कामापुरता मामा


ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६
काही म्हणींचा अर्थच समजत नाही
कामापुरता मामा आठवतो
की कामासाठीच मामा येतो
काही केल्या उमजत नाही.

एक मात्र खरं,
विवाहसमारंभात मामाच्या नावाचा गजर होतो
क्वचितच भेटलेल्या भाचीला पाहून मामा हजर होतो.
प्रॉपर्टीच्या वादात कंस मामा दिसतो
देवकी-वसुदेवाला कायद्याच्या कैदेत टाकतो.
शकुनी मामाचं काही कामच नसतं
एमबीए भाच्याचं कोणावाचून अडत नसतं.

शाल्व मामा तर दिसतच नाही
कोण आणि कशाला शेला मळवून घेईल?
मला वाटतं,
जातं पाटा वरवंट्यासारख्या
म्हणीसुद्धा संग्रहात ठेवाव्या लागतील
काही शब्दांबरोबर
काही नातीही शब्दकोशात शोधावी लागतील.

- प्रमोदिनी देशमुख


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा