दुपारचे काम आटोपून निवांत बसले होते....इतक्यात फोन वाजला...रिंगटोन वरून ओळखला कि, भारतामधून माहेर चा फोन आहे, म्हणून आनंदाने जाऊन कानाला लावला, पण भाऊ जास्त काही बोलेना, अचानक हुंदक्यांचा आवाज आला...घाबरून विचारले कि, काय अशुभ बातमी आहे, तेव्हा म्हणाला कि, आमच्या एकुलत्या एक बहिणीच्या नवऱ्याला हिरडीच्या कँसर चे निदान झाले आहे. भावोजींचे वय ४० वर्षे, बहीण ३५ वर्षांची व पदरी ३ लहान मुली, पहिली मध्ये, तिसरी मध्ये व सर्वात मोठी पाचवी मध्ये; ऐकून पायातले त्राणच निघून गेले. भावोजींच्या रोगाचे निदान ऐकून त्यांच्या ऑफिस ने त्यांना मेडिकल लिव्ह देऊन घरी बसवले, पण ती लिव्ह तरी किती महीने पुरणार, आणि भावोजींनी सरकारी ऑफिस मध्ये चांगल्या पदावर नोकरी असूनही लोकांची ओळखीने कामे करून दिली, पण स्वतःच्या संसाराकडे, बायको-मुलींच्या भवितव्यासाठी फारशी काही तरतूद करून ठेवली नव्हती. स्वतःचे मेडिक्लेम पण काढले नव्हते. म्हणून कॅन्सरच्या उपचारात होती नव्हती ती बचत खर्च झाली. हॉस्पिटलमध्ये दर वेळी हिरडीचा थोडाथोडा भाग कापून टाकत, असे करत करत शेवटी इलाज च उरला नाही, हॉस्पिटलमधून घरी पाठवले व बहीण घरीच नवऱ्याची सेवा करू लागली व निदान झाल्यापासून नऊ महिन्यात त्यांना देवाने आपल्याकडे बोलावून घेतले.
बहिणीवर तर आकाशच कोसळले. ती घरीच होती, नोकरी करत नव्हती, शिकलेली होती पण चांगली नोकरी मिळायला तिचे शिक्षण अपुरे होते. भावोजींच्या पाठीमागे तिला अनुकंपा म्हणून त्यांच्या जागेवर प्रयत्न केला, पण तिचे शिक्षण अपुरे असल्याने जमले नाही. मुलीपण सर्वच लहान असल्याने वडिलांच्या जागेवर त्यांना त्यांच्या ऑफिस मध्ये प्रयत्न करणे जमले नाही.
बहिणीला बाहेर छोटीशी नोकरी मिळाली असती, पण तिघी मुली लहान, त्यांना पाळणाघरात ठेवून नोकरी करण्याएवढी कमाई मिळत नसल्याने तिने घरच्या घरी प्रायमरी मधल्या मुलांच्या शिकवण्या घे, पतपेढी, पोस्ट सारख्या ठिकाणी लोकांचे फॉर्म्स भरून तिकडे नेऊन दे, अशी मामुली कामे करायला सुरु केले. भावोजींच्या नंतर अशी २ वर्षे गेली व तिला हळूहळू आपल्या एका पायात काहीतरी प्रॉब्लेम सुरु झाल्याची जाणीव झाली. ती आईबाबांना म्हणाली कि 'पायात थोडेसे दुखते आहे', आईबाबा म्हणाले कि ' जास्त धावपळ करतेस, त्यामुळे असे होते आहे, तू मुलींकडे लक्ष दे, जास्त दगदग करू नकोस, आम्ही आहोत ना ', पण मुलींसाठी तिने स्वतःकडे लक्ष दिलेच नाही. हळूहळू दुखणे वाढत गेले, पाय ढोपराखालून थोडासा सुन्न पडल्याची जाणीव झाली, रस्त्यामध्ये एकदा पडून पायाची ३ बोटे फ्रॅक्चर झाली. पाय सुन्न पडतो म्हणून तिला फॅमिली डॉक्टर ने न्यूरॉलॉजिस्ट कडे न्यायला सांगितले. त्या डॉक्टरने सांगितले कि, तिच्या मणक्याला मार लागला आहे, त्यामुळे फुटड्रॉप चा प्रॉब्लेम झाला आहे, तर ऑपरेशन करावे लागेल. ती एकदा नवीनच सुरु झालेला मॉल मुलींच्या आग्रहाखातर त्यांना घेऊन बघायला गेली होती, पण त्यातील एस्कलेटर वर त्यात साडी अडकून पडली होती, त्यावेळी लागला असेल मणक्याला मार, असे समजून ऑपरेशन करून घेतले; पण तिच्या पायाच्या प्रॉब्लेम मध्ये सुधारणा होण्याऐवजी वाढ च झाली, म्हणून पहिले ऑपरेशन झाले त्याच्या ४ महिन्यांनी टीव्ही वर प्रसिद्ध नयूरॉलॉजिस्ट ची मुलाखत बघून तिला त्याच्याकडे नेले. त्याने आधीचे सर्व रिपोर्ट्स पाहून निदान केले कि, केलेले ऑपरेशन बरोबर झाले नाही, पुन्हा करावे लागेल, म्हणून पुन्हा ४ महिन्यांनी आधीचे ऑपरेशन झाले होते तिकडे पुन्हा ऑपरेशन केले, तरीही त्यात काही सुधारणा झाली नाही, मग त्या डॉक्टर च्या रिसेप्शनिष्ट ने फोन केला तर तो डॉक्टर कडे देणे पण बंद करून टाकले व बहिणीला नेऊन डॉक्टरकडे दाखवण्याएवढी स्थिती राहिली नाही. तिला बेडवर झोपून राहावे लागले. शेवटी तिला जवळच असलेल्या हॉस्पिटल मध्ये नेले. तिकडच्या नयूरॉलॉजिस्ट ने सर्व रिपोर्ट्स व तिच्या प्रॉब्लेम ची सुरुवात ऐकून सांगितले कि हा 'मोटर न्यूरॉन डिसीज' आहे, हा असाध्य रोग असून अजूनपर्यंत तो का होतो व त्यावर उपाय काय ह्याचा शोध लागलेला नाही, रिसर्च सुरु आहे, दीड-दोन लाखांमध्ये एखाद्याला होतो, पण पुरुषांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त आहे, शक्यतो स्त्रियांना होत नाही. ह्यात आपल्या शरीरातील सर्व नसा हळूहळू सुकून जातात, पण त्या रोग्याचा मेंदू शाबूत असतो, तो रोगी आपल्या शरीराचे हाल बघत असतो व आस धरून बसलेला असतो, कि ह्यातून कधीतरी बाहेर पडेन.
तिची दिवसोंदिवस ढासळणारी प्रकृती पाहून व तिच्या मुलींकडे तिची असहाय पणे फिरणारी नजर बघून जीव तुटत असे. बेडवर असताना मग हळूहळू तिच्या एका हाताची बोटे वाकडी झाली, बोलणे बंद झाले, जीभ लुळी पडली, घसा सुकून गेल्यामुळे भरवलेले अन्न पोटात जाणे बंद झाले. हाडांचा सापळा उरला, केस विंचरणे, धुणे मुश्किल झाले, म्हणून न्हाव्याला घरी बोलावून चकोट करून टाकला. डॉक्टरने नाकातून नळी घालून तिला लिक्विड डाएट वर ठेवले. तिला क्षणामध्ये श्वास घेणे मुश्किल होऊ लागले. हॉस्पिटल मध्ये डॉक्टर ने सांगितले कि, ‘ हिला घरीच ठेवा, होईल तेवढी सेवा करा, ह्यावर इलाज नाही ‘. काही माणसे तर आम्हाला म्हणत कि, ‘कशासाठी सेवा करता एवढी, तिला त्रास देण्यापेक्षा डॉक्टर ला सांगून तिची त्यातून सुटका करा’. हे सांगणे खूप सोपे आहे, ही सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तिच्या तिघी मुली लहान व भारतामध्ये इच्छामरण किंवा दयामरण नसल्याने तसा काहीच निर्णय घेऊ शकत नव्हतो.
म्हणून तिला घरी ठेवून हॉस्पिटल मध्ये असतो तो ऑक्सिजन चा सिलिंडर घरी आणून ठेवला व तिच्या घरी पूर्णवेळ बाई ठेवून तिला सर्व शिकवून ठेवले. आईबाबा, भाऊ सतत येऊनजाऊन असत, पण भाऊ त्यांचा संसार, मुले ह्यामुळे कायम तिकडे राहणे शक्य नव्हते. मी इकडे सिंगापूर ला असल्याने जाऊन २ महिने राहून बघून आले. तिकडून निघताना माझ्या मनाला माहिती होते कि, ती माझी तिच्याशी शेवटची भेट होती. पण इकडे माझी शाळेत जाणारी मुले, नवऱ्याची नोकरी ह्यामुळे जास्त राहणे शक्य नव्हते.
शेवटी एक दिवशी मनावर दगड ठेवून ती अशुभ बातमी ऐकली. ३ लहान मुलींना मागे ठेवून तिने ह्या जगाचा निरोप घेतला होता मुंबई ला जाणारे विमान लगेच मिळाले नाही, म्हणून दुसरे दिवशी जाऊन पोचले. तिचे शेवटचे दर्शन पण मला मिळाले नाही. त्यावेळी भारत व आपली माणसे सोडून परदेशी रहायला आल्याचे फार दुःख झाले. तिच्या मुलींना अभागी म्हणावे लागेल कि, त्यांच्या नशिबात आईबाबांचे प्रेम मिळण्यापेक्षा बेडवर खितपत पडलेले बाबा, त्यांच्या सेवेत मग्न आई, ज्या वयात बाहेर बागडायला मिळावे ते सोडून बाबांना नळीने औषध, लिक्विड भरवायला आईला मदत करावी लागत असे. बाबांच्या मृत्यूला २ वर्षे पण होत नाहीत, तेवढ्यात आईने अंथरूण धरले, मग तिची सेवा, ह्यातच त्यांचे बालपण गेले. 'बालपण दे गा देवा' असे त्या मुलींना चुकूनही वाटणार नाही.
इकडे व्हील चेअर मधून आजारी माणसांना फिरवताना पाहिले कि, मला माझ्यापेक्षा लहान असलेली एकुलती एक बहीण ५-६ वर्षे अंथरुणात खितपत पडली होती व वार्धक्यामुळे हतबल झालेले आईबाबा ह्यांची प्रकर्षाने आठवण येते. भारतामध्ये व्हील चेअर ने फिरवण्याएवढे रस्ते चांगले नसतात व सर्वच बिल्डींग्स ना लिफ्ट नसल्याने आजारी माणसांना वरून खाली उतरविणे मुश्किल असते. सर्वांची आठवण झाली कि मन गलबलून येते.
प्रतिमा जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा