ऋतुगंध हेमंत वर्ष १२ अंक ५
राजीव मसंद च्या राऊंड टेबल डिस्कशन मध्ये या वेळी एक वेगळंच चित्र दिसून आलं, एकाच वेळी विकी कौशल, आयुष्यमान खुराणा, राजकुमार राव, रणवीर सिंग आणि पंकज त्रिपाठी एकत्र आले. हे कशाचं द्योतक असावं , आजचा प्रेक्षक खरच बदलतोय ? त्याच्या आवडीनिवडी चोखन्दळ होत चालल्या आहेत ? आजच्या तरुण पिढीला चांगला सिनेमा कळायला लागलाय? या नव्या प्रेक्षकांना आपण मूर्ख बनवू शकत नाही हे तर यातून सिद्ध झालंच आहे. गेल्या वर्षातील चित्रपटांमधील विविधता बघता हे अगदी स्पष्ट आहे कि सिनेमा ऑडियन्स हा वयात आलाय. त्याला नेमकं वर्गीकरण करता यायला लागलं आहे. एकाचवेळी न्यूटन चित्रपटाला गर्दी करणारा हा वर्ग आज रणवीर सिंग च्या तद्दन मसालापट सिम्बा ला ही गर्दी करतोय. हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. तर मास आणि क्लास मधली सीमारेषा पुसट होत चालली आहेत का .. मास आणि क्लास या संकल्पना आजच्या काळात सिंगल स्क्रीन ऑडियन्स आणि मल्टिप्लेक्स ऑडियन्स या नावाने ओळखल्या जातात, हे कितपत योग्य आहे …
मुळात मनोरंजनाचं साधन म्हणून चित्रपट या माध्यमाची सुरवात विसाव्या शतकाच्या सुरवातीला भारतात झाली, या पूर्वी संगीत होतच , त्यात शास्त्रीय, लोकसंगीत , असे ठळक प्रकार होते. चित्रपट निर्मिती ही सुरवातीला कुठल्याही वर्गाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केली नव्हती, त्यात शुद्ध करमणूक हा हेतू होता, जनतेला त्यांच्या रोजच्या विवंचनेतून चार घटका वेगळ्या स्वप्नवत दुनियेची सैर घडवून आणणे, जे केवळ स्वप्नातच शक्य आहे अशा अकल्पित आणि चमत्कृतीपूर्ण घटना दाखवणे हाच तेव्हाच्या निर्मात्यांचा हेतू होता. त्या काळी जनतेला देवादिकांचे आकर्षण होते, त्यामुळे राजा हरिशचंद्र, अयोध्येचा राजा, सैरंध्री, रामराज्य, माया मच्छिन्द्र, वगैरे चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. यानंतर समाजाला काहीतरी संदेश द्यावा असे चित्रपट निर्माण करण्यास सुरवात झाली तुकाराम, संत ज्ञानेश्वर, रामशास्त्री ही काही उदाहरणे . सोज्वळ, आदर्श पात्रयोजना , त्याग ही त्या काळातली अतिशय महत्वाची मौल्यवान असलेली संकल्पना हा त्या काळाचा usp म्हणता येईल. याच काळात फिअरलेस नादिया नावाचं एक वादळ घोंगावू लागलं, १००% करमणूक हे एकमेव उद्धिष्ट ठेवून निर्मिलेले हे चित्रपट एका वर्गाला खुणावू लागले. हा वर्ग गरीब होता. रोजच्या भाकरीची विवंचना असलेला हा वर्ग, ज्याला मूल्यशिक्षणाऐवजी पोटाची भूक जास्त महत्वाची वाटत होती, त्या वर्गाने या निव्वळ मनोरंजनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. मारधाडीने खचाखच भरलेला चित्रपट, अतर्क्य अफाट स्टंट्स, जेवढ्यास तेवढी स्टोरी, कुठलाही बोधप्रद संदेश नाही, असे साधारण स्वरूप असलेले चित्रपट त्या काळी खूप गाजले. हाच कदाचित मास चा जन्म असावा. मास म्हणजे आम जनता , म्हणजे थोडक्यात आपण सगळेच. त्या काळी तो एक विशिष्ट वर्ग असला तरी आज त्याच्या सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. भगवानदादानी सुरवातीला अशाच चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. भगवानदादा आणि मास्टर विठ्ठल यांनी तो काळ गाजवला. मारधाडपटाबरोबरच रोमँटिक चित्रपट हळूहळू आकार घेत होता, सुरवातीला काही विशिष्ट फॉर्मुला न वापरता करण्यात येणारे हे चित्रपट हळूहळू एका ठराविक साच्याकडे वाटचाल करू लागले. नायक आणि नायिकेतील सामाजिक दरी, शोकांतिका किंवा सुखांतिका, समाजाचा विरोध या पूर्वापार चालत आलेल्या संकल्पना थोडेफार बदल करून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या. यात असलेली सुमधुर गाणी कथानकाला पुढे नेण्याचे मौलिक कार्य करू लागली आणि चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ सुरु झाला. मासेस ने आपापले नायक निवडले , मॅटीनी आयडॉल देव आनंद, ट्रॅजीडी किंग दिलीप कुमार, आणि सामान्य माणसाचा प्रतिनिधी राज कपूर या मध्ये सामान्य जनता स्वतःला पाहू लागली.
चित्रपट पाहणारा सामान्य माणूस , सिनेमा थेटर च्या बाहेर आल्यावर क्षणभर का होईना आपली दुःख, विवंचना विसरत असे, बरेचदा स्वतःला नायकाच्या जागी ठेवून स्वप्नरंजन करत असे, किंवा त्याच्या दुःखापुढे आपले काहीच नाही यात समाधान मानत असे, आवडत्या गाण्यांवर दौलतजादा करणे , शिट्या वाजवणे , पडद्यावर च्या आई च्या दुःखात समरस होऊन मनसोक्त रडणे, नायिकेला बघून मनातल्या गुदगुल्या चेहऱ्यावर दिसणे, नायकाच्या एन्ट्री ला कडाडून टाळी देणे, खलनायकाचा उघड उघड उद्धार करणे, शेवटच्या नायक खलनायकाच्या लुटुपुटीच्या मारामारीला उत्तेजित होऊन प्रतिसाद देणे, ही अगदी खास मासेस ची वैशिष्टयं . सगळं उघड , कुठेही लपवाछपवी नाही, बाहेर आल्यावर सगळ्या भावनांचा निचरा होऊन माणूस पुन्हा नव्या आव्हानांशी दोन हात करायला सज्ज. खरं तर मासेस चित्रपट चालवतात आणि पाडतात ही . या मायबाप रसिकांच्या हातात सर्व काही असत. मासेस ना काय आवडेल काय नाही हे आजवर कुठल्याही निर्मात्याला न उमगलेलं कोडं आहे. एक मात्र खरं कि चित्रपट जितका कमी गुंतागुंतीचा तितका तो जास्त अपील होतो. काही महत्वाचे संदेश जर मनोरंजक पद्ध्तीने मांडले गेले तर ते नक्कीच उचलून घेतले जातात. याच सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मुन्नाभाई mbbs आणि लगे राहो मुन्नाभाई हे चित्रपट. ह्या चित्रपटांना लोकांनी अक्षरशः उचलून धरलं, यालाच चित्रपटक्षेत्रात लोकं success का formula म्हणतात. हा नक्की काय असतो हे ब्रह्मदेवालाही कळलं नाहीय. तसं असत तर मेरा नाम जोकर सारखे चित्रपट का चालले नाहीत, मुघल ए आझम , पाकिझा या महत्वाकांक्षी चित्रपटांना माफक यश का मिळालं, एका काळी प्रसिद्धी च्या शिखरावर असणारा राजेश खन्ना अचानक नावडता का झाला, अमिताभ बच्चंन सारख्या महानायकाला अपयश का आलं, एखादा हम आप के है कौन यशाची शिखरे गाठतो पण त्याच दिग्दर्शकाचा नंतर चा कुठलाही सिनेमा तितकासा यशस्वी का होत नाही, रणबीर कपूर सारख्या नायकाला सतत अपयशाची धूळ चाखायला लावणारी ही जनता , किशन कुमार च्या अच्छा सिला दिया ला डोक्यावर का घेते, ही न सुटणारी कोडी आहेत. गोविंदा, मिथुन चक्रवर्ती हे मासेस ने गाजवलेले नायक. गोविंदा चे चित्रपट , त्याची गाणी, त्यातले विनोद, त्यातल्या अतर्क्य घडामोडी एका काळात लोकांनी डोक्यावर घेतल्या. कादर खान चे संवाद, शक्ती कपूर चा अर्धवटराव , केवळ शोभेची बाहुली इतपत महत्व असलेली नायिका आणि स्वतःच्या खांद्यावर पूर्ण चित्रपट पेलणारा नायक, जो सर्वगुणसंपन्न आहे, जो आग्याकारी पुत्र आहे, जो ६४ विद्यांमध्ये पारंगत आहे, जो नायिकेचा पाठलाग करून तिला पटवतोच, गुंडांशी दोन हात करतो, यात तर्कशास्त्राला शून्य महत्व असत, हे असं का असे प्रश्न विचारायचे नसतात. वारंवार असे विचार मनात येतात आणि त्यांना एकच उत्तर असतं , ते म्हणजे “मनोरंजन’, एखाद्या निमशहरातील, गावातल्या, किंवा मोठ्या शहरातील प्रेक्षकाला यातून काय मिळत, तर एखाद्या युवकाला सिनेमात का होईना नायिका पटवल्याचे समाधान, सहज श्रीमंत होण्याचा आभासी अनुभव, निसर्गरम्य स्थळांची सैर, खलनायकाचा नायनाट , या अतर्क्य घटना जगता येतात. आपल्याला नायकाच्या जागी कल्पून त्याचा इगो सुखावत असतो. वास्तव जगात सतत वाट्यास येणार उपेक्षा, अवहेलना , निराशा या निमित्ताने विसरली जाते, दोन घटका का होईना परकाया प्रवेश केल्याचे समाधान मिळते. हेच कदाचित या चित्रपटांच्या यशाचे रहस्य असावं. मिथुन चक्रवर्ती रूढार्थाने दिसण्यात सामान्य असल्यामुळे तो कदाचित सामान्य माणसाला जास्त जवळचा वाटला असेल. त्याने ही एक काळ गाजवलाच. सनी देओल ची माचो इमेज तरुणांनी स्वतःला त्याच्या जागी कल्पून डोक्यावर घेतली असेल . आमिर, सलमान, आणि शाहरुख खान या त्रयींनी एका काळावर अधिराज्य केले, त्यात विभागणी करायची झाली तर सलमान हा जास्तीत जास्त मासेस चा प्रतिनिधी मानता येईल, त्याच्या सर्व चुकांवर पांघरून घालून सर्वसामान्य जनतेने त्याच्यावर प्रचंड प्रेम केले. आमिर ने वेगळी वाट चोखाळली असली तरी त्याला प्रेक्षकांची नाडी कळली आहे हे त्याच्या चित्रपटाच्या निवडीवरून वारंवार सिद्ध झालय, लगान, दंगल, पिके , ३ idiots ही काही प्रातिनिधिक उदाहरणे देता येतील. शाहरुख खान ने राज अजरामर केला, त्याचं ते आसुसून प्रेम करणे , इंटेन्सिटी तरुणांना विशेष करून तरुणींना आवडू लागली, प्रत्येक तरुण स्वतःत राज ला तर तरुणी सिमरन पाहू लागली. हे सर्व एकीकडे घडत असता , दुसरीकडे प्रचंड उलथापालथ होत होती. रामगोपाल वर्मा हे त्या झंझावाताचे नाव.
क्लास या शब्दाचा अर्थ पाहायला गेले तर एक विशिष्ट वर्ग असा होतो. ज्यावेळी एकीकडे एक सामाजिक वर्ग , केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून चित्रपटाकडे बघत होता , त्याच वेळी दुसऱ्या वर्गाला याहून काहीतरी अपेक्षित होते. त्या वर्गाला अर्थपूर्ण चित्रपटाची आस होती. एक कलाकृती म्हणून चित्रपटाकडे पाहणारा हा वर्ग होता. अंतर्मुख करायला लावणारा , विचार प्रवृत्त करणारा , आशयघन चित्रपट त्याला आकर्षित करत होता, या वर्गाला उच्चभ्रू वर्ग म्हणून नेहमीच हिणवले गेले. यात सामाजिक, आर्थिक दृष्ट्या उच्चभ्रू हा भाग आलाच. पण ही व्याख्या सर्वस्वी चुकीची आहे आणि राहील. ज्याप्रमाणे मास हा सर्वसाधारण समाजाचे प्रतिनिधित्व करतो त्याचप्रमाणे क्लास हा त्याच समाजाची बौद्धिक भूक दर्शवतो. क्लास हा मास चाच एक भाग आहे. असा एक सामाजिक घटक , ज्या घटकाला काहीतरी वेगळं अपेक्षित आहे, तो घटक क्लास म्हणता येईल. सत्यजित रे यांचं नाव यात प्रामुख्याने घ्यावे लागेल. पाथेर पांचाली, चारुलता, अपूरसंसार , महानगर, सारखे क्लासिक त्यांनी दिले. या चित्रपटाचं वेगळेपण काय होतं , यात ही सामान्य माणसे होती, परंतु यात माणसाच्या मनाचा अंतर्वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. अप्रतिम प्रकाशयोजना, आशयघन संवाद, विचार करण्यास प्रवृत्त करणारी कथा, सामाजिक भान जपणाऱ्या व्यक्तिरेखा, अशा अनेक वैशिष्ट्याने हे चित्रपट गुंफलेले असत. आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत त्याच काळात गुरुदत्त हा द्रष्टा दिगदर्शक काळाच्या खूप पुढचे चित्रपट देत होता. त्याचा प्यासा यशस्वी करणारा हाच मास होता ज्याला चांगल्या विषयाची आस होती आणि कागज के फुल अयशस्वी करणारा हाच मास होता. या दोन्ही नाण्याच्या दोन बाजूच नाही का. गुलझार, ऋषिकेश मुखर्जी या सारख्या दिगदर्शकानी या दोन्ही वर्गाना एक करण्याची उत्तम भट्टी निर्माण केली, लोकप्रिय अभिनेत्यांना घेऊन त्यांनी आशयघन चित्रपट केले आणि ते चालले देखील. सत्यजित रे नंतर आपल्याला श्याम बेनेगल यांनी सर्वस्वी कलात्मक चित्रपट दिले. यात कुठेहि व्यावसायिक गणित नव्हतं , पण या चित्रपटांनी क्लास ला खूप काही दिले. अंकुर, भूमिका, चक्र, मंडी , या सारखे चित्रपट त्यावेळच्या सामाजिक प्रश्नावर आधारित असत, जमीनदारी, जातींवर आधारित समाज, शोषण करणारा आणि शोषित वर्गाचा संघर्ष , समाजातील विदारक वास्तव दाखवण्याकडे दिगदर्शकाचा कल असे. यातून चित्रपटसृष्टीला अतिशय संवेदनशील अभिनेत्यांची फळी दिली. हे चित्रपट अप्रतिम होते परंतु यशस्वी झाले नाहीत याचे कारण सर्वसामान्य प्रेक्षकाला ते वास्तव नको होते, सिनेमाला येणार प्रेक्षक हा या वास्तवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला त्याचं रोजचं जिणं बघण्यात काहीही स्वारस्य नव्हतं. रामगोपाल वर्मा ने या दोन वर्गांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. सत्या हा चित्रपट मासेस ने उचलून धरला. प्रथमच काहीतरी वेगळं बघायला मिळाल्याचा आनंद क्लास ला मिळाला. आणि एका परीने एक वेगळ्या पर्वाची सुरवात झाली. यात व्यावसायिक हुशारी होतीच, पण अर्थपूर्ण कथा होती , ती सांगण्याची पद्धत मनोरंजक होती. सामाजिक प्रश्न होते पण त्यावर एका वेगळ्या दृष्टीने विचार केला गेला होता. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक चित्रपटात “कथा” या प्रकाराला विशेष महत्व दिले गेले. केवळ एक मनोरंजनाची खिचडी ही प्रथा मागे पडून ठराविक कथानक , आणि त्याला मनोरंजक फोडणी असे स्वरूप देण्यात आले. यांनतर अनुराग कश्यप सारख्या निर्मात्या दिग्दर्शकांनी तर चित्रपटसृष्टीत क्रांती घडवली. आजच्या सोशल मीडिया च्या काळात घरबसल्या मिळणाऱ्या चित्रपट समीक्षेने प्रेक्षक विचार करू लागलाय. वेबसिरीज चा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण होतोय, नेटफ्लिक्स, ऍमेझॉन ने घरबसल्या जागतिक सिनेमा आपल्या पदरात टाकलाय. विविध भाषेतले सिनेमे बघून आजचा प्रेक्षक प्रगल्भ होत चालला आहे. आजच्या तरुण पिढीला चित्रपटाचं वर्गीकरण करता येतं , एकाचवेळी हा प्रेक्षक तुंबाड सारखे वेगळे चित्रपट चालवतो त्याचवेळी सिम्बा ला गर्दी करतो. कारण त्याला नेमका कळलंय कि तो स्वतः मासेस चा एक भाग असला तरी क्लास हा त्याच्या आतच दडलेला आहे.
- जुईली वाळिंबे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा