ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
आनंद आणि सुख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू! आनंदी असाल तर सुखी असता आणि सुखी असाल तर आनंदी असताच. माझी आजी नेहमी एक वाक्य म्हणायची, ‘आनंद हा मानण्यावर असतो.’ माझा आजीशी एकदा ह्या वाक्यावरून खूप वाद झाला. त्याचं झालं काय, मी आमच्या शाळेतर्फे दरवर्षी आंतरशालेय पोहण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायची. ब्रेस्टस्ट्रोक मधे माझा पहिला नंबर ठरलेला. त्यावर्षी स्पर्धेच्या आदल्या दिवशी माझा पाय मुरगळला. आणि सुजला. मला आता पाण्यात तरी उतरता येईल का नाही इथपासून शंका निर्माण झाली. पण मी जिद्दीने स्पर्धेत भाग घेतला, तसाच पाय सुजलेला असताना पोहले. परिणामी माझा स्पीड कमी पडला आणि माझा नंबर दुसरा आला. पहिला नंबर गेला म्हणून मी खूप खूप रडले. माझी आजी तेंव्हा मला म्हणाली, “अगं एव्हढं रडायला काय झालं, ‘आनंद हा मानण्यावर असतो’. पहिला नंबर गेला म्हणून दुःखी व्हायचं का स्पर्धेत भाग घेता आला आणि दुसरा नंबर मिळाला म्हणून आनंद मानायचा हे तुझ्या हातात आहे.” मी आजीवर जामच उखडले. पहिला नंबर गेल्याचे आणि सुजलेल्या पायाचे दुःख ठसठसत होतंच. मी आजीशी वादच मांडला. तिला म्हणाले, “मी तुला दुसरं उदाहरण देते, समजा, एखाद्याचे दोन्ही पाय अपघातापेक्षा तुटले तर मग तू त्यालाही हेच सांगशील की ‘आनंद हा मानण्यावर असतो,’ जरी तुझे दोन्ही पाय तुटले आहेत तरीही तू आनंदी रहा म्हणून?” त्यावर आजी मला म्हणाली, “बरोबर आहे तुझे, तो माणूस आनंदी असणे शक्यच नाही, तो दुःखात असणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु त्याचे पाय तर आता त्याला परत मिळणार नाहीत, अगदी कितीही दुःख केले तरी, हे तर सत्य आहे. मग त्याच्या पुढे दोनच पर्याय उरतात, पाय गमावल्याच्या दुःखात बुडून पूर्ण आयुष्य दुःखात कंठायचे किंवा मग कालांतराने, स्वतःला सावरून, आहे ती परिस्थिती स्वीकारून, त्याला सामोरे जाऊन, आहे ते आयुष्य कसे ‘आनंदी होईल’ याचा मार्ग शोधायचा. ह्या मार्गावर जेव्हा तुम्ही चालायला लागता तेव्हा त्याचाच अर्थ ‘आनंद हा मानण्यावर असतो’ असा होतो.”
ह्याच संदर्भात माझा आजीशी झालेला दुसरा वाद आठवतो. आनंद, भौतिक सुख मिळवणे हे ‘वाईट’ आणि ‘त्याग’ करणे ‘चांगले’ ह्यावरून! मी आजीला म्हणायची, “भौतिक सुखांचा उपभोग घेणारे आणि त्याग करणारे, दोघेही, कोणतातरी ‘आनंदच’ शोधत असतात ना, मग एक आनंद चांगला आणि एक आनंद वाईट असे का?” तेव्हा तिने खूप छान समजावून सांगितले होते. ती म्हणाली, “ ‘त्याग’ ह्या शब्दाचा अर्थ तू नीट समजावून घे. उदाहरणच द्यायचे झाले तर, एखादा माणूस ‘आनंद मिळवण्यासाठी’ कांद्याची भजी खातो तर दुसरा कांद्याची भजी खाताना आनंद मिळवतो. पहिला हा आनंद मिळवण्याचा हरप्रकारे, सातत्याने प्रयत्न करत असतो. मग प्रत्येक गोष्टीत आनंद मिळतोच याची खात्री नसते. कधी आनंद मिळतो तर कधी दुःख वाट्यास येते. मिळालेला आनंद हा त्या त्या गोष्टीपुरता मर्यादित रहातो. त्यामुळे आनंदाचा सतत शोध घेणे चालूच राहते. त्याउलट दुसऱ्या प्रकारात त्याग वगैरे करायचा नसतो पण आनंद ‘मिळवायचाही’ नसतो तर आनंदी ‘व्हायचे’ असते. भजी खाण्याचा ‘त्याग’ करणे हे महत्त्वाचे नाही. तर भजी कांद्याची असोत अथवा वांग्याची, भजी असोत अथवा भाजी, काय जे आहे ते खाताना आनंदी ‘व्हायचे’ हे महत्वाचे.”
‘आनंद मिळवणे’ हा ‘शरीरधर्म’ आहे तर ‘आनंदी असणे’ हा ‘मनोधर्म’ आहे. कोणत्याही ‘गोष्टीचा’ त्याग करण्याची गरज नसते तर फक्त दुःख करण्याच्या ‘वृत्तीचा’ त्याग करणे महत्त्वाचे असते. आज माझी आजी हयात नाही पण तिने समजावलेला हा फरक माझ्या कायम लक्षात राहिल.
- योगिनी लेले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा