सारा महाराष्ट्र २०१७ मध्ये हादरला.IPS ऑफिसर्स , मिलिंद आणि मनीषा म्हैसकर यांच्या १८ वर्षांच्या मुलाने - मन्मथने आत्महत्या केली गच्चीवरून उडी मारून! कारण कधीच कळले नाही.देशभर या घटनेचे पडसाद उमटले.२०१४ मध्ये कोची येथे अशीच घटना घडली होती .आयुष हाही IPS अधिकारी अभय यांचा मुलगा.या आणि अशा अनेक मुलांना सामाजिक, आर्थिक स्तरांवर उकृष्ट स्थान ,बौद्धिक वारसा , स्वतःउत्तम शिक्षण घेत असतांना, काय कारण असावे कीं तडकाफडकी जीव द्यावासा वाटावा ? संवाद, परिसंवाद , शाळा -कॉलेजमध्ये मानसोपचार तज्ञाची व्याख्याने , वर्तमानपत्र , मासिके यामधून मान्यवरांचे लेख ...सारे ४/५ महिने अव्याहतपणे सुरु होते. ४०-५० वर्षे वयोगटातील पालक अतिशय चिंतेत पडले.सारीकडे एक अस्वस्थतेचे दाट धुके अजूनही आहे.
दशकागणित माणसाची प्रगती होतच आहे वर्षनुवर्षे .पण गेल्या ३० वर्षांत टेकनॉलॉजीचा इतका विस्तार झाला ही प्रगती प्रचंड वेगाने झाली नि होत आहे. बाजारात दर दिवशी काहीतरी नवे अवतीर्ण होतेय की कालचा प्रॉडक्ट, ज्यावर आपण अतीव समाधानी होतो , तो तत्काळ जुनापुराणा होत आहे. थोड्याफार लाटा अंगावर घेऊन पोहणाऱ्याची प्रचंड मोठी लाट आली, ती पार करेपर्यंत दुसरी ..तिसरी ...जी दमछाक होते तीच आजच्या समाजाची होत आहे.एकीकडे सुखसुविधा मुबलक होत आहेत, "घटोंका काम मिनिटोंमें नही, सेकंदोमें " हो रहा है !आधुनिक उपकरणांची घरांत रेलचेल ,अत्याधुनिक खेळणी ,विविध खाद्यपदार्थ , उत्तमोत्तम कपडेलत्ते आवाक्यात .खरं तर साऱ्याचा व्यवस्थित वापर करून प्रत्येकजण सुखी/समाधानी झाला पाहिजे. पण ........
६०-७० वर्षांपूर्वी माणूस अधिक समाधानी होता असे म्हणायला वाव आहे.शेतकरी असो वा चाकरमानी कोणत्याही पदावर कार्यरत असो, ठराविक वेळ काम करून , साधं रुचकर जेवून व्यवस्थित विश्रांती घेत असे.मिळणाऱ्या पैशांत घरखर्च , कार्ये ..सारं व्यवस्थित बसत असे. पैशाला आत्यंतिक महत्व नव्हते.कौटुंबिक नातेसंबंध खऱ्या अर्थाने जपले जात होते.गेल्या २५/३० वर्षांत जग जवळ आले , अगदी मुठ्ठीमें,पण माणसे दुरावली.आता केंद्रबिंदू माणसाऐवजी पैसा झाला. शिक्षणसंस्था पैसे मिळविण्यासाठी पिढी तयार करणारे कारखाने झाले.पदव्या , नोकऱ्या , प्रचंड स्पर्धा .स्पर्धेत उतरून ,उसाच्या गुऱ्हाळात रस निघतो तसा कमावतातही पैसा पण चिपाड होऊन जातात. ताकत संपते दमछाक होऊन.मग मिळेल त्या वेळी खाणे, पिणे , पार्ट्या , सहली ....सुख ओरबाडायचे. कधी कामवाल्यांवर मुले सोपवून.त्यांनाही खेळणी , कपडे, अपरंपार .जरा मोठे होताच क्लासेसचा भडीमार.मूलही खेळ ,अभ्यास , स्पर्धात्मक परीक्षा ..सारं काही करतंय,फक्त बोलायला कोणी नाही. मग मनोरंजन T .V ., मोबाईल !! काय वाट्टेल ते. शरीराची पूर्ण वाढ व्हायच्या आधी सारे ज्ञान .कळीने हळूहळू उमलावे पूर्ण फुलांत रूपांतर होईपर्यंत , मग बघा किती छान डोलते फांदीवर ! पिलाच्या पंखात ताकत आल्यावर घेतेच भरारी उंच ,निळ्या नभी आत्मविश्वासाने ! इथे कोवळे पंख विहरतात मोबाईलच्या दुनियेत ,स्वतःच्या च आकाशाच्या सीमा सीमित करून.त्यातून मित्रांच्या सहवासात विविध गोष्टींची चव.पूर्वी २२/२३ वर्षे वयाला शिक्षण पूर्ण होऊन आत्मविश्वासाने जगात पाय टाकायला मूळ उत्सुक असे, जगाच्या अपार कुतुहलासकट.आता त्या वयांत सारी कुतुहलं शमलेली असतात .नाही कशाची उत्सुकता. एकच. पैसा कमवायचा. Money making machine म्हणून ओळख वाढवायची. या टप्प्यावर नैराश्य येते.लकलकत्या डोळ्यांऐवजी दिसतात विझलेली बुब्बुळे !
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, लहानपणापासून मुलाची प्रत्येक मागणी मान्य होते. कदाचित आपण वेळ देऊ शकत नाही या अपराधीपणाच्या भावनेने, कधी, मला लहानपणी हवे होते, पण नाही मिळाले परिस्थितीमुळे, माझ्या मुलाला तसे नको/ काही कमी पडायला नको या विचाराने स्वतःहून भरमसाठ देतातच पण त्याने मागितले, की दिले लगेच….. यामुळे,’ नाही’ या शब्दाची ओळखच होत नाही मुलांची आणि मग पुढे कधी किंचीत अपयश/ साधी शाळेत कुठल्या उपक्रमात निवड न होणे …..थोडक्यात कुठेही कोणताही नकार ही मुले सहन करू शकत नाहीत. एकतर प्रचंड निराशावादी बनत जातात नाहीतर आक्रमक. दोन्हीही वाईट. दोन्हीमध्ये कोणाच्यातरी जाळ्यात फसण्याची शक्यता नि फक्त अधोगती. हळूहळू येणारे नैराश्य कधी पालकांच्या लक्षात येत नाही. आपण आपल्या अपत्याला काही द्यायला कमी पडत नाही या धुंदीतअसतात नि ती ओसरते तेव्हां वेळ निघून गेलेली असते. कित्येकवेळा, एक सर्वसामान्य दृश्य दिसते, मूल घरांत एकटेच खेळत असते नि आई वडील मोबाईलवर व्यस्त असतात.जेवढा वेळ आपलं फेसबुक अपडेट करायला देतात तेवढाही वेळ मुलांसाठी देत नाहीत.मूल लहानपणापासून एकटं पडतं.छोट्या छोट्या गोष्टीही त्याला जेव्हां share कराव्याशा वाटतात,तेव्हां ऐकायला कोणीही नसतं. लहानपणापासून हर्ष , खेद, राग, निरागसपणा ..साऱ्याच भावना दबल्या जातात. त्यातून,90% गुण मिळाले तर 95 % कां नाहीत, विचारणारे पालकही असतात. पैसे टाकले की मुलाने सर्व activities मध्ये पारंगत, शाळेत अत्युच्च गुण, डॉक्टर/IT सारख्या मोठ्याच अपेक्षा, अन् मग कुठे मागे पडले की, नैराश्याच्या झटक्यात मुले जीवनच संपवायला जातात.
यांवर पहिला उपाय , पालकांचे बौद्धिक घ्यायला हवे . 70% समस्या तेथेच सुटू शकतील. लहानपणापासून मुलांना वाचनाची गोडी लावावी. वयानुसार इसापनीती, रामायण महाभारत इत्यादींच्या गोष्टींपासून सुरुवात करून हळूहळू इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वे,त्यांच्या जयापराजयासह ,चुकां, जिद्द सारे काही वाचतांना, मूल घडत जाते. धीरूभाई अंबानी ,रतनजी टाटा , करसनभाई पटेल (निरमाचे संस्थापक )अशांची चरित्रे वाचून यशस्वी होण्यास ज्ञान, संयम व मेहनत करायची तयारी पुरेशी आहे याचे आकलन होते तर अब्दुल कलाम, अमिताभ बच्चन यांच्या सारखे पहिल्या ठिकाणी नाकारले गेल्यावर क्षणिक निराशेतून जिद्दीने उभे राहून असे कर्तृव दाखविले, त्यांच्या क्षेत्रात असे स्थान प्राप्त केले की तिथपर्यंत पोहोचणे भल्याभल्यांना अशक्य .बाबा आमटे, त्यांचे कार्यरत कुटुंब , सिंधुताई सकपाळ ,डॉक्टर बांग (दोघेही ) वाचतांना सामाजिक जाणिवेपोटी किती त्रास सहन करून शेकडो लोकांचे भले केले , मूर्तिमंत त्याग मनावर ठसतो.
मुलाला जगाच्या स्पर्धेस तोंड देण्यास सज्ज करायचे असेल तर शाळा , कॉलेजच्या अभ्यासाबरोबर हे वाचन , त्यावर चर्चा आवश्यक आहे त्या बरोबरीने एक तरी खेळ मुलाने (इथे प्रत्येकवेळी मुलगा आणि मुलगी अपेक्षित आहे ) खेळायलाच हवा. आरोग्यदृष्ट्या उपयुक्त आहेच पण मानसिक आरोग्यदृष्ट्या अनिवार्य आहे. खेळात हार जीत होतच रहाते, ती स्वीकारून पुह्ना कसे प्रयत्न करायचे याचे धडे आपोआप मिळत जातात, जे पुढील जीवनाच्या स्पर्धेसाठी उपयोगी पडतात .आणि मन:शांतीसाठी साऱ्या कुटुंबानेच योग साधना अंगिकारावी.
जरुरी वाटली तर मुलांचे समुपदेश करायला हवे. त्यासाठी पालकांना आपल्या मुलाचे वागणे , बदललेला मूड वेळीच लक्षांत यायला हवा. संवाद असेल तर हे सहज शक्य आहे. तरुणांनी हे लक्षांत ठेवायला हवे की, आपले प्रयत्न , स्वप्ने, जिद्द कधी सोडता कामा नये .एक दरवाजा बंद झाला तर सात खिडक्या उघडतात .
वयाच्या तेविसाव्या वर्षी अब्राहम लिंकन यांची नोकरी गेली. त्याच वेळी विधानसभे वरील जागा गमावली. तीन वर्षात त्यांच्या प्रेयसीचा अंत झाला. वयाच्या 39 व्या वर्षी कमिशनर, तर 49 व्या वर्षी, U.S.Senator बनण्याची संधी गमावली. बिजनेस मध्ये मंदी आली. सतत अपयशी ठरलेले हे व्यक्तिमत्व वयाच्या 52 व्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.Don ‘t Give up.. म्हणणे वेगळे आणि करून दाखविणे वेगळे! परंतु या अशा उदाहरणांवरून हे लक्षांत घ्यायला हवे की दुसरा कोणी आपले मूल्यमापन करूच शकत नाही. आपल्या या स्वप्नांचा पाठपुरावा करतांना, आपण पुरेसे चांगले, स्मार्ट, प्रतिभावान नाही... हे दुसऱ्याला सांगण्याची परवानगी द्यायचीच नाही. आपली झेप, क्षमता आपण ठरवायची नि आपण मनावर घेतले की, काहीही करू शकतो. हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या बिल गेट्सने मायक्रोसॉफ्टची कल्पना राबविण्यासाठी कोर्स मध्येच सोडून दिला. पुढचा इतिहास सर्वांना माहीतच आहे. तीच गोष्ट सचिन तेंडुलकरची. चार्ल्स डार्विनला त्याच्या वडिलांनी, अत्यंत आळशी, फक्त कुत्र्यांची काळजी घेणारा व उंदीर पकडणारा म्हणून बोल लावले. तोच डार्विन एकोणिसाव्या शतकातील सर्वात प्रभावी शास्त्रज्ञ म्हणून मान्यताप्रत पावला आणि त्याचा उत्क्रांतीचा सिद्धांत आजही मानला जातो. आत्यंतिक गरिबीतील चार्ली चॅप्लिनला वयाच्या ७व्या वर्षांपासून workhouse मध्ये काम करायला लागले . ९व्या वर्षी वडील मरण पावले,आई मानसिक आजारी झाली.दोन्ही भावंडे कित्येकवेळां उपाशी झोपत. अशावेळी stage play पासून सुरुवात करीत चॅप्लिन हॉलिवूडमधील मूकपटांचा अनिभिषक्त नायक झाला. देश-परदेशांतील शेकडो उदाहरणे हेच सांगतात की , Never Give up . जन्माला येणारा प्रत्येक जीव काहीनाकाही skill घेऊन येतोच येतो.
आई आजारी आणि वडिलांबरोबर तणावपूर्वक संबंध असे बालपण गेलेल्या J.K.Rolling ला ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही. बाहेरून परीक्षा( external ) देऊन, पदवी प्राप्त केली.आईचे निधन , घरगुती अत्याचारांनी विवाहसंबंध संपुष्टात. प्रत्येकवेळी आलेल्या अपयशाने ती खचली नाही, की, निराश झाली नाही. पुन्हा सावरून हॅरी पॉटर ची कथा लिहिली. तब्बल 12 प्रकाशकांनी नाकारलेली कथा, ब्लूम्सबरीने केवळ पंधराशे डॉलर्स मानधन देऊन प्रकाशित केली आणि तिने इतिहास घडविला. पुस्तक लेखनातून अब्जाधीश झालेली पहिली लेखिका, J.K.Rolling !!
शेखर नाईक,शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेला, जन्मांध, काही काळात पित्याचे छत्र हरपले, बाराव्या वर्षी आईही गमावली. नशिबाशी संघर्ष करीत,बर्याच आर्थिक आणि सामाजिक अडचणीनंतर नाईक एक विजेता म्हणून उदयास आला .आपल्या तीव्र इच्छाशक्ती आणि चिकाटीमुळे तो टी -20 ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियन बनला आणि त्याच्या नावावर 32 शतके आहेत.आणि सरकारने त्याला पद्मश्री किताब देऊन सन्मानित केले.
प्रीती श्रीनिवासन,19 वर्षांखालील तामिळनाडू महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. पोहतांना अपघात होऊन तिच्या मानेखाली अर्धांगवायू झाला, तरीही ती आपल्या संस्थेच्या, सल्फ्रीच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देत आहे. तिने गंभीर अपंग असलेल्या महिलांना आशा प्रदान करण्यास सुरवात केली आहे.
साईप्रसाद विश्वनाथन लहान असतांनाच त्याच्या शरीराच्या खालच्या अर्ध्या भागातील संवेदना गेल्या. परंतु त्यामुळे डगमगून जाणारा तो नव्हता. अथक प्रयत्नांनी तो भारताचा पहिला दिव्यांग skydiver बनला आणि 14000 फुटांवरून स्कायडायव्ह करणारा,पहिला भारतीय दिव्यांग म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये त्याचे नाव नोंदले आहे. सहस्रा ही संस्था त्याने स्थापन केली असून ती आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणारी संस्था आहे. सध्या तो भारतातील Deloitte U.S.मध्ये जोखीम सल्लागार म्हणून काम करतो.
राजस्थानातील एका अतिशय लहान गावांत,एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मांध असलेल्याअकबर खानचे बालपण अतिशय कठीण होते. त्याचा मोठा भाऊ सुद्धा जन्मापासूनच दृष्टिहीन होता.गरीबी तर इतकी, दोन वेळच्या खाण्याची वानवा. मात्र मोठ्या भावाने शिक्षणास सुरुवात करून अकबरलाही नेले.दोघांनीही शिक्षणात उत्तम गुण प्राप्त केले. नैराश्यापासून दूर राहिलेल्या या भावंडांचे कौतुक करावे तेवढे कमीच. दोघांचे शिक्षण शक्य नाही म्हणून मोठ्याने कामास सुरुवात करून धाकट्यास शिकविले. प्रत्येक परीक्षेत मेरीट मध्ये येऊन त्यानेही त्याचे चीज केले. संगीतात मास्टर डिग्री संपादन केली. Staff Selection Commission मध्ये पहिला आला. अनेक पुरस्कार प्राप्त झालेला अकबर आज सर्वार्थाने मानाच्या स्थानावर आहे.
गिरीश शर्मा, लहान असताना रेल्वे अपघातात त्याचा एक पाय गमावला. पण, आयुष्यातील या धक्क्याने त्याला बॅडमिंटन चॅम्पियन होण्यापासून रोखले नाही. त्याच्याकडे फक्त एक पाय आहे जो इतका मजबूत आहे की तो केवळ सहज खेळत नाही तर संपूर्ण कोर्टाला सहज कव्हर करतो.
अनेक वर्ष एफ 1 मध्ये स्पर्धा केल्यानंतर, अलेक्स झनार्डी ला 2001 मध्ये एक अपघात झाला ज्यामध्ये दोन्ही पाय कापण्यात आले. तीन वर्षांनंतर तो पुन्हा बीएमडब्ल्यू चालविण्याच्या मार्गावर होता, ज्यासाठी त्याने स्वत: काही कृत्रिम अवयव तयार केले होते.त्याने चार वर्ल्ड टूरिंग कार चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसीसी) जिंकली. तथापि, 2007 मध्ये त्याने खेळाच्या प्रयत्नांना अनुकूलित सायकलिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.त्याने चालवलेले ट्रिसायकलही स्वतः डिझाइन केले आहे आणि आजपर्यंत त्याने तीन पॅरालंपिक सुवर्णपदके जिंकली आहेत.
अभ्यासाबरोबर नृत्याचे धडे गिरविणाऱ्या सुधा चंद्रनला सोळाव्या वर्षी अपघातामुळे पाय कापायला लागल्यावर, मनाची स्थिती काय झाली असेल , याची कल्पना करवत नाही. साधे उभे राहणे, आधाराविना चालणे कठीण, या अवस्थेतून प्रयत्नांती बाहेर पडून, पुन्हा नृत्यही करू लागली !तिच्या जिद्दीला, मनोबलाला साऱ्या जगाने सलाम केला. तिच्याच जीवनावरील मयूरी या तिनेच प्रमुख भूमिका केलेला सिनेमा केवळ गाजला नाही तर , त्याला National Award ही मिळाले. कितीतरी T.V. Serials मध्ये आजही काम करणाऱ्या सुधाने अनेक मल्याळम् , तमिळ,हिंदी सिनेमांत अभिनय केला, करत आहे.अनेक पुरस्कार तिला प्राप्त झाले आहेत. बालपणी झालेला पोलिओ ,पाठीच्या कण्याच्या अतोनात समस्या यांमुळे आयुष्याच्या बराचसा काळ पलंगावर व्यतीत करायला लागला, तरीही कलेमध्ये स्वतःला झोकून देऊन विसाव्या शतकातील सुप्रसिद्ध चित्रकार, फ्रिडा कहलो,जन्मांध असूनही गीतकार आणि संगीतकार म्हणून प्रसिद्धी मिळविलेले,” गीत गाता चल, ओ साथी गुनगुनाता चल ,जब दीप जले आना,ले जाएंगे, ले जाएंगे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ,ठंडे-ठंडे पानी से नहाना चाहिए, सुन सायबा सुन, प्यार की धुन अशी अनेक गीते देणारे आणि पुरस्कार प्राप्त करणारे, रवींद्र जैन,तीव्र स्किझोफ्रेनियाने ग्रासलेला तरीही गणिततज्ञ म्हणून ख्याती मिळवून 1994 मध्ये अर्थशास्त्रात नोबेल प्राईज मिळविणारा जॉन नॅश, Life Without Limbs संस्था ,जी अपंगांसाठी कार्यरत आहे, त्याचा संस्थापक, अनेक पुस्तके लिहिलेला, T.V. व वTalk Shows मधून सातत्याने चमकणारा आणि स्वतः अपंग असूनही जगभर प्रेरक भाषणे देत फिरणारा निक वुझिक, संगीतकार, लेखक आणि इटालियन मूळचे संगीत निर्माता, ज्याच्या 75 दशलक्षाहून अधिक रेकॉर्ड विकल्या आहेत नि जो वयाच्या बाराव्या वर्षी आंधळा झाला असा अॅन्ड्रिया बॉक्सेली,सर्वात प्रेरणादायक अपंग सेलिब्रेटींपैकी एक असण्याव्यतिरिक्त,व्हीलचेयर स्केटिंग हे वैशिष्ट्य असणारा, व्हीलचेयरच्या इतिहासातील प्रथम सोमरसॉल्ट करणारा, अॅरॉन फोदरिंगहॅम अशी असंख्य उदाहरणे आहेत की कोणावर जन्मापासून आघात, तर कोणाला अपघाताने दुर्दैव समोर उभे ठाकलेले. सुरुवातीला नक्कीच त्यांना नैराश्य आले असेल, माझ्याच वाट्याला हे कां, या विचाराने त्रस्त झाले असतील, पण त्यावर मात करून त्यांनी जीवनाची सकारात्मक बाजू स्वीकारली आणि आपापल्या क्षेत्रात उच्चासनावर जाऊन बसले.
हिमांशु रॉय सारख्या धडाडीच्या IPS ऑफिसरने आत्महत्या केल्याने देशभर खळबळ माजली. केवळ या वर्षात सहा-सात बँक ऑफिसर्सनी कामाच्या प्रचंड ताणामुळे स्वतःला संपविले. हे थांबविता आले नसते कां ?एक बँक अधिकारी, शाखाप्रमुख म्हणून काम करितांना, मीही कामाचा ताण, दडपण, उत्तम काम करीत असतांनाही वरिष्ठांची दादागिरी, छळवणूक अनुभवली आहे. येते, अशावेळी प्रचंड निराशा येते, हे मीही मान्य करते. परंतु अशावेळी स्वतःला संपवून नुकसान कोणाचे झाले? चीड संताप, अगतिकता, नैराश्य येतेच. शिवाय, घरापासून दूर, भावना share करायला कोणी नाही जवळ…... सारी परिस्थिती आत्महत्येच्या विचारापर्यंत आणून सोडते, पण सावरायचे असते स्वतः च स्वता:ला !! ज्यांच्यामुळे त्यांनी हा दुख्ख:द निर्णय घेतला, त्यांना सुतराम फरक पडला नाही. नुकसान झाले ते त्यांच्या कुटुंबाचे.त्यापेक्षा नोकरीचा राजीनामा देता आला नसता कां ? या पदावर काम करणाऱ्यांची इतकी योग्यता व क्षमता नक्कीच आहे की कुटुंबाला सांभाळू शकू इतके उत्पन्न नक्कीच मिळवू शकतो. आणि वर दिलेली अनेक उदाहरणे पाहिली तर त्यांच्याइतकी आपली परिस्थिती बिकट नाही हे हे मान्य करायलाच हवे.
स्टीफन हॉकिंग च्या जिद्दीला, मन:शक्तीला प्रणाम केल्याशिवाय लेख पुरा होऊच शकत नाही.
एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, विश्वविज्ञानी आणि प्रख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचे २१ व्या वर्षी एएलएसचे निदान झाले. त्याला जगण्यासाठी अजून दोन वर्षे देण्यात आली. तो 76 वर्षांचा होईपर्यंत जगला.तीस वर्षांहून अधिक काळापर्यंत त्याला डोक्यापासून पायापर्यंत अर्धांगवायू झाला होता आणि त्याने संवाद साधण्यास सक्षम व्हावा यासाठी व्हॉईस सिंथेसाइजर वापरला शेवटी केवळ आणि केवळ बुब्बुळांच्या हालचालींनी संवाद साधला.चुकून नैराश्याच्या वाटेवर जायची वेळ आलीच तर याचे स्मरण करावे ,आपोआपच मुखातून शब्द बाहेर पडतील, “ तेथे कर माझे जुळती,” आणि सहजपणे समोर नवी सोनेरी वाट दिसू लागेल.
नीला बर्वे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा