पडसाद



नवऱ्याची पुन्हा बदली झाली, आणि पुन्हा एकदा अमिता तिचा सगळा संसार खोकी अन बॅगांमध्ये भरून निघाली. नवीन शहरात नवीन कॉलनी मध्ये घर, नवीन शेजार, नवीन मैत्रिणी आणि पुन्हा नवी सुरुवात. पण अमिताला आता याची सवयच होऊन गेली होती. नवीन कॉलनी मध्ये अमिताचे छान स्वागत झाले. तिथल्या बायकांनी तिला भिशी जॉईन करण्याचे आमंत्रणही दिले. तेव्हा तिने ते आमंत्रण थोडेसे द्विधा मनस्थितीतच स्वीकारले. अजून कुणाशी धड ओळखही नव्हती झाली. आपण त्या ग्रुप मध्ये कसे सामावू, अश्या काहीश्या साशंक मनानेच अमिता पहिल्या भिशीला गेली. चहा आणि चविष्ट खाद्यपदार्थांबरोबर अनेक विषयही तिथे चघळले गेले. त्यात शिळोप्याच्या गप्पांपासून राजकारणापर्यंत सगळ्याचा आवर्जून समावेश होता. पहिलीच भिशी आणि नवीन ग्रुप, त्यामुळे अमिताची भूमिका संभाषणामध्ये सक्रिय सहभाग घेण्यापेक्षा प्रेक्षक आणि श्रोत्याचीच अधिक होती. त्या गप्पांमध्ये सगळ्यात चवीने आस्वाद घेतला गेलेला विषय म्हणजे दूरदर्शनवरच्या दैनिक मालिका हा होता. अमिताला आश्चर्य वाटले. जगात एवढे वैचारिक मुद्दे असताना, या सगळ्याजणी मालिकांमध्ये जणु आपल्या घरच्या सदस्यांच्या समस्या सोडवल्यासारख्या का रमतात? अमिता ने आपली निरीक्षण, आकलन आणि विश्लेषण-शक्ती इथे पणाला लावायचे ठरवले. नवऱ्याच्या बदलीच्या नोकरीमुळे जरी व्यवसाय करायला जमले नसले, तरी मानसशास्त्राचे प्रशिक्षण घेतलेल्या अमितामधला मनोवैज्ञानिक अश्या प्रसंगी टक्क जागा व्हायचा. सगळ्यांचे स्वभाव, पार्श्वभूमी इत्यादी जाणून घेण्याची ही संधी न दवडण्याचे अमिताने ठरवले. 

खाद्यपदार्थांचा फडशा पडल्यावर, अत्यंत लोकप्रिय असलेल्या अश्या मालिकांचा चहाबरोबर यथेच्छ समाचार घेणे सुरु झाले. सरिताने सुरुवात केली. "अग, त्या दुपारच्या मालिकेत अमुकच्या नवऱ्याचे प्रकरण बघितलेस का? काय बाई हे वागणे! इतकी चांगली सोन्यासारखी बायको घरात सोडून ... बरे झाले अगदी तिचे मित्र-मैत्रिणी तिच्या बाजूने खंबीर उभे आहेत. छान चोख प्रत्युत्तर दिले त्यांनी तिच्या नवऱ्याला!". त्यावर मालिनी उद्गारली, "नवऱ्याचे राहू दे ग! पण त्या संध्याकाळच्या मालिकेत तिचे आई-वडीलच बघ ना! सख्खे कि सावत्र असा प्रश्न पडेल बघणाऱ्याला! भावाची तऱ्हा ती पुन्हा वेगळीच! खरेच वाटत नाही अगदी. सासू सासरे मात्र पोटच्या मुलीसारखे प्रेमाने वागवतात हो तिला! देव कुठल्या रूपात भेटेल ते सांगणे कठीण!". तिकडे प्रभा मात्र आपले नवे हिऱ्याचे मंगळसूत्र सगळ्यांच्या नजरेत भरते आहे का हेच निरखण्यात आपले डोळे इकडे तिकडे भिरभिरत होती. कुणी दखल ना घेतल्यामुळे, "त्या मालिकेतल्या नायिकेने मंगळसूत्र घातले आहे, ते किती छान आहे नाही? अगदी तस्सेच मीही बनवून घेतले मागच्या आठवड्यात," असे न राहवून शेवटी म्हणालीच. मालिकांच्या पात्रांबद्दल असे शेरे सर्रास झाडताना त्या तिघींच्या चेहऱ्यावर एक आगळेच समाधान पसरले. तेवढ्यात कल्पना वदली, "यावरून आठवले, सरिता, तुझा नवरा अजूनही सारखा फिरतीवरच का ग? शहरात असताना तरी घरात पाय टिकतो कि नाही त्याचा? आणि मालिनी, यंदा तरी माहेरी जाणार कि नाही? गेले ३-४ वर्षे नाही गेलीस ना तू? प्रभा, अग, हे मंगळसूत्र दाखवले आहेस कि आधीच तू आम्हाला?" 

अमिताला या संभाषणावरून अंदाज यायला वेळ लागला नाही, कि सरिता आणि मालिनी च्या घरची परिस्थिती आणि प्रभाची मानसिकता साधारण कशी असावी ते. इतरांनीही असेच आपले मन मोकळे केले, आणि जाणवले कि घरोघरी मातीच्या चुली होत्या. त्यामुळे साहजिकच, मालिकेतील नायिकेला त्रास देणाऱ्याला अद्दल घडली, किंवा कुणी चोख उत्तर दिले, कि जणु आपल्यावरच्या अन्यायालाच कुणीतरी सडेतोड जवाब दिल्याचा आंतरिक आनंद होत होता त्यांना. अमिताला तिच्या बालपणीची आठवण आली. लहानपणी आजी झोपताना गोष्ट सांगायची रोज. त्यातल्या परीने आपल्याकडच्या जादूने किंवा राजकुमाराने आपल्या शौर्याने संकटात सापडलेल्या राजकन्येला राक्षसाच्या तावडीतून सोडवले, कि चिमुरडी अमिता आनंदाने टाळ्या पिटायची. अमिताच्या या नव्या मैत्रिणीही काहीश्या अश्या परिकथेसारख्या भाबड्या आशेवर तर जगत नव्हत्या ना? आणि मालिकेत आपले आयुष्य तर शोधत नव्हत्या ना? अमिताच्या मनात आले, आजच्या आधुनिक जगात आपली जादुवाली परी किंवा शूर राजकुमार आपले आपणच होणे अधिक उचित नव्हते का? 

त्यातली सरिता आपले रडगाणे गात होती, "हो ग कल्पना, कंटाळले मी आता. नको वाटते अगदी.", तर याउलट मालिनी मात्र उत्साहात बोलत होती, "जाऊदे ना, इतर इतकी ठिकाणे आहेत मुलांच्या सुट्टीत जायला आम्हाला! आणि आपल्याकडे जे आहे ते उपभोगायचे सोडून, जे मिळाले नाही त्याची खंत का करावी बरे?" मालिनीच्या वागण्या-बोलण्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा होती, जी क्षणाक्षणाला वातावरणात पसरत होती. प्रभा मात्र "कुणाला आपले कौतुकच नाही" असा नाराजीचा भाव चेहऱ्यावर आणून बसली होती. 

खरेच! कुठे असते आपले मन? सामान्य डोळ्याला ते कुणाला दिसत नाही खरे. "कुणाच्या मनात काय चालले आहे ते कळणे कठीण, केवळ देवच जाणे!" असे आपण नेहमी म्हणतो. पण अमिताला पुन्हा एकदा अनुभव आला, कि मनःचक्षूने बघितले, तर कुणाचे मन ओळखणे वाटते तितके कठीण नाही. कारण, कळत-नकळत का होईना, पण माणसाच्या अंतर्मनातल्या विचारांचे पडसाद त्याच्या वागणुकीत आणि बोलण्यात उमटत असतात. मनातून आनंदी असलेली व्यक्ती इतरांना नेहमी आनंदच देते. ती व्यक्ती, वैयक्तिक जीवनात कितीही निराश किंवा दु:खी असो, पण सगळ्यांनी आनंदी राहावे असे मनातून वाटत असेल, तर इतरांशीही प्रेमानेच वागते, आणि इतरांना आनंदच द्यायचा प्रयत्न करते. एखादी व्यक्ती कायम छोट्या-मोठ्या गोष्टींचा बडेजाव मिरवताना दिसते. अश्यावेळी त्यांना झिडकारण्याऐवजी, त्यांना थोडेसे बोलते करून त्यांच्या मनात डोकावून बघावे. थोडा विचार केला, तर सहज जाणवेल, कि लहानपणी, किंवा मोठेपणीही, त्यांचे एखाद्या गोष्टीचे अजिबात किंवा हवे तितके पुरेसे कौतुक झालेले नसते. कदाचित, एखाद्या प्रसंगी किंवा सतत आलेल्या अपयशामुळे, किंवा लहानपणी इतरांशी सतत तुलना झाल्यामुळे, किंवा इतर काही कारणाने त्यांच्या मनात कुठेतरी न्यूनगंड निर्माण झालेला असतो. ज्याचा परिणाम त्यांच्या सद्य वागण्यावर झालेला असतो. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याशी उगाच वाईट वागली असे राहून राहून वाटत रहाते. अश्या वेळी त्या व्यक्तीच्या त्या वागण्यावर जरी आपले नियंत्रण नसले, तरी त्या व्यक्तीची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करणे मात्र आपल्या हातात आहे. आपल्याशी विनाकारण असे वागणारी माणसे स्वतः आयुष्यात अतृप्त वा असमाधानी तर नसावीत ना? कुणीतरी त्यांना नीट वागवले नसावे, म्हणून तर ती इतरांशींही तसेच वागत तर नसावीत ना? 

सारासार विचार करता आपल्यासारख्या सामान्यांच्या लक्षात येणे वाटते तितके कठीण नाही, आणि त्यासाठी प्रत्येकाला अमितासारखे मानसशास्त्राचे प्रशिक्षण असायला हवे असेही काही गरजेचे नाही. साधी गोष्ट आहे, कि मनुष्याचे वागणे-बोलणे किंवा चेहऱ्यावरील हावभाव देखील, हे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अनुभवांचे आणि सुख-दुःखाचेच नाही, तर मनातल्या सकारात्मकतेचे वा नकारात्मकतेचे पडसाद असतात. जरी आपला आधार आपणच बनले पाहिजे असे कितीही म्हटले, तरी कळणे आणि वळणे यात अंतर रहाते कधी कधी. सर्व व्यक्ती काही त्या बाबतीत तितक्या खंबीर आणि सक्षम असतील असे सांगता येत नाही. त्यामुळे, आपल्या आसपासच्या व्यक्तींच्या बाबतीत हे उमटलेले पडसाद वेळीच ओळखून, आणि ते पडसाद त्या व्यक्तीच्या कुठल्या अनुभवाचे किंवा काय प्रकारच्या मानसिकतेचे आहेत, हेही वेळीच ओळखलेले बरे नाही का? विशेषकरून भूतकाळातल्या मागच्या अप्रिय दुःखद घटना विसरण्यात किंवा वर्तमानातील त्यामुळे निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीवर मात करण्यात जवळच्या व्यक्तींनी साथ दिली, तर त्या व्यक्तीचे भविष्यकाळात नैराश्येच्या गर्तेत किंवा नकारात्मक दिशेने जाणे टाळता येईल आणि सगळ्यांचेच आयुष्य आहे त्यापेक्षा नक्कीच सुंदर होईल. अश्या प्रकारची आधारसंस्था आपल्या मैत्रीला आणि नातेसंबंधांना एक नवा अर्थ तर देईलच पण हे अनुबंध परस्पर पूरक आणि पोषकही ठरतील नाही का? ती नाती अश्याने नक्कीच एक नवी पायरी गाठतील. शिवाय प्रत्येकानेच जर असा विचार केला आणि त्यावर अंमल केला, तर आपल्या जवळच्या व्यक्तींवरच नाहीत, तर संपूर्ण समाजावरच त्याचे सकारात्मक पडसाद उमटतील. 

- डॉ अर्चना कुसुरकर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा