ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा , गोंधळाला उभा गोंधळी भवानी चा… बॅकग्राऊंड ला हे वाजत होते आणि मी अक्षरशः थरारून गेले, खरं तर हे गाणं काही खूप वेगळं आहे अशातला भाग नाही पण त्या वेळेस मला ते आत कुठे तरी भिडले आणि माझ्या शरीराला एक सूक्ष्म कंप जाणवू लागला. ध्यानधारणेत अशी स्थिती निर्माण होते असे म्हणतात. परंतु एखादे गाणे हि अनुभूती देऊ शकते? शेवटी मेडिटेशन म्हणजे काय, आपण एखाद्या विचारावर स्थिर होणे, किंवा एकाग्र होणे हेच ना, ती जादू संगीतात आहे. संगीत आपल्याला केवळ आनंदच देते असं नाही , संगीतात आपल्याला खेचून घेण्याची अलौकिक ताकद आहे. ज्या लोकांना संगीताची आवड असते, भले ते कानसेन असो वा तानसेन, संगीत त्यांना कधीही एकटं पडू देत नाही. ते कुठल्याही मूड मध्ये आपली साथ देतं .
आपलं भारतीय संगीत आत्म्याशी जवळीक साधणारं आहे. विविध रागमाला काही ठराविक कालावधी आणि मनोव्यवस्थेवर आधारित आहेत. किती विचार केला असेल या रागमाला रचताना. आपण सर्वसामान्य रसिक जे अनुभवतो ते संगीत या रागांवरच आधारित आहे. त्यामुळे एखादे गाणे आपल्याला सकाळी ऐकायला आवडत नाही किंवा एखादे गाणे आपल्याला शरीरात काही भावना जागवत, तर एखादं आपल्याला उदास करतं . हेच ते वाटणं, ही संगीताची देणगी. ढोबळ अर्थाने त्याचे भाग करायचे झाले तर चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत , वेस्टर्न संगीत. चित्रपट संगीताचं आपल्या जीवनात प्रचंड योगदान आहे. विचार करा समजा चित्रपट संगीत नसतं तर, तुमच्या भावना दुसऱ्यांपर्यंत कशा पोचल्या असत्या, शब्दातीत भावना. किंवा प्रवास करताना, एकटं असताना, आनंदी असताना दुःखी असताना पार्श्वभूमीवर संगीत नसतं तर? कल्पनेनेच घाबरायला होतं. निदान मला तरी.
चित्रपट संगीत आपल्यासमोर चित्र उभं करतं, मग भले तुम्ही ते गाणं फक्त ऐकलं असेल ,पाहिलं नसलं तरी, आता “ दिल ढुं ढ ता है फिर वोही “ हे गाणं ऐकताना नेमकं काय चित्र उभं राहत, माझ्या मनांत अनेक वर्षांनी केवळ माझी अशी स्वतःची अशी सुट्टी उभी राहते, जेव्हा मी एकटीच डोंगरदऱ्यात भटकत असेन , तिथली शांतता तिथला निसर्ग डोळ्यांनी आणि गात्रांनी अनुभवत असेन. चालत राहीन दूरवर. “वादी में गुंजती हुई खामोशीया सुनें” असच काहीसं फुरसत मिळाल्यावर आपण सगळे करू ना.. “कतरा कतरा मिलति हैं “ या गाण्यात कसं कोण जाणे पाणीच दिसतं , तसं ते चित्रपटात आहे ही, म्हणून नाही तर त्या गाण्यात जो ओव्हरलॅप आहे ना “प्यासी हू मैं , प्यासी रेहने दो” ते पाण्यातले तरंगच वाटतात, एकमेकांवर स्वर होणारे. “फिर वोही रात है , फिर वोही रात है ख्वाब की” मध्ये प्रियकराची माया दिसते त्याची वासना नाही. खरं तर रात्रीचं गाणं आणि ते हि किशोर कुमार च्या आवाजात, पण त्यात कुठलीही शरीर भावना दिसत नाही, दिसतं ते अतिशय मायेने कुशीत घेणं. “रहते थे कभी जिनके दिल में “ हे ममता मधलं गाणं काळीज पिळवटून टाकतं , तर “एक अकेला इस शहर में “ हे घरोंदा मधलं गाणं सगळंच संपल्याचं फीलिंग देऊन उदास करून जातं . मग “तू चंदा मैं चांदनी” हे रेश्मा और शेरा चं गाणं ऐकलं कि हृदयात झंकारायला लागतं, शरीरात एक विजेची लहर सळसळत गेल्याचा आभास. “सांसो को सांसो में “ हे हम तुम चं गाणं मला प्रचंड sensuous वाटतं, “लम्हो की गुजारिश है ये, पास आजा ए” या शब्दांनीच ती संवेदना जाणवते. “कई बार यूही देखा है” हे गाणं मनाला बजावतं, पाय जमिनीवर घट्ट ठेव अशी ताकीद देतं. “कहि तो मिलेगी, बहरो कि मंझिल” हे गाणं खूप दूरवर दोघेच चालत जात असल्याचा फील देऊन जातं. पूर्वीच्या हिंदी चित्रपट संगीतातला शृंगार खूपच सोज्वळ असायचा, फक्त व्हॅम्प ची गाणी थोडीफार मादक असत. “अब जो मिले हो तो बाहो को बाहोमे” “मेरा नाम है शब्बो” “हूस्न के लाखों रंग” ही त्यातल्या कलाकारांनी उंचीवर नेऊन ठेवली आहेत. मला स्वतःला सागर मधलं “जाने दो ना” किंवा “क्या यही प्यार हैं “, “बहोत दूर हमें चले जाना हैं “ ही गाणी मादक वाटतात. या सर्वांवर कडी म्हणजे “ये हँसी वादीया “ हे रोजा मधलं गाणं आहे, त्याच चित्रीकरण छान आहेच पण डोळे मिटून ऐकलं तरी ती शिरशिरी , उबदार मिठी , फुलपाखरं हे सगळं अनुभवायला येतं. “ एक प्यार का नगमा है” हे असचं माझं अत्यंत आवडतं गाणं, त्यातलं “दो पल के जीवन से एक उम्र चूरानी हैं “ हे शब्द मन हेलावून सोडतात. निखळ आनंद देणारी असंख्य गाणी आहेत, तुमच्या हृदयाला ठंडक देणारी सदाबहार गाणी, जी कधीही ऐकली तरी मूड झकास होऊन जातो. उदा. “ओ चाँद जहाँ वो जाए “हे लता अशा चा द्वंद्वगीत, मिस मेरी मधलं “ सो गया सारा जमाना , निंद क्यो आता नाहि”, मुनीमजी मधलं “एक नज़र बस एक नज़र “, दिल कि नजर से नजरो कि दिल से , आझाद मधलं “कितना हँसी है मौसम”, अलबेला मधलं “बलमा बडा नादान”, तेरे मेरे सपने मधलं “ए मैने कसम ली”, प्रेमपुजारी मधलं “फुलों के रंग से” अशी अगणित. “रिमझिम गिरे सावन” मला लता च्या आवाजातलं खूप आवडतं ऐकायलाही आणि पाहायलाही. किती अप्रतिम चित्रीकरण आहे. प्रेमी युगुल मुंबई च्या धुवदार पावसात विहरतय, बेफिकीर आपल्याच धुंदीत मस्त, दुनियेची पर्वा न करता, प्रेमाच्या आणि पावसाच्या वर्षावात चिंब चिंब होत. गमन मधलं “आप की याद आती रही रात भर” मला प्रचंड अस्वस्थ करत, त्यात हाच पाऊस दिसतो पण तो खिडकीतून अविरत कोसळताना दिसतो, त्यात काही उत्फुल्लता नसते, असत ते साचलेपण आणि एकारलेपण. जस वाट बघताना वाटतं तसंच .
यादी कधीही न संपणारी.
गझल म्हटली की अर्थ मधली “ कोई ये कैसे बतायें के हम तन्हा क्यो है” अगदी आठवतेच. नको नको म्हणताना मित्रांसाठी एका पार्टी ला गेलेली नायिका, तिला एकटं वाटू नये म्हणून, प्रत्यक्षात त्या गोतावळ्यात खूप एकाकी फील करणारी नायिका, तिच्याकडे बघता बघता गाणारा तिच्या चेहऱ्यावरील आणि पर्यायाने मनातले भाव वाचू शकणारा हितचिंतक,अचानक पार्टी मध्ये नायिकेचा नवरा आणि त्याची प्रेमिका यांचा नाट्यपूर्ण प्रवेश. आणि एकंदरीतच वातावरणात साचलेले अवघडलेपण “तुम मसर्रत का कहो या इसे ग़म का रिश्ता ,कहते हैं प्यार का रिश्ता हैं जनम का रिश्ता ,हैं जनम का जो ये रिश्ता तो बदलता क्यों है ? “ कोणाकडेच याचे उत्तर नाही. मिराज ए गझल हा गुलाम अली आणि आशा भोसले चा गझल संग्रह माझ्या अत्यंत आवडता.” दयार ए दिल कि रात में, चराग सा “ , नैना तोसे लगे, सारी रैना जागे, एक सो एक गझल , गुलाम अली चा नितळ आवाज आणि आशा चा तयारीचा दमदार आवाज. गुलाम अलींचं “कैसी चली है अब के हवा तेरे शहर में “ लाजवाब. “लता sings for गालिब” ने मला गालिब वर प्रेम करायला शिकवलं. “ये हम जो हिज्र में” ऐकल्यावर सरसरून काटा येतो. तलत अझीझ चा आवाज असाच आवडीचा. नाजूक , उर्दू नजाकतीने भरलेला. “ज़िन्दगी जब भी 'तेरी बज्म में “, फिर छिडी रात बात फुलों की , किती मुलायम वाटतं ऐकायला.
मराठी संगीत तर अथांग सागरासारखं आहे. “डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे” “रूपास भाळलो मी” “काल मी रघुनंदन पहिले”, “नवीन आज चंद्रमा” अंगावर मोरपीस फिरवणारी गाणी. चांदण्यात फिरताना ऐकताना येणार अशारीरी अनुभव, मालवून टाक दीप चा संथ खुलत जाणारा शृंगार, सावर रे सावर रे चे जीवघेणे चढ उतार , घर थकलेले संन्यासी ची विरक्ती, उंबरठा चित्रपटातलं “गंजल्या ओठास माझ्या, धार वज्राची मिळू दे” हे रवींद्र साठे यांच्या आवाजातलं गीत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन देऊन जातं. ही सर्व अर्थातच हृदयनाथ मंगेशकरांनी जादू. श्रीनिवास खळेंचं “श्रावणात घननीळा बरसला” ऐकलं कि मनात आनंदाचे झरे पाझरल्याचा भास होतो, पवित्र , लखलखीत प्रसन्न असा अनुभव. जाईन विचारीत रानफुला , किंवा जाई जुई चा गन्ध मातीला ऐकलं कि रानावनात हरवून जावंसं वाटतं . बगळ्यांची माळ फुले हे तर मी डोळे मिटून ऐकते, डोळ्यासमोर शुभ्र बगळ्यांची माळ दिसू लागते, शिवकल्याण राजा मधलं “गुणी बाळ असा जागसि का रे बाळा” ऐकलं कि डोळे भरून येतात. “हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती सम तेजा” ने स्फुरण चढतं, निरजरूप दाखवा हो ऐकलं कि प्रत्यक्ष पांडुरंगाचा साक्षात्कार झाल्याची जाणीव होते. “ जीव रंगला दंगला असा” ऐकलं कि मोकळा आकाश आणि त्या खालच्या निसर्गाच्या सानिध्यातलं एकमेकात विरघळून जाणं दिसतं. “जाहल्या काही चुका” या गाण्यातल्या अतिशय अवघड वाटणाऱ्या जागा लताबाई ज्या सहजतेने घेतात ते ऐकून आपण नशीबवान आहोत याची जाणीव होते. जिवलगा कधी रे येशील तू मधला आशा ताईंचा ऋतूंप्रमाणे फिरता आवाज, घनरानी , ऋतू हिरवा चा आवाका, हे सगळंच थक्क करणारं. माणिक वर्मांचं “घननीळा लडिवाळा” हे केवळ त्यांनीच म्हणाव असं.. भरभरून दिलेलं दान, हृदयात जपलेलं.
“चाला वही देस “ हा एक असाच अप्रतिम अल्बम. मीरेची भजने आणि हृदयनाथ मंगेशकरांनी चाल. आवाज अर्थातच लता मंगेशकरांचा. लताचा पवित्र देव्हाऱ्यातील आवाज मीराबाई च्या भजनाला पूर्णपणे न्याय देतो. मीरे चे कृष्णावर प्रेम होते पण ते अलौकिक होते. त्याला कुठल्याही विशेषणांची जरुरी नव्हती. लता बाईंनी ती भजने अजरामर करून ठेवली आहेत. माई माई कैसे जिऊ मधली आर्तता, राधा प्यारी मधला अवखळपणा, किनु संग खेलू होरी मधली व्यथा, सावरो नंदनंदन मधली आर्तता, म्हारा रे गिरीधर गोपाल मधली प्रेमळ हक्काची भावना हे सर्वच केवळ अप्रतिम. तोच आनंद कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनातून मिळतो. वेगळ्याच विश्वात संचार करून आल्याचा अनुभव, उड जायेगा हंस अकेला , हिरण न समझ बुझ, अवधूता ऐकलं की क्षणभर शरीरात आत्मा खरंच असतो असं वाटून जातं. किशोरी अमोणकरांचं “सहेला रे” वेगळ्या वातावरणात नेऊन ठेवत, प्रभा अत्रेंचं “जागु मैं सारी रैना “ विलक्षण संवेदना निर्माण करते , मालिनी राजूरकरांचा तराणा , मुकुल शिवपुत्र यांचा आऊट ऑफ द वर्ल्ड आवाज, शिव हरी यांचं कॉल ऑफ द वॅली, वीणा सहस्त्रबुद्धे च्या आवाजातला ठेहराव. परवीन सुलताना ची आवाजातली फिरत, बेगम अखतर च्या आवाजतली खनक, देवाचे किती आभार मानायचे.
आजकाल मला वेस्टर्न क्लासिकल आवडायला लागलंय . अजून तितकंसं कळत नाही पण त्यातही एकप्रकारचं spiritual असं काहीतरी आहे. काय ते नक्की सांगता नाही येणार. जेव्हा मी प्रथम “moonlight sonata “ ऐकलं तेव्हा मी अंतर्बाह्य थरारून गेले, त्याचा हृदयाच्या स्पन्दनांसारखा विविध लहरीत फिरणारा ध्वनी शब्दातीत. तसेच जॅझ या प्रकाराबद्दल कुतूहल निर्माण झाले. विशेषतः Midnight in Paris या चित्रपटाच्या सुरवातीचा पीस Sidney Bechet - Si Tu Vois Ma Mère (Midnight in Paris), कदाचित मी जेव्हा पॅरिस ला जाईन , तेव्हा हेच हेडफोन वर ऐकत पॅरिस अनुभवेन. Amy winehouse , जी आता हयात नाही आहे, तिचा आवाज हि असाच वेगळा. बीटल्स , एरोस्मिथ , क्वीन्स, काहीतरी सांगून जातात. त्यांचं वेगळेपण, त्यांचा आवाज, वाद्यावरची हुकूमत, समर्पक शब्द, सगळंच वेगळं पण पुनः पुन्हा ऐकावंस वाटणारं. साऊंड ऑफ म्युझिक तर मला थेट ऑस्ट्रियाच्या विस्तीर्ण पसरलेल्या हिरवळीवर घेऊन जातो. गॉडफादर च “Speak softly” सिसिली मधल्या ऑलिव्ह रंगाच्या संध्याकाळी घेऊन जातं. बीथोवेन, बाख , मोझार्ट, ही मंडळी त्यांच्या सुरावटीतून माझ्या रेडिओ तुन माझ्या हृदयात झिरपत असतात. आणि मी नकळत या ध्वनीचा भाग होऊन या लहरींच्या अवकाशात विहरत राहते, साथीला असतं ते फक्त संगीत.
- जुईली वाळिंबे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा