अलविदा


राधिका ऑफिस मधून घरी आली आणि तिने पर्स आणि लॅपटॉप बॅग कपाटात ठेवून पलंगावर अंग टाकले.आज तिचे डोके प्रचंड दुखत होते. कपाळावर आडवा हात घेऊन ती शांत पडून राहायचा प्रयत्न करू लागली. परंतु दुपारी घडलेला कटू प्रसंग तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येऊ लागला.

आज लंच टाइम मध्ये जे काही अनपेक्षितपणे घडले त्याने तिचा मूडच गेला. 

दुपारी ती कॅफेटेरियात पोहचली तेव्हा तिचे ऑफिसमधील सहकारी जाई,अनिश,रोहन टेबलाभोवती जमलेले तिला दिसले. त्यांनी आपापले जेवणाचे डबे उघडलेले होते. बरोबरच आहे, तिला आज कॅफेटेरियात पोचायला थोडा उशीरच झाला होता. हातातील इमेल पाठवून तिकडे पोचेपर्यंत तिला ५-७ मिनिटे लागलीच.

“अरे,थांबा.थांबा मी आलेच.”बोलताना ती घाईघाईने त्यांच्या दिशेने चालू लागली.त्यांच्या जवळ पोचली आणि तिच्या कानावर आले जे काही आले, ते ऐकून मात्र तिचे पाय जागेवरच खिळले. 

“आज,बाईसाहेब बघितल्यास किती अटीट्युड दाखवत होत्या?”जाई बोलत होती. 

“कोण राधिका?अरे, तिचे नेहमीचेच आहे हे.लहान लहान गोष्टीत तिला दाखवायचे असते आपण किती महान आहोत ते.”-रोहन.

“असं नको तसे करा. तसं नको असं करा. अजूनही ती लहानच समजते आपल्याला”

“शू.हळू बोला. येईल ती इतक्यातच .ऐकले तिने तर लोचा होईल.”-अनिश ने सर्वाना दाबले. 

त्यांचे बोलणे ऐकणाऱ्या राधिकाच्या डोक्यात अचानक कोणीतरी हातोडा मारल्यासारखे झाले. तिचे प्रिय सहकारी, ज्यांच्या बरोबर ती गेली पाच सहा वर्षे रोज दिवसातील १० तास घालवते, ज्यांच्याबरोबर विश्वासाने स्वतःचे सुखदुःख शेअर करते त्यांच्याकडून स्वतःबद्दल असे बोलणे ऐकून तिचा तिच्या कानावर विश्वास बसेना. ‘अटीट्युड ?”या जाईच्या शब्दानेही राधिकेच्या मनाला मनस्वी दुःख झाले. 

“यांच्यावर किती विश्वास ठेवते मी.या सर्वाना सहकारी असे कधी न समजता माझ्या मित्रमैत्रिणीसारखे वागवते मी त्यांना आणि त्यांना वाटते मी महान बनण्याचा प्रयत्न करीत आहे. जाई,अनिश यांना लहान समजून मदत करण्याचा प्रयत्न केला तर ही दोघे समजतात मी माझी मते या दोघांवर लादतेय.”

राधिकाची भूकच मेली. जेवणाचा डबा न उघडता तसाच बॅगेत ठेवून ती जड पावलांनी तिच्या केबिनमध्ये परतली. 

दिवसभर तिचे मन अस्वस्थ होते. आतल्याआत कुढत होते. घरी जाईपर्यंत आभाळ गच्च झाले होते. एक प्रकारची घुसमट हवेत दाटली होती. 

आता पलंगावर पडल्या पडल्या राधिकाने दीर्घ श्वास घेतला. ग्लासभर थंड पाणी पिऊन तिने भराभर खिडक्या उघडल्या .वाऱ्याचा सुखद झोत आत आला. तिच्या सैरभैर विचारांना स्थिर करून गेला. 

आता ती शांतपणे तिला अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगावर आणि पर्यायाने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुद्देसूद विचार करू लागली.

मुद्दा नंबर एक: मी ऑफिसमध्ये राधिका -सो अँड सो नसून एक जबाबदार वरिष्ठ अधिकारी आहे. जाई,रोहित आणि अनिश हे माझे सहकारी आहेत.कामाच्या वेळात ते फक्त सहकारी आहेत.ऑफिसमध्ये तिला फक्त त्यांचे काम जोखायचे आहे. तिच्या हुद्द्याला आवश्यक असणारे काम करायचे आहे आणि करवून घ्यायचे आहे . कामाव्यतिरिक्त आपल्या सहकाऱ्यांविषयी कोणतेही मत बनवणे किंवा जजमेंटल होणे हे बरोबर आहे का?नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मी कर्तव्य आणि भावनांची गल्लत केली का?

मुद्दा नंबर २: 

गरज नसताना अपेक्षांचे ओझे स्वतःच वाढवून बसले. .त्या ओझ्याखाली दबून जे शक्य नाही ते करण्याचा प्रयत्न करीत बसले. या प्रयत्नात जे काही झाले त्यातून मी काय शिकणार आहे ? 

मुद्दा नंबर ३: मी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून कधी बघितले का? 

या मुद्द्यांवर विचार करताना तिला उत्तर सापडले असे वाटले. का ? कशासाठी हे सगळे? यापुढे थांबवायचे. उद्यापासून राधिका ही फक्त एक प्रोजेक्ट मॅनेजर असणार आणि जाई,अनिश हे केवळ सहकारी. हो फक्त सहकारीच.ते कामाच्या ठिकाणी सहकारी आहेत आणि सहकारीच राहतील.हे मित्र-मैत्रीण,लहान-मोठे,बहीण-भाऊ अशी नाती नाही जोडायची. म्हणजे नको त्या दुःखांची दुखणी जन्मणारच नाहीत. 

तिला मोकळे वाटले. तिला पटले तसे तिच्या दुःखात तिला आता सुख शोधायचे होते आणि पुढे जायचे होते. 

मनाला आलेली मरगळ झटकून ती उठली. आता तिला तिचे दुःख डिलीट करून त्याला कायमचे अलविदा करायचे होते. 


मोहना कारखानीस



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा