हे देवाघरचे देणे

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

प्रेम",काय असत प्रेम? अशी भावना ज्याच्या वर वर्षानुवर्षे लिहिलं जात आहे, विविध कलांसाठी जी वरदान ठरलआहे, या अडीच अक्षरांमध्ये असं काय दडलं आहे जे संपतच नाहीये ? चित्रकला,गायन, नृत्य,साहित्य, सिनेमा, .............अशा कितीतरी क्षेत्रात आपला अमर ठसा उमटवणाऱ्या आणि मानवी जीवनात वारंवार वेगवेगळ्या रूपात डोकावणाऱ्या या भावनेला जणूअमर्याद अशा क्षितिज रेषेने गुरफटले आहे......

निर्व्याज प्रेम करणं हे फार कठीण आहे. एखाद्याला गुणदोषांसकट स्वीकारणं, कुठल्याही परतफेड भावनेची अपेक्षा न ठेवता प्रेम करणं सोपं नाही. साहित्यात अमर असलेले कृष्ण राधेचे प्रेम हे "देव आणि भक्त" यांच्यातल्या तरल प्रेमाचे अतिशय देखणं उदाहरण आहे. कृष्णाने गोकुळ सोडल्यावर राधा कृष्णाला भेटल्याचा उल्लेख ठळकपणे साहित्यात सापडत नाही. जितका सहवास तिला कृष्णाचा लाभला तो जणू अनमोल ठेवी सारखा मनात जतन केला आणि उरलेल्या आयुष्यासाठी जपून वापरला. "राधा कृष्ण" या लोकमान्य नावाने त्याच्या बरोबर तिचं नाव नेहेमी करता जोडलं गेलं. तिला “कृष्णा “ पण म्हणतात. राधेने कृष्णाने गोकुळ सोडल्यावर काय केलं असेल.....की तिच्या भक्ती प्रेमाने इतकी उंची गाठली होती की त्याचे अस्तित्व असणं किंवा नसणं याच्या पलीकडे हे नातं पोचलं होतं? 

मीरेने तर त्याला कधीच पाहिले नाही, लहानपणी गंमतीने कृष्णाच्या मूर्तीची तिच्या आईने नवरा म्हणून तिची ओळख करून दिली आणि ती त्याच्या बरोबर प्रेमाच्या गूढ आणि अतूट नात्याने बांधली गेली. विष पचविण्याचं सामर्थ्य देणारे हे "भक्त आणि देवाचं" नातं हे अमर्याद आणि अपार भक्ती प्रेमाचे उदाहरण आहे.

माणूस जन्माला आल्यावर त्याला आई, वडील, भावंडं, मित्र, गुरु आणि विविध नातेवाईक याचं प्रेम लाभतं. मग संपूर्ण आयुष्य ज्याच्या बरोबर घालवायचं त्या जोडीदाराच्या प्रेमाची ओढ आणि आस लागते. या प्रकारच्या प्रेमाने फार पूर्वी पासून वेगवेगळ्या कथा आणि कहाण्यांना जन्म दिला.काही कहाण्या सफल झाल्या तर काही असफल होऊनही जनमानसात प्रसिद्ध पावल्या.या प्रेमाने कवी, चित्रकार, साहित्यकार यांना न संपणारे साहित्य दिले.

हल्लीच एक नवीन गाणं आहे,
माना के हम यार नही,
लो तैय है के प्यार नही,
फिर भी नजरे ना तुम मिलाना,
दिल का ऐतबार नही.

कसं,कोण,कुठे प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. कवीने गाण्यातल्या केलेल्या शब्दांची रचना बघा आपण दोघे मित्र नाही ....अगदी खात्री आहे की आपल्यामधे प्रेम नाही तरी पण ज्या हृदयातून प्रेमाची उत्पत्ती होते, त्या हृदयाचा आणि ही संवेदना हृदयापर्यंत पोचवणाऱ्या नजरेचा भरोसा नाही. अशा या प्रेमाच्या कहाण्यांचे किस्से जगभर अजरामर आहेत. सगळ्या प्रेमकहाण्या सफल होत नाहीत ,काळाबरोबर हृदयाच्या हळव्या कोपऱ्यात दडलेल्या या भावनेचा गुलाबी रंग काहीसा फिकुटतो पण जात नाही.

समाजाची बंधने झुगारून,बंड करून आपल्या प्रियकराबरोबर लोकमान्य बंधनात न अडकता राहणाऱ्या अमृता प्रीतम या लेखिकेची प्रेमकहाणी त्यांच्या सारखी आगळी वेगळी आहे. "अमृता प्रीतम" या प्रसिद्ध लेखिका, कवियत्री यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. काळाच्या पुढे विचारसरणी,लेखन असलेल्या या मनस्वी लेखिकेने वैयक्तिक आयुष्यात सुद्धा धाडसी निर्णय घेतले. आज "Live in” मधे राहणं सामान्य झालं आहे परंतु त्या काळी लोक विवादाला न घाबरता त्या इमरोज या त्यांच्या प्रेमी चित्रकाराबरोबर आयुष्याच्या अखेर पर्यंत राहिल्या. इमरोज यांनी पण कधी ही अमृतांना त्यांच्या भूतकाळाविषयी विचारलं नाही. त्यांच्या बरोबर सावली सारखे राहिले. त्यांच्या चित्रांमधे अमृता वारंवार डोकावत राहिल्या. इमरोझच्या चित्रकलेवर लिहिलेल्या कवितेत त्या म्हणतात,

मी तुला पुनः भेटेन... कधी, कशी, केव्हां माहित नाही
मी तुला पुनः भेटेन... 
तुझ्या कल्पनेची एक चमक होऊन तुझ्या कॅनव्हासवर उतरेन

ज्या कॅनव्हासवर इमरोझ यांनी अमृतांना अमर केला त्यांना त्याच कॅनव्हासवर अमर होण्याची मनीषा कवितेत व्यक्त करतात. याच कवितेत त्या सांगतात,

"शरीर संपलं की सार संपत पण स्मृतीचे धागे या विश्वात कण कण होऊन चिरंतन राहतात.

शरीर संपल्यावर सुद्धा जोडीदार बरोबर चिरंतन सहवासाची ओढ व जोडीदारावरच्या अपार प्रेमाच्या व्याप्तीची कल्पना कवितेच्या ओळी देतात. या भूतलावर मानवाबरोबर असलेले प्राणीआणि त्यांच्या मधल्या प्रेमाचे बरेच किस्से आहेत. राजा नल याला पक्ष्याची भाषा कळायची असे पुराणात आढळते. कृष्णाची बासरी ऐकायला गाई थांबायच्या. राणा प्रताप -चेतक, शिवाजीमहाराज- वाघ्या, डॉ.पूर्णपात्रे आणि सोनाली सिंहीण..........मानव आणि प्राण्याच्या अतूट नात्याच्या बऱ्याच कथा आहेत. निरपेक्ष प्रेम करणारे हे मुके जीव मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग कधी होतात हे त्यांच्या मानव मित्राला पण कळत नाही. सगळे काही "Animal Lover नसतात पण मानवसेवेबरोबर या मुक्या जीवांसाठी पण तळमळीने काम करणारे प्रकाश आमटे यांचं"आमटेज ऍनिमल आर्क" भूतदयेचं आगळावेगळा उदाहरण आहे. अनाथ,घायाळ प्राणी,पक्ष्यांना आधार देणाऱ्या या आर्कला प्रकाश आमटे मात्र "प्राण्याचं गोकुळ" म्हणतात. मारुती चितमपल्लींचं पक्षी प्रेम पण सर्वश्रुत आहे.

प्रेमाचे विविध रंग आहेत. यापैकी अगदी वेगळ्या रंगाचे आणि एका प्रकारची झिंग आणणारे प्रेम म्हणजे "देशप्रेम".

“देश हीच माता, देश जन्म दाता, घडो देश सेवा ऐसी बुद्धी दे अनंता"

"सब कुछ देश" ही भावना उरात बाळगून देशावर जीवापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या अभिमानास्पद साहस कथांनी आपला इतिहास भरलेला आहे.......रक्तरंजित आहे. देशप्रेमासाठी स्वतःचेबलिदान देणाऱ्या, देश्प्रेमापाई आयुष्य वाहून देणाऱ्या वीरांच्या गाथांनी मन अभिमानाने भरून येतं. वीर सावरकरांनी लिहिलेले " ने मजसी ने परत मातृभूमीला " हे गीत ऐकतांना दरवेळी मनभरून येतं. किती तळमळीने हे गीत त्यांनी लिहिले आहे याची जाणीव प्रखरतेने प्रत्येक वेळी ऐकतांना होते. अत्यंत हाल अपेष्टा सहन करून देशावर अपार प्रेम करणारे सावरकर हे भारतमातेचे थोर पुत्र आहेत.

माणसाच्या आयुष्यात बालपणापासून ते अगदी शेवटपर्यंत प्रेम वेगवेगळ्या रूपात समोर येतं असतं. मग काय आहे हे प्रेम? "सिर्फ एहसास है जो रुह से महसूस करो " की पाडगावकरांच्या कवितेतल्या ओळींसारखा "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नी आमचं सेम असतं "?

कदाचित असावं .....कदाचित नसावं ...वेगवेगळे कंगोरे असलेल्या या भावनेची बात थोडी अलग आहे. साम्य आणि हुबेहूब सारखेपणा यातली पुसट रेषा ध्यानी ठेवून " प्रेम की गंगा बहातेचलो" असं म्हणूया आणि परत भेटण्याचं आश्वासन प्रेमाने देऊन निरोप घेऊया.

-हेमांगी वेलणकर

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा