नववर्ष- एक संकल्पना


ऋतुगंध हेमंत  - वर्ष १२ अंक

“आत्या, नवीन वर्षाचे कॅलेंडर घ्या…”
म्हणाली दीप्ती, अन् ,
“अगबाई, ऑक्टोबर मध्येच?”
उद्गारले मी !

सहजच घेणार हातात, इतक्यात
दरवाज्यातून घुसला भन्नाट वारा
फडफडली सारीच पाने, अन्,
पडला धारातीर्थी गुंडाळा !!

खो खो हसली स्वरा, अन् म्हणाली
“आत्याआजी, पुढचे वर्ष गेले उडुनी”
काहीच न कळे तरी ती हसते म्हणुनी
दोन वर्षांची सई खदाखदा हसली !
अन्, अचंबित मी,
किती सहज सत्य बोलुनी गेली ही !!


उगवले वर्ष नवीन,
साजरे करून लागतो तोच ,
काही करा वा न करा तुम्ही
भराभर उजाडे मावळे दिवस
हा हा म्हणता सरे वर्ष हेही
पुन्हा मंडळी सामोरी नवीन वर्षासाठी !


प्रत्येक वर्षी,
‘उन्हाळा जरा जास्तीच यावर्षी...’ 
नि, ‘कस्से संपले वर्ष, कळलेच नाही...’
याच वाक्यांनी सांगता होई !!

सहज पाहिले सूर्याकडे,
म्हणे हसुनी
“काय ते तुमचे वर्ष ,
माझ्याभोवती केवळ एक फेरी !”

खरंच, शाळा, कॉलेज, नोकरी
सण-समारंभ, सुट्ट्या अन् सहली
निसर्गाचा कोप-प्रकोप अन् लोभही
सुखदुःखाचे प्रसंग घरी अन् दारी
अत्तराच्या थेंबावाणी
प्रत्येक वर्ष जाते उडुनी !!

आणि हिशेब आपण मोठे होतो
दर वाढदिवशी
की आयुष्यच 
होते कमी दरवेळी ? 
नक्की कशासाठी
कालगणना नि नोंदी ?

रायगडी जाता
चारशे वर्षे गळुनी जाती
वाटते, दमदार पावले टाकीत
येतील महाराज केव्हांही
तो काय घोड्यांच्या टापांचा
आवाज आला जवळी !

जाता आळंदीला वाटे,
रांधते आहे मुक्ताई
धपाटे कोवळ्या ज्ञानेश्वरा पाठी
आणि भास होतोय की खरे
ती पहा ज्ञानेश्वर भिंत चालविती !

जालियनवाला बागेमध्ये
येती ऐकू मज किंकाळ्या अन् टाहो अजुनी
अस्वस्थ मी गेल्याच वर्षी
ओरडले न राहवुनी
एका ग्रुपमधील बायकांवरी
“अरे या किंकाळ्यात,
वेफर्स आणि पॉपकॉर्न कसे खाऊ शकता तुम्ही,
दगडी हृदये तुमची”
चमत्कारिक बघती, मैत्रिणी बाजूला घेती
तरी मी चवताळलेली !

जिथे जाल तिथे होतो
इतिहास जिवंत
असेल हृदयी धग
जगतो आपण तिथला प्रत्येक क्षण !
नको भूतकाळात रमायला ?
ठीक, बघा वर्तमान काळाला...

रात्रीचे बारा, आई-बाबांचे
पहाटेचे अडीच सिंगापूरच्या मुलाकडे
कालच्या दुपारचे बारा अमेरिकेतील मुलीचे
मग कॅनडातील मुलाकडे किती बरं?
रात्रीच्या प्रहरी
आई-बाबा वेळेच्या हिशोब लावती…
मग ‘हॅपी बर्थडे’ म्हणायचे कधी ?

तरी बरे हे एकाच ग्रहावरी
आणखी शंभर वर्षांनी
हेच, प्रत्येक ग्रहावरील मुलांच्या
वर्षांचा हिशोब लावत असतील
आणि त्यांची मुले
बदलतील सूर्यमालाच
तेव्हां, कोणते युग रे तुझ्याकडे? विचारतील
आणि त्यावेळी मात्र नववर्ष ही
एक निव्वळ संकल्पना असेल हे नक्की !!



- नीला बर्वे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा