ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १
चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी नववर्षदिन, गुढीपाडवा. ह्या दिवशी हटकून आठवते ते माझे बालपण. घरोघरी उभारलेल्या रंगीबेरंगी विजयपताका पाहून माझे बालमन अगदी मोहरून जात असे. मात्र सिंगापुरात आल्यावर इथल्या सरकारी घरात(HDB) खिडकीबाहेर लांब बांबूवर धुतलेले कपडे वाळत घातलेले पाह्यले तो दिवस मला अजूनही आठवतो मला. ते लटकणारे कपडे पाहून गमतीने मी संतोषला म्हटले होते अरे इथे तर रोजच साजरा होतो की गुढीपाडवा.
ह्याच दिवशी ब्रम्हदेवाने पृथ्वीची निर्मिती केली असा आपल्या पुराणांमध्ये उल्लेख आहे. खर तर हाच दिवस पृथ्वी दिवस अर्थात शुद्ध मराठीतच सांगायचं तर Earth Day म्हणून साजरा करायला हवा. पण भारतात हा दिवस Neem Day म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
ह्या दिवशी प्रथेनुसार भल्या पहाटे गुळ आणि कडू लिंबाच्या चटणीचे सेवन केले जाते.तत्वतः आपल्या आयुष्यात येणाऱ्या कडू गोड अनुभवांना आपण असेच हसत सामोरे जायचे असते हाच भावार्थ.
या प्रथेमागे वैद्यकीय कारणेही आहेत. सणासुदीच्या दिवसात अधिक प्रमाणात सुग्रास भोजन केल्यामुळे आपल्या जठरातील आम्लपित्ताची वाढ होते, ते कमी करण्यासाठी कडू लिंबाचे सेवन उपयुक्त आहे. गोड खाण्याने रक्तातील साखर वाढली असता ती सुद्धा ह्याच्या सेवनाने कमी होते. म्हणून ह्याला मधुमेहींचा मित्रच म्हटले आहे. कडू लीम्बात anti bacterial आणि anti viral गुण असल्याने गोवर किवा कांजिण्या येऊन गेल्यावर कडू लिंबाची पाने पाण्यात उकळून त्याने अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो.
केसातील कोंड्याची समस्या माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रुग्णांना मी कडू लिंबाच्या पाल्याचा लेप लावायला सांगते. आणि अशी समस्या येऊच नये यासाठी आठवड्यातून एकदा कडू लिंबाच्या पाण्याने नहावे असेही सांगते. तरुण मुलांना सतावणाऱ्या तारुण्यपीटिका याचा लेप लावल्याने नाहीशा व्हायला मदत तर होतेच परंतु त्यामुळे त्वचेवर येणारे डागही हलके होतात. या लेखाच्या खाली मी कडू लिंबाचा face pack बनविण्याची कृतीही दिली आहे. ती पाहायला विसरू नका.
आतापर्यंत आपण कडू लिंबाच्या पानांचे उपयोग पाह्यले , ह्या वृक्षाचे सर्वच भाग अतिशय उपयोगी आहेत. ह्याची मुळे,खोड, फुले, फळे सर्वांचे औषधी उपयोग आहेत. त्या दृष्टीने पाहिलं तर हा कल्पवृक्षच म्हणायला हवा. याची वाढ कमीतकमी पाण्यात आणि अगदी निकृष्ट जमिनीतही होत असल्याने शहरी वनीकरणासाठी याचा उपयोग केला जातो. पालापाचोळ्यामुळे जमिनीचा कसही वाढतो. हवेतील प्रदूषण कमी करून प्राणवायूची निर्मिती व्हावी यासाठी शहरात याची लागवड होणे खूप गरजेचे आहे.
मोठ्या कुंडीत तुमच्या घरातील बाल्कनी मध्येही हा वृक्ष वाढू शकेल. त्यामुळे रोज कडू लिंबाची २-३ कोवळी पाने तुम्हाला चावून खायला मिळतील. आणि तुमचे दातांचे आरोग्य उत्तम राहील. आणि डेंग्यू मलेरियाचे डासही ह्यामुळे दूर राहतील.
आता कळल का की चांदोमामा निंबोणीच्या झाडामागेच का लपतो आणि तेथेच का झोपी जातो?
- नीम फेसपॅक
साहित्य : १ कप कोवळा कडू लिंबाचा पाला
१/२ कप ताजा खोवलेला नारळ
१ चहाचा चमचा organic हळद पावडर किवा १ इंच ताजी हळद
२ मोठे चमचे घरगुती दही
कृती: हे सर्व थोडस पाणी घालून मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे. मग बर्फाच्या tray मध्ये ठेवून त्याचे ice cubes बनवून ठेवा. रोज आंघोळी पूर्वी यातील एक तुकडा काढून चेहऱ्यावर हळुवार घासा. १० मिनिटे ठेवून मग चेहरा धुवून टाका.
तारुण्यपीटिका आणि चेहऱ्यावरील डागासाठी हे उत्तम औषध आहे.
(अनुवाद: राजश्री लेले)
- मूळ लेखन: डॉक्टर प्रिया कामत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा