नाते विश्वासाचे


(सत्य घटनेवर आधारित ,नांवे बदलून )

जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा. दिवसभर सर्वांचे हात आणि पेन चालूच होते

आणि पावणेतीनच्या सुमारास “ XX बोमनजी, मरना है क्या?” असे दणदणीत आवाजात विचारत, सिधवांनी बँकेत एंट्री घेतली.

चाळीस वर्षांपूर्वीचा काळ! पैशांच्या कोणत्याही व्यवहारासाठी ग्राहकाला बँकेतच यावे लागे.मोठ्या रकमांच्या व्यवहारासाठी दोन काउंटर्स आणि लहान रकमांसाठी बाकीचे. मोठ्या म्हणजे एक लाखाच्यावर.(पण ही एक लाख रक्कम त्यावेळची की सर्वसाधारण पगार रु.५०० ते ७०० असे व त्यात सर्वसामान्य माणसाचा कुटुंबाचा महिन्याचा खर्च भागून थोडीशी शिल्लकही रहात असे.) ग्राहकांची संख्या अर्थात खूप असल्याने , योग्य प्रमाणात काउंटर्स ठेवले जात आणि नावाप्रमाणे विभागणी केली जात असल्याने प्रत्येक ग्राहकाचा काउंटर व सहाय्यक ठरलेला असे, त्यामुळे ग्राहक व सहाय्यक, पर्यायाने बँक यांचे बॉण्डिंग जबरदस्त होत असे.

तर हे महाशय इतके कोकलत कां आले म्हणून सर्वजण पाहू लागले , पण क्षणभरच !

तसा त्यांचा आवाज खूप मोठाही होता नि नेहमीच आले की दोन मिनिटे धमाल उडवून हसत, हसवत जात असत. उत्तम जम बसलेला उद्योजक होता पण दिलखुलास . पुन्हा एकदा त्यांनी मोठ्या प्रेमाने शिवी हासडली , " XX तू आज वर पोहोचला असतास" म्हणत बॅग बोमनजीकडे दिली.

बोमनजीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहताच , " XXX बघतोस काय माझ्याकडे? बॅगेत बघ , किती दिलेस ते ! बोमनजीने काहीच लक्षात न येऊन बॅग उघडली आणि आतील नोटा बघून त्याचे डोळे विस्फारले .

तसाच सिधवांकडे बघत राहिला.

"काय , पोचला असतास ना आज वर?"

काही न बोलता बोमनजीने मान हलविली. आता सर्व ग्राहकांचेही लक्ष्य वेधले गेले. माझा प्रोव्हिडंड फंड ही नाही इतका , तो पुटपुटला.

" XX , तो हिशोब करायला तू जिवंत राहिला असतास का, सशाचं काळीज तुझं , डिफरन्स बघून attack येऊन मेला असतास ना रे ? मग मी कोणाला शिव्या देणार म्हणून आलो ."

बोमनजी काहीच न बोलता शेवटच्या ग्राहकाचे काम करू लागला आणि तोपर्यंत काउंटर्स बंद झाल्याने ,सिधवांना एकाने विचारले आणि त्याला सांगतांना साऱ्या डिपार्टमेंट पर्यंत त्यांचा आवाज जात होता.

दर महिन्याला पहिल्या आठवड्यात सिधवा बँकेत येत आणि स्टाफ ला पगार वाटण्यासाठी रु. १०० च्या नोटांमध्ये पैसे खात्यातून काढून नेत.यावेळी एक जागा खरेदीसाठी काही रक्कम रोख द्यायची होती म्हणून त्यांनी रक्कम १० लाख काढायला येतो उद्या, सगळॆच रु. १०० मध्ये दे असे बोमनजीला सांगितले होते. हा मोठ्या रकमांच्या देवाण घेवाणीचाच काउंटर , आणि बोमनजी सिनियर ,एक्स्पर्ट. नेहमीप्रमाणे विथड्रॉव्हल sanction होऊन बोमनजीकडे आले , त्याने लगेच तयार ठेवलेली कॅश सिधवांच्या बॅगेत भरून पुढच्या कामाला लागला. हेही नेहमीचे. विथड्रॉव्हल ओके होऊन कॅशियर कडे येईपर्यंत वेळ लागे. त्यानंतर कॅश देणे. म्हणून सिधवांसारखे अनेक ग्राहक आपली बॅग बोमनजी कडे देऊ जात, नंतर येऊन घेऊन जात .नेहमीच्या पद्धतीने सिधवा आले नि सही करून बॅग घेऊन गेले. कारमध्ये काम करीत असतांना , एका document साठी बॅग उघडली , side कप्प्यातून ते घेतांना सहज नोटांकडे लक्ष गेले आणि ते धक्का बसून पाहतच राहिले.एव्हांना कार सांताक्रूज सिग्नल पर्यंत पोहोचली होती. क्षणात सावरून बॅग बंद करून कार फिरविण्यास सांगितले , पुन्हा फोर्ट मधील बँकेकडे.

आणि आले आरडाओरडा करत. झाले होते काय हे कळल्यावर साऱ्याचे श्वास रोखले गेले. कशी चूक झाली कळायला मार्ग नाही पण बोमनजीने १०० रु. च्या नोटांऐवजी १००० रु. च्या नोटा भरल्या होत्या. म्हणजे १० लाख रु. ऐवजी एक करोड!!

चक्क नव्वद लाख जास्त ! आतासुद्धा ही रक्कम बरीच मोठी आहे ,तर चाळीस वर्षांपूर्वी , ( गहू , तांदूळ दोन रु. किलोच्या जमान्यात) , ती किती मोठी याची कल्पना केली तरी छाती दडपते. आणि सिधवांना जराही मोह पडला नाही !!

ते आले तेव्हां,बँकेचे व्यवहार अजून सुरूच होते. त्यानंतर हिशेब करतांना तूट ( cash short ) लागली असती. 5II पर्यंत समजले असते नि मग बोमनजीचे पहिले काय झाले असते याची आजही आठवण झाली तरी जीव थरारतो. बँकेत असा नियम आहे की, सकाळी मोजून रक्कम दिली जाते , दिवस अखेरीस देवाण -घेवाण यांचा ताळमेळ करून उरलेली रक्कम head cashier कडे जमा केल्यावर घरी जात येते. फरक असल्यास शोधणे, निश्चित करणे , रक्कम जास्त असल्यास , बँकेचे एक खाते असते त्यात जमा करणे व तूट असेल तर त्याने आपल्या खात्यातून भरणे , त्यानंतरच घरी जात येते. इतक्या बॅंका, त्याच्या हजारो शाखा , लाखो कर्मचारी आहेत , असा एकही कॅशियर आजही (रोख व्यवहार पूर्वीच्या तुलनेत कित्येक पटींनी कमी होऊनही )आपणास सापडणार नाही की ज्याला स्वतःच्या खिशातून पैसे भरायला लागले नाहीत.

बोमनजी काही काळ स्तब्ध राहिला , नुसता सिधवाकडे बघत.त्याची पटर पटर ,प्रेमाच्या शिव्या चालूच होत्या.तोपर्यंत बँक व्यवहाराची वेळ संपलीच कारण त्या आधी १५ मिनिटेच ही स्वारी आली होती .बाकीचे सिनिअर्स काउंटर बाहेर येऊन त्याचे आभार मानू लागले. माझ्या काउंटर समोरच हे सर्व सुरु असल्याने मी जाग्यावरूनच बघत होते. बोमनजी अजूनही स्तब्धच .ही पारशी लोकं अतिशय गोड स्वभावाची,भावूक . आता तर त्याच्या मनात काय उलघाल सुरु असेल याचा मी विचार करत होते, तर तो उठला , केबिन बंद करून , एक मोठ्ठा वळसा घालून बाहेर आला, सिधवांसमोर .त्याला समोर बघून सिधवा अजून तेजीत.

“XXXX .......त्यांच्या तोंडावर हात ठेवून बोमनजीने त्यांना कवेत घेतले.सिधवांनीही त्याला घट्ट जवळ घेऊन थोपटले.बोमनजीच्या डोळ्यात अश्रू नक्कीच आले असतील , दिसले नाहीत पण जाणवले. सारा प्रसंगच भावूक झाला. आवेग ओसरल्यावर , त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून सिधवा म्हणाले, "आज मेला असतास ना रे डिकरा ? "

बोमनजीने मान हलविली.

"XX उद्या माझी flight आहे. तुझं funeral attend करायला ती कॅन्सल करायला लागली असती ,म्हणून आलो XXX !"

पुन्हा प्रेमळ संवाद सुरु झाल्यावर सारे आपापल्या जागेवर परतले.काही दिवस याचे पडसाद घुमत राहिले आणि मी मात्र नोकरीच्या पहिल्या आठवड्यात जे अनेक कोर्सेस करून कळणार नाही ते बँकर-कस्टमर नातं शिकले , नव्हे मनावर कोरले गेले.

"customer is God ", ग्राहक राजा ....वगैरे नंतर अनेक वेळा कानावर पडले, विविध ठिकाणी , विविध वेळा , पण ग्राहक कायमचा जोडला जातो आपल्या स्वभावाने हा पहिला आणि आयुष्यभर जपलेला , अनेक उत्तम अनुभवांनी संपन्न झालेला धडा शिकले या प्रसंगाने.

नंतर ही बँकेच्या व्यवहाराची ओळख करून घेतांना हेच लक्षांतआले की , बँकेने अत्यंत काटेकोर नियम बनविले आहेत.कागदोपत्री ते सांभाळले जातातच पण मुख्य कॅश व्यवहारांबद्दल सारे नियम काटेकोरपणे पाळले तर २४ तास काम करूनही त्यांचे काम होणार नाही. उदा.या काळात सर्वच बँकामध्ये रोख पैशांची देवाण-घेवाण प्रचंड प्रमाणात.जर नियमाप्रमाणे रांगेत उभे राहून कॅश दिली/घेतली तर मोठ्या रक्कमांमुळे, वेगाने मोजूनही ,प्रत्येकाला कमीत कमी २०/२५ मिनिटे सहज लागणार . मात्र येथे काउंटर उघडला की मोठया मोठया कंपन्यांची माणसे हातात बॅग घेऊन हजर.स्लिप आणि बॅग कॅशियर कडे देऊन निघून जात. 2II नंतर रिकामी बॅग आणि counterfoil घेऊन जात.वेळ मिळेल तशी त्याने कॅश मोजलेली असे. खूपच bags जमल्या तर एखाद्या शिपायाला बोलावी आणि तोही “हे माझे काम नव्हे , हेल्प मागून घे ….” वगैरे न म्हणता धाडधाड कॅश मोजे. त्या काळात counting machines नव्हती की forge note detector .पण त्यांची बोटे आणि डोळे या मशीन्सपेक्षा जास्त चालायचे. विश्वासाने दिलेल्या बॅगेत कधी कमी नोटा वा खोट्या नोटा असलेल्या ऐकल्या नाहीत . उलट दोन वेळा रु. १००० च्या २ आणि ५ नोटा जास्त आल्याने परत करतांना पाहिले आहे.(आत्ता जाणवते की त्या काळात आत्तासारखा खोट्या नोटांचा सुळसुळाट नव्हता. उत्सुकतेपायी मी कॅशियर्स ना सांगून ठेवले होते की खोटी नोट सापडली की मला बघायची आहे, तर 2 वर्षांनी एक मिळाली बघायला ! आणि आत्ता demonetization पर्यंत दिवसाला कुठे ना कुठे सापडत असे.)

तीच गोष्ट , पैसे खात्यातून काढण्याची. आदल्या दिवशी कंपनीचा माणूस सांगून जायचा,रक्कम किती हवी ते. काउंटर सुरु होतांना कॅशियर एकेक थैली तयार करून ठेवायचा.सकाळी कंपनीचा माणूस विथड्रॉव्हल काउंटरवर नि बॅग कॅशियरकडे देऊन जायचा ,वेळेचा अंदाज असायचा.त्याप्रमाणे येऊन कॅश मिळाल्याची सही करून , बॅग घेऊन निघून जायचा. एक शब्द बोलण्याची ना गरज, फक्त हाताने निरोप ! मी अचंबित होत असे , एकही जण पैसे मोजत बसलेला पहिला नाही या मोठ्या व्यवहारांसाठी.

व्यवहाराची वेळ संपल्यावर , सर्व कॅशियर आपल्याकडे जमलेली रक्कम घेऊन ,(अर्थात मोठ्या पेट्या असायच्या , त्यास शिपाई लागत असत ) कॅश डिपार्टमेंट मध्ये. इथे सर्व मजल्यांवरील कॅशियर्स यायचे. पूर्ण मजला , सुमारे २००० Sq. Mt यासाठी. प्रचंड मोठी टेबल्स , त्यावर नोटांचे ढीग .प्रयेकजण १०० नोटांची पॅकेट्स बांधण्यात मग्न .बाजूला शिपाई. त्यांची सर्व बाबतीत प्रचंड मदत.करोडो रुपये आत्यंतिक वेगाने , मोजून, पॅकेट्स बांधून , बंडल्स तयार करून ,हेड कॅशियरकडे देऊन ६ वाजता घरी जायला मोकळे. आज मशिन्सचा वापर करून होणार नाही इतक्या कमी वेळात इतकी रक्कम मोजणे.कधीतरी कुणाला difference लागला की इतर सर्व मिळून शोधणार , नि मगच घरी जाणार.आणि मुख्य म्हणजे ही सर्व कामे हसतखेळत, गप्पा मारीत. कोणाच्या डिपार्टमेंट मध्ये काही वेगळे झाले असल्यास , कोणाचे वाढदिवस, सणवार इ .इ.

हे दृश्य फक्त आमच्याच बँकेत नाही, भारतातील कोणत्याही बँकेत , कोणत्याही शाखेत तसेच. किती परस्पर विश्वास !! शिपायाचा पगार सुमारे ३०० रुपये असायचा नि नोटांच्या सागरात दिवसभर वावरायचा. कधीच , कोणालाही पूर्ण देशभर त्याचा मोह झाला नाही. गिनीज बुकवाल्यांना ही बाब अशक्य वाटेल आता, पण त्या काळात याचे कौतुकच नव्हते कारण ती एक सर्वसाधारण गोष्ट होती.

एकही बँक कर्मचाऱ्याने रोख पैशांची अफरातफर केलेली घटना ऐकिवात नाही पण विशेष म्हणजे या कंपन्यांची माणसे इतकी मोठी रक्कम घेऊन यायचे किंवा घेऊन जायचे तोही बहुधा त्यांचा शिपाई वर्ग असे.तसाही एकही बॅग घेऊन पळून गेला असे कधीच झाले नाही. म्हणजे तसे काही घडू शकते हा विचारही कोणाच्या मनाला शिवला नाही.

आत्ता पावलोपावली घडणाऱ्या अशा घटना ऐकल्या की वाटते , असे का होते? विश्वासाचे परिवर्तन फसवणुकीत होण्याइतका पैसा का मोठा झाला? कष्टाशिवाय पैसा ही संकल्पना , जेव्हा रुजली तिथे विश्वासाची पिछेहाट झाली .

आजही झवेरी बाजार, मुंबई येथे जे ज्वेलर्स आहेत , त्याचा आपसात व्यवहार केवळ विश्वासावर चालतो हे मी बँक ऑफिसर म्हणून त्या भागात फिरतांना , त्यांच्याशी बोलतांना पाहिले तेव्हां थक्कच झाले. १००रू. देतांना विचार करणारी मध्यमवर्गीय माणसे कुठेही भेटतात (आणि त्यांचे वागणे चुकीचे नाही वाटत आजकालच्या परिस्थितीनुसार ) आणि हे ज्वेलर्स आजही एकमेकांना कुठेही लिखापिढीशिवाय १०० किलो सोने उसने देऊन टाकतात. माझ्याकडेही , यांचेच कर्मचारी सोने घेऊन जाण्यासाठी यायचे. २०/२५ वर्षांची मुले, पगार देतात ३००० ते ४००० रु. आणि काम सर्व काही. ऑथॉरिटी लेटर मिळाले की मला द्यायला हवे सोने त्यांना. एवढ्या शुल्लक (!!) कामासाठी ते स्वतः कधीच यायचे नाहीत की त्यांचे मॅनेजर्स ,आणि ही मुले दोन खिशात दोन सोन्याचे बार टाकून (प्रत्येकी एक किलो) टाकून बसने निघून जायचे. " मीच सुरुवातीला काळजीने म्हटले, "अरे, वजनाने खिसा फाटेल नि पडेल तर? जातोस पण बसने . गर्दीत पत्ता पण लागायचा नाही . एखादी बॅग तरी आणावी ना !" नुसते हसायचे नि जायचे.मलाच त्यांची काळजी वाटे कारण काही ज्वेलर्स सुरक्षा व्यवस्था तजवीज (security arrange) करून यायचे.शेवटी एकदा एकाने सांगितले, "mam , काळजी नको करू , आम्हाला सवय हाय आणि बॅग चोरीला जाऊ शकते गर्दीत, खिशाला हात नाही लावू शकत."

हे जोखमीचे काम ,इतर कामांबरोबर थोड्या पगारात करणारी ही पोरे, कधी मोह होत नाही, सोने घेऊन पळून जाण्याचा. आणि हा विश्वास देऊनच मोठी होतात ती, ज्वेलर्सच्या मॅनेजरपदाची मजल गाठतात.

नोकरीमध्येच काय, जगात कुठेही सर्वात जास्त महत्व आहे ते विश्वासाला.कोणी विश्वास देऊन जग जिंकतो, कोणी विश्वास मिळवून पार वाटोळे करून जातो.चटकन विश्वास ठेवणारे बुवाबाजीला बळी पडतात , मग ती कोणत्याही धर्मातील असो.नुकते जन्माला आलेल्या बाळालाही अंदाज येत असतो ,कोणाकडे जावे /जाऊ नये ,कोणावर विश्वास ठेवायचा.मग आपण त्याच्यावर आपली मते लादू लागलो की त्याचे मत बाजूला पडते व व्यवहाराच्या नदीत तो वाहत जातो , कधी कधी प्रवाह नेईल तसा. पण प्राणिमात्र बरोब्बर ओळखतात कोणावर विश्वास ठेवायचा ते.

सारांश, जो नीतिमूल्यांवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करतो, तो लौकिक अर्थाने कदाचित यशस्वी नाही होणार , पण समाजाच्या आदरास पात्र होतो हे निश्चित आणि त्याहून महत्वाचे आत्मसमाधान !

काळाच्या ओघात किती घटना घडल्या असतील पण नवीन येणाऱ्यांना बँकेच्या शैक्षणिक पाठामध्ये बोमनजी आणि सिधवा यांची गोष्ट सांगितली जाते बँकर आणि ग्राहक यांच्यामधील विश्वासाच्या पायावर उभे असलेले सर्वोत्तम नातं !!

नीला बर्वे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा