माजी अध्यक्षांचे विचार


अरुण मनोहर (अध्यक्ष १९९४)

पंचवीस वर्षात मंडळाने खूप मोठी वाटचाल केली आहे. अजूनही खूप काही करता येण्यासारखे आहे. 

केवळ नफा तत्वाचा विचार न करता सभासदांना सवलती आणि कमी खर्चात कार्यक्रम कसे मिळतील याचा विचार. सभासदांच्या आईवडिलाना आणि वरिष्ठ वयाच्या सभासदांना सवलतीची वर्गणी.

आजीव सदस्यांशी चर्चिलेला मुद्दा- नवीन लोकाना आकर्षित करण्यासाठी जिथे मराठी लोक जास्त आहेत तिथे  कार्यक्रम घेणे.

पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!



प्रसन्न पेठे (अध्यक्ष २०१२)

महाराष्ट्र मंडळाला रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक अभिनन्दन ..!

मंडळाच्या अधिक उन्नतीकरीता पुढील प्रकारे विचार केल्यास मदत होईल असे  वाटते :-

१. असा प्रयत्न असावा की, नवीन व जुन्या सभासदांना न बुजता किंवा लाजता प्राधान्य दिलं जाईल याची खबरदारी कार्यकारिणीने  घ्यावी.

२.  नवीन सभासद आल्यास त्यास कमीतकमी २ / ३  मेंबर्सनी वेलकम करावे (वा यासाठी २ /३ ग्रुपची   नेमणूक करावी)

३ . सिंगापूर मधील उच्च पदावरील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याशी  सम्पर्क साधावा. सभासद नसले तरी त्यांना विशेष बोलावणे करावे (वा यासाठी २ /३ ग्रुपची   नेमणूक करावी)

४   मंडळाचे  एक किंवा दोन हेल्पलाईन नंबर्स असावे. ह्या नम्बर वर सिंगापूर मधील सर्व प्रकारची माहिती मिळू शकेल.  LIKE  गूगल, सिंगापूरला कुठल्याही देशातून संधान साधता  येईल. उदाहरणार्थ, मंडळाची कुठलीही माहिती मिळू शकेल.

५. लाइफ मेंबर्सचा  मंडळासाठी  जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल याचा विचार करावा.

मी मंडळाच्या मदतीसाठी सदैव उपलब्ध आहे, कृपया काहीही गरज लागल्यास संपर्क साधावा ही विनंती.

मंडळाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच श्री गजाननाचरणी प्रार्थना.

किरण संख्ये ( अध्यक्ष २०१४)

सर्वप्रथम, महाराष्ट्र मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र मंडळाचे आजी,माजी कार्यकर्ते,सभासद आणि कार्यकारिणीचे हार्दिक अभिनंदन!!

गेल्या २५ वर्षातील सभासदांची वृद्धी, मराठी भाषा,संस्कृतीला प्रोत्साहन देणारे दर्जेदार उपक्रम महाराष्ट्र मंडळाच्या यशस्वी वाटचालीचे प्रतीक आहेत.

भविष्यात महाराष्ट्र मंडळाला अशीच यशस्वी वाटचाल चालू ठेवण्यासाठी, Gen X चा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांची उपक्रमांना पसंती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र मंडळाने ह्या दृष्टीने काही उपक्रम चालू केले आहेत. पण हे उपक्रम वार्षिक, ठराविक काल मर्यादा आणि ध्येय ठेवून केले तर एक दिवस Gen X महाराष्ट्र मंडळाच्या पुढच्या वाटचालीचे सूत्र हाती घेण्यासाठी तयार असेल.


संतोष अंबिके (अध्यक्ष १९९६-९७,२०११, २०१९) 

समर्थांनी सांगितल्या प्रमाणे "काही गलबला काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ..." हे करता करता त्यांनी सांगितलेली "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा", "आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे" व "महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे" ही वचने कायम आपल्या कानांमधे गुंजत राहावी अशी आहेत. याच प्रेरणेने त्याचे आधुनिक काळातले उपयोजन (सोप्या मराठीत - application!), २५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आपल्या लाडक्या मंडळाने केले. त्यावेळी लावलेल्या रोपट्याचा आता झालेला हा वृक्ष असाच डेरेदार राहिला हवा आणि त्याची उंची, व्याप्ती वृध्दिंगत होत रहावी यासाठी, सर्व सभासदांनी व सिंगापूरवासी मराठी जनांनी प्रयत्न केला पाहिजे. 

हा वृक्ष एकमेवाद्वितियम, अखंड-अभेद्द्य व आपल्या एकसंध मजबूत मुळांवर उभा राहिला तर सुवर्ण महोत्सव, हिरक/अमृत महोत्सव, शताब्दी महोत्सव हे काळातील मैलाचे दगड मंडळ लीलया पार करेल. व्यक्तीपेक्षा कुटुंब  मोठे, कुटुंबापेक्षा  समाज मोठा, समाजापेक्षा धर्म मोठा आणि धर्मापेक्षा राष्ट्र मोठे हे देखील  समर्थांनीच शिकवले आहे. आपल्या मराठी भाषेसाठी, संस्कृतीसाठी पुढची २५-५०-१०० वर्ष आपण व आपली पुढची पिढी  एकत्र राहून आपल्यापेक्षा महाराष्ट्र मंडळ मोठे आहे ही जाणीव सदैव ठेवेल ही परमेश्वर चरणी, समर्थचरणी माझी प्रार्थना.


राजश्री लेले (अध्यक्ष २०१३ )

गेल्या पंचवीस वर्षां प्रमाणे मंडळाने यापुढेही प्रत्यक्ष लोकांशी संपर्कात राहावे. आपली मातृभूमी सोडून इथे आलेल्या सर्वांची पहिली गरज असते ती आपली माणसं वारंवार भेटावी ही.

त्यासाठी इतर मंचांप्रणाने खाद्यगंध, पुस्तक कट्टा, भटकंती असे मंच सुरू करता येतील असं वाटतं. आणखी पुढील वाटचालीसाठी मंडळाला अनेक शुभेच्छा.



धनंजय बोरकर (अध्यक्ष २००१ )

मी ममंसिं चा कार्यकर्ता होतो ९० च्या दशकात. त्या वेळी जी दिशा आम्ही मनात धरून वाटचाल सुरू केली त्या मार्गानेच ममंसिं ची प्रगती चालू आहे हे पाहून मनस्वी समाधान होते. मंडळ मुख्यत्त्वे मराठी भाषकांना केंद्रबिंदू मानून सांस्कृतिक कार्य करील अशी आखणी आम्ही करीत असूं. यापुढेही मंडळाने ती वाटच चोखाळावी. फक्त त्यात कालानुरूप बदल होतील इतकेच. माझी माहिती बहुतेक फेसबुक वर आधारित असते. मंडळ सध्या काव्य(शब्दगंध), नाट्य, शैक्षणिक(मराठी भाषा शिक्षण) व सांस्कृतिक कार्य करते. त्या क्षेत्रात वाढ व्हावी. आसिआन देशांमधील ममं बरोबर सहकार्य करून त्याची व्याप्ती वाढवता येईल. मुलांसाठी मराठी शिक्षणाचे क्षेत्र शालेय व क्रमाक्रमाने विद्यापीठीय पातळीपर्यंत येत्या २५ वर्षात नेण्याचे उद्दिष्ट ठेऊन काम करावे. मी अध्यक्ष असताना INSEAD मधील विद्यार्थ्यांसाठी एक मराठी प्रश्नपत्रिका तयार केली होती, तसेच मेलनी कुलकर्णी नामक इंग्रज तरुणीला तिच्या आजीबरोबर संभाषणासाठी कामचलाऊ बोली मराठी शिकवले होते त्याचे यानिमित्ताने स्मरण होते. 

हल्ली दळणवळणाची व संपर्काची साधने खूप वाढली आहेत हे खरे, तरी परदेशी रहाणा-या व नैमित्तिक भेट देणा-यांनाही आकस्मिक आर्थिक व मानसिक मदतीची गरज भासू शकते. त्या दृष्टीने मंडळाने काही कायमस्वरूपी व्यवस्थेचा विचार करावा. त्यासाठी भारतीय उच्चायुक्त कार्यालयाशी सहकार्य करता येईल.

या सर्व गोष्टी करत असतांना नेहेमी सरकारी नियमांच्या चौकटीत राहूनच व सरकारच्या दृष्टोत्पत्तीस येईल अशा रीतीने काम करावे. सरकारी ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. सिंगापूरमध्ये ममसिं ही एक आवर्जून नोंद घेण्याजोगी संस्था झाली पाहिजे. माझ्या सर्वांना शुभेच्छा!

अजय काशीकर (अध्यक्ष २००५ /०६)

महाराष्ट्र मंडळाने पुढच्या वाटचालीत 12 ते 18 वयातील तरुणाईच्या दृष्टीने विचार करण्याची नितांत गरज आहे. या वयातील मुलं भविष्यात मंडळाशी कशी जोडून राहतील हे बघण्याची खूप आवश्यकता वाटते. हळू हळू वारसा जपला पाहिजे व नकळत तरुणाई कडे तो सोपविण्यात यावा.  मंडळाशी बांधिलकी आणि वृद्धी यामुळे होईल यात शंका नाही. तरुणाईला समजून घेऊन सामावणे हे आपले नाजुक काम आहे. मंडळाचे भविष्य यांच्या हाती देऊन आपण सांस्कृतिक वारसा वाढवण्याची हीच वेळ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा