ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
मनातील विचार प्रत्यक्षात साकारताना पाहणे म्हणजे आनंद
अनाहूतपणे आवडणारी गोष्ट घडून येणे म्हणजे आनंद
असे अनेक आनंदाचे क्षण आढळतात पावलोपावली
त्यांना ओळखायला मात्र घारीची नजर हवी
कधी गारठलेल्या संध्याकाळी,
कांदा-भजी आणि वाफाळलेला चहा
कधी गजबजलेल्या पंगतीतील मसालेभात आणि बासुंदीचा मेवा
कधी पहिल्या पावसातले चिंब होऊन भिजणे
कधी डोंगर माथ्यावरून दूर क्षितिजाला टिपणे
कधी अथांग समुद्रात भरकटलेली छोटीशी नौका
समाधानी मनाला मिळतो तृप्तीचा झोका
कधी नकळतपणे होऊन जाते बोलक्या डोळ्यांशी नजरा-नजर
धडधडत्या हृदयाला मिळते लज्जेची झालर
कधी आपल्या लाडक्याचे पडलेले पहिले दुडूदुडू पाऊल
'आई' नावाची साद ऐकून मन जाते हेलावून
कधी म्हाताऱ्या आई-बाबांची प्रेमळ मायाळू नजर
पांघरून जाते मनावर आधाराची चादर
आनंदसोहळे असोत अथवा सणा-सुदीचे प्रसंग
खेळी-मेळीने साजरे होतात, उल्हासात दंग
स्वानंदाच्या रम्य दुनियेत सारेच जीव रमतात
तो उंबरठा ओलांडणारे मात्र फारच थोडे असतात
दुसऱ्याच्या दुःखाने ज्यांचे मन होते द्रवित
परहिताने सुखी होणारे असामान्य असतात क्वचित
ज्यांच्या आनंदाला असे परमार्थाची जोड
त्या आनंदाला नसे कसलीच तोड !
-सोनाली पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा