पाककृती: चटकदार चमचमीत मिरझापुरी


ऋतुगंध हेमंत  - वर्ष १२ अंक
नमस्कार वाचकहो,

आजकाल घरोघरी पोचलेल्या वायफाय, स्मार्टटीव्ही, नेटफ्लिक्स, अ‍ॅमॅझॉन प्राईम इत्यादी प्रकारांमुळे कोणालाही आपापले पदार्थ बनवून हजारो लोकांपुढे सादर करणे शक्य झाले आहे. घरी हायस्पीड इंटरनेट असलेल्या आणि आठवड्यातले पाच दिवस बंदिस्त वातानुकूलित कार्यालयात खुर्चीवर बसून आंबलेल्या सुखवस्तु अभिजनांना सप्ताहांती काहीतरी चमचमीत पाहण्याची भूक लागलेली असते. आता नुसतं चमचमीत पाहायचं म्हणून काहीही सवंग पाहणे बुद्धीजीवी वर्गाला सहन होण्यातले नाही; त्यामुळे जे काही सादर करायचे ते वास्तववादी व भेदक (मराठी: हार्ड हिटींग) वगैरे असणे अतिशय महत्त्वाचे असते. आपल्या पापभीरु आयुष्यात कधीही अनुभवायला मिळणार नाही याची खात्री असलेले, वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून अधूनमधून झळकणारे, न पाहिलेल्या प्रदेशातले, न पाहिलेले वास्तव भरपूर मीठमसाला लावून सादर केल्यास, अभिरुचीसंपन्न प्रेक्षकांच्या धडाधड उड्या पडतात. विमानतळावरुन येताजाता आणलेले ड्यूटी-फ्री उंची मद्य पिताना तोंडी लावायला किंवा व्हर्च्युअल चावडीवर चघळायला म्हणून अशा चमचमीत वेबसिरीज लोकप्रिय आहेत. असा एखादा लोकप्रिय, नावाजलेला, भेदक, वास्तववादी आणि चमचमीत पदार्थ बनवण्याची आपली इच्छा असल्यास ही कृती आपल्या नक्की कामी येईल अशी खात्री आहे. 

साहित्यः 
१. 'द गॉडफादर' किंवा मार्टिन स्कॉर्सेसी छापाच्या चित्रपटांतल्या 'मॉब'च्या धंद्याचं चित्रीकरण, 'गन क्रेझी'सारख्या फिल्म न्वार प्रकारातल्या सामान्य माणसांची नीतिहीनता, 'बेसिक इन्स्टिन्क्ट' किंवा 'बॉडी हीट' सारख्या चित्रपटांतली उत्तान प्रणयदृष्ये, दीवार मधला दक्षिणमार्गी आई-मुलगा विरुद्ध वाममार्गी भाऊ वगैरे कौटुंबिक ताणतणाव आणि गेलाबाजार सत्या, ओंकारा किंवा गॅंग्ज ऑफ वासेपूर मधील शिवराळ, ट्रिगरानंदी गुंड या सगळ्याची ज्याच्या डोक्यात खिचडी झाली आहे आणि त्या शिळ्या खिचडीला जो स्वतःची ओरिजिनल बिर्याणी पेश करण्याच्या अविर्भावात पेश करु शकेल, असा एक गरजू लेखक घ्यावा.

२. दुसर्‍या एखाद्या दिग्दर्शकाच्या वास्तववादी शैलीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे जळून अर्धवट करपलेला आणि आतून धगधगणारा एक दिग्दर्शक. दिग्दर्शकाची धग चांगलीच जाणवली पाहिजे. शक्यतो वास्तव पाहिलेला नसावा; पण, “हार्ड हिटिंग वास्तववादीचं कौतुक करता काय? बघाच आता किती हार्ड हिट करतो” असा अविर्भाव स्पष्ट दिसला पाहिजे; नाहीतर कलाकृती पुरेशी चमचमीत होत नाही.

३. बॉलीवूडमध्ये 'हटके' समजल्या जाणार्‍या (म्हणजे ज्यात उत्तान गाणी ऊर्फ आयटम नंबर्स नाहीत त्या) चित्रपटांत केलेल्या छोट्या-मोठ्या भूमिकांमुळे नावाजले गेलेले; पण फार पैसा मागू शकत नसलेले चार-पाच होतकरु कलाकार. अप्रसिद्ध नसलेले आणि फार प्रसिद्धही नसलेले असे बघून घ्यावेत. त्यात एखादाच जरा जास्त प्रसिद्ध असल्यास तो जास्त फुटेज शोषून घेऊ पाहात असल्याने इतर कलाकारांचा खारटपणा वाढण्याचा धोका असतो. सगळे एकसारखे अर्धप्रसिद्ध कलाकार घेतल्यास एकेकाच रंगात रंगवलेली एकसुरी पात्रे साकारताना कंटाळा येणे त्यांना परवडत नाही व कलाकृतीत छान एकजीव होतात.

४. अगदी नवखी एक नटी. आई-वडील अभिनयाच्या क्षेत्रात असल्याने आपोआप अभिनयाच्या क्षेत्रात आलेली असावी; म्हणजे बर्‍याच लोकांना, तिने स्वतः काहीही केलेले नसले तरी, तिचे नाव माहित असते. शिवाय चटपटीत चवीसाठी एक अतिशय अप्रसिद्ध नटी घ्यावी. तिला करीअरसाठी 'हटके' आणि 'च्यालेंजिंग' काहीतरी करणे अनिवार्य असल्याने वारंवार आलेल्या संभोगदृष्यांमागची ‘कथेची गरज’ तिच्या चटकन लक्षात येते. दुसरा फायदा म्हणजे आपण साकारलेल्या पात्राच्या शरीरसुखाव्यतिरिक्त इतरही काही गरजा व भावना असतील अशा विचारांचा काकस्पर्श तिला होत नाही.

५. एक बी-ग्रेड शहर. भारतातल्या अनेक शहरांपैकी कुठलेही घेतले तरी चालेल. त्यात गल्ली-बोळ, धूळ भरलेले रस्ते, कळकट हाटेलं वगैरे सगळं असतंच. अगदी पदार्थाचं नाव गावावरून असलं तरी गावाला कॅरॅक्टर असलंच पाहिजे अशा जुनाट कल्पना पदार्थात टाकू नयेत. एकतर ते असलं काय अन् नसलं काय, पाहणार्‍यांना काहीही फरक पडत नाही. जिलेबीच्या रंगाने काम होत असेल तर केशर कशाला घालायचं? आपण बिर्याणी खाल्ली हे चार लोकांना सांगता येणे ह्यात लोकांना आनंद असतो; त्यात जिलेबीचा रंग घातला होता की केशर घातलं होतं त्याची पर्वा कोणालाही नसते हे लक्षात ठेवावे.

६. खरी वाटणारी किंवा खरीच हत्यारे. बंदुका, रिव्हॉल्वरे, पिस्तुले, कट्टे, घोडे, तलवारी, कोयते, सुरे, चाकू, वस्तरे मुबलक प्रमाणात घालावेत. प्रत्येक पात्राकडे यापैकी एक-दोन असल्यासही हरकत नाही. हार्ड हिटिंग वास्तवात अशा हार्ड हिटिंग हत्यारांची फार गरज असते. 

७. भरपूर लाल गंध घातलेले दाट पाणी. प्रेक्षकांना थरार वाटावा म्हणून प्रत्येक एपिसोडात चिळकांड्या, शिंतोडे, भळभळणे, फसफसणे इत्यादी प्रकारांनी हे लाल गंध उडवणे गरजेचे असते. ह्यात कंजुषी नसावी.

८. दहा-बारा किलो बटर चिकन किंवा चिकन टिक्का मसाला. डोक्यात गोळी झाडल्याने मेंदू बाहेर पडून गाडीवर उडणे वगैरे दिग्दर्शकीय कौशल्य पणाला लावणाऱ्या सूचक प्रसंगांसाठी हे कामी येते. लाल गंधात मिसळून हे दाखवल्यास प्रेक्षक रोमांचित वगैरेही होत असावेत असा प्रवाद आहे.

कृती: 
प्रथम लेखकाला घेऊन वर्तमानपत्रातील बातम्या बारीक चाळून घ्याव्यात. “लग्नाच्या वरातीत आनंदाच्या भरात गोळीबार केल्याने नवरदेव ठार” किंवा “गावठी पिस्तुलातील बिघाडामुळे बोटे तुटली” इत्यादीसारख्या बातम्या निवडून घ्याव्यात. ह्या बातम्यांचे पीठ उचललेल्या कल्पनांमध्ये एकजीव मिसळून घेतल्यास छान एपिसोड्स जमून येतात.
मग निवडलेल्या अर्धप्रसिद्ध नटांचे दोन भाग करावेत. जरा गोरेगोमटे, मऊ चेहऱ्याचे वगैरे नट एका बाजूला आणि दाढीवाले, ओबडधोबड चेहऱ्याचे नट एका बाजूला करावेत.

मऊ चेहऱ्याचे, गोरेगोमटे नट प्रामाणिक, सत्त्वशील वगैरे असणाऱ्या पात्रांत टाकावे आणि ओबडधोबड चेहऱ्याचे, दाढीवाले किंवा काळे नट विनाकारण दुष्ट व निर्दय असलेल्या पात्रांमध्ये टाकावेत. असे केल्याने प्रेक्षकांच्या सुप्त पूर्वग्रहांना धक्का बसत नाही व कलाकृतीचा आनंद निर्वेधपणे घेता येतो.

असा सगळा जामानिमा झाला की गोमट्या लोकांना ओबडधोबड लोकांपेक्षा हुशार दाखवून त्यांच्यात मत्सरभाव निर्माण होईपर्यंत काही प्रसंग रटरटावेत. आणखी छान शिजण्यासाठी ओबडधोबड लोकांना आवडणारी नायिका गोमट्या लोकांच्या प्रेमात पाडून प्रेमाचे त्रिकोण तयार करावेत. गोमट्या किंवा ओबडधोबड दोन्हीप्रकारच्या लोकांमध्ये सदसद्विवेकबुद्धीच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून वेगाने प्रसंग ढवळत राहावेत. मात्र गोमटे लोक निर्ढावलेले नाहीत हे दाखवण्यासाठी पहिली गोळी झाडल्यावर रक्त पाहून उलटी करताना दाखवण्यास विसरू नये. त्याच्याच पुढच्या प्रसंगात मैत्रिणीबरोबर हाटेलात बसून हसत हसत चहा पिताना दाखवले तरी पदार्थ बिघडत नाही. ते निर्ढावलेले नाहीत हे तोपर्यंत प्रेक्षकांनी स्वत:ला समजावलेले असते; आपण जास्त मेहनत घ्यायची गरज पडत नाही.

मग हळहळू दोन प्रतिस्पर्धी व त्यांची एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न, पुत्रप्रेम, निर्मम राजकारण, एकमेकांचा वापर करून घेणारे स्त्री-पुरुष, कर्तव्यनिष्ठ वगैरे असलेले अधिकारी असे क्रमाक्रमाने पदार्थ घालत जाऊन गोमट्या लोकांचा बळीचा बकरा होईल अशी परिस्थिती येईपर्यंत ढवळत राहावे. 
शेवट शक्यतो दु:खद वाफारा देऊन करावा; म्हणजे पदार्थ जास्त हार्डहिटींग होतो आणि प्रेक्षकांना बराच वेळ चव लक्षात राहते.

असा एकदा पदार्थ तयार झाला की मग मार्केटिंगच्या थाळीत तो मोठ्या अविर्भावात वाढावा. दिग्दर्शक व नटांनी जमेल तिथे जाऊन लांब तोंडाने ”सामाजिक प्रवाह”, “अंडरबेली” यांसारखे मनोहर शब्द वापरून भाष्य करावे. तसे केल्याने आपोआप पदार्थाचा दर्जा वाढत जातो आणि कोणी त्याला नावं ठेवण्याची हिंमत करत नाही.
चुकून कोणी तोंड वाकडं केलंच तर त्याच्याकडे अतिशय करुण व दयार्द्र नजरेने पाहावं म्हणजे पदार्थाच्या लोकप्रियतेवर परिणाम होत नाही.

तर असा हा चमचमीत, चटपटीत पदार्थ नक्की करून पाहा व “बडिंग”, “प्रॉमिसिंग” वगैरे कलाकार म्हणून सगळीकडे कौतुक करून घेत मिरवा!


- निरंजन नगरकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा