एकदा काय गम्मत झाली, तुम्हाला सांगू का
मुले सुट्टीमध्ये मामाकडे, राहायला गेली बरं का
म्हणून हट्टाने गच्च्चीवर, बांधून घेतला एका झोका
आणि फुरंगटून मी पण, धरून बसले मोठा हेका
वाटले लाड पुरवून घायचा, आलाय चांगला मोका
घरचे करताना, स्वतःकडे बघण्याएवढा वेळ असतो का
माझे वजन पेलण्याएवढा आहे का मजबूत, आली मनी शंका
म्हटले नवऱ्याला, जरा हळूहळू देतोस का रे मला झोका
त्याने असलानसलेला जोर काढून, दिला पाठून असा धक्का
की वाटले, हा आहे झोका की वादळात सापडलेली नौका
तिच्यासारखाच जोरजोरात, हिंदकळू लागला की हो झोका
पाय वर जाऊन वाटले, सटकून आता खाली पडतेय का
वाटले, इराद्यात नाही न कुठे दिसत आहे कसला धोका
की, सुंठीवाचून खोकला गेल्याच्या, विघ्नसंतोषाची शंका
क्षणार्धात माझ्या काळजाचा, चुकला की हो ठोका
तेव्हापासून झोक्याचा, मी घेतलाय असला धसका
की, नसते हट्ट करण्याचे, आता माझे वय उरलेय का
पडून कंबर मोडली तर, बघायला कोणाला वेळ आहे का
म्हटले मुले परतण्याआधी, काढून टाकूया हा झोका
असले खेळ त्यांच्या दृष्टीने, आऊटडेटेड नाहीत का
बघेन त्यांच्यासम आयपॅड, आयफोन मला भरभर जमते का
किंवा गंगनाम स्टाईलची, एखाददुसरी स्टेप जमतेय का
प्रतिमा जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा