कवी शब्दांचे ईश्वर ... स्मृतिमग्ना (इंदिरा संत)

ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६

कुडाळ मागे पडत चालले.आता इंदिरा संतांच्या गावी म्हणजे बेळगावच्या लाडक्या होऊन राहिलेल्या आक्कांच्या गावी जायचे होते. खरे तर आरती प्रभूंच्या गावाला जरी आम्ही निरोप दिला असला तरी त्यांच्या कवितेची धुंदी मनातून पूर्ण उतरली होती असे मात्र नव्हते. इंदिरा संत या आरती प्रभूंच्या आवडत्या कवयित्री होत्या .त्यांच्या कविता आरती प्रभूंनी आसुसून वाचल्या होत्या.कुडाळात असताना त्यांनीत्यांच्या संग्रहांची पारायणे केली होती..माझ्याही इंदिरा संत या अत्यंत आवडत्या कवयित्री होत्या.त्यांच्या कवितेतील लखलखीतप्रतिमा सृष्टी मनाला थक्क करून सोडत असे. इंदिरा संत यांचा “बाहुल्या “ हा कविता संग्रह आम्हाला एम.ए.ला अभ्यासाला होता. त्या कवितांचा अभ्यास करताना आम्ही त्यांच्या कवितांनी भारावून गेलो होतो. त्यांचे सर्व संग्रह त्याच वेळी वाचून काढले होते. विलक्षण ‘स्व’त्त्वाने तेजाळून निघालेली यांची कविता त्यांच्या कवितेच्या अस्सलपणाची साक्ष देऊन जात होती. वाचता क्षणीच ती कविता आपल्या मनाचा ठाव घेत आपल्याला अक्षरश: वेड लावीत होती. त्यामुळेच त्यांची कवितातोंडपाठ व्हायला मुळीच वेळ लागला नाही.

आपल्या भारतात कुठेही जा. तिथला निसर्ग आपल्या अद्भुत लावण्याची विशेष खूण आपल्या अंगाखांद्यावर वागवत बहरून आलेला दिसतो. भारतातील प्रत्येक प्रदेशाचे निसर्ग सौंदर्य केवळ अभूतपूर्व आणि अवर्णनीय असते. कोकणातलानिसर्ग वेगळा,गोव्याचा निसर्ग वेगळा,बेळगावचा निसर्गही वेगळा.बेळगावच्या आवडत्या कवयित्री आक्का म्हणजेच इंदिरा संत. त्यांच्या स्वभावासारखाच इथला निसर्ग ! शांत,निवांत.याबेळगावात ठळकवाडीत, आक्कांचे लहानसेच टुमदार घर.आक्कांचा मुलगा आर्किटेक्ट.त्याच्या देखरेखीखाली घराचे बांधकाम आधुनिक पद्धतीने झालेले. घराबाहेर एक सुबकसा लहानसाच बगीचा. हा आक्कांचा घरातलाअत्यंत प्रिय भाग .त्या बागेत छानशी हिरवी गार तजेलदार हिरवळ. म्हणजे जमिनीवर पसरलेला एक हिरवा गार गालिचाच जणू.तिथेच बाजूला एक लहानसे पाँड.त्याच्या बाजूने आकर्षक रंगसंगती साधणारी झाडे. तिथेच बहरलेल्या सुंदर वेली. त्या वेलीच्या फांद्या, फुलांच्या भारानं कमनीयपणे खाली झुकलेल्या.एखाद्या चित्रात दिसावं तसंच दृश्य.दारापासून बंगल्यात जायला एक नागमोडी लहानशीच वाट.त्या वाटेच्या एका बाजूने डौलदार डवरून आलेली तुळस. बहुदा ती मुद्दाम लावलेली, आक्कांना प्रिय म्हणून.एका बाजूला व्हरांड्यात बांधलेला सुबकसा झोपाळा. त्या झोपळ्यावर बसून मंद झोके घेणे, हा देखील आक्कांचा एक आवडता दिनक्रम.आपल्या खोलीत एखादी लहानशीच फुलदाणी आक्का रोज ठेवत असत. ती फुलदाणी बागेतल्याच फुलापानांनी सजत असे. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य जपणे ही त्यांची वृत्ती आणि पावित्र्य जपणे हा ध्यास ! म्हणूनच त्यांच्या खोलीतली ती लहानशीच फुलदाणीअगदी तुळशीच्या मंजिऱ्या तिच्यामधे खोवूनहीशोभिवंत दिसत असे. त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असे. 

इंदिरा संत यांचा एक स्वभाव विशेष म्हणजे त्यांना असलेले गंधांचे वेड.त्यांच्या कविते इतकेच त्यांचे “मृदगंध” हे आत्मपर लेखनही वाचकांच्या पसंतीस उतरले.”मृदगंध”या पुस्तकातला “गंधवेडी” हा त्यांचा अप्रतीम लेखही त्यांच्या घरांत वावरताना सारखा आठवत होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखेच त्यांचे घरही शीतल, निर्मळ वाटले.प्रेमळ,प्रामाणिक,अगत्यशीलआणि मितभाषी.त्यांचा मुलगा रवी आणि सून वीणा त्यांनासावली सारखी जपणारी. सुनेवर त्यांचा भारी लोभ.घर नातू,नातसुनेमुळेप्रसन्न झालेले. नातसुनेकडे घरात कोणीतरी येणार असल्याची ,छोट्या बाळाच्याआगमनाची सुवार्ता होती. त्यामुळे जणू सारे घर नवजात अर्भकाची वाट बघत असल्यासारखे वाटत होते. त्याच्या आगमनाला उत्सुक असल्यासारखे स्निग्ध,स्नेहाळ झाल्यासारखे भासत होते. इंदिराबाईंच्या एका कवितेत त्यांनी या चिमुकल्याचे स्वागत करताना घराची होणारी स्थिती फार नेमक्या शब्दांत मांडलीआहे. एका स्नेहल आजीचे हे हृदगत आहे. आपल्या घरात कोणीतरी चिमुकली पाहुणी आलेली आहे तिचे स्वागत करताना ही आजी म्हणते.....

चिमुकल्या पाहुणीचे घरी आज आगमन 
वास्तू होतसे तबक आणि मीच निरांजन

मायेची पाखर घालणाऱ्या एका प्रेमळ आजीचे हे हृदगत आहे. इंदिराबाईंचे व्यक्तित्व खूप शांत,निगर्वी, स्वागतशील पण तरीही कणखरहोते.त्यांचा स्वभाव अबोल पण चिंतनशील. संजीवनी मराठे,पद्मा गोळे आणि इंदिरा संत तशा समकालीन कवयित्री. संजीवनी,पद्मा,इंदिरा हे त्या वेळच्या कविसंमेलनातून तसे रसिक मान्य झालेले त्रिकूट होते.एकदा मी संजीवनीबाईंची पुणे आकाशवाणीसाठीमुलाखत घेतली होती.तेव्हा त्या म्हणाल्या होत्या “आम्ही तिघीजणी तेव्हा काव्य मैफिलीत सहभागी असायचो. कविसंमेलनातून कविता वाचनाबरोबरच काव्य गायन करायचा कालखंड होता तो. पद्मा आणि मी काव्य गायन करूनच पुष्कळदा कविता सादर करायचो. पण इंदिराबाईंना गायचे अंग नव्हते त्यामुळे त्या काव्य वाचनच करीत असत आणि रसिकांवर आपली छाप पाडीत असत. त्यांच्या काव्यातली झळाळून टाकणारी प्रतिमा सृष्टी रसिकांना थक्क करून सोडत असे.त्यांची कविता आमच्या काव्य गायनापेक्षा रसिकांवर प्रभाव पाडीत असे.इतका की आमच्या त्यांच्या कावितेपुढे कधी कधी निष्प्रभ वाटत असत.” संजीवनीबाईंचे हे प्रांजळ मत खरे होते. त्यांच्या प्रतिमाविश्वाचा प्रत्यय अनोखा होता. त्यांची कविता वाचून कोणीही हे मान्य करेल....उदा.नियती विचाराविषयी त्या सहजच लिहून जातात, 
प्रारब्धा रे ! तुझे नि माझे नाते अटीतटीचे 
हार जीत झेलण्याचे,पारध्याचे,सावजाचे

असे जीवनाविषयी बोलणाऱ्या इंदिराबाईंनी त्यांच्या जीवनात नियतीने त्यांच्या पदरांत टाकलेले दान कणखरपणे झेलले. आपल्या एका कवितेत त्या म्हणतात...

जरी फाटला पदर तुझे झेलते मी दान 
पण ओठातून नाही तुला शरण शरण ....

असेकवितेत त्यांनी ठणकावून सांगितले.इंदिराबाईंच्या कविता आम्हाला एम.ए.ला अभ्यासालाहोत्या.त्यांचा अभ्यास करताना इंदिराबाई अधिक गहिरेपणाने मनात उतरल्या. मनाला भावून गेल्या.’मृदगंध‘ हे इंदिरा बाईंचे आत्मपर ललित लेखन.ते वाचल्यावर ज्या कोणाला ते भावणार नाही किंवा भावले नाही, असा माणूस विरळच म्हटला पाहिजे . माझे ते अत्यंत आवडते पुस्तक.त्यांच्या कवितेप्रमाणेच त्यांचे गद्य लेखनही मनाचा ठाव घेते. जगण्याला दु:खाची इतकी सुंदर किनार असते,सोसण्यातही विलक्षण सौंदर्य असते, विरहातही तृप्ती शोधायची असते,हे दाखवणारी त्यांची शहाणी सुरती कविता मनात ठसली होती. ही कणखर मनाची यशस्वी कविता,आपल्या जीवनाच्या धगीतून तावून सुलाखूननिघणारी कविता,प्रीतीची समंजस जाणीव देणारी कविता ...ही कविता लिहिणारी कवयित्री असेल तरी कशी ? असा प्रश्न खूप दिवस मनात पिंगा घालीत होता. आता त्या कवयित्रीला खूप जवळून बघण्याचे भाग्य मला लाभत होते. फारादिवासांची मनात जपून ठेवलेली इच्छा आज पूर्ण होत होती. निखळ कविता लिहिणाऱ्या या कवयित्रीचे साधे ,सोज्वळ,शांत रूप बघून मला आणखीनच भारावून गेल्यासारखे झाले. त्यांचे सारे घर या कवयित्रीची जपणूक तिच्या कवितेसकट अतीव आदराने,प्रेमाने, ममत्वाने आणि आपुलकीने करीत होते. त्यांची सून वीणा आणि इंदिराबाई ही सासू सुनेची जोडी, हे नाते खूप प्रेमाने जपताना पाहून तर फारच आल्हाद वाटला. 

होउन येशिल उषा शुभांगी
दारापाशी शुभ्र धुक्यातुन
अंगांगावर बहर जाईचा 
केसांमध्ये चमके दंवकण
सोन पायरीवर पायावर 
सोनेरी किरणांचे पाणी
दो हातांनी टाकिन स्वप्ने 
तुझ्यावरून मम ओवाळूनी 

असे आपल्या सुनेचे वर्णन करणारी सासू ,आपल्या घरांत आपली सून लक्ष्मीचे भाग्य घेऊन येणार म्हटल्यावर तिची कोण लगबग सुरू होते ! तिच्या सोनपावलांचे स्वागत करताना तिची धांदल उडते.आणि तिचे गोंधळलेले मन म्हणते....
ओवाळिन मग तुजला दारी 
नक्षत्रांच्या निरांजनांनी
उंबऱ्यावरी ठेविन चंद्रम
घरांत आणशिल सुधा वाहिनी 

आपल्या चंद्रमौळी घरात सुनेचे असे अभूतपूर्व स्वागत आणि कौतुक करताना गोंधळलेली सासू आणि तो कौतुक सोहळा जिच्यासाठी चाललेला आहे ती सून , दोघीही त्या दिवशी माझ्या समोरच बसल्या होत्या.आणि या घराच्या उंबऱ्याचे माप ओलांडून आलेल्या आपाल्या सुनेवर त्यांनी लेकीसारखेच प्रेम केले होते. या विलोभनीय नाते संबंधाचा एक वेगळाच ठसा माझ्या मनावर उमटत होता. वीणा म्हणजे त्यांची सून आपल्या प्रतिभावान सासूविषयी भरभरून बोलत होती. ती सांगत होती त्यांची दिनचर्या, त्यांचासंवेदनशील स्वभाव ,त्यांचा साधेपणा ,त्यांची लेखन पद्धती ,त्यांच्या स्वभावातील कणखर भावही.त्यांचे एक एक स्वभाव विशेष सांगणाऱ्या त्यांच्या सुनेलाहीकॅमेऱ्यात घ्यायचे होते. इंदिराबाईंवरचा हा एपिसोड करताना आणखी एक भान ठेवणे गरजेचे वाटत होते.ते भान त्यांच्या वयाचे आणि थकलेल्या शरीराचे . शूटिंग सुरू करायच्या वेळी आधी त्यांच्या अंगात ताकद असतानाच घराबाहेरील (आउट डोअर शूटिंग ) करायचे आम्ही ठरवले. आणि मी इंदिराबाईंना ,आक्कांना विनंती केली की ,” आक्का ! रोज सकाळी बागेत एक फेरी असते ना तुमची ? त्या प्रमाणे बागेत जरा फेरी मारता का ? नेहमी प्रमाणे फुले तोडतानाचे तुमचे शूटिंग आपण घेऊयात. “ त्यांनी तत्काळ आपली संमती यासाठी दर्शवली आणि त्या म्हणाल्या ,” हो ! रोज सकाळी माझी बागेत एक चक्कर असते.फुलं,पानं मला फार आवडतात.नेहमी प्रमाणेच फिरूना बागेत?चालेल तुम्हाला?” आपली तब्येत तशी नाजूक असताना सुद्धा शूटिंगसाठी आम्हाला त्यांच्याकडून सर्वतोपरी सहकार्य होते. त्यांनी त्यांच्या स्वभावांतील शांतपणानुसार बागेत एक चक्कर मारली. ती चक्कर मारताना झाडावरील सुकलेली पाने खुडून टाकली.एखादे सुंदर दिसणारे फूल,पान हलक्या हाताने खुडून घेतले. तुळशीच्या मंजिऱ्या ममत्वाने आपल्या ओच्यात खुडून घेतल्या आणि त्या झोपाळ्यावर जाऊन बसल्या. ओच्यातील मंजिऱ्या त्या एकाग्रतेने आपल्या मनाशी विचार करीत जुळवीत होत्या.हा त्यांचा दिवसातील एक आवडता उद्योग होता असे त्यांची सून आम्हाला म्हणाली. थोड्या वेळातच त्यांनी आपल्या हातातील मंजिऱ्या आणि काही सुंदर फुले घेऊन त्यांचा एक गुच्छ बनवला, फुलदाणीत ठेवायला.हा आमच्या दृष्टीने त्यांचे सात्विक व्यक्तित्व टिपण्याच्या दृष्टीने मोलाचा क्षण होता, विलक्षण क्षण होता. ज्यांनी या कवयित्रीचा बारकाईने अभ्यास केला असेल त्यांनी आमचा एपिसोड या दृष्टीने बघितला, तर त्यांना त्यातील बारकावे समजू शकतील. त्यामुळे त्यांना अधिक आनंद देखील मिळू शकेल. अशा कितीतरी बारकाव्याच्या जागा आम्ही शूटिंग करताना पकडलेल्या आहेत. त्या बारकाव्यातून त्यांचे व्यक्तित्व सुंदर रीतीने प्रतिबिंबित झाले आहे. त्यांच्या घरचाच होऊन राहिलेला त्यांचा कुत्रा “गूफी”. जणू एक फॅमिली मेंबरच. हा कुत्रा खरोखरीच भाग्यवान म्हणायला हवा .त्या मुक्या प्राण्यावर इंदिराबाईंचे अलोट प्रेम.त्या त्याला आपल्या बरोबर जेवायला बसवीत असत. जेवताना त्याच्या स्वत:च्या पानात जे जे पदार्थ वाढले असतील ते ते सर्व “गूफी “च्या थाळीत देत असत.आहे की नाही हे सारे विलक्षण ! 

या एपिसोडसाठी मी पूर्व तयारी भरपूर केली होती. त्यांच्या बद्दलची बारीक सारीक निरीक्षणे माझ्या डायरीत नोंदवून घेतली होती. त्यांचे काही जुने फोटो,त्यांच्या हस्ताक्षरातल्या कविता,त्यांचा आणि संतांचा मिळून काढलेला एकत्रित काव्य संग्रह “सहवास”, त्या पूर्वी पुस्तकात खूण म्हणून ठेवत असत ते मोरपीस या साऱ्याचीच जुळवाजुळव करून ठेवायला मी वीणाला म्हणजे त्यांच्या सुनेला ,आधीच सांगितले होते.’ संत’ द्वयीने काढलेला त्यांचा “सहवास” हा कविता संग्रह मी सहजच चाळत असताना मला त्या दोघांचे फर्गसन महाविद्यालयातील ते जुने दिवस आठवले.” मृदगंध “ या आपल्या आत्मपर लेखन असलेल्या पुस्तकात त्याबद्दल इंदिराबाईंनीलिहिले आहे. संतांची आणि त्यांची भेट या कवितेनेच तर घालून दिली होती. फर्गसनच्या मागच्या बाजूच्या टेकडीवर बसून,समोर दिसणाऱ्या सूर्यास्ताच्या साक्षीने त्यांनी एकमेकांच्या चिरंतन वाटचालीसाठी शपथा घेतल्या होत्या.झाडावरून अलगद उतरणाऱ्या बुचाच्याफुलांची छानशी सुबक अंगठी करून एकमेकांच्या बोटांत घातली होती आणि आपल्या संसाराचे भावी चित्र रंगवले होते. श्री.संत आणि इंदिराबाई यांच्यात होणाऱ्या कवितेच्या देवघेवीच्या नाजुक व्यवहाराचा साक्षीभूत असा हा फर्गसनचा परिसरच होता.त्याचेच फलित होते,”सहवास” हा कविता संग्रह.या सर्व गतकाळातील आठवणी कित्येक वर्षानंतर इंदिराबाईंसमोर परत उभ्या ठाकल्या होत्या ,शूटींगच्या निमित्ताने ! किती काळ लोटला होता या गोष्टींना ...माझ्या मनात आले काय वाटले असेल त्यांना ! दोघांनी एकमेकांवर आसुसून पण संयत प्रेम केले होते. त्या दोघांच्या संसारासंबंधीच्या कल्पना इतरांसारख्या चूल बोळकी मांडून संसार करण्याइतपत सीमित नव्हत्या. संसार म्हणजे दोघांनी एकत्रित येऊन जीवनाचा घेतलेला आनंद, अशी त्यांची संसाराबद्दलची साधी सरळ व्याख्या होती. अशा अतिशय संवेदनशील जोडीदाराबरोबर संसार सुखात चाललेला असताना नियतीने त्यांची केलेली फारकत त्यांनाकिती जीवघेणी वाटली असेल ! पण कवितेने या चिरंतन विरहाचे दु:ख झेलण्याची ताकद त्यांना दिली. आपल्या कवितेचा गेंदच त्यांनी या चिर वेदनेच्या भोवती गुंफलेला होता.

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी 
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली 

असे म्हणत कोसळणाऱ्या पावसाच्या लाख विनंत्या करणारी प्रेमिका या कवितेत दिसते.पावसाला म्हणते,’तुझ्या विजेच्या डोळ्यात मी माझ्या प्रियकराला पूजीन.पावासाला विनंती करते ,तू जरा पुढे जा आणि माझ्या प्रियकराची वाट अडवून त्याला माघारी परतव.’पावसाशी संवाद साधत प्रियकराची आळवणारी ही कविता त्यांच्या मनातील प्रीतिभावना व्यक्त करणारी एक समर्थ कविता आहे. या कवितेची लयआणि कवयित्रीच्या मनातील गाढ प्रीतीचे दर्शन याचा मेळ या कवितेत इतका काही सुंदर जमून आला आहे की इंदिरा बाईंची ही कविता आज मराठी काव्य रसिकांच्या मनात कायमचे घर करून राहिली आहे. इंदिराबाईंचेप्रतिमाविश्व थक्क करून सोडणारे आहे,त्यांच्या कवितेतील आर्त विरहभावव्यक्त करण्याची ताकद विलक्षण आहे. या साऱ्या साऱ्यालाच त्रिवार सलाम ! आक्कांचे शूटींग एकीकडे चालू होते आणि दुसरीकडे त्यांच्या बांधेसूदपणे लिहिलेल्या कवितेच्या प्रांगणात माझे मन विहार करीत होते. मनात आले पती विरहाचे दु:ख या अतिसंवेदनशील मनाने कसे झेलले असेल ? त्यांच्या काही आर्तभाव असलेल्या ओळीही मनात दाटून आल्या. 
कधी कुठे न भेटणार ,कधी न काही बोलणार 
कधी कधी न अक्षरात, मन माझे गोवणार 
पण तिथेच रे तिथेच ,मिटुनि ओठ संपणार
व्रत कठोर हे असेच ,हे असेच चालणार

त्यांच्या कवितेतून विरह वेदना अशी पाझरते.दु:ख विस्तारत जाते ..वैयक्तिक दु:खाची भावना वैश्विक होते.या कवयित्रीने जे भोगले त्या भोगण्याचीच ‘ अक्षर नक्षत्रे ‘ झाली आणि आपल्या अंगभूत तेजाने काव्य सरस्वतीच्या अंगावरील अलंकार म्हणून शोभून दिसली....मी विचारातबुडून गेले क्षणभर. इंदिराबाई आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर होत्या की ‘सुख दु:ख समे कृत्वा ‘ अशीच त्यांची भूमिका असणार .....मी तंद्रीतून जागी झाले,कोणीतरी माझ्या हातात मोरपीस आणून ठेवले होते,पुढीलशॉट घेण्यासाठी म्हणून.मी जरा पुढे होत आक्कांना म्हटले ,” आक्का ! जरा हे मोरपीस या पुस्तकात खूण म्हणून ठेवता ? आवडायचं ना तुम्हाला हे मोरपीस खूण म्हणून ठेवायला ? मग एक शॉटअसाही घेऊयात ...” त्या हसल्या.त्यांनी त्या मोरपिसावरून हळूवार हात फिरवला. मला वाटले किती आठवणींचे काहूरत्यांच्या मनात दाटून आले असेल ! त्यांनी लिहिलेल्या “मरवा” या कविता संग्रहातील कवितेच्या ओळी मनात एकदम तरळून गेल्या.

पुस्तकातली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे 
पिसाहुनी सुकुमार काहिसे 
देता घेता त्यात थरारे 

त्यांनाही त्या ओळी आठवल्या असणार.म्हणाल्या ,” बरीच बारकाईने कविता वाचलेली दिसते आहे ” आम्ही शॉट घेतला. आक्का पुस्तक वाचताहेत. ते वाचून झाल्यावर पुस्तक मिटताना वाचन कुठपर्यंत आले त्याची खूण म्हणून, त्या ते सुंदरसे मोरपीस पुस्तकांत तिथपर्यंत केलेल्या वाचनाची खूण म्हणून ठेवीत आहेत. शॉट ओके झाला. मग शॉटझाल्यावर आक्कांना जरा विश्रांती दिली. त्यांना मधून मधून विश्रांती देणेही आवश्यकच होते. आम्ही पुढील शॉट घेण्याच्या तयारीला लागलो. आक्कांनी फिक्कट निळ्या रंगाची साडी नेसली होती. थकलेले शहाणपण त्यांच्या डोळ्यांतून प्रतिबिंबित होत होते. बोलण्याचालण्यात एक निगर्वी नितळपणा होता.व्यक्तिमत्वात शालीनता होती. बोलण्यात स्पष्टता होती,आणिविचारांत कणखरपणा. 

नंतरचा शॉट फार हृद्य होता. इंदिराबाई त्यांच्या मुलाबरोबर,सुनेबरोबर सहजच गप्पा गोष्टी करतानाचा तो शॉट होता. या गप्पांच्या ओघातच त्या आपल्या सुनेच्या गृह प्रवेशाच्या निमित्ताने लिहिलेली कविता वाचणार होत्या ....”होउन येशिल उषा शुभांगी “....शॉट सुरू झाला.मी त्यांना ‘बोला’ अशी विनंतीवजा खून केली.आक्कांना वयानुसार जरा कमी ऐकायला येत होते. वीणाला त्यांच्या सुनेलाजवळ जवळ त्यांच्या कानाशी जाऊनच बोलावे लागत होते. खरे तर वीणा होती त्यामुळे आक्कांशी संवाद साधणे तसे आम्हालाही सोयीचे जात होते. असो. आक्कांनी पुस्तक उघडले. आणि त्यांनी त्या कवितेचे वाचन सुरूकेले. कितीतरी वर्षांपूर्वी वीणाच्या गृहप्रवेशासाठी केलेली कविता आज त्या तिच्या समोर बसून वाचत होत्या. वातावरण नाही म्हटले तरी जरा भावुकच झाले होते. त्या तिघांचीही मनेभूतकाळात गेली नसतील तरच नवल ! आक्का वाचत होत्या ......

येशिल होउन संध्या लक्ष्मी ,सुवर्ण सिंचित राजपथातुनी 
अंगांगावर बहरत केशर , केसांमध्ये सांज चांदणी
स्वप्नामाध्ये हे स्वागत पण,येशिल जेव्हा तूच खरोखर 
गोंधळलेली मी हिअशी ,अन हे तर माझे चंद्रमौळी घर 

वीणा लक्ष देऊन ऐकत होती. इंदिराबाई वाचत होत्या आणि वीणाचे डोळे आठवणींनी तुडुंब भरून आले होते.शॉट ओके झाला.

‘लोकेशन चेंज’ची सूचना मी दिली. आक्कांना परत एकदा जरा विसावा दिला. त्यांची थोडी विश्रांती झाल्यावर त्या परत आल्या. दोन्ही खांद्यावरून पदर लपेटलेला ,वयानुसार केस जरासे विरळ झाले होते, त्याची लहानशीच गांठ मानेवर बांधली होती.काव्यवाचन त्या फार प्रभावीपणे करायच्या असे नाही. जशा त्या साध्या होत्या तसेच त्यांचे काव्य वाचन ! वाचन साधे जरी वाटले तरी त्या कवितेतला एकेक शब्द मनावर ठसा उमटवत होता. त्यांची प्रसिद्ध कविता त्या वाचायला लागल्या ......

निर्मळ निर्भर वातावरणी 
धुके तरंगे धूसर धूसर 
झगमगते अन नक्षी त्यावर
सोनेरी किरणांची सुंदर 

इंदिराबाई ज्या पायवाटेनी आपल्या संस्थेत काम करण्यासाठी जात असत त्या वाटेवरती खाली पायाशी हिरवे गवत आणि त्याच्यावर कुणीतरी शेला पांघरावा तसे धरतीवर धुके पसरलेले. थंडगार वातावरण ...कार्तिकातली थंडी. इंदिराबाईंना तेव्हा वाटून गेले,की जणू धरित्रीच शेला ओढून बसली आहे. आणि तो शेला चारुदत्ताने तिच्याकडे फेकला आहे, तिने तो अलगद आपल्या अंगावर लपेटलेला आहे. 

चारुदत्त हा कोण कोठुनी
अंगावारला फेकित शेला
वसंतसेना वसुंधरेने
झेलून तो हृदयाशी धरिला

वा! रसिकांच्या तोंडून या ओळींना दाद मिळायला हवी. ही आक्कांची एक प्रसिद्ध कविता,खूप गाजलेली.त्यांच्या ‘शेला ‘ या कविता संग्रहातील. मनात येऊन गेले इंदिराबाई ‘ शाल ‘ हा शब्द योजत नाहीत.’ शेला ‘ हा शब्द योजतात. ‘ शाल ‘आणि ‘ शेला ‘ या दोन्ही शब्दांचे तसे प्रयोजन एकच .पण ‘ शेला’ या शब्दाभोवती एक खास खानदानी सभ्यतेचे, शालीनतेचे ,ॠजुतेचे वर्तुळ आहे. आक्कांची ही खूप गाजलेली कविता त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा योग यावा, ही किती भाग्याची गोष्ट ! आणि हे भाग्य दूरदर्शनाच्या प्रेक्षकांनाही लाभणार होते. कवितेची अंगभूतलय,सौंदर्य आणि सुसंस्कृतता यांचा तोल राखणारी ही कवयित्री. वय वर्षे फक्त ऐशी वर्षांच्या आसपास. पण वाचण्यातली तन्मयता जाणवून जावी अशीच. या नंतर इंदिरा संतांनी आणखी तीन चार कवितांचे वाचन केले. मी त्यांना प्रश्न केला ,” आक्का भावकविता म्हणजे काय हो ? “ आणि त्यांनी अगदी साधेपणाने उत्तर दिले,” माझ्या कवितांना मी भावकविता म्हणते. भावकविता म्हणजे जो भाव मनात आत पर्यंत जाऊन पोहोचलेला असतो आणि त्याच्यावर परिणाम होऊन जे शब्द वर येतात ती कविता म्हणजे भावकविता.” या वयातही आपल्या प्रतिभेविषयीचा सार्थ अभिमान या कवयित्रीजवळ होता.त्या पुढे म्हणतात, “ माझी कविता ही माझीच कविता आहे असं मी म्हणते. याला तुम्ही अभिमान म्हणा किंवा माझ्या मनाचं सत्य म्हणा.” आपल्या कलेविषयी असलेला सार्थ अहंकार किती साध्या शब्दात त्यांनी बोलून दाखवला ! त्यांनी एके ठिकाणी असेही म्हणून ठेवले आहे की ‘ माझी कविता माझ्या भावनात्मकआयुष्याशी निगडित आहे. पण ती माझी सहचरी किंवा प्रतिकृती नव्हे. जीवनातील संघर्षात व्यक्तिमत्त्वाच्या ठिणग्या उडतात. त्या ठिणग्यांनी घेतलेला आकृतिबंध म्हणजेच माझी कविता आहे.’ 

सकाळपासूनच आमच्या शूटिंगचा धबडगा त्यांच्या घरात चालू होता. त्यांच्या नीटनेटक्या घराला आमच्या शूटिंगच्या सर्व सामानानी अस्ताव्यस्त रूप आलेले होते. शूटिंग साठीचे सर्व साहित्य घरात पसरले होते. काय करणार ? तसा शूटिंगचा नाही म्हटले तरी पसारा होतोच.पण त्यांचे घर सहनशील होते. दिवस भराच्या शूटिंगमुळेआक्कांची नाही म्हटले तरी दगदग झाली होतीच. त्यामुळे त्या दमून जाणे अगदी साहजिकही होते. तसेच झाले.त्या जरा दमल्यासारख्या झाल्या. शूटिंगसाठी वापराव्या लागणाऱ्या लाईट्समुळे त्यांच्या डोळ्यांखाली जरा टापसल्यासारखी सूज दिसायला लागली. मी मनात म्हटले आत्ता घेतले गेले आहे तेवढे शूटिंग खूप झाले. त्यांना जास्त दमवण्यात अर्थ नाही. आमचे काम महत्त्वाचे आहे हे खरे, पण त्यांची तब्येतहीमहत्त्वाची आहे. शेवटी मीच मला सांगितले,” माधवीताई ! आता बास... तुमच्या लाडक्या मालिकेसाठी तुमच्या आवडत्या कवयित्रीला आता जास्त शिणवू नका...” आम्ही त्यांना विश्रांती घेण्यासाठी विनविले. 

आम्ही शूटिंग सुरू केल्यापासून मला एक गोष्ट सतत जाणवत होती तीही की त्यांची सून वीणा त्यांच्या लेकीचीच जागा घेऊन त्यांची खूप काळजी घेत होती. त्यांना खूप जपत होती. त्यांची मन:पूर्वक देखभाल करीत होती. त्यामुळेच आक्कांना खरेखुरे समजून घेण्यासाठी तिची फारच मदत होणार होती. मी वीणाला म्हटले,” वीणा ! तू इतकी वर्षे आक्कांच्या सहवासात आहेस. अगदी मनोभावे त्यांना काय हवे,नको बघते आहेस.तू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी काही बोल ना ! त्यांचे स्वभाव विशेष तूचचांगले उलगडून दाखवशील. त्यांची इतकी जवळून आणि आत्मीयतेने कोण ओळख करून देणार ? तुझ्यासारखी ! “ ती अतिशय संकोचानेच होय ,नाही करत बोलायला तयार झाली. सासूसुनेची ही भावनिक वीण इतकी मोहक वाटत होती की वाटून गेले उगाचंच घराघरातून सासवासुना वाद घालत असतात. या घरात जसे सासू सुनेचे नाते आहे तसेच नाते घराघरातून दिसले तर किती चांगले होईल ! असेही ऐकले होते की इंदिराबाईंनी आपल्या साहित्याचे सारे हक्क याच सुनेच्या स्वाधीन केलेले आहेत.ही गोष्ट तर आणखीनच विशेष होती. बोलण्यासाठी प्रथम प्रथम संकोचणारी वीणा भरभरून बोलायला लागली, “त्यांची आनंद घेण्याची आणि सौंदर्य टिपण्याची क्षमता कमालीची आहे. त्यांच्यासारखी व्यक्तीच मी पाहिली नाही. त्यांनी स्वत:च्या लेखनाच्या आड किंवा त्या कॉलेजच्या प्रीन्सिपॉल होत्या त्याच्याआड ,आपल्या कवयित्रीचा मूड किंवा घरातली नैमित्तिक कामं कधीच येऊ दिली नाहीत. त्यांची शिस्त खूप असते.जेवढंतरल मनआहे तितकंच शिस्तबद्ध पण आहे. आणि त्या शिस्तीत त्यांची सौंदर्यदृष्टी गेलेली नाहीये. माझं कसं असतं की कोणी माझ्याकडे पाहुणे येणार असतील तर मी भराभरा बागेत फिरते आणि चार फुलदाण्या भरून ठेवते.त्यांचं तसंअसत नाही. त्यारोज बागेमध्ये जी फेरी मारतात,तेव्हा झाडावर सुकलेलंफूल दिसलंतर ते त्या काढून टाकतील जर सुकलेल्या अवस्थेत ते सुंदर दिसत असेल तर ते त्या खुडून घेतील. झाडांना पाणी घालताना त्या त्याच्या पानावरनं पाणी घालतील.कुरूप विद्रूप असंत्यांना काही आवडत नाही.कॉलेजात त्या होत्या तेव्हा त्यांचा सत्कार करावा असं ठरलं,तर त्या इतक्या सामान्यपणे असं म्हणाल्या ,’ अग , मी काय सेवा केली का ? पगार नाही का घेतला मी ? याला सेवा नाही म्हणत.मी नोकरी केली. मग माझंकाम होतं विद्यार्थ्यांचं हित बघायचं,त्यांना नीट शिक्षण देण्याचं ,त्यांच्या समोर स्वच्छता,सौंदर्याचा आदर्श ठेवण्याचं.बेळगावात आलेला प्रत्येक मोठा माणूस आक्का जेव्हा प्रिन्सिपल होत्या, तेव्हा कॉलेजमध्येयेऊन गेलेला आहे .एक तर आक्कांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्या आग्रहावरून .आणि त्यांना असं वाटायचं की मुलांनी ही मोठी मोठी बघितली पाहिजेत. असे पाहुणे येणार असतील तर त्या संस्थेतल्या मुलींना शेणाचे सडे घालून रांगोळी काढायला लावायच्या.सडा रांगोळ्यांनी पाहुण्यांचंस्वागत केलं जायचं.म्हणजे सौंदर्य दृष्टी त्यांना अंगभूतच मिळालेली देणगी आहे. आणि त्यात कृत्रिमतेचा लवलेशही नाही. म्हणजे त्याबद्दल काय बोलावं ते कळतच नाही.” वीणाने असेही सांगितले की‘ “ त्यांच्या सौंदर्य दृष्टी बद्दल तर काय सांगावं?एखादं सुंदर फूल जर त्यांना दिसलं तर त्या फुलाचं सौंदर्य बघण्यात मग्न होतात.फुलं,वेलींना आक्का फार जपतात.त्यांच्याशी कोमलतेनंवागतात.फुलदाणीत फुलं ठेवायला त्यांना फार आवडतं.आणि विशेष म्हणजे कसलीही फुलदाणी त्यांना चालते औषधांच्या रिकाम्या बाटल्याताही त्या अशा प्रकारे फुलं सजवून ठेवतात की ती फुलदाणी खरोखरच फार सुंदर दिसायला लागते. आक्कांना नाना प्रकारचे गंध फार आवडतात . अगदी मृदगंधापासून ते महागड्या सेंट्स पर्यंतचे सारे गंध त्यांना प्रिय ! त्यांना ‘गंधवेडी ‘हे विशेषण वापरलेजातं,ते खरंच आहे.त्यांचे गंधाचे वेड आता सर्वश्रुत झालं आहे.” वीणा आक्कांच्याबद्दल अतीव आदराने बोलत होती. या संवेदनशील कवयित्रीच्या लेखनाबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली, “ त्यांचे लिहिण्याचे असे काही खास मूड्स वगैरे नसतात. घरात कितीही गडबड गोंधळ असला तरीत्या कधी “माझ्या लिहिण्यात यामुळे काही व्यत्यय वगैरे येतो आहे किंवा त्यांनी कधी तक्रार केली आहे किंवा म्हणून कोणालाबोलल्या आहेत ,असे कधीच होत नाही. आपल्या खोलीत जाऊन त्या अगदी शांतपणे लिहीत असतात.अगदी एकाग्रतेने. त्यांना लिहायला सोपे जावे म्हणून त्यांना सोयीचे होईल त्या उंचीवर अगदी साध्या सूटकेसचा आधारही दिलेला त्यांना पुरेसा होतो. म्हणजे लिहायच्यासाठी त्यांना साधी , सोयीची बैठकही चालते. “ वीणाने त्यांच्या खोलीत जाऊन ती त्यांची लेखन समाधीची साधीसुधी बैठक आम्हाला दाखवली,तेव्हा खरोखरीच आश्चर्य वाटले. एक बसायला साधी खुर्ची होती ,त्याच्या समोर टेबल म्हणून ठेवलेली उलटी खुर्ची होती.त्यावर एक साधी सूटकेस व त्यावर एक लिहिण्याचे पॅड.अशी त्यांच्या लिहिण्यासाठीची सोयीस्कर,त्यांना त्यांच्या वयाला झेपेल अशी साधीच बैठक होती. कुठेही थाटमाट नाही सारा निगर्वी आणि साधा मामला. आक्कांची अशा बैठकीत लागलेली लेखन तंद्री आम्ही कॅमेऱ्यात घेऊन ठेवली. वीणा बोलत होती ,”आता वयोमानानुसार त्यांच्या हातातली ताकद कमी झाली आहे. त्यामुळे लिहायला त्यांना ‘इंक’ पेनच लागतो. त्यासाठी तेवढे तीन,चार पेनं शाई भरून ठेवली की झालं. मी ते काम मात्र आवर्जून नित्य नेमानं करते. ते देखील त्यांच्या मनगटात आता लिहिण्यासाठी जोर राहिला नाही म्हणून ! बाकी ‘त्यांचं’ म्हणाल तर तसं मला काहीच करावं लागत नाही. त्या मुळातच तशा शांत वृत्तीच्या आणि मृदू स्वभावाच्या आहेत. आता पर्यंत,आजवर त्या कोणावरही रागावल्याचे,आवाज चढवून बोलल्याचे मला तरी आठवतनाही. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असा विचार किती लोक करत असतील? सांगा ना ! “ वीणा मोकळेपणी बोलत होती तिचा कंठ दाटून येत होता. ती म्हणाली ,” आता आणखी काय सांगू आक्कांबद्दल? त्यांची सून होण्याचं भाग्य मला मिळालं, या माझ्या भाग्याला मी काय म्हणावं तेच मला कळत नाहीये. देवानं मला त्यांच्यासारखी थोर मनाची सासू दिली .माझा कोणीही खरं तर हेवाच करील.” 

दिवस कलू लागला.आक्काही आपल्या खोलीत जाऊन जरा पहुडल्या होत्या. त्या दिवसाचे चित्रीकरण आम्ही पूर्ण केले. बऱ्याच गोष्टी आता आमच्या हाती आल्या होत्या. योजलेले सर्व शॉट्स मनासारखे घेऊन झाले होते. त्यांच्या घरातील उपलब्ध फोटो, पुस्तके,आक्कांचे हस्ताक्षर ,काव्य संग्रह यांचेही चित्रीकरण घेऊन झाले होते. त्यांच्या टुमदार घराचे काही शॉट्सही घेतले होते. काम चांगले झाल्याच्याआनंदात मी “ प्लीज पॅक अप “ म्हटले. 

आक्कांचा आशीर्वाद आणि निरोपही घ्यावा म्हणून त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा त्या उत्स्ताहाने आपल्या नवीन प्रकल्पाविषयी सांगू लागल्या,” लोक साहित्यावर आधारित ‘मालन गुंफा ‘ या नवीन प्रकल्पाला मी सुरुवात केली आहे.त्या सांगत होत्या , “मी काही ग्रामीण ओव्या गोळा केलेल्या आहेत.मला लहानहापणापासूनच हा नाद होता. कोल्हापूरला बसनी जाताना तवंदी म्हणून एक डोंगर लागतो. ते जैनांचे स्थान आहे. तिथं माझं सगळं बालपण ,लहानपण गेलं.तिथे खेड्यातल्या लोकांची गाणी ऐकून आणि घरी येणाऱ्या मोलकरणी वगैरे ,त्यांची गाणी ऐकून मला ती गाणी फार आवडायला लागली.त्यावेळी मी ती लिहून घेतली नव्हती पण नंतर पाचवी सहावीत गेल्यापासून ती गाणी लिहून घ्यावी वाटायला लागली. मग मी ती गाणी जिथून मिळतील तिथून लिहून घ्यायला लागले. आणि तशी खूप जमली माझ्याकडे.खूप मोठा गठ्ठा झाला. मग त्याचे काय करावे मला कळेना. मग शेवटी मला फार उशीरा कळलं की या गाण्यांचं मला काहीतरी करायला पाहिजे.मग मी त्या गाण्यांची गाथा केली.म्हणजे ग्रामीण स्त्रियांची जीवन गाथा” मी म्हणाले,” होय का ? मग माझ्या आजीने मला एक पारंपारिक गौळण शिकवली होती. म्हणून दाखवू का तुम्हाला ? कृष्णाचे विश्वरूप दाखवणारी गौळण आहे.आवडेल तुम्हाला.”हे ऐकल्यावर त्यांना फार आनंद झाला. मला त्यांनी ती गौळण म्हणून दाखवायला सांगितली. त्यांना ती फारच आवडली.त्यांनी माझ्याकडून ती लिहूनही घेतली. याही वयात त्यांचा तो अदम्य उत्साह पाहून अक्षरश: थक्क व्हायला झाले. मनोमन मी त्यांच्या प्रतिभेला नमस्कार केला.त्यांच्यापाशी नतमस्तक होऊन त्यांचा निरोप घेतला आणि आम्ही एका तृप्त भावनेने त्यांच्या घरातून बाहेर पडलो. 

या भागाच्या चित्रीकरणाचा पूर्वार्ध बेळगावी झाला तर उत्तरार्ध पुण्यात आल्यावर चित्रित करण्यात आला. इन्दिराबाईंच्या कवितांवर कोणीतरी समीक्षकाने बोलले पाहिजे असे वाटत होते. त्यासाठी आम्ही सुप्रसिद्ध समीक्षक डॉ.अरविंद वामन कुलकर्णी यांना पाचारण केले.डॉ.कुलकर्णी हे मूळचे तवंदीचे. तवंदी हे बेळगावापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले गाव.त्या गावात इंदिराबाईंचे काही दिवस वास्तव्य होते. त्यामुळेच इंदिराबाईंना अरविंद वामन कुलकर्णी खूप जवळून ओळखत होते. त्यांच्या एरवीच्या बोलण्यातही तवंदीसंबंधाने नेहमी उल्लेख येत.गप्पांमधे ते आक्कांच्या खूप आठवणी सांगायचे.त्या आठवणी सांगताना अगदी रंगून जायचे. त्यांच्या मनात आक्कांबद्दल आदरभाव होता,आणि ते आक्कांच्या कवितांचे निस्सीम चाहातेही होते. आणखी एक व्यक्ती इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलण्यासाठीआम्ही निमंत्रित केली,ती व्यक्ती म्हणजे श्री.विजय कुवळेकर. इंदिराबाईंना त्यांनीच ‘मृदगंध ‘साठी लिहिते केले होते. कुवळेकरांना आक्कांचे व्यक्तिमत्व फार बारकाईने माहीत होते. या दोघांचे चित्रीकरण करण्यासाठी मी माझ्या बालमैत्रिणीच्या घराची निवड केली. तिचे नाव श्री.चारुशीला श्रीखंडे.माझ्या सर्व प्रकारच्या कामात माझी ही मैत्रीण सदैव माझ्या पाठीमागे उभी असायची. “अनन्वय” च्या कामातही तिने मन:पूर्वक मदत केलेली आहे. तिचे घर खूप टापटिपीचे,व्यवस्थित आणि देखणे होते. आणि मुख्य म्हणजे तिच्या घरी शूटिंग घेण्याइतके नात्याने जवळचे होते. तिने माझी ही विनंती तत्काळ मान्य केली. 

आधी डॉ.अरविंद वामन कुलकर्णी आक्कांच्या काव्याविषयी बोलले.ते म्हणाले, “ ‘इंदिराबाईंची’ म्हणू ,अशी जी कविता आहे ती खऱ्या अर्थाने बहराला आली ती १९५० नंतर. ती आपण लक्षात घ्यायला लागलो आणि त्या कवितेचं जर वर्णन करायचं झालं तर मला असं वाटतं की आपण एक विशेषण तिथं चांगल्या प्रकारे वापरू शकू. ते विशेषण म्हणजे ती कविता विलक्षण आहे. इंदिराबाईंची जी कविता आहे ती खऱ्या अर्थाने स्वाभाविक आहे,आणि खऱ्या अर्थानं ती नैसर्गिक आहे. असं दिसतं की ती पूर्णपणानं आपल्या प्रकृतीशी ईमान राखणारी किंवा तिला नव्या समीक्षेमध्ये जो शब्द आहे तो वापरायचा झाला तर पूर्णपणाने जिला ‘स्वनिष्ठ’ म्हणू अशी कविता ही इंदिराबाईंची कविता आहे.” असे म्हणून त्यांनी त्यांचे एक कवयित्री म्हणून मराठी कवितेतील स्थान फार वरच्या दर्जाचे कसे आहे,तेविषद केले. पतिनिधनानंतरत्यांच्या कवितेला एक वेगळे वळण लागल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांची व्यक्तिगत भावना वैश्विक पातळीवर कशी पोहोचली याचे सोदाहरण स्पष्टीकरणही त्यांनी केले. ते म्हणाले, “ इंदिराबाईंच्याबहुतांशाने सगळ्याच लिहिलेल्या कवितांमध्ये सुद्धा एक अंत:स्रोत आपल्याला जाणवतो तो म्हणजे त्यांचे पती ना.मा.संत यांच्या निधनाचा आहे. पण असं जरी असलं तरी इंदिराबाईंची कविता म्हणजे विलापिकांचे लेखन अशा स्वरूपाची मात्र नाही. पती निधनाचं दु:ख त्यांच्या त्यांच्या काव्यातून जरूर व्यक्त होतं पण हे नुसतं पती निधनाचं दु:ख नाहीये तर त्या दु:खाचा अर्थ लावण्याचा हा प्रयत्न आहे. आणि हा जो बाईंचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आहे त्याच्या अनेक पडताळल्या जाण्याच्या ज्या शक्यता आहेत त्या शक्यतांमध्ये आपल्याला असं दिसेल की अनेक पातळ्यांवरून त्या या दु:खाला भिडतात.”त्यांच्या कवितेतील अलौकिक प्रतिमाविश्व आणि त्याची विलक्षण अशी झळाळी यामुळे कवितेला विशिष्ट उंची प्राप्त कशी होते, हे ही आपल्याला पटते.एकंदरच त्यांच्या काव्य प्रतिभेविषयी अत्यंत मौलिक विवेचनडॉ.अ.वा.कुलकर्णी यांनी केले. तर कुवळेकरांनी आक्कांच्या अनोख्या व्यक्तित्वावर सुंदर भाष्य केले.ते म्हणाले,“ इंदिराबाईंच्या साहित्यातलं एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक म्हणजे ‘मृदगंध’ इंदिरा बाईंची कविता ही स्मृतिमग्न.आत्ममग्न अशा स्वरूपाची आहे. पण थेट आत्मपर असं त्यांनी काही लिहिलेलंनव्हतं. इंदिराबाईंनी ऐन उमेदीच्या काळात ’चैतू’,‘कदली’, असे फार चांगले कथासंग्रह लिहिले आहेत.फार चांगल्या कथा आहेत.त्यानंतर मात्र त्यांनी बरेच वर्षे काही गद्य लेखन केलेलं नव्हतं.इंदिराबाईंची कविता वाचताना,कथा वाचतानात्यांच्या बद्दल ऐकताना सातत्यानं असं वाटत राहायचं की इंदिराबाईंनी जर आत्मपर ललित गद्य लिहिलंतर निश्चितपणे मराठीमध्ये ते एक वेगळे साहित्य निर्माण होईल. किंबहुना या कवयित्रीचं मराठीमधे जे साहित्यातलंस्थान आहे,ते लक्षात घेता तिच्या कवितांचे काही उदगम स्रोत आत्मपर लेखनातून सापडू शकेल. आणि त्यातून मग इंदिरांबाईंच्या मागे पाठपुरावा सुरू केला. ‘मृदगंध’हे नाव ठेवलंआणि हे नावच त्यांना इतकं आवडलं की त्या म्हणाल्या गंधांवरती माझं खूप प्रेम आहे.गंध हा सबंध आयुष्यभर त्यांना साथ करत आलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे गंध अत्तरं,सेंट्स,फुलं,फुलांचे वेगवेगळ्या प्रकारचे सुवास,सुगंध हा इंदिराबाईंच्या फार आवडीचा भाग. आणि त्या नावावरच त्या इतक्या खूष झाल्या की त्यांनी जो पहिला लेख लिहिला तोच ‘गंध गाभारा’ असा लिहिला.कोणत्याही गोष्टीमधे पूर्णत्व,अचूकता असली पाहिजे नेमकेपणा असला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता,हा फार महत्त्वाचा होता. आणि त्यामुळे ते शब्द अतिशय सुंदर,लोलकाप्रमाणे,लोलकातून जसा प्रकाश यावा ,तसे ते शब्द आलेले आहेत.त्या शब्दांना नाद आहे,गंध आहे,लय आहे,ताल आहे,सूर आहे आणि त्या प्रत्येक शब्दाला त्याचं असंएक व्यक्तिमत्व आहे. “ श्री.कुवळेकरांनी इंदिराबाईंचे व्यक्तित्व आणि साहित्य दोन्हीवर आपल्या बोलण्यातून प्रकाश टाकला. डॉ.अरविंद वामन कुलकर्णी आणि श्री. विजय कुवळेकर दोघेही आपआपल्या क्षेत्रात जाणकार असल्याने त्यांनी विषयही चांगले मांडले. चित्रीकरणही गतीने व व्यवस्थित पार पडले.

त्याच दिवशीआणखी दोन कलाकारांचे चित्रीकरण घ्यायचे आम्ही ठरवले होते.त्यातीलएक होते भावगीत क्षेत्रातील दिग्गज गायक आणि संगीतकार कै.गजाननराव वाटवे.इंदिरा संतांच्या कवितेला त्यांनी भावविभोर चाली लावल्या होत्या. त्यातील एक कविता आम्ही निवडली.ही कविता जणू इंदिराबाईंच्या काव्यविश्वाचा आरसाच होती. कवितेचे शब्द होते.....
कधी कुठे न भेटणार 
कधी न काही बोलणार
कधी कधी न अक्षरात 
मन माझे गोवणार ....

आपले दु:ख मिटल्या ओठांनी स्वीकारायची सोशिकता कमालीच्या संयतभावानी इंदिराबाईंनी या कवितेत व्यक्त केली आहे. असेच मूकपणे दु:ख सोसत सोसत विरून जायचे आहे,ही आर्त भावना या कवितेतून प्रकट होते.पण हे कठोर व्रत घेऊन चालणे हीच माझी नियती आहे, असे कवयित्रीचे म्हणणे आहे. आणि असे व्रत अंगिकारणे हेच या केवितेचे ब्रीद आहे. या शब्दांना चालीत बांधणे किंवा सुयोग्य स्वरांची साथ देणे संगीतकाराच्या दृष्टीने तसे अवघडच .पण गजाननराव वाटवे यांना शब्दांची आणि काव्याचीही उत्तम जाण होती. त्यामुळेच त्यांनी हे आव्हान लीलया पेलले. फक्त एक हार्मोनिअम त्यांनी साथीला घेतली होती. ती तेच स्वत: वाजवणार होते. माझ्या मैत्रिणीचा मुलगा नीलेश श्रीखंडे त्यांना तबल्याची साथ करणार होता.त्यांनी सांगितलेला लयदार ठेका नीलेशनी तबल्यावर धरला आणि गायन सुरु झाले. कवितेतल्या आशयाला न्याय देणारे एक एक सूर शब्दाभोवती गुंफले जात होते. त्यामुळे कवितेतल्या भावना अधिक गहिऱ्या होत होत्या. हा स्वरांचा माहोल असा सुंदर बनत चालला होता की आपल्याला शूटिंग करायचे आहे किंवा आपण शूटिंग घेत आहोत, हे देखील विसरून जायला होत होते. पण तसेही होऊन चालणार नव्हते. ‘टेक’ झाला तेव्हा सगळ्यांच्याच तोंडून ‘वाहवा !’ असे उदगार आपसूकच बाहेर पडले. गजाननराव वाटवे हे तेव्हा भावगीताच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेले गायक आणि संगीतकार !पण त्यांच्या वागण्यात , बोलण्यात इतके साधेपण होता की त्याचाही अचंबा वाटावा .कोणत्याही प्रकारचा डामडौल नाही . कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट नाही.मला अमक्याच गोष्टी हव्यात,तमक्या गोष्टी तयार ठेवा,असा आग्रह नाही.मनात आले,आजकालच्या गायकांचे किती प्रकारचे रागरंग बघायला मिळतात ,काही वेळा ते किती चढेलपणाने वागतात ,इथे त्याचा मागमूसही नाही. त्यांच्या उत्तुंग प्रतिभेला, आणि त्याच बरोबर साधेपणाला आम्ही मनोमन दंडवत घातला.

त्यानंतर एक उदयोन्मुख कलावंत इंदिरा चित्रीकरणासाठी आम्ही बोलावली होती. तिचे नाव सोनाली कुलकर्णी . आत्ताची ही एक आघाडीची अभिनेत्री आहे. सोनाली माझी फर्गसनची विद्यार्थिनी. ‘अनन्वय’ च्या कार्यक्रमातून तिने संहिता वाचन केले होते तेव्हा ती अकरावीत शिकत होती. त्या अर्थाने सोनाली मला फार जवळची वाटत होती,आत्ताही जवळचीच वाटते. तिला आम्ही इंदिरा संतांच्या “मृदगंध “ या आत्मपर लेखनातला एक परिच्छेद वाचायला म्हणून निमंत्रित केले होते. आम्ही बोलावल्याबरोबर ती येणार नाही असे होणार नाही असा विश्वासही आम्हाला होताच. ती येणार व आपलेपणाने येणार हीदेखील खात्री होतीच. असो .” मृदगंध “ मधील ना.मा.संतांच्या अखेरच्या दिवसातला ,आजारपणातला परिच्छेद आम्ही तिच्यासाठी वाचायला काढून ठेवला होता. त्यातला आशय वाचकांच्या मनाला भावून जाणारा असाच होता. त्यात इंदिराबाईंनी आपल्या प्रेम जीवनात आलेल्या अडचणी,खाच खळगे अगदी मनमोकळेपणाने येथे मांडले आहेत.त्या सर्व अडचणी त्यांनी अत्यंत सोशिकपणे स्वीकारल्या होत्या.ही कथा थोडक्यात अशी ,’ ना.मा.संतांनी त्यांना पाठवलेली काही पत्रे बाईंनी आपल्या ट्रंकेच्या तळाशी लपवून ठेवली होती. ती त्यांच्या काकांच्या हाती लागली. आणि त्यामुळे मोठा गहजब झाला. इंदिराबाईंची अगदी नको नको त्या शब्दांत कान उघाडणी केली गेली आणि शिक्षा म्हणून त्यांच्या उजव्या हाताचा तळवा जळणाऱ्या कंदिलाच्या माथ्यावर धरला गेला. त्या वेळी त्यांना किती असह्य वेदना झाल्या असतील ! त्याची कल्पनाच केलेली बरी. आपल्या प्रेमाचा कबुली जबाब चुकीच्या पद्धतीने द्यायचा नाही असे ,सांगणारी ही धैर्यवान कवयित्री आपल्याला या प्रसंगातून दिसते. सोनालीने धीर गंभीरपणे आपल्या वाचनाला सुरुवात केली. “ काका माझी उलट तपासणीच घेत होते. ‘त्याच्या बरोबर फिरायला गेलीस काय ? हॉटेलात गेलीस ? असे प्रश्न.आणखी खूप. मी स्वस्थ बसून होते. असल्या वेड्या वाकड्या प्रश्नांना मी काय उत्तर देणार ? माझ्या अंगाचा भडका उडाला होता. त्याही परिस्थितीत मला द्रौपदीची आठवण झाली. तशीच मी ही इथे. आणि मला यातून सोडवील असा तो मित्र दोनशे मैलांवर .आणि तो काही देव नव्हता. मलाच उत्तर देणं भाग होतं.घसा कोंडला आणि डोळ्यांतून पाणी लोटलं.” हे बघा मला वाट्टेल ते प्रश्न विचारू नका आणि बोलूही नका.आणि त्यांना शिव्या देण्याचं काम नाही. आम्ही फक्त फिरायला टेकडीवर जात होतो ,एवढंच खरं.”चटकन काका माझ्या पुढ्यात येऊन बसले. “खरं सांगतेस ? खरं? अगदी खरं ? “,”हो अगदी खरं.असं मी म्हणते तो त्यांनी माझ्या हाताचा तळवा उचलून कंदिलाच्या माथ्यावर दाबला.मला कळलंच नाही. डोक्यात जाऊन भिनली ती एक तीव्र वेदना.संतांच्या शेवटच्या आजारपणात संत त्या हाताचा तोच तळवा हळवेपणाने आपल्या ओठांवर टेकवतात , ज्या तळव्यांनी प्रीतीसाठी चटके सोसले होते. इंदिराबाई हा प्रसंग लिहितात तेव्हा ते वाचताना आपले डोळे पाणावतात. तो उतारा असा ,” या तप्त मुद्रेची आणखी एक आठवण आहे. ज्यांच्यासाठी उमटली त्यांची शेवटची.यांच्या शेवटच्या आजारात एका सकाळी मी यांचा अंग पुसत होते. टॉवेल देणं कोरड्या केलेल्या अंगाला पावडर लावणं,अशी कामं करत होते. आमचा चंदू मला मदत करत होता.गळ्यापाशी मी पुसत असताना ह्यांनी क्षीण हातांनी माझा उजवा हात हातात घेऊन त्यांच्या ओठांवर टेकवला. मी चंदूकडे बघत यांच्यावर डोळे वटारले.माझा हात बाजूला करून हे चंदूला म्हणाले,” अरे ! आईच्या हाताला काटे आहेत का, बघत होतो.टोचले ना मानेला. त्या अजाणाला ते पटलं आणि तो म्हणाला,” बघू,बघू ! “ आम्ही त्या भोळ्या सांबाकडे बघून मिश्किलपणे हसलो. हा आमच्या त्रिकूटाचा शेवटचा संवाद. माझ्या मनावर उमटलेली ही सुखमुद्रा.सतत अश्रूत भिजवणारी.पण सतत टवटवीत असणारी अशी.” हा उतारा फार उत्कटपणे लिहिला गेला होता. म्हणूनच त्याचे वाचनही अत्यंत समंजसपणाने होणे देखील अत्यंत गरजेचे होते. तसे वाचन सोनाली करू शकेल याचा विश्वासहोता सोनालीने असा विश्वास तिच्या ‘अनन्वय ‘च्या वाचनाच्या सहभागातून माझ्या मनात निर्माण केला होता.म्हणूनच सोनालीची निवड मी केली होती.त्या निवडीला सोनालीने बरोबर न्याय दिला. तिने तो उतारा अतिशय सार्थपणे वाचला.माझा तिच्या बाबतीतला विश्वास देखील अनाठायी ठरला नाही. तिचे शूटिंग घेतानाही आम्ही तिची बसण्याची जागा खोलीच्या एका कोपऱ्यात निवडली होती. तिच्या शेजारी एक निशिगंधाच्या सुंदर फुलांनी सजलेली फुलदाणी ठेवली होती. आणि तिच्या जागेवर एक दिव्याची मंद प्रकाश देणारी शेड वरून खाली सोडली होती. आणि त्या मंद प्रकाशानी उजळलेल्या प्रकाशात हिरवट,निळसर पंजाबी सूट परिधान केलेली सोनाली शांतपणे आणि अत्यंत मनस्वीपणे आपले वाचन करीत होती. तिचे ते वाचन लेखिकेच्या प्रत्येक शब्दाला न्याय देणारे होते. तिचे ते धीर गंभीर आणि भावपूर्ण वाचन संपले आणि मी “कट “ अशी सूचना दिली.

या एपिसोडसाठी इंदिरासंतांची आणखी एक भाव विभोर कविता आम्ही निवडली होती, त्या कवितेच्या गायनासाठी आम्ही अत्यंत गुणी गायिकेची निवड केली. आणि ती कविता देवकी पंडित या गायिकेकडून गाऊन घेतली. कवितेचे शब्द होते.....

किती तुला आठवावे
किती तुला साठवावे
जिवा भावा एक ध्यास
एक रूप व्हावे व्हावे

देवकी पंडित यांच्या स्वरास्वरांतून ही शब्दातील प्रियकराशी एकरूप होण्याची भावना, लागलेली ओढ,आर्तता व्यक्त होणे आवश्यक होते. आणि हे सर्व ही गुणी गायिका करू शकेल असा विश्वास संगीतकार राहुल घोरपडे यांना होता. तो विश्वास देवकी पंडित यांनी सार्थ ठरवला.या गायिकेचे मनोमन कौतुक वाटते ते यासाठी की या गायिकेने गाणे रेकॉर्ड करण्याआधी त्या कवितेचा आशय, त्यातील भाव, कवितेचे मर्म नीट समजून घेतले होते. ‘वेदना मूकपणे सोसण्याची ताकद, नियतीने पदरांतटाकलेले दान कणखरपणे झेलण्याची ताकद म्हणजे इंदिरा संतांची कविता ‘ हे एकदा समजल्यावर या गायिकेने त्यांच्या कवितेतला शब्द अन शब्द आणि त्या शब्दांना राहुल घोरपड्यांनी चढवलेला स्वरसाज इतक्या मन:पूर्वक सादर केला की त्याला तोड नाही. गीताचे रेकॉर्डिंग सुरु होते देवकी पंडित गात होत्या......
उणिवेत ब्रम्हानंद 
ध्यास अमृताचा झरा
म्हणून का माझ्यासाठी 
अशी क्षितीज मेखला ?

इंदिरा संतांची चिरविरहाची वेदना अंगिकारलेले शब्द आणि घोरपडे यांनी त्या शब्दांना चढवलेला अभूतपूर्व स्वरसाज, देवकी पंडितांच्या सादरीकरणतील आर्तता आणि मनस्विता यामुळे माझे डोळे मात्र पाझरू लागले .इंदिरा संतांच्या या भागाच्या चित्रीकरणाच्या वेळी माझी झालेली भावनिक गुंतवणूक मला आता सावरायला हवी होती. एखाद्या गोष्टीवर काम करताना आपण त्याच्याशी तद्रूप होऊन जातो. तशी गतमाझी आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांचीच झाली होती. काम संपले. आता यानंतर झालेल्या चित्रीकरणाची संगतवार जुळवाजुळव करणे हा ‘पोस्ट प्रॉडक्शन’चा भाग होता. 

चित्रीकरणाच्या दरम्यानच या शब्दांबरोबरच कोणते दृश्य दाखवायचे आहे याचा विचार दिग्दर्शकाच्या मनात सुरूच असतो. या वेळीही असेच झाले. देवकी पंडित गात होत्या आणि मला त्याचवेळी त्या गाण्यावर चित्रित करायची दृश्ये डोळ्यांसमोर दिसत होती. इंदीराबाई घरातल्या त्यांच्या आवडत्या झोपाळ्यावर बसलेल्या आहेत, चिंतन मननात मग्न आहेत,त्यांच्या ओटीत तुळशीच्या मंजिऱ्या आहेत.आपल्या गत आठवणीत रंगून जात त्या तुळशीच्या मंजिऱ्या एक एक जुळवत जुळवत त्यांचा एक गेंद तयार करीत आहेत.......खूप भावपूर्ण असा तो शॉटहोता.... 

अशीच एकेका शॉटबरोबर,त्या शॉटचा विचार करताना,त्या कलावंतांचे चरित्र आणि साहित्य याचा अभ्यास आखणीसाठी करताना आपले मन त्यात गुंतत जाते. हा गुंता आणि आपल्या कामात होणारी एकरूपता विलक्षण असते. तिची सोडवणूक चटकन होणे,संवेदनशील मनाच्या माणसालातरी तशी न पेलणारी ,न झेपणारीही असते.इंदिराबाई स्वत: एक व्यक्ती म्हणून आणि साहित्यिक म्हणूनही माझ्या मनात मीमाझ्यासाठी एक आदर्शवत जपलेली मनस्वी लेखिका होती. या भागाचे चित्रीकरण करताना म्हणूनच या कामात माझी खूप भावनिक गुंतवणूक होणे तसे अपरिहार्य होते. 

आता इंदिराबाई काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत हे जसे खरे आहे तसेच त्या त्यांच्या लेखनाद्वारे अमरही झाल्या आहेत,हे देखील खरे. आणि आम्हाला समाधान देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या रसिक चाहत्यांच्यासाठी ,आम्ही केलेल्या कामाद्वारे त्यांना साक्षात पाहताही येतील. हे काम त्या दृष्टीने तसे महत्त्वाचेच झाले, असेही म्हटले पाहिजे कारण इंदिराबाईंवर आम्ही करून ठेवले तसे काम क्वचितच झाले आहे.हे काम आमच्या हातून झाले याचे एक वेगळेच समाधान वाटते इतके मात्र खरे आहे.

माधवी वैद्य


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा