डर अच्छा है

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

तान्हं बाळ जन्माला आल्याबरोबर रडतं ते आईपासून दूर होण्याच्या भीतीने. तिथे माणसाला भीती ही भावना कळत असावी. म्हणजे भावना जाणवते, तिचं नाव थोडं उशीरा कळतं. इथून माणसाच्या मनात भीती वस्तीला येते, ती अगदी प्राण सोडेपर्यंत राहते. स्वरूप वेगळं, वेळ वेगळी, क्वचित नावही वेगळं देतो माणूस, पण भीती राहतेच. अगदी सर्वसंग परित्याग केलेल्या माणसाला पण परमात्मा आपल्यापासून दुरावेल याची भीती असतेच. 

भीती साधारणपणे आयुष्याच्या सुरळीत प्रवाहाला बांध घालते, असा समज आहे. बऱ्याच अंशी तो खराही आहे. एखाद्या गोष्टीची भीती बाळगून ती टाळत राहिलं तर बऱ्याच गैरसोयी, नुकसान यांना तोंड द्यावं लागतं. लोकल प्रवासाला घाबरणारा माणूस मोठ्या शहरात सुखाने वावरू शकणार नाही. 

पण 'नाण्याला दोन बाजू असतात' या लोकप्रिय वचनाचा नीट विचार केला तर लक्षात येतं भीती कित्येकदा आपल्याला योग्य तेच वागायला भाग पाडते, नंतर ते वळण पडतं आपल्या बुद्धीला आणि शरीर-मनाला. 'जो होगा देखा जायेगा' हे धोरण नेहमी नाही उपयोगी पडत. अगदी आपल्या रोजच्या सवयी आठवा -

**रस्ता ओलांडतांना दोन्ही बाजुला नीट बघूनच आपण रस्ता ओलांडतो. 

**रस्ता कितीही उत्तम असला तरी गाडीचं चाक आणि ब्रेक आपल्या नियंत्रणात असतात. 

**कितीही स्वस्त आणि चविष्ट असलं तरी रस्त्यावर आपण फार खात नाही. 

**सुशिक्षित मध्यमवर्गीय घरात औपचारिक शिक्षण सहसा कुणी टाळत नाही. क्षेत्र कोणतंही असो.

**कष्टाच्या पैशाची बचत आणि योग्य गुंतवणूक ही बहुसंख्य भारतीय माणसांची मानसिकता आहे. रक्कम आणि मार्ग अर्थातच वेगवेगळे असतात.

**आणि कधीही कोणाला न चुकलेली 'लोक काय म्हणतील' ही भीती.

लोकांना भिऊन आपण आपलं आयुष्य आखत नाही हे खरंच, पण लोकांना टाळूनही आपण समाजात राहू शकत नाही. माझ्या नुसत्या दिसण्या-बोलण्यावरून लोक माझ्याबद्दल बरा-वाईट समज करून घेणार असतील तर - अ. अनोळखी माणसं काय म्हणतील याची पर्वा मी कशाला करू आणि आ. अनोळखी माणसांनी विनाकारण माझ्याबद्दल चुकीचा समज का करून घ्यावा - यापैकी मी तरी आ ला महत्त्व देते. अर्थात तसं करतांना माझं वैयक्तिक आणि नंतर आजूबाजूच्या परिसराचं काही विशेष नुकसान नाही याची खात्री मी करून घेतेच. 

उदा. घरातला कचरा नेणारा माणूस एखादे दिवशी आला नाही तर ती कचऱ्याची पिशवी इकडे तिकडे न टाकता मी कोपऱ्यापर्यंत नेऊन तिथल्या पालिकेच्या डब्यातच टाकीन. असं करतांना 'लोक काय म्हणतील' ही भीती मी मुळीच बाळगणार नाही. पण केवळ माझी वैयक्तिक हौस म्हणून वयाला न शोभणारे कपडे घालतांना 'लोक काय म्हणतील' याचा विचार मी आधी करीन - किंबहुना केलाच पाहिजे.

शत्रू राष्ट्राने आपलं नुकसान करु नये म्हणून केलेली शस्त्रसिद्धता, साथीचे रोग पसरून जनता मृत्युमुखी पडू नये म्हणून उभी केलेली रोगप्रतिबंधक यंत्रणा, आपात्कालीन संपर्क क्षमता या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भीतीपोटीच केल्या गेल्या, हे विसरून कसं चालेल? 

त्या एका साबणाच्या जाहिरातीची टॅगलाईन आहे ना 'दाग अच्छे हैं।' तसं या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला की वाटतं 'डर अच्छा है।'

- राधा मराठे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा