप्रवेश, कथा, ललित अश्या विविध पु.ल. लिखित साहित्याचे वाचन यावेळी झाले. मराठी साहित्य वाचनाच्या ह्या कार्क्रमात गार्गी गोरे,अनुष्का वर्तक आणि अथर्व पटवर्धन ह्या तीन लहान मुलांच्या सहभागाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आपल्या उत्कृष्ट वाचनाने ह्या मुलांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. 

६ तारखेला सामुहिक अथर्वशीर्ष पठण झाले.
 उत्तरपूजेनंतर ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. 

७ ऑगस्ट रोजी ग्लोबल इंडिअन स्कूल,पुंग्गोल इथे विविध गुणदर्शन हा सर्वांचा आवडता कार्यक्रम झाला. मंडळातील सभासदांच्या कलागुणांना वाव मिळावा ह्या हेतूने दरवर्षी गणेशोत्सवा दरम्यान हा कार्यक्रम साजरा होतो. सभासद उत्साहाने ह्या कार्यक्रमात सहभागी होतात. ह्या वर्षी आनंदोत्सव ह्या संकल्पनेवर आधारित नृत्ये सादर झाली. शिवाय एका छोट्या नाट्यप्रवेशाचे सादरीकरण देखील झाले. ह्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे -


इतर कम्युनिटी कार्यक्रम – महाराष्ट्र मंडळाला सिंगापूर मधील स्थानिक संस्थांकडून कार्यक्रम करण्याबद्दल नेहमीच आमंत्रण येत असते. 

२४ ऑगस्ट रोजी People’s Association - Changi Simei Community Club च्या तर्फे आयोजित कार्यक्रमात मंडळाने भाग घेऊन साडी नेसण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. स्थानिक महिलांनी फार उत्साहाने ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. 

ह्या सारखाच अजून एक कार्यक्रम #One Community Fiesta @Hillion Mall इथे करण्यात आला. सिंगापूर मधील स्थानिक जनतेला मराठी संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने साडी नेसवणे तसेच वारली पेंटिंग चे प्रात्यक्षिक दाखवले. शंकरपाळे,चिवडा आणि बाकरवडी हे मराठमोळे खाद्यपदार्थ पण लोकांसाठी ठेवले होते. 

SIIEXPO इथे झालेल्या कार्यक्रमात आपल्या ढोल ताशाच्या पथकाला खास आमंत्रण होते. दमदार सादरीकरणाने ढोल ताशा पथकाने कार्यक्रमात रंगत आणली. 

लिटल इंडिया शॉप कीपर्स and हेरीटेज असोसिएशन ("लिशा") आयोजित curry fiesta ह्या कार्यक्रमात मंडळाने भाग घेतला होता. पंचामृत आणि सोलकढी हे दोन पदार्थ मंडळातर्फे ठेवले होते. 




भोंडला आणि गरबा – 
नवरात्रीत लोकप्रिय असणारा गरबा मंडळात साजरा झाला. 
२९ ऑगस्ट रोजी ग्लोबल इंडिअन स्कूल,पुंग्गोल इथे गरबा आणि भोंडल्याचे आयोजन केले होते.





- श्यामल भाटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा