विश्वास-अविश्वास

थोरल्या नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव पानिपतच्या लढाईत कामी आले, त्यानंतर एक वाक्प्रचार मराठीत रूढ झाला. ‘विश्वास पानिपतावर गेला, तो परतलेला नाही’ म्हणजे आता कुठे कुणावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती राहिलेली नाही. खरंच तसं झालंय का याचा शोध घ्यायला गेले तर संमिश्र परिस्थिती आहे असं लक्षात आलं.

रिक्षापासून विमानापर्यंत कोणत्याही वाहनातून आपण प्रवास करतो, तेव्हा त्या चालकाच्या कौशल्यावर विश्वास ठेवणं गरजेचं नसतं का? आपण ठेवतोच विश्वास. त्या चालकाबद्दल कोणतीही वैयक्तिक माहिती नसते आपल्याला, तरीही निर्घोर मनाने आपण प्रवास करतो आणि बहुश: वेळा आपल्या मुक्कामाला सुखरूप पोचतोही. काही दुर्देवी माणसं अपवाद.

आपले कष्टाचे पैसे आपण नि:शंक मनाने बँकेत ठेवतो, तेव्हा त्याची नोंद करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावरही आपण विश्वास ठेवतो.

दुकानातून काही खरेदी केली तर त्या दुकानदारावर, घरं बांधणाऱ्या बिल्डरवर, दूध घालणाऱ्या गवळ्यावर अशा अनेक व्यक्ति आणि संस्थांवर आपण विश्वास टाकत असतो रोज. यातल्या एकाही माणसाची वैयक्तिक माहिती आपल्याला नसते किंवा त्याची विश्वासार्हता आपण तपासून पाहत नाही. 

पण रस्त्यात कुणी म्हटलं की माझं पाकीट चोरीला गेलं हो, काही मदत करता का? तर नाही आपण लगेच विश्वास टाकत. दारावर येणाऱ्या फिरत्या विक्रेत्याकडून माल घेतांना आपण साशंक असतो त्या मालाच्या दर्जाबद्दल. रात्रीच्या वेळी रीक्षा-टॅक्सीत बसतांना सुद्धा आपण थोडे कचरतो. नेमका कुठे विश्वास ठेवावा आणि कुठे संशय घ्यावा याचं काही ठराविक गणित नाही सापडलं मला. संस्थात्मक विश्वास ठेवतो म्हटलं तर अलिकडे सहकारी बँकांत पैसे ठेवायला माणसं घाबरतात. खासगी बसवाल्यांवर विश्वास नाही म्हणणारे खासगी टॅक्सी किंवा एसटीच्या बसमधून नि:शंक मनाने प्रवास करतांना दिसतात. नळातून येणारं पाणी उकळून पिणारी माणसं बाहेर हॉटेलमध्ये निर्धास्तपणे खातात-जेवतात आणि बँकेतून/ATMमधून रक्कम काढतांना ती पुन्हा पुन्हा मोजून घेणारे ऑनलाईन शॉपिंग करतांना मागचा पुढचा विचार न करता आपल्या डेबिट कार्डाचे तपशील खुशाल भरतात तिथे. अनोळखी मुलाशी कसं लग्न करायचं असं म्हणणाऱ्या पिढीतल्याच काही मुली जेव्हा आपलं आयुष्य अगदी नगण्य ओळखीवर उधळून देतांना दिसतात तेव्हा यात पिढीचा काही वेगळा विचार किंवा दृष्टीकोन आहे असंही म्हणता येत नाही.

एकीकडे आपण सहजपणे एखाद्या व्यक्तीवर, संस्थेवर विश्वास ठेवतो, एकीकडे आपल्या मनात संशयाची पाल सतत चुकचुकत असते, नेमका निर्णय घेतांना आपला गोंधळ उडवत असते. आपल्या अंतर्मनात कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही याचे ठोकताळे मांडले गेलेले असतात. कधी आपल्या तर कधी दुसऱ्याच्या अनुभवावर आधारित बरे-वाईट पूर्वग्रह, कधी आपल्या शक्तिने दिलेले अनुकूल-प्रतिकूल कौल, तर कधी मनातली आणि भोवताली असलेली सकारात्मक-नकारात्मक उर्जा या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन आपण ठरवतो कुठे विश्वास ठेवावा, कुठे ठेवू नये किंवा कुठे हातचं राखून राहावं. सोशल मिडीयाचा स्फोट झालेला असतांना तर विश्वास ठेवण्याच्या आपल्या सारासार बुद्धीचा फारच काळजीने वापर करणं आवश्यक ठरतं.

विश्वास द्या, विश्वास संपादन करा-मिळवा. विश्वासाच्या जोरावरच हे जग चाललेलं यावर विश्वास ठेवा. 

(डोळ्यासमोर घडणाऱ्या घटना, वावरणारी माणसं यांच्यावर ठेवलेला विश्वास जेव्हा अमुर्त शक्तीच्या सगुण रुपावर ठेवला जातो, तेव्हा मग ती श्रद्धा होते. पण तो विषय वेगळा आणि फार मोठा.) 


राधा मराठे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा