ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४
"इथे बसायला काही चांगली सोय नाही, त्यापेक्षा याला बाजुच्या हॉलमधे सोफ़ा वगैरे आहेत तिथे बसु दे आरामात", असे कोणी तरी म्हणाले. मग मी तिथे बसलो, आणि बाकी सगळे उंडारायला गेले.
.......... ............ ................ ..............
बॅडमिंटनचे चार पाच डाव झाल्यावर आम्ही सगळे नेहमी जरा जास्तच एक्साईटेड असतो. एंडॊरफ़िन्सचे स्त्रोत सगळ्यांमधे उफ़ाळत असणार! अशाच मजेत गप्पा सुरू होत्या. आजच्या खेळांशी संबधितच. "पण थांबा...", मी म्हटले. माझे कोणी ऐकलेच नाही. सगळे गप्पासत्रांत मग्न! बहुदा मी मनांतच बोलत असेन! खरच मी मनातच बोलत होतो. "थांबा.. आपण आज खेळलो आलरेडी? केव्हा? आपण तर जयंत साठी थांबलो होतो, मी तिकडे बसून आराम करीत होतो, सगळे टाईमपास म्हणून आजुबाजुला फ़िरायला गेले होते... ही सगळी कुठल्या गेमची चर्चा करताहेत?"
अत्यंत निकडीने मी गोविंदला मनांतल्या मनात नाही, खरचच विचारायला लागलो, "अरे आपण केव्हा खेळलो?" तो कुणाचे काही तरी ऐकण्यात गुंगला होता. सगळे गोल करून उभे होते. माझे मधेच व्यत्यय आणणे कोणाला कळले देखील नाही. पण माझी निकड अत्यावश्यक होती. मी पुन्हा जरा चढ्या आवाजात गोविंदला विचारले, "अरे आपले खेळणे झाले आज?" आता सगळ्यांचे लक्ष एकदम वेधले गेले. गोविंद जरा आश्चर्याने उदगारला, "म्हणजे काय? तू एक गेम जिंकला देखील!"
"काय खेचतोय की काय माझी? अरे आपण जयंतची वाट पहात नव्हतो कां? तुम्ही सगळे टाईमपास करायला गेलात, मी इथे बसलो होतो.. मग काय झाले?"
"तुम्ही टाईमपास करायला गेला होता, तेव्हा बहुदा ह्याने इथे बसून दोन पेग हाणले असतील! म्हणून आता याला खेळलेले काहीच आठवत नाहीये!", जयंत नेहमी प्रमाणे टारगटला.
"तरीच म्हटले, आज हा गेम जिंकला कसा?", राजू कसा खेचण्याची संधी सोडणार! एकमेकांची खेचणे हा गॆंगचा आवडीचा उद्योग सुरू करायला मीच टार्गेट सापडलो होतो!
पण हे सिरीयस होते. हे असे गमतीवर सोडून चालणार नव्हते. "हे बघा, बी सिरीयस. तुम्ही सगळे फ़िरायला गेलात, मी इथे बसलो. त्यानंतर आता आपण गप्पा करीत आहोत. ह्यापेक्षा काही जास्त घडलेले मला मुळीच माहीत नाही", मी जरा धास्ताऊन, जवळजवळ ओरडूनच म्हटले.
आता सगळेच जरा भानावर आले. 'खिचाई मोड' ऑफ केल्यावर जयंत नेहमी 'सामंजस्य मोड' ऑन करतो, तसा त्याने तो केला! "अरे म्हणजे काय? आपले मस्त गेम झाले. बहुदा गेम खेळतांना तू दुस-याच कुठल्या विचारांत असशील, म्हणून तुला आठवत नाहीये!"
आता मी भडकलो. "आठवत नाही म्हणायला ही काय जुनी गोष्ट आहे? आत्ता, दहा मिनीटांपुर्वी खेळलेल्या गेमचे बोलतोय ना आपण? मी खेळलो, जिंकलो, मला काहीच कसे माहीत नाही?"
गोविंदने पाठीवर हात ठेऊन मला बाजुला नेले. "अरे होतं असं कधी कधी. येवढं टेंशन नको घेऊस. आठवेल तुला हळुहळु" त्याच्या धिराच्या शब्दांनी मला जरा हायसे वाटले.
"मला सांग, माझा पार्टनर कोण होता?"
"बस कां! अरूण, सगळे विसरला, तरी पार्टनरला विसरू नकोस कधी!", गोविंद डोळे मिचकाऊन, पण अगदी मनापासून बोलला.
मी चिंतेने चित्राकडे पाहीले. ती मधेच केव्हा जवळ येऊन उभी राहिली होती कोण जाणे!
"मला विसरून कसे चालेल ह्याचे! मग सगळेच अडेल नां ह्याचे! त्यामुळे मला तो विसरूच शकणार नाही!", हे तिने गोविंदला उद्देशून, पण मला दटावून म्हटले, आणि लगेच तोंड फ़िरवून दुसरीकडे बघू लागली. तेवढ्या क्षणातही प्रकाशाच्या एका चुगलखोर तिरीपीने तिच्या डोळ्यातले तरारले थेंब दाखविलेच.
"अग खरंच! मला मुळीच आठवत नाहीये आपण आज एकत्र खेळलेलो."
मग सगळ्यांच्याच, 'ह्या वयातील आठवणी' विषय चघळून चघळून गप्पा झाल्या. एखाद्या विषयाचा अगदी चावून चावून चोथा करणे ह्यात आमची बॅडमिंटन गॆंग अगदी माहीर आहे. त्या सामुहिक आठवणींच्या आवर्तनात माझ्या आठवणीचा सगळ्यांनाच विसर पडला. पोटात कावळे कोकलायला लागले, तर कोणीतरी बूट काढला, चला एखादी बियर मारू, चिकन राईस, जे असेल ते चार घास खाऊ. मग इथले फ़ुड कोर्ट कुठे आहे ते कोणालाच नीटसे माहीत नव्हते. ते शोधतांना भटकत जरा पायपीट झाली, तर कोणी दिसेल त्या दुकानात खरेदीला शिरले. शेवटी मी कंटाळलो. माझे पाय बोलू लागले आहेत. "मी बसतो इथेच कुठे तरी. फ़ुड कोर्ट मिळाले, की या मला घ्यायला", मी निक्षून सांगितले.
मग ग्रुप भराभरा पांगला. बसण्याची जागा शोधीत मी कसा कोण जाणे, एका बाजुला असलेल्या जिन्याच्या पाय-यांवरच स्थिरावलो. येवढाले प्रचंड कॊंप्लेक्सेस बांधतात, पण बसण्यासाठी छान जागा काही कोणी देत नाहीत. म्हणजे सतत इथून काहीतरी खरेदी करून ह्यांच्या डोंबलावर पैसे उधळा, तरच तुम्ही कोणीतरी! नाहीतर तुम्ही कोण, आम्ही कोण! नशीब, हा जिना, जरा आडबाजुला असल्यामुळे, तिथे वर्दळ नव्हती! मी बसल्यावर एक मध्यम वयीन बाई येऊन टेकली. नंतर आणखी एक दोन जण येऊन बसले. वाट पहाता पहाता बराच वेळ झाला, अजून कसे कोणी न्यायला आले नाहीत? फ़ोन करावा म्हणून पँटच्या डाव्या खिशात हात घातला, तर काय, मोबाईल ऐवजी घरचा फ़ोन रिसिवर हातात आला! घरचा फ़ोन रिसीवर खिशातून येणे हे जरा विनोदीच होते! चित्रा नेहमी म्हणते, "घरून कुठेही बाहेर जातांना मोबाईल घेऊन जात जा. तुझे हे असे, नेमका इमर्जंसीच्या वेळेस नसायचा बरोबर!" आज खरंच निघतांना आठवणीने पॆंटच्या खिशात ठेवला होता! तो काय मोबाईल ऐवजी रिसीवर होता? आणि आजकालचे रिसीवर हे इतके छोटे कशाला करतात? उगाच आमच्यावर विनोद मारायला पब्लीकला कारण!
मनातल्या ह्या नसत्या विनोदाने मी उलट चिडून उजव्या खिशात चाचपले. हो. बहुदा मोबाईलच होता. बाहेर काढला, तर माझा मोबाईल नव्हे, साधारण त्याच आकाराचा जरा चपटा, फ़ोन सारखा एक पीस हातात दिसला. त्यावर ना बटने ना कीज, ना स्क्रीन! फ़क्त स्पीकर सारखी जाळी, एक लुकलुकणारे हिरवे टिंब. काळ्या रंगाचा तो पीस पाहून मी चक्रावलो. एक पांढरा चौकोन मधे होता. तो दाबला. अचानक गोविंदचा आवाज त्यातून आला. गोविंदचा आवाज ऐकणे ही माझ्यासाठी नेहमीच एक स्वगतार्ह बाब असते. त्यात आत्ता तर त्याचा आवाज म्हणजे स्वर्गातल्या देवदुतासारखा भासला.
"हां अरूण, कुठे आहेस तू?"
"अरे कुठे म्हणजे... ते येवढे नीट सांगता नाही येणार, पण तुम्ही मला जिथे सोडून गेलात, त्याच्याच जवळ, जरा आडबाजुला एक जिना आहे. त्यावर बसलो आहे वाट पहात."
"ओके ओके. मी कोणालातरी पाठवतो. तू तिथेच थांब. फ़क्त हा फ़ोन बंद नको करूस. सुरूच ठेव."
"बंद करायला ह्याला काही बटने असतील तर नां! हो मी सुरूच ठेवतो. तू ये लवकर!"
फ़ोन हातात घेऊन बसून राहिलो वाट पहात. हिरवे टिंब लुकलुकत हो्ते, तेच काय एक आधार, सगळ्यांशी असलेले एकमेव कनेक्शन!
मधेच एकदम समोर पियू उभी दिसली. अरे! ही कशी इथे! ऒफ़िस ड्रेस मधे छान दिसतेय! किती दिवसांनी भेटतेय!
"अंकल, चला. आपण जाऊ"
"अगं, तू केव्हा आलीस?"
"अंकल, माझे ऑफ़िस इथेच आहे. बाबांचा फ़ोन आला की तुम्ही सगळे इथेच आहात! ते म्हणाले, तुला ही जागा माहीत आहे, तू अरूण अंकलला घेऊन ये म्हणून!"
"ओके ग्रेट! चल! इथे किती वेळ झालाय, बसून अगदी कंटाळा आलाय."
उठलो. तो फ़ोन पियूनेच माझ्या हातातून अधिकाराने घेऊन धरला. म्हणजे बहुदा तिचाच किंवा गोविंदचा असणार. आणि आम्ही निघालो.
पण थांबा.....तो फ़ोन माझा नसेल...पण पुन्हा थांबा.... तो मुळांत माझ्या खिशात आलाच कसा, नी केव्हा?...... माझ्या खिशात दुसर्याचा फ़ोन.. माझ्या आठवणी पुफ़्फ़... अगदी माझे स्वत:चे असे जगलेले जीवन.... त्यावर देखील आता माझा अधिकार उरला नव्हता? ....... मघाचा बॅडमिंटन गेम,.....जे सर्वार्थाने अगदी माझे स्वत:चे...जगलेले सुखदुखा:चे क्षण.... ते देखील बघता बघता पुफ़्फ़ होऊ लागले होते?
पियू काळजीने विचारित होती, "अंकल बरे वाटत नाहीये कां?"
कार्टूनमधे दाखवितात तसे धुळीचे फ़ुगे... एकामागून एक पुफ़्फ़ होत डोळ्यांसमोरून जात होते....
- अरुण मनोहर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा