मनाचिये गुंती

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

ते एक चौकोनी कुटुंब होतं. कुटुंबप्रमुख जयंतराव,त्यांची सहचारिणी विजयाताई, आणि त्यांची दोन मुले, वनश्री आणि तेजस.

तेजस हुशार होता. एका आयटी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर वर होता.वनश्री देखील एमबीए करत होती. तेजसचं नुकतच लग्न झालं होतं.

काही समारंभानिमित्त एका पार्टीला सगळे गेले होते. तिथे तेजसच्या मित्राने, सुजितने वनश्रीला पाहिले. गव्हाळ वर्णाची, अपऱ्या नाकाची,पाणीदार डोळ्यांची वनश्री नाजूक होती. बघताक्षणीच सुजितला वनश्री आवडली आणि त्याने स्वतःच्या आई वडिलांना सांगितले. बघता बघता सगळ्या गोष्टी जुळून आल्या.

वनश्रीचं लग्न झोकात झालं. दोन महिन्यांपासून खूप धावपळ सुरु होती. खरेदी,हॉल,जेवणाचा बेत,देणीघेणी सगळं सुरु. पण कधी कधी असं वाटायचं सगळ्यात असूनही वनश्री अलिप्त आहे. तिच्या डोळ्यात अचानक भीती जाणवायची. अबोल असल्यामुळे फारश्या मैत्रिणी नव्हत्या पण वहिनीशी सख्य होतं. कुणी चेष्टा केली की ती थरथरायची. मग वहिनी म्हणायची अग एवढे घाबरण्यासारखे काही नाही. तुझ्या सासरचे लोक किती चांगले आहेत.सुजित तर किती चांगला आहे. हसतमुख,उच्चशिक्षित,देखणा. आत्तापासून तुझ्या आवडीनिवडीकडे त्याचे लक्ष आहे.

वनश्री सासरी आली. सकाळचे सगळे कार्यक्रम यथासांग पार पडले. मोठ्या नणंदेने तिला चांगले नटवले. ती छानच दिसत होती.सुजितला तर ती आवडली होतीच पण वनश्रीलाही सुजित आवडला होताच. पण तिच्या डोळ्यात भीती दाटली होती. तिची होणारी थरथर नणंदेला जाणवली. तिने वनश्रीची खूप समजूत घातली. पण वनश्री अशांतच होती.

सुजित खोलीत येताच ती ताड्कन उठून उभी राहिली. तो म्हणाला,अग हे काय? बस, आपण काही जुन्या काळातले नाही, नवरा येताच उठून उभे राहायला. पण वनश्रीची मान वर होत नव्हती. उलट जास्तच संकोच,भीती डोळ्यात दिसत होती. सुजित म्हणाला,” वनु, अग शांत हो. काय झालं?कशाला थरथरतेस? आणि वनश्रीला रडू कोसळलं. तिच्या डोळ्यातलं पाणी खळेना. सुजित तर घाबरलाच.काय झालं अचानक हिला? त्याने वनश्रीला पाणी दिले.मग त्याने हळुवारपणे तिला विचारले,” वनश्री तुला लग्नाची जबरदस्ती करण्यात आलीय का? दुसऱ्या कुणावर तुझं प्रेम आहे? वनश्री मानेनेच नाही,नाही म्हणत होती.

त्याने ठरवले उद्या आपण उटीला जाणारच आहोत, तेव्हां वनश्रीला समजावून घेऊ. कदाचित तिला घरच्यांची आठवण येत असेल. दोघेही उटीला जाण्याची तयारी करतच होते पण नववधूचा उत्साह तिच्या नव्हता.

उटीच्या निसर्गरम्य वातावरणात वनश्री छान रमली. पण जसजशी रात्र होऊ लागली तसतशी ती स्वत:ला आक्रसत होती. दिवसभराचं मोकळं हसणं,गप्पा एकदम बंद झाल्या. सुजितलाही हा बदल लक्षात आला. संध्याकाळचे जेवण झाल्यावर दोघेही खोलीत आले. पण वनश्री त्याला जवळ येऊ देईना. त्याने हात हातात घेतला तरी ती झिडकारत होती आणि नको नको म्हणत थरथरत होती. सुजितला कळेचना दिवसभर आनंदात असणाऱ्या वनश्रीला काय झालं?

सुजितने घरी परत जाण्याचा निर्णय लगेच घेतला. दोघांचाही प्रवास अबोलपणे सुरु होता. ठरल्या दिवसांपेक्षा लवकर ती दोघे आलेले पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. सुजितचा उतरलेला चेहरा पाहून त्याच्या बहिणीने खोदून खोदून विचारले पण तो काहीच बोलत नव्हता.

दुसऱ्या दिवशी तो वनश्रीसह तिच्या माहेरी गेला. वनश्रीच्या मोठ्या भावाशी त्याची छान मैत्री होती. त्याने सगळा किस्सा त्याला सांगितला. वनश्रीदेखील वहिनीच्या कुशीत रडत होती. तिला समजवण्यात वहिनी,आई गुंतल्या होत्या. तेजसने आई-वडिलांशी बोलून वनश्रीच्या जीवनात लहानपणी घडलेला भयानक प्रसंग सुजितला सांगायचे ठरवले.

तेजस आणि सुजित दोघेहि गच्चीत गेले. निखळ चांदणे पसरले होते. पण त्याचा आनंद दोघेही घेऊ शकत नव्हते. त्या निरव शांततेचा भंग करत तेजस म्हणाला,” सुजित मी काय सांगतो ते शांतपणे ऐक, आमचे वडील जंगल विभागात नोकरीला होते. तुरळक वस्ती,खेडेगाव आणि दादागिरीही चालत असे. मला पाचवीपासूनच अमरावतीला काकांकडे शिकायला ठेवले होते.

त्या खेड्यातल्या घराभोवती मोठ्ठे आवार होते. बागेची हौस असल्यामुळे आई-बाबांनी खूप झाडे लावली होती. पण फळे तयार होऊ लागली कि कोणीतरी चोरी करत होते. ही चोरी एक गुंड मुलगा करतो असे कळले होते. तो मुलगा फुलपाखरे धरायचा,झुरळे पकडून पिशवीत ठेवायचा,बेडकांना दोरी बांधून नाचवायचा असे भयानक उद्योग सुरु असायचे. सगळेच त्याच्या या वागण्याला वैतागले होते.

हा प्रसंग घडला तेव्हां वनश्री आठ वर्षाची होती. तो रविवार होता. बाबा घरीच होते. तो द्वाड मुलगा लपत छपत बगीच्यात घुसत होता.त्या दिवशी वडिलांनी पाळत ठेवली होती. त्यांनी त्या मुलाला पकडले आणि त्याला खूप ओरडले.पुन्हा आलास तर पोलिसात देईन अशी धमकी पण दिली. त्या बदमाशावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट, तुम्हालाच बघून घेईन अशी धमकी त्याने वडिलांना दिली.

४-५ दिवसांनी आठ वर्षाची वनश्री शाळेतून घरी येत होती.त्या मुलाने तिला पाहिले आणि बडबड सुरु केली,आता बघतोच तुला. तुझा बाप मला पोलिसात देतो नाही का? आता तुला शिक्षा असे म्हणून पिशवीतली झुरळे तिच्या अंगावर फेकली. बरोबरीच्या दोघी मुली घाबरून पळत सुटल्या. झुरळे अंगावर पडताच वनश्री घाबरून ओरडू लागली. त्या मुलाने तिचा हात धरला आणि ओढत रस्त्यापालीकडील झाडीत नेऊ लागला. वनश्रीला खरचटत होते,ती रडत होती. तेव्हड्यात एक मेंढपाळ त्या बाजूने जात होता. त्यने मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला. तो मोठ्याने ओरडत आवाजाच्या दिशेने निघाला. त्याच्या बरोबरीची कुत्रीही भुंकत तिकडे धावली. तो गुंड मुलगा झाडीत पळाला. अतिप्रसंग टळला होता. धनगराने विचारपूस करुन तिला घरी पोहोचवले. वनश्रीची आई तर धनगराच्या पाया पडली. “देवमाणूस रे तू,माझ्या मुलीला वाचवलस” म्हणत खूप रडत होती. तिने धनगराला बक्षिसीही देऊ केली पण त्याने घेतली नाही. पोरीला सांभाळ एवढेच बोलला.

वनश्रीच्या आईने तिच्या जखमा स्वच्छ केल्या. तिचे कपडे बदलले. जयंतराव घरी येताच विजायाताईंनी एकच हट्ट सुरु केला. इथे आम्हाला राहायचे नाही. अमरावतीला चला. तुम्ही बदली करुन घ्या.

अमरावतीला आल्यावरही कितीतरी दिवस वनश्री रात्री किंचाळून उठत असे. त्यासाठी डॉक्टरांचे उपचार घ्यावे लागले. तेव्हापासून आमची बडबडी वनश्री एकदम शांत झाली. ती कोणात मिसळेना,कोणाशी मैत्री करेना.कॉलेजात जाऊनही कुठल्या स्पर्धेत भाग घेणे नाही, सहली नाही. फक्त अभ्यास एके अभ्यास. वाचन,घरकाम एवढेच तिचे क्षेत्र राहिले. आम्हाला वाटलं होतं की ती आता सगळं विसरली असेल पण ही भीती तिच्या मनात खोल तळाशी बसली असेल हे लक्षात आले नाही. सगळी खरी हकीकत तुला सांगितली आहे. तूच काय तो निर्णय घ्यायचास. तुझ्यावर कुणाचीही जबरदस्ती नाही.

सुजित ने तेजसचा हात हातात घेतला आणि म्हणाला वनश्रीवर माझं खूप प्रेम आहे. या आघातातून तिला पूर्णपणे बाहेर काढायचा मी निश्चय केला आहे. तुम्ही सगळीच निश्चिंत रहा. वनश्रीला मी कुठलाही त्रास होऊ देणार नाही. हे माझं वचन समजा.

तेजसने सुजितला कडकडून मिठी मारली . त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

इतका समजूतदार जावई मिळाल्याबद्दल घरच्यांना धन्यता वाटत होती आणि वनश्रीचा संसार मार्गी लागेल याचीही खात्री पटली होती.

- शालिनी अलोणी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा