संपादकीय

ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
नमस्कार साहित्यप्रेमी जनहो,

महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे रौप्यमहोत्सवी वर्ष. आणि ऋतुगंध ह्या द्वैमासिकाचे हे तेरावे वर्ष. २०१० पासून मला कोणत्या ना कोणत्या रुपाने महाराष्ट्र मंडळ सिंगापूर ऋतुगंध साठी काम करण्याची संधी मिळाली. ऋतुगंध ह्या द्वैमासिकाची सुरुवात झाली तेव्हा PDF स्वरुपात ते वाचकांच्या भेटीला येत असे. त्यानंतर २०१३ मध्ये प्रथम एक अंक ब्लॉग स्वरुपात तयार झाला. आणि त्यानंतर २०१५ पासून आपण ब्लॉग स्वरुपातच अंक वाचकांपुढे सादर करतो आहोत. 

या वर्षी मला ऋतुगंधच्या संपादक पदाची धुरा सांभाळण्याची संधी दिल्या बद्दल मी मंडळाची ऋणी आहे. ऋतुगंध समिती मध्ये माझ्या बरोबर काम करणाऱ्या माझ्या सर्वच सहकाऱ्यांच्या मदती शिवाय हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नसते. गेले काही आठवडे अथक परिश्रम घेऊन आम्ही ऋतुगंध चा हा पहिला छापील आणि ब्लॉग अशा दोन्ही माध्यमातील अंक "वर्षा" आपल्यापुढे सादर करीत आहोत.

अत्यंत गूढ अशा मानवी मनाच्या भाव भावना ह्या संकल्पनेवर आधारित ह्या वेळचे ऋतुगंधचे अंक आहेत. "आनंद आणि उत्सव" ही ऋतुगंध वर्षा ची केंद्रकल्पना आहे.

ह्या अंकाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध लेखिका सौ आशाताई बगे, मंगला गोडबोले, माधवी वैद्य यांचे आशीर्वाद लेख, अभिप्राय रुपाने ऋतुगंध ला लाभले आहेत.

आनंद ही अशी ठोस वस्तू नाही की दाखवता येईल. पण त्याचा अनुभव मात्र सर्वांनाच येतो. आनंद झाला आहे असे आपल्या चेहऱ्यावर, आपल्या कृतीतून समजते. ह्या अनुभवावर लिहिते होऊनही समजते. या अंकासाठी साठी साहित्य पाठविण्याच्या आमच्या आवाहनाला आपण भरभरून प्रतिसाद दिला आहे. "आनंद" ह्या विषयावरील कविता, ललितलेखन आपल्यासाठी सादर करीत आहोत. नियमितपणे आपल्या भेटीस येणाऱ्या लेखमालाही आहेत.

या अंकात आनंदाची वेगवेगळी रुपे आपल्याला कथा-कविता-लेखांतून पाहायला मिळतील. आनंदाच्या अध्यात्मिक विश्लेषणापासून तर त्याच्या रासायनिक विश्लेषणापर्यंत, कोरियाच्या जेजू बेटावर अवचित गवसलेल्या आनंदापासून ते जपानमध्ये अनुभवलेल्या आनंदापर्यंत, आजीने समजावलेल्या आनंदाच्या अर्थापासून ते चाळिशीत मिडलाईफ क्रायसिसमध्ये मिळवायच्या आनंदापर्यंत विविध अंगाने आनंदाला भिडण्याचे काम या अंकात कवी-लेखकांनी केले आहे. 

अभिजित वैद्य यांनी डूडल माध्यमातून तयार केलेले मुखपृष्ठ आपल्याला नक्कीच आवडेल.

या अंकात ममंसिं च्या विविध उपक्रमांची माहिती, अध्यक्षांचे मनोगत आणि आगामी कार्यक्रमां बद्दल माहिती मिळणार आहे. मंडळाची भविष्यातील वाटचाल कशी असावी ह्या बद्दल काही माजी अध्यक्षांनी आपले विचार मांडले आहेत.
ह्या कविता-कथा-लेखांतून आपल्यालाही वाचनानंदाची अनुभूति येईल अशी खात्री आहे. वाचून ऋतुगंधच्या ब्लॉगवर आपली प्रतिक्रिया नोंदवल्यास आम्हाला व लिहिणारांनाही आनंद वाटेल.

- राजश्री लेले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा