ऋतुराग मालिका – भाग दुसरा

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

नमस्कार मंडळी, ऋतुराग लेखमालिकेच्या दुसऱ्या भागाकडे आज आपण वळूयात. फाल्गुन महिन्यातली अखेर, चैत्र आणि वैशाख ह्या वसंताच्या साधारण दोन अडीच मासाच्या वसंताच्या साखळीत दृष्टीला भ्रांत करणारे, प्राणीमात्रातल्या निर्मितीच्या शक्तीच्या उन्मादक वृत्तींना चेतवणारे, त्याचबरोबर बेसुमार रंगांनी नटलेले आणि प्रखर उन्हाने भाजून काढणारे असे हे महिने. एक दुसऱ्यात मिसळून जाणारे.. पण हे महिने आणि वसंत संपत आल्याची चाहूल लागते ती ग्रीष्मातल्या पांढऱ्या भुरक्या आकाशभर पसरलेल्या ढगांनी.. उकाडा असह्य होतो. पण मधूनच येणारी थंडगार झुळूक पुढचा ऋतू वर्षा आहे ह्याची आठवण करुन देऊन जाते... नारळाची झाडे सदाचं गर्द्काळसर झावळ्यांनी भरलेली, पण त्या झावळ्यांचा रंग हि आता मलूल झालेला वाटतो. मग अशोकाचं झाड पाहू, तर त्यावर हिरव्या पाचूची हिरवाई पूर्ण सजलेली दिसते, शिरीष वृक्षाची गुलाबी फुले काळ्या-हिरव्या रंगाच्या पानामध्ये दडलेली सापडतात. दिवस कित्ती मोठे वाटायला लागतात.. गंभीरता, संथपणा, भावगंभीरता ह्या ऋतूत काठोकाठ भरलेली आहे.

वसंत-कलिकेचे ते खेळकर, अल्लड वातावरण हळुहळु सरत चाललंय आणि ग्रीष्मातल्या प्रौढपणाची सावली आलम दुनियेवर पसरत आहे ह्याची जाणीव हळूहळू होऊ लागलेली असते. निसर्गसुद्धा मधुर पक्क फळे घेऊन आलाय, झाडावर भारदस्तपणे शेंगा डवरल्यात.. छाया आणि प्रकाश दोन्ही पोटात साठवणारे ढग पहाटेची लालीसुद्धा रोखू पाहतात.. पण छाया-प्रकाश एक झालेले हे वातावरण मोरांना उन्मत्त करते.. मग तो भर दुपारचा समुद्र.. तो सुद्धा शांत आणि संथ वाटू लागतो. एरव्ही निळ्याशार आकाशाखाली ते लाटांचे निळे पाणी थयथयाट करत असते.. प्रत्येक लाटेसोबत येणारे चमचमणारे सुर्यफुल आता पूर्णत: नाहीसे झाल्याचे दिसते. पाण्यात धरतीचा तपकिरी हिरवा रंग मिसळून प्रौढत्वाची झालर प्रत्येक लाटेला दिसते. आकाशातल्या त्या धुरकट मेघांचे मोठमोठाले पट्टे पाण्यावर उमटायला लागतात. आणि मग इथे उलगडतो तो पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या पंच महाभूतांचा खरा अर्थ..

निसर्गातला हाच सारा बाज सुरांमध्ये एकवटून येतो.. आणि ह्या ऋतूत सामोरा येतो तो धीर गंभीर प्रकृतीचा राग दीपक.. तानसेनाने जेव्हा ह्या रागाचे सूर छेडायला घेतले तेव्हा त्याच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला.. आणि त्यानंतर त्याच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराच्या सुरांनी न्हाऊन टाकल्याची घटना कितपत खरी आणि खोटी ह्याची शास्त्रीय मीमांसा करत बसण्यापेक्षा त्या रागांच्या सुरांनी सजीवमात्रांवर कसा पडतो ह्याची सापेक्षता चटकन पडताळून पाहता येते. या रागाबद्दल संगीतसम्राट तानसेनासंदर्भात असलेली आख्यायिका सर्वांनाच माहिती आहे पण त्याव्यतिरिक्त काही माहिती सांगावीशी वाटते.

दीपक रागाच्या स्वरांकडे जाण्याआधी थाट म्हणजे नक्की काय ? ह्याचा थोडक्यात विचार मांडतो. सप्तकातील बारा (सा, रे॒, रे, ग॒, ग, म, म॑, प, ध॒, ध, नि॒, नि) पैकी ७ स्वरांच्या एका समुदायास थाट (उत्तर हिंदूस्तानात "मेळ") म्हणतात. स्वरांच्या कोमल किंवा तीव्रतेमधील बदलानुसार उत्तर हिंदुस्थानी रागसंगीत ग्रंथकारांनी दहा मूळ थाट सांगितले आहेत. ढोबळ विचार करता थाटापासूनच रागाची उत्पत्ती होते, ह्या तत्वानुसार विचार केला तर हजारो राग तयार होऊ शकतात. पण काही गणिती, आणि काही राग- संगीत नियम पाळून रागांची उत्पत्ती मांडली गेलेय. त्याच्या खोलात शिरायचं ठरवलं तर ऋतु-नुसार राग हि लेखमाला अपुरी पडेल. तेव्हा पुन्हा दीपक रागाकडे वळूयात.

आता दीपक रागासंदर्भात सांगायचं तर, विविध संगीत ग्रंथांमध्ये हा राग कधी पूर्वी थाटात तर कधी बिलावल थाटात तर कधी खमाज थाटात मांडला आहे. पण आजकाल ह्या रागाची पूर्वी अंगाने आणि दुसरं बिलावल अनुषंगाने मांडला जातो. संगीत सुधाकरमध्ये हा राग असा मांडला आहे -

अब दीपका राग: स्यात्षडजजन्यासग्रहांशक:।
पंचम स्वरसंवादी आरोहे वर्जितर्षभ:।।
अवरोहे निगदितो निषाद स्वर वर्जित।
गीयते दीप-समये बुधै: षाडव षाडव:।।

ह्या रागाचा परिचय आरोहात - सा ग म॑ प, ध॒ नी सां आणि अवरोहात- सां ध॒ प, म॑ ग रे॒ सा। असा होतो. आणि रात्रीचा दुसऱ्या प्रहरात गायला जातो. अजून काही संगीतज्ञांच्या मते दीपक राग हा पूर्वी, काफी, बिलावल, खमाज, आणि कल्याण थाटात आढळतो आणि कल्याण थाटातच दीपक-केदार हा मिश्र राग आढळतो. संगीत-शास्त्रानुसार दीपक राग भगवान शंकराच्या पूर्व-मुखातून प्रकट झालेला आहे. आणि ग - गंधारावर विस्तार केला तर अधिक प्रभावकारी परिणाम आढळून येतो. पण त्याच्या स्वरांनी सिद्धि-प्राप्त योगी और ऋषितुल्य गायक आपल्या अध्यात्म-शक्तिने ह्या रागाच्या परिणामांना काबूत ठेवू शकतात, असं पण एक ग्रह आहे. 

आता अजून काही मत-भिन्नता पाहूयात – पंडित अहोबल द्वारा रचित ‘संगीत-पारिजात’प्रमाणे दीपक राग भैरव थाटातला ओडव- संपूर्ण राग आहे, म्हणजे आरोहात पाच आणि अवरोहात सात स्वराधिष्ट आहे. शारंगधरकृत ‘संगीत-रत्नाकर’ प्रमाणे ‘सम्पूर्णो दीपको जात:’ (दीपक सम्पूर्ण राग है), म्हणजे ह्याच्या आरोह आणि अवरोहात सातही स्वरांचा वापर होतो. ‘नाद-विनोद’ ह्या ग्रंथानुसार हा कल्याण थाटातला षाडव षाडव राग म्हणजे आरोहावरोहात सहा स्वर.. तर कर्नाटक संगीतामध्ये दीपक राग हा कामवद्र्धनी, मनोहरी आणि वरुणप्रिया ह्या थाटात मांडला जातो.

कदाचित ह्या सगळ्या जटील तांत्रिक आणि मताभिन्नतेमुळे दीपक राग कित्येक वर्ष जुना राग असला तरी प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या आख्यायिकांमुळे ह्या राग इतर रागांच्या तुलनेत रचना, बंदिशा आणि संगीत कार्यक्रमातून सदर करण्याच्या प्रक्रियेत दुर्लक्षित राहिलाय. आणि लोप पावण्याच्या मार्गावर आहे.

ज्या गायकांनी हा राग मांडला आहे त्याच्या इथे काही लिंक्स देतो. मी वर चित्रीत केलेल्या ह्या ऋतूचा परिणाम त्या लिंक्सच्या माध्यमातून जाणवला तर नक्की कळवा.. आणि जाणकारांनी ह्या लिंक्सचा वापर काळजीपूर्वक करावा.. आणि कदाचित सर्वांगाचा दाह व्हायला लागलाच तर पुढच्या येणाऱ्या “वर्षा”ऋतुतल्या लेखमालिकेवर लक्ष असू द्यावे. म्हणजे होणारा दाह कमी होईल.

पंडित कृष्णराव गिंडे खमाज थाटात दीपक राग


उस्ताद गुलाम मुस्तफा खान


माता महाकाली ह्या चित्रपटात शाहू मोडक ह्यांच्यावर चित्रीत प्रसंगात गायला गेलेला दीपक राग


बैजू बावरा ह्या चित्रपटात तानसेन आणि बैजू बावराह्याच्या जुगलबंदीत गायला गेलेला दीपक राग 


उस्ताद विलायत हुसैन ह्यांनी गायलेला दीपक-केदार


संगीत सम्राट तानसेन ह्या चित्रपटात महंमद रफी साहेबांनी गायलेला दीपक


- ओंकार गोखले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा