महाराष्ट्र मंडळ सिंगापूर वार्ता

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

नमस्कार मंडळी,
एप्रिल आणि मे महिन्यात मंडळातर्फे झालेल्या काही कार्यक्रमांची माहिती खालीलप्रमाणे!


ढोल- ताशा पथक

लिटल इंडिया शॉप कीपर्स एन्ड हेरीटेज असोसिएशन ("लिशा") तर्फे सादर केलेल्या Indian Cultural Fiesta या उपक्रमात महाराष्ट्र मंडळाने भाग घेतला होता. भारतातील विविध संस्कृतींचे दर्शन सिंगापुरी जनतेला व्हावे ह्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या ह्या कार्यक्रमात यावेळी भारतातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाजवण्यात येणाऱ्या ढोल ह्या वाद्याची झलक सादर केली गेली. महाराष्ट्र मंडळातर्फे यांच्या पथकाने अप्रतिम असे सादरीकरण करुन सगळ्यांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी मंडळाच्या ढोल-ताशा पथकाचे विशेष कौतुक केले. हा कार्यक्रम २७ एप्रिल रोजी इंडिअन हेरीटेज सेंटर, लिटील इंडिया येथे पार पडला.


नाटक निवड चाचणी 

नाटक हा मराठी मनाचा जिव्हाळ्याचा विषय! अर्थात, आपण सर्व महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे सभासद ह्याला अपवाद नाहीत. उत्तम नाटक सादर करण्याबाबत मंडळ नेहमीच प्रयत्नशील असते. आपल्यातीलच उदयोन्मुख कलाकारांना निवडून त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने एक नाट्य कलाकार निवड चाचणी घेण्यात आली. ही निवड चाचणी २७ एप्रिल रोजी मंडळाचे उपाध्यक्ष श्री. आशिष पुजारी यांच्या घरी पार पडली. श्री. योगेश तडवळकर आणि श्री शेखर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. निवडचाचणीचा उद्देश हा सर्व सभासदांना (गुणवत्ता व तयारीच्या आधारावर) मंडळाच्या नाटकांमधे समाविष्ट होण्यास समान संधी उपलब्ध व्हावी आणि जास्तीत जास्त कलाकारांना व्यासपीठ मिळावे असा आहे. नाटक यशस्वी होण्यासाठी पडद्यावरील कलाकारांबरोबर पडद्यामागील कलाकारांचे योगदानही तितकेच महत्वाचे असते. त्याच्यासाठी सुद्धा आपलं नाव नोंदवण्याची ही एक संधी होती. नाट्य निवडचाचणीला उत्तम प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र मंडळाच्या नाट्यरंग ग्रुप मध्ये गुणी कलाकारांची भर पडली ह्यात शंकाच नाही.



महाराष्ट्र दिन

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.दरवर्षी महाराष्ट्रात धुमधडाक्यात हा दिवस साजरा होतो. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर मध्ये सुद्धा आपण हा दिवस उत्साहाने साजरा केला . खाद्य महोत्सव,पाककला स्पर्धा आणि लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. महाराष्ट्र दिन आणि खाद्यमहोत्सव हे समीकरण गेली दोन वर्षे सभासदांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. महोत्सवात महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी होती. यात मुंबईचा सुप्रसिद्ध वडापाव, कोल्हापुरी मिसळ, पाणीपुरी, भेळ, मसाले भात, मठ्ठा, पुरणपोळी यासारखे मराठमोळे पदार्थ तर होतेच शिवाय केक,दाबेली ,नुडल्स या सारख्या पदार्थांनी पण हजेरी लावली होती. याशिवाय बर्फाचा गोळा, कुल्फी, कैरीचे पन्हे अश्या थंडगार पदार्थांना सुद्धा भरपूर प्रतिसाद मिळाला. 

खाद्य महोत्स्वाबरोबरच एका पाककला स्पर्धेचे पण आयोजन करण्यात आले होते. उन्हाळी पदार्थ या संकल्पनेवर आधारित पाककला स्पर्धेत भाग घेऊन सुगरणींनी आपले पाककौशल्य सादर केले. या स्पर्धेत परीक्षक म्हणून मंडळाचे उपाध्यक्ष श्री. आशिष पुजारी आणि सौ. तेजश्री दात्ये यांनी काम पाहिले.

सिंगापूरमधील प्रेक्षणीय स्थळे या विषयावर आधारित छोट्या मंडळींसाठी चित्रकला स्पर्धा घेतली गेली. लहान मुलांनी अतिशय उत्साहाने या स्पर्धेत भाग घेतला होता. गायत्री लेले आणि रश्मी वळंकीकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेला पण लहान मुलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.





आगामी कार्यक्रम

नृत्य आणि स्वरगंध निवड चाचणी – नृत्य आणि संगीत क्षेत्रातील कलाकार निवडण्यासाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे ह्या दोन्ही क्षेत्रातील उत्तम कलाकार निवडणे हा या चाचणीचा उद्देश आहे. या दोन्ही निवड चाचण्यांची प्रथम फेरी ऑडीओ/व्हिडिओ या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. निवड झालेल्या कलाकारांना प्रत्यक्ष चाचणीसाठी बोलावले जाईल.

रौप्य महोत्सव सांगता सोहळा

महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे हे रौप्य महोत्सवी वर्ष. या निमित्ताने गेले वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले गेले होते. या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ ऑगस्ट मध्ये होणार आहे. दोन दिवस होणाऱ्या या सोहळ्यात नृत्य, नाट्य आणि संगीत असे विविध कार्यक्रम होणार आहेत. भारतातून काही मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर मंडळी ३ आणि ४ ऑगस्ट ह्या दोन दिवसाची नोंद आपल्या रोजनिशीत आजच करुन ठेवा आणि मंडळाच्या ह्या आनंद सोहळ्याला नक्की उपस्थित राहा. 


- श्यामल भाटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा