आनंदयात्री

ऋतुगंध वर्षा  वर्ष १३ अंक ३

मित्रहो कल्पना करा की जर मी तुम्हाला एक रिकामा ग्लास दाखवला आणि विचारल की ह्यात काय आहे ? तर तुमच उत्तर काय असेल ?

मी सांगू तुम्हाला, निराशावादी लोक म्हणतील की हा ग्लास रिकामा आहे तर आशावादी म्हणतील की ह्यात हवा आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आनंद हा प्रत्येक व्यक्तीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे.

मी लहानाची मोठी झाले ते गजबजलेल्या,धकाधकीच्या, सतत पळणाऱ्या मुंबईत. पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतांना मुंबईची लाइफ लाईन असलेल्या लोकल मधून अख्खी मुंबई पालथी घातली आहे. विरार ते चर्चगेट आणि ठाणे ते ग्रांटरोड, मी आणि ही लोकल सतत पळत असू. विविध वासाने आणि आवाजाने भरलेल्या त्या डब्यात इतकी गर्दी असायची की मुंगीलाही आत शिरकाव करणे शक्य नसे. ह्या गर्दीत आनंदी राहण्याचा गुरुमंत्र मला माझे व्यायसायिक गुरुमानसोपचार तज्ज्ञ श्री. ढवळे यांनी दिला होता. ते म्हणायचे की निर्णय तुझा आहे, तू तुझी नजर खाली करून रेल्वे track च्या आजूबाजूची घाण बघून दु:खी होणार की नजर उंचावून खिडकीतून आणि दारातून दिसणाऱ्या निळ्याभोर आकाशातील पांढरे ढग पाहणार आणि हिरव्या हिरव्या झाडांवर उमलणारी रंगीबेरंगी फुले पाहून आनंदी होणार. खरंच आनंदी राहण्याचा निर्णय फक्त आपलाच असतो.

जैत रे जैत चित्रपटातील एक दृष्य माझ्या स्मृतीत कायम कोरले गेलेले आहे. त्यात नायक आणि नायिकेचे नुकतेच लग्न झालेलं असतं आणि ते त्यांच्या छोट्याश्या झोपडीत बसलेले असतात, त्यावेळी नायक तिला म्हणतो की तुला देण्यासाठी माझ्याकडे फारसे काहीच नाही. आणि त्याच वेळी ती नायिका झोपडीच्या छतातील भोकातून येणाऱ्या सूर्य किरणांखाली ओंजळ धरते. गरगरीत गोल सोन्याच्या मोहोरांसारखी सूर्यकिरणे तिच्या ओंजळीत पडतात आणि ती म्हणते, अरे बघ माझ्याकडे तर सरी दौलत आहे. खर सांगायचं तर तुमच्याकडे काय आणि किती आहे ह्यावरून तुमची श्रीमंती किंवा आनंद ठरत नसतो. पण तुमच्याकडे जे आहे त्याच्या कडे तुम्ही काय नजरेने पाहता त्यावर तुमचा आनंद अवलंबून असतो.

बहुसंख्य वेळी पुष्कळ दुःख असणारी माणसे ते दुःख हसत हसत झेलताना दिसतात तर काहीच दुःख नसणारी माणसं उगाच चेहरा पाडून बसतात. हास्य हा दुःखावरचा रामबाण उपाय आहे. म्हणूनच जेव्हा काही कठीण प्रसंग तुमच्यावर येईल आणि दुःख तुम्हाला ग्रासेल तेव्हा आरशासमोर उभे राहा डोळ्यामधील अश्रू पुसा आणि खोटं का होईना एक हास्य आपल्या ओठांवर आणा, ते हास्य तुमचा चेहरा खुलवेल. स्वतःचा खुललेला चेहरा पाहून दुःखाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य तुम्हाला पुन्हा गवसेल.

म्हणतात ना आयुष्य जर तुम्हाला शंभर कारणे रडायची देत असेल तर तुम्ही आयुष्याला हजार कारणे हसण्याची द्या सदैव हसत रहा. माझे आजोबा म्हणत असत की “हसला तो अमृत प्याला”.

अध्यात्माप्रमाणे आपलं खरं स्वरूप आनंदमय आहे. मायेच्या आवरणामुळे आपण स्वतःलाच विसरतो आणि आपल्या स्व-रुपाला शोधत मायेच्या जंजाळात जन्मोजन्मी फिरत राहतो. ह्याचे विश्लेषण करणारा कबीरदासजींचा एक सुंदर दोहा मला आठवतो “पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी. गुरूबिन ग्यान, ग्यान बिन चेला निसदिन फिरत उदासी.

आनंदयात्री आम्ही आनंदयात्री!


- प्रिया कामत













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा