ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २
१४ एप्रील च्या संडे टाईम्स या सिंगापूरच्या वर्तमान पत्रातील "इनसाईट" या विभागातील ज्येष्ठ पत्रकार श्री. वॉंग किम हो यांच्या लेखाचं हे भाषांतर.
डिसलेक्शिया या विकाराशी झगडणाऱ्या मायकेल कोह या मुलाची गोष्ट. परिस्थितीला शरण न गेलेल्या या मुलाला वयाच्या पंधराव्या वर्षी ब्रदर मॅकनली भेटले आणि त्याचं आयुष्यच बदललं.
काही वर्षांपूर्वी मायकेल कोह एका हॉकर सेंटर मधे जेवत असताना, अंगभर टॅटू केलेला एक जण त्यांच्याकडे आला आणि हातातल्या की-चेन्स दाखवत , पूर्वीच्या कैद्याला मदत करा ' अशी विनंती करू लागला . त्याला पाहताक्षणी कोह हॉकिआन मधे म्हणाले, 'अंग कॉंग सिओ. 'धक्काच बसला त्याला! तुरूंगाची वारी केलेल्या आपल्याला 'क्रेझी टॅटूज ' या टोपणनावाने या व्यक्तिने ओळखलं ! होय , कोह त्याच्या हाताखाली काम करत होते .
तीस वर्षाहून जास्त काळ लोटला त्या दिवसांना ! मायकेलचा आजार कुणाला कळलाच नव्हता . त्याला अभ्यास जमेना आणि सातवीत असताना त्यानं सरळ शाळाच सोडली .भरकटत जात होते दिवस. घराजवळच्या एअरपोर्ट रोडवरील एका टोळीच्या संपर्कात तो आला. अंग काँग सिओ या कुप्रसिद्ध गुंडाची दहशत होती तिथं.
अलिकडेच हा गुंड पुन्हा भेटला. आता सुधारला होता, इंग्लीशही बोलत होता. मायकेलच्या आयुष्याची गाडीही आता चांगल्या रस्त्यानं जात होती. खूप अडचणी आणि कष्टांना या मूळच्या सुस्वभावी तरुणानं तोंड दिलं होतं आणि आज त्यानं उभं केलंय एक अत्यंत प्रतिष्ठित ज्वेलरी स्टोअर- Caratell. अजूनही त्याला वाचनात ' लेखनात अडचणी येतात. तरीही आसपासच्या देशातील राजघराणी त्याचे ग्राहक आहेत. त्याची वार्षिक उलाढाल आहे पाच मिलिअन डॉलर्स .
अडचणी आणि अडथळ्यांना अंगावर घेणं सोपं नव्हतं. याचे बाबा एका ज्वेलरी स्टोअरचे मॅनेजर होते तर आई गृहिणी. पाच भावंडातला हा धाकटा चांगला चळवळ्या होता, कलेचीही जाण होती त्याला. पण हेग बॉईज प्रायमरी स्कूल मधे तो अपयशी ठरला . त्याचं प्रगतीपुस्तक लाल असे - फक्त चित्रकला आणि विज्ञान सोडून. ६वी आणि ७वी - दोन्हीत अनुतीर्ण.
आपल्याला डिसलेक्शिया नावाचा आजार आहे हे त्याला कित्येक वर्ष कळलंच नाही. अक्षरं ओळखायला अडचण आली की वाचन आणि लेखनावर परिणाम होणारच. आजही त्याला अक्षरं दिसतात ती आकृती ' आकार अशा स्वरूपात.
माउंटबॅटन प्रशिक्षण संस्थेत मायकेलनं इलेक्ट्रिक कामं आणि वेल्डिंग शिकायचा प्रयत्न केला पण जेमतेम वर्षभरात त्यानं तो सोडून दिला. विषयांची त्याला आवड नव्हतीच, केवळ शाळेत जावं इतकाच हेतू होता.
ओल्ड एअरपोर्ट रोडच्या मित्रांनी त्याला सामावून घेतलं आणि दोन वर्ष हा मुलगा त्यांच्या बरोबर भटकत राहिला. चौदाव्या वर्षी टाईकवांडोत ब्लॅकबेल्ट मिळवूनही टोळ्यांच्या मारामाऱ्यात अडकत राहिला. सापडला एक दिवस कायद्याच्या पकडीत! सीआयडीने ताब्यात घेताच आईवडील रडू लागले. ' असं काय मोठं घडलंय '' त्याला कळेना. पण अखेरीस ' गुंडांच्या टोळयांपासून लांब राहा ' हे बाबांचं सांगणं त्यानं ऐकलं.
आणखी एका दुर्दैवी आपत्तीनं मायकेलच्या घरावर वज्राघात झाला . दुःखाच्या आघातानं उध्वस्त झालेले आई-बाबा पाहून तो भानावर आला .आयुष्य म्हणजे नुसतीच मौजमजा नाही; आई बाबांनी फार भोगलंय. आता आपण नव्या दिशेनं चांगला रस्ता धरला पाहिजे.
लहानपणी त्यानं चित्रकलेचे धडे गिरवले होते, रंगकामही तो चांगलं करत असे . त्याच्या मनात आलं , चला कलेचा अभ्यास करूया . पण फारच कठीण होतं ते ! तो जाई तिथं त्याचं दहावी उत्तीर्ण नसणं त्याला रोखू लागलं. नानयांग अॅकेडमी ऑफ फाईन आर्टस आणि आता अस्तित्वात नसलेली बाहारूद्दीन व्यावसायिक प्रशिक्षण संस्था यांनीही त्याला नकार दिला.
मायकेलच्या बाबांच्या मित्रानं त्याला La Salle कॉलेज ऑफ आर्टस मधे जाण्यास सांगितले. आपल्या कलेचे नमुने घेऊन जात असताना त्याची अचानक गाठ पडली ती साक्षात् संस्थापकांशी- ब्रदर जोसेफ मॅकनॅली यांच्याशी. ते कोण आहेत त्याला माहीत नव्हतं. त्याचे चित्रांचे नमुने पाहुन त्यांनी त्यात सुधारणा करून पुन्हा तीन महिन्यांनी भेटायला बोलवले.
मायकेलनं आता मात्र कलाकार लिम पोह टेक यांची मदत घेऊन आपलं तंत्र सुधारलं. नवीन पोर्टफोलिओ घेऊन तो पुन्हा कॉलेजला आला. ब्रदर मॅकनेली खूपच प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला फाईन आर्टसच्या डिप्लोमा कोर्सला स्थान दिलं . अवघ्या पंधरा वर्षाचा मुलगा कॉलेज मधला सर्वात छोटा विद्यार्थी बनला . सरांनी स्पष्ट सांगितलं की तो दहावी उत्तीर्ण नसल्याने त्याला डिप्लोमा मिळेलच असं नाही. मायकेलचं तरी कुठ अडलं होतं ! त्याला फक्त शिकायचं होत . त्याच्या जवळ असलेल्या उपजत कलेनं त्याला थोड्याच दिवसात बक्षिसं मिळू लागली.
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी त्यानं मुख्य विषय निवडला - ज्वेलरी डिझाईन. प्रेमातच पडला तो या विषयाच्या ! ही तर शिल्पकला आहे . कलेची उपजत देणगी ;अनेक बक्षिसं , यंग डिझाईनर अवॉर्ड - हे सारं असूनही मायकेलची झटापट चाललीच होती कोर्सच्या अभ्यासाशी ! विशेषतः ' कलेचा इतिहास ' या विषयाशी -कारण वाचन व लेखनावरच तो आधारित होता.
पण मायकेल जवळ असलेल्या एका गुणानंच त्याला तारलं - दृढनिश्चय ! त्याच्या चित्रातील अतिशय सुंदर व नाजुक फुलांनी त्याला एक नवीन नाव मिळवून दिलं- फुलांचा राजा .
१९८९ च्या पदवीदान समारंभाच्या वेळी त्याला एक अनपेक्षित आनंद मिळाला - विशेष कौशल्यासह डिप्लोमा. यानंतर एक वर्ष त्यानं आवडत्या ज्वेलरी डिझाईन मधे असिस्टन्ट लेक्चरर म्हणून काम केलं . पुढील दोन वर्ष मायकेलनं ' नॅशनल सर्विस ' केली .नंतर त्याला याच कॉलेजमधे ' रॉयल मेलबर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ' च्या डिग्रीच्या अभ्यासाला प्रवेश मिळाला. स्वप्नात सुध्दा येणार नाही असं यश त्याला पदवी दान समारंभात मिळालं - डिस्टिंक्शन.
पदवी मिळाल्यावर नोकरी मिळण्यात काहीच अडचण नव्हती . तरीही मायकेलनं स्वतःच्या पायांवर उभं राहण्याचं ठरवलं . बचत केलेले ३००० डॉलर्स आणि भागीदारानं घातलेले ३००० डॉलर्स असे एकूण ६००० डॉलर्स जमले. इथे गच्ची असलेलं भाड्याचं घर आणि सेकंड हॅन्ड सामुग्री घेतल्यावर पैसे उरले नाहीत . मग एका भटक्या कुत्र्याची सिक्युरिटी म्हणून नेमणूक झाली. दिवस खडतर होते . ऑर्चर्ड रोड आणि इतर भागातील ज्वेलरी दुकानात तो खेपा घालत असे. दागिन्यांची डिझाईन्स आणि प्रत्यक्ष घडवलेले दागिने - काहीच त्यांना पसंत पडेना. परिस्थितीतून मार्ग काढताना त्यानं ज्वेलरी डिझाईनचे क्लासेस सुरू केले. दोन वर्ष त्यानं फक्त मारी बिस्किटं खाऊन दिवस काढले. कुत्र्यालाही उपासमार घडली .
अखेरीस एक मोठी संधी आली- मिकी माऊसचं डिझाईन असलेलं पेन्डन्ट बनवणे - डिस्नेशी त्याचं कॉन्ट्रॅक्ट झालं . त्यानं कालांग मधे मोठी जागा घेऊन तीन सहकारी भरती केले . लौकरच पोह हैंग ज्वेलर्सकडून कॉन्ट्रॅक्ट मिळालं .
La Salle कॉलेजमधे त्याची ज्युनिअर असलेल्या टेन्ग या मुलीशी १९९९ मधे त्याचं लग्न झालं. मायकेलवर प्रेम असणारी ही मुलगी त्याच्या बरोबर कष्ट करायला तयार होती .एका प्रख्यात स्थानिक ज्वेलरकडची नोकरी सोडून ती घरच्या उद्योगात सामील झाली. सहा महिने स्वतःसाठी वेगळा पगार न घेता . पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी हॉस्पिटलचे पैसे कसे भरता येतील ही तिला चिंता होती . हाता-तोंडाची गाठ पडण्यासाठी तिनं इन्शुअरन्स पॉलिसीआधीच विकली होती . संसारात स्थिरस्थावर व्हायला त्यांना दोन वर्ष लागली . आता १२ ते १७ वयोगटातील तीन मुलं त्यांना आहेत . त्यांचं दुसरं मूल बाबांसारखं आहे.
कोह यांच्या उच्च व्यावसायिक कौशल्याची कीर्ती आसमंतात पसरली आणि त्यांना ज्वेलर्स कडून आणि कंपन्यांकडून कामं मिळू लागली.
दोन हजार तीन मधे त्यांनी एक मोठं धाडस केलं .एका भागीदाराबरोबर युनायटेड स्क्वेअरमधे दुकान उभं केलं. पण वेळ काही जमली नाही कारण थोडयाच दिवसांत सार्सचं आक्रमण झालं . या भयानक साथीवर उपचार करणारं टॅन टॉक सेंग हॉसपिटल युनायटेड स्क्वेअरच्या जवळच होत. ग्राहकांनी पाठ फिरवली ' धंद्यातली भागीदारीही संपुष्टात आली. पण त्या दुःखी आणि उदासवाण्या काळाशी कोह पतीपत्नींनी झगडायचं ठरवलं.
आणि आलीच एक संधी - सोन्यासारखी नव्हे तर पाचूच्या रूपात. एका बाई जवळ पाचूची अंगठी होती. तिला त्याच पाचू सारखे पाचू बसवलेले दोन दागिन्यांचे डिझाईन हवे होते - नेकलेस आणि ईअर रिंगस. तोच दर्जा राखणं अशक्य होतं किंवा त्या मौल्यवान खडयांचा शोध घेत त्यांच्या उगमापर्यंत पोचायला हवं होतं. दुसरा पर्याय स्वीकारत कोहृ निघाले- दोन हजार चार मधे म्यानमारला. नंतर श्रीलंका ' व्हिएटनाम आणि कंबोडियाला . मौल्यवान रत्नांच्या शोधात.
मायकेल कोहना परदेशाच्या दारावर धडके मारण्याचे ते दिवस आठवतात - २००४ ची म्यानमारला पहिली ट्रिप. त्या काळात तेथे जाण्यासाठी त्या सरकारचे आमंत्रण लागत असे . हा प्रसंग तर पाचूच्या लिलावाचा ! सुदैवानं व्यापार मंत्र्यांशी भेट झाल्यावर आणि कोह यांच्या सिंगापूर पासपोर्ट मुळे त्यांना म्यानमारचे प्रवेशद्वार उघडले गेले. सुरवातीच्या काही मोजक्या सिंगापुरी ज्वेलर्सपैकी ते एक होते . पाचूच्या थेट उगमापाशीच ते पोचले .दर्जा उत्तम होताच आणि किंमतीही आटोक्यातल्या. महत्वाचं म्हणजे या व्यापारातल्या खाचाखोचा ' बारकावे त्यांना कळले .
म्यानमार आणि थायलंडच्या दूरवरच्या खाणींच्या प्रवासात धोका होताच .कंबोडिया सारख्या देशातला त्यांचा प्रवास खडतर धोकादायक डोंगराळ भागातल्या रस्त्यांवरुन आणि भूमिगत स्फोटकं असलेल्या प्रदेशातून झाला आहे . काही वेळा संशयास्पद व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला तर कधी ठकसेनही भेटले. या कामात रत्नांची उत्तम पारख हवी ' किंमती वर ठाम असलं पाहिजे . नाहीतर फसवणूक अटळ आहे . कोह प्रवासात आपल्या जवळ जी साधनसामग्री ठेवतात त्यात मायक्रोस्कोप आणि रिफ्रेक्शन लिक्विङ्स असते -अमूल्य खडे ,रत्न यांच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी. रत्नांचा डीएनए ओळखण्यासाठी त्यांनी एक ' पद्धत ' तयार केली आहे आणि लौकरच ते पेटन्ट मिळवण्याच्या शेवटच्या टप्प्यात येतील.
त्यांच्या खड्यांचा दर्जा आणि त्यांची अतिशय सुंदर सुबक रचना केलेले नमुने यांची कीर्ती यामुळे सिंगापूर, युरोप, चीन आणि मिडलईस्ट येथील मोठमोठे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत.
कोह यांनी आणखी एक उपक्रम सुरू केला आहे . खरे आणि नकली खडे कसे ओळखावे यावर ग्राहक जागृती आणि त्यांचे प्रशिक्षण करण्यासाठी ते नियमितपणे भाषणांचे कार्यक्रम आयोजित करतात.
Caratellची व्याप्ती वाढवण्याची त्यांची महत्वाकांक्षा नाही . त्यांना छोटंच राहायचंय . आपण जे काम करतो ते चांगलं केलं की लोक आपल्याकडे येणारच ' अशी त्यांची धारणा आहे . या प्रवासात ते कधीही निराश झाले नाहीत की कधी खचून गेले नाहीत. हा मार्ग त्यांनीच निवडला होता आणि पुढे आलेल्या कठोर कठीण परिस्थितीवर त्यांनी विजय मिळवला.
- अंजली दिलीप प्रधान
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा