संपादकीय

नमस्कार मंडळी,

ऋतुगंध च्या हेमंत अंकात आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. ह्या अंकाची केंद्रकल्पना दुःख, नैराश्य आहे. ह्या विषयावरचे हे खास मुखपृष्ठ आपल्यासाठी अर्चना रानडे आणि श्रेया रानडे या मायलेकींनी तयार केले आहे.

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे. हे गीत लहानपणी बरेचदा कानावर पडत असे पण त्यावेळी त्याचा अर्थ समजत नसे. मोठे झाल्यावर मात्र ह्याचा अर्थ समजू लागतो. दुःख आपल्या आयुष्यात नसेल तर सुखं म्हणजे काय ते आपल्याला समजणार नाही. परंतु आजकालच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात अगदी लहानपणापासून दुःख आणि नैराश्याचा सामना माणसाला करावा लागतो आहे.

एक दार उघडल्यावर जेव्हा निराशा समोर येते तेव्हा निराशेत बुडून न जाता, अगदी जवळच असणारे आशेचे दुसरे दार शोधावे असा मौलिक संदेश आजोबांची ओसरी या मालिकेतील गोष्टीतून अरुण मनोहर यांनी आपल्या छोट्या दोस्तांना दिला आहे. 

नैराश्यावर मात करण्यासाठी स्वकल्याणा पासून जगतकल्याणाचा उत्साहपूर्ण, सकारात्मक, आशादायक विचार आणि कृती करणे आवश्यक आहे असे स्वगत या मालिकेतील लेखात वृंदा टिळक सांगतात.

नैराश्य येऊच नये यासाठी मना सज्जना या मालिकेतील लेखात श्रीकांत जोशी "मना राघवेवीण आशा नको रे" या समर्थ रामदास यांनी दिलेल्या मंत्राची आठवण करून दिली आहे.

अगदी अलीकडच्या नैराश्यपूर्ण राजकीय घडामोडींवर भाष्य करणारा तमसो मा ज्योतिर्गमय हा नितीन मोरेंचा लेख. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर जे लिहून गेले ती मानसिकता जोपासणं ही निरशेवर मात करण्याची गुरुकिल्ली: अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला! मारिल रिपु जगती असा कवण जन्मला? 

ट्रेकिंग पहावे करून या मालिकेत मध्ये विवेक वैद्य यांनी टूर द माऊंट ब्लँक या सफरीचा दुसरा भाग सादर केला आहे. 

ऋतुराग मालिकेत ओंकार गोखले कोणत्या रागाचा परिचय आपल्यासाठी घेऊन आलेत नक्की वाचा

मालिकांशिवाय कथा, ललित, कविता सुद्धा आपल्यापुढे सादर करीत आहोत.

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत. अंक कसा वाटला जरूर कळवा.

ऋतुगंध समिती २०१९-२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा