ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १
सोशल मीडिया ने आपल्या आयुष्यात दमदार प्रवेश केला, आणि सगळे जगच छोटे होऊन गेले. दूरदूर रहाणारी माणसे आता एका मिनिटाच्या हाकेवर आली. सोशल नेटवर्किंग च्या साईटवर खाती उघडून त्यावर अनेकांना उत्साहात ऍड करून झाले,आणि तसेच भराभर अनेक चॅट ग्रूप्सही तयार झाले. कोण किती ग्रूप्स चे मेम्बर आहे, कोण ऍडमिन आहे, कुणाचे सोशल मीडिया साइट वर किती फ्रेंड्स
आहेत, कुणाच्या पोस्टला किती लाइक्स मिळाले यावर आता व्यक्तीची सामाजिक आणि कौटुंबिक पात्रता ठरू लागली. परदेशी, किंवा देशातच पण दूरच्या शहरात असणाऱ्या अनेक वर्षे नातलग आणि मित्र-मैत्रिणींच्या सहवासाला आसुसलेल्यांसाठी सोशल मीडिया ही पर्वणी ठरली खरी, पण एका शहरात राहणारेही आता एकमेकाना ‘टेक्स्ट करणे’ यातच धन्यता, आधुनिकता आणि पुढारलेपण मानू लागले.
पूर्वी कुणाच्या घरी कार्य असले, तर त्या निमित्ताने आमंत्रण पत्रिका छापणे, त्या द्यायला आप्तेष्टांच्या घरी प्रत्यक्ष जाणे हा एक आनंदाचा भाग असायचा. सम्बंध किती जवळचे आहेत त्याप्रमाणे प्रत्यक्ष, पत्राने किंवा फोनवर आमंत्रण दिले जायचे. 'लग्नाला अगदी सीमांतपूजनापासून आले पाहिजे हां सगळ्यांनी!' असे कानावर पडले, कि आपुलकीची जाणीव आपोआपच व्हायची. पण आता काय, कार्ड बनवण्याचे ऍप्प डाउनलोड केले, कि झाले काम. त्यात हवा तो मजकूर टाईप केला, कि आमंत्रण पत्रिका तयार. जवळचे मित्र-मैत्रीण किंवा नातेवाईक असतील तर पत्रिकेचा फोटो वैयक्तिक मेसेज ने, नाहीतर इतरांना ग्रूप वर कॉमन पोस्ट करून आमंत्रण दिले जाऊ लागले. कुणाच्या मुलाचा पहिला क्रमांक आलेला असो, कुणाकडे हळदीकुंकू असो किंवा आणखी काही बातमी असो. सांगण्याची पद्धत तीच. कुठलाही समारंभ, मग ते बारसे असो किंवा कुणाचा डान्स परफॉर्मन्स वा बक्षीस समारंभ असो. त्याचे फोटो सोशल मीडिया वर किंवा ग्रूप वर पोस्ट करणे हीच प्रथा जणु पडायला लागली. ‘बारश्याचे फोटो आले का हो वहिनी? आम्ही बघायला येतो आहे येत्या रविवारी’ ही गंमतच नाहीशी झाली.
इतकेच काय, तर निवडणुका आल्या की चहाबरोबर किंवा मॉर्निंग वॉक बरोबर रंगणाऱ्या 'काय मग? यावेळी कुणाला मत देताय? काही म्हणा, आमचा पक्षच बहुमताने येतो की नाही बघा!' अश्या खमंग गप्पा कुठेतरी मागे पडू लागल्या. त्या ऐवजी लोक आपली राजकीय किंवा इतर कुठल्या संवेदनशील विषयावरची आपली मतेही सोशल मीडिया द्वारेच सर्रास मांडायला लागले. जणु एक प्रकारची अदृश्य चुरसच इथे या डिजिटल विश्वात सुरू झाली. रोज सकाळी प्रत्येक ग्रूप वर ‘सुप्रभात’ च्या संदेशांचा भडिमार. कधी कुणी कोडे पोस्ट केले, तर कोण आधी उत्तर देते याचा निकाल बुद्धीच्या वेगावर नाही, तर टाइपिंग च्या वेगावर ठरायला लागला. 'हे काय, मला सगळी उत्तरे येत होती. पण मेले ते पटापट टाईप करणे जमेल तर ना!' अश्या तक्रारी नवीनच मोबाईल वापरायला लागलेल्या आज्या आणि काकू करायला लागल्या. सगळ्यांनी एकत्र जमून भेंड्या लावण्याची, एकमेकांना कठीण कोडी घालण्याची आणि त्यानिमित्ताने हास्यविनोदात बुडून जाण्याची मजाच कुठेतरी निघून गेली.
कुणाचा वाढदिवस किंवा ऍनिवर्सरी असेल तर बघायलाच नको. एखाद्या कुणी सकाळी सकाळी शुभेच्छा पोस्ट केल्या, की दिवसभर तोच विषय. 'सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या, पण फक्त अमुक अमुक ने दिल्या नाहीत', किंवा 'मी नेहमी प्रत्येकाला नावाने धन्यवाद देते आणि ती मात्र 'सर्वांचे मनापासून धन्यवाद' असेच फक्त लिहीते' असे त्यात पुन्हा पारिवारिक राजकारण आलेच. त्यावरून मग कुणाचे संबंध कुणाशी कसे आहेत याचे इतरांचे तर्क-कुतर्क, आणि तत्सम अप्रिय चर्चांना नको ते आमंत्रण. पूर्वी वाढदिवस म्हणजे मोठ्यांना नमस्कार, जवळच्यांचे फोन, कुणी कुणी ग्रीटिंग कार्ड पाठवले असेल याचे अंदाज करण्यात पोस्टमन ची बघितलेली वाट, यात मजेत जाणारा दिवस असायचा. आता मात्र ‘शुभेच्छांबद्दल धन्यवाद’ असे सोशल मीडिया वर टाइप करण्यात दिवस जाऊ लागला.
या सगळ्यामध्ये, 'माणसांना जवळ आणि एकत्र आणण्यासाठी म्हणून जन्माला आलेला सोशल मीडिया', त्याच्या उपलब्धीमुळे 'माणसे एकमेकांच्या जवळ आली की एकमेकांपासून दूर गेली?' ही विचार करण्यासारखी बाब आहे. पुष्कळदा एकत्र डिनरला बाहेर गेलेले मित्र मैत्रिणी किंवा कुटुंब ही, रेस्टॉरंट मध्ये पदार्थ मागवून आपापल्या फोनमध्ये मेसेज चेक करतानाच जास्त रमलेले दिसतात. मागवलेला पदार्थ आला, की त्याचा आस्वाद घेण्याच्या ऐवजी, त्याचे फोटो काढून ते इतरांना पोस्ट करण्यातच त्यांना जास्त मजा येते. 'थांब ... खाऊ नकोस, मला सजावटीसकट फोटो काढू दे आधी, मग तू काय करायचे ते कर' असे संवादच डिनर टेबल वर जास्त ऐकू येतात.
या सगळ्यांत आपण आपल्या जवळच्या माणसांपासून दूर तर चाललो आहोतच, पण आपले 'स्वत्व'ही कुठेतरी हरवून बसलो आहोत नाही का? आपले कुटुंब, आपले छंद, आपले स्वतःचे आयुष्य हे सगळे कुठेतरी लुप्त व्हायला लागले आहे. इतरांच्या आयुष्यात काय चालले आहे, कोण कुठे सुट्टीला जाऊन आले, कुणी कुठले फोटो पोस्ट केले, यातच फावला वेळ वाया चालला नाही आहे का? साधे उदाहरण घायचे झाले, तर वाढदिवसाला सोशल मीडिया वर आलेल्या शेकडो शुभेच्छांमध्ये, किती जणांनी आठवणीने म्हणून शुभेच्छा दिलेल्या असतात, आणि किती जणांनी कर्तव्य म्हणून किंवा दबावा खातर? कोण खरे आपले आणि कोण नावाला म्हणून आपले, हे जाणून घेण्याचा एक
नव्याने प्रयत्न करायचा असेल, आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या आयुष्याशी आणि स्वतःशी पुन्हा ओळख करून घ्यायची असेल, तर काही दिवस या सगळ्यापासून दूर जायला हवे, म्हणजेच, डिजिटल डिटॉक्स करायला हवे. सगळी सोशल नेटवर्किंग खाती, सगळे सोशल मीडिया ग्रुप्स काही दिवस बंद करून तर बघा! स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करून मोकळ्या वेळात स्वतःच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवून बघा. आपले छंद जोपासा. जे आपल्या जवळ राहतात, त्यांना प्रत्यक्ष भेटा. दूर राहणाऱ्या आप्तेष्टांशी फोन करून संवाद साधा. जे लोक खरेच आपले आहेत, ते आपण कुठल्या ग्रुप वर किंवा सोशल मीडिया वर नाही म्हणून आपल्यापासून दूर जातील का?
काही काळ डिजिटल डिटॉक्स करून मी तरी आपल्या खऱ्या आपुलकीच्या माणसांशी आणि स्वतःशी जास्त चांगल्या पद्धतीने संवाद साधला आणि स्वतःच्या आयुष्याशी जणू काही पुन्हा नव्याने ओळख करून घेतली.
- डॉ. अर्चना कुसुरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा