जांभूळ पिकल्या झाडाखाली

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

आमच्या सिंगापुरातल्या घरा समोरच एक रमणीय असा जलाशय आहे. त्या जलाशायाभोवती निसर्गरम्य असा परिसर आहे. मग काय विचारता माझ्यासारख्या निसर्गप्रेमी व्यक्तीला रोज तिथे एक फेरफटका मारल्याशिवाय थोडंच चैन पडायला? मग जाता जाता कोणते मोठे वृक्ष इथे आहेत त्याची पाहणी करता करता एक चिरपरिचित फळ दृष्टीस पडले. आणि लक्षात आले की त्या फळाची बरीच झाडं तिथे आहेत. मला त्या झाडांना पाहून कोणीतरी माहेरचेच भेटल्याचा आनंद झाला. माझ्या सप्तरंगी बालपणातील जांभळा रंग ह्या झाडाच्या फळाचा बर का. कोणतं झाड असेल हे तुम्ही ओळखलंच असेल. त्या जांभळाच्या बनात फिरायला जाण्याचा आता दिनक्रमच झाला.

जांभळाचे झाड मुळात भारतीय मग त्याची लागवड दक्षिण पूर्व अशिया मध्ये करण्यात आली. आणि ते ही अगदी इथलेच असल्यासारखं इथे बहरलं. ह्याच कारणामुळे तर मला ह्याच आकर्षण वाटल नसेल? ह्या जांभूळ बनात फिरताना मला माझ्या बालपणीच्या उन्हाळी सुट्ट्यांची आठवण झाली. घरी उन्हाळी सुट्टीला आत्ये मावस भावंड जमलेली. आमरसाचे भरपेट जेवण सकाळीच झालेले. बाहेर दुपारचे रणरणते ऊन, अशा वेळी बाहेर खेळायला जाणेही शक्य नसायचे. अशा आळसावलेल्या दुपारी आई एक मोठा टोप भरून वरून थोडं मीठ भुरभुरवलेली जांभळ आमच्या बच्चे कंपनीच्या पुढ्यात ठेवत असे. मग ते चविष्ट फळ खाताना आमची ब्रम्हानंदी टाळी लागत असे. त्या फळाच्या मऊ लुसलुशीत गराने कोणाची जीभ किती जांभळी हे पाहण्यासाठी हातभर जीभ बाहेर काढण्यची जणू स्पर्धाच लागत असे. कित्ती मज्जा येत असे हे सर्व करताना. अगदी निरागस साधे सोप्पे बालपण. अशी धमाल करताना ह्या जांभळाचे आम्हाला किती फायदे आहेत हे आमच्या गावीही नव्हते. ह्यामुळे आमच्या रक्तातील तांबड्या रक्पेशींची वाढ होत होती. म्हणूनच आम्हाला कधी अनिमिया झाला नाही आणि कडू आयर्न च्या गोळ्या घ्याव्या लागल्या नाही. जांभळा मध्ये विपुल प्रमाणात असणाऱ्या फायबर मुळे बद्धकोष्ठताही झाली नाही. त्यातील antioxidant मुळे आमच्या शरीरातील free radicals ही दूर पळाले.

चवीला कडू असणाऱ्या जांभूळ बिया आम्ही थुंकून टाकत असू.आई त्या बिया गोळा करून स्वच्छ धुवून वाळवून त्याची पूड करून ठेवत असे. ही पावडर रक्तातील साखर कमी करण्यास अत्यंत उपयुक्त आहे.

ह्या झाडाची पाने, फळे, बिया इतकेच नव्हे तर खोडही मधुमेहींसाठी औषधी आहे. खर पाहयल तर जग मधुमेहापासून मुक्त करण्याचा सधा सोपा उपाय आपल्या अंगणातच उपलब्ध आहे. सिंगापुरातले हवामान ह्या झाडाला विशेष मानवले आहे. त्यामुळे हा वृक्ष इथे जोमाने वाढला आहे. आणि मधुमेह बरा करण्याचा स्वस्त उपाय आपल्याला देत आहे.

खरं सांगू का मधुमेह हा कंजूष माणसासारखा आहे. का म्हणून विचारता? अहो जसं कंजूष माणूस फक्त साठवत राहतो खर्च मात्र करत नाही तसेच मधुमेहात साखरेचे प्रमाण वाढतच जाते.वापरले जात नाही. समजा तुम्हाला कंजूष माणसाचा बँक balance कमी करायचाय तर तुम्ही काय कराल? त्याच्या account मध्ये पैसे भरणे प्रथम बंद केले पाहिजे मग साठवलेले पैसे खर्च करण्यची त्याला सवय लावली पाहिजे. आपोआप बँकेतील पैसे कमी होतील. तसेच मधुमेहींनी प्रथम पिष्टमय पदार्थ आणि साखर खाणे थांबवले पाहिजे. मग व्यायाम करून साठलेल्या calories वापरायला सुरुवात करावी. कल्पना करा ह्या रम्य जांभूळ बनात चालून तुम्ही शरीरातील calories खर्च करून ह्या झाडाची औषधी फळे आणि कोवळी पाने खाऊन तुमच्या मधुमेहावर मात करू शकता. जांभळाची कोवळी पाने चावून खाल्याने तुमचे मुखरोग आणि हिरड्यांचे आजार बरे होऊन दातांचे आरोग्यही सुधारते. 

मधुमेह हा फक्त श्रीमंत लोकांचा आजार आहे असा एक समज आहे. पण मी म्हणेन नाही, तो गरीब लोकांनाही तितकाच उपद्रव देत आहे. कारण पांढरा polished तांदूळ हा हातसडीच्या तांदळापेक्षा स्वस्त आहे. पांढरा पाव ब्राऊन पावापेक्षा स्वस्त आहे. केक आणि queh जे मैद्यापासून बनतात ते बदामाच्या पिठापासून बनणाऱ्या पेस्ट्री पेक्षा स्वस्त आहे. म्हणूनच श्रीमंतांबरोबर गरीबांना तसेच लहान मोठ्या सर्वांनाच ह्या रोगाने तितकेच ग्रासले आहे. 

म्हणून तुमच्यावर मधुमेहाने मात करण्याआधी तुम्हाला जर मधुमेहावर मात करायची असेल तर आमच्या रमणीय, प्रेक्षणीय जलाशया भोवती असणाऱ्या जांभूळ बनात फिरायला या आणि काळ्याभोर जांभळांचा आस्वाद घ्या. वाट कसली पाहताय?

अनुवाद - राजश्री लेले 

मूळ लेखन- डॉक्टर प्रिया कामत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा