ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १
नुकताच महाराष्ट्र मंडळाने वर्षप्रतिपदा शालिवाहन शके १९४१, म्हणजेच गुढी पाडव्याने नवीन वर्षाची सुरूवात साजरी केली. हे वर्ष पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे.
जगभर आयोजिलेल्या ’पुलोत्सवाची’ भारताबाहेरील कार्यक्रमांची सुरूवात (सोप्या मराठीत – launch!) सिंगापूरमधल्या ह्या कार्यक्रमाने झाली ही खास नमूद करण्यासारखी गोष्ट. “गुण गाईन आवडी” म्हणजे पु.लं.नी अनेक मान्यवर दिग्गज कलाकारांची रेखाटलेली शब्दचित्रे आणि त्यांच्या अभिवाचनाच्या कोंदणात बसवलेला अजरामर गाण्यांचा त्याच नावाचा कार्यक्रम. यात गाणारे कलाकार होते डॉ.रेवा नातू आणि पं.विजय कोपरकर. पं.विजय कोपरकरांसारख्या संगीतज्ञ ज्येष्ठ कलाकारांना मंडळाच्या प्रेक्षकांना ऐकता आले. कार्यक्रमाच्या अनुषंगाने, श्री.संतोष अंबिके यांनी घेतलेली कोपरकर बुवांची ही मुलाखत....
- शिक्षण आणि साधना
कोपरकर बुवा शिक्षणाने College of Engineering, Pune आणि पुणे विद्यापीठाचे मेटालर्जिकर इंजिनीअर आहेत (Masters in Metallurgical Engineering). अनेक वर्षे ते लघु-औद्द्योगिक क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय करीत आहेत. त्यांची ती कारकीर्द यशस्वीपणे सुरू आहे. कोपरकरांचे वडिल हे थोर कीर्तनकार होते. आफळे बुवा आणि कोपरकर बुवा हे दोघे जुन्या काळात महाराष्ट्रातील राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून नावाजलेले होते. घरात संगीताचा वारसा होताच. वयाच्या आठव्या वर्षापासून बुवांनी संगीताची तालीम घ्यायला आरंभ केला. प्रथम पं.विनायकराव पटवर्धन यांचे चिरंजीव डॉ.मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे ८ वर्षे शास्त्राचा अभ्यास आणि विद्यार्जन, त्यानंतर डॉ.वसंतराव देशपांडे यांच्याकडे ५ वर्षे तालीम आणि वसंतरावांचे देहावसान झाल्यावर ७ वर्षे पं.जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे तालीम. अभिषेकी बुवांच्या ज्येष्ठ शिष्यांमधे कोपरकर बुवांचा समावेश आहे. वसंतराव आणि अभिषेकी बुवा हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे महाराष्ट्रातील दिग्गज. त्यांचा सहवास कोपरकर बुवांना तब्बल १२ वर्षे मिळाला आणि त्या दोघांच्या गायकीचा सुक्ष्म अभ्यास करताना, आपल्या स्वत:च्या गायकीचा आविष्कार झाला. या अध्ययनाबद्दल बोलताना कोपरकर बुवा अंतर्मुख, गंभीर आणि हळूवार होतात! त्यांच्या सहवासात आलेल्या अनेक लहान मोठ्या अनुभवांनी कोपरकारांचे - एक गायक म्हणून, शास्त्रीय संगीतातले व्यक्तिमत्व प्रथम साधक म्हणून व नंतर सिध्द म्ह्णून - घडले आहे हे स्पष्ट होते. त्या कालखंडात, त्या पर्वताएवढ्या बुजुर्ग संगीतयोगींकडनं रोजची ५-६ तासांची समोर बसून घेतलेली तालीम आणि स्वत:चा प्रदीर्घ रियाज, हा बुवांच्या गायकीचा गाभा आहे.
शिवाय साधक वृत्तीचा पाठपुरावा करताना बुवांनी अनेक मातब्बर संगीतज्ञांकडनं मार्गदर्शन घेतलं. यात जमशेदपूरच्या पं.चंद्रकांत आपटे गुरूजी यांचे नांव बुवा अत्यंत आदराने घेतात. त्यांच्या कडून विविध पारंपारिक आणि अनवट व जोडरागांतील असंख्य बंदिशी बुवांनी मिळवल्या. तसेच डॉ.आबा गोडबोले यांच्याकडनं जोडराग व बाळासाहेब पुंछवाले यांच्या कडून टप्पा-तराण्यांचे समक्ष आणि विस्तारीत मार्गदर्शन बुवांनी मिळवले. आज भारतातील एक अग्रेसर गायक म्हणून अनेक मोठमोठ्या समारोहांमधे बुवांनी आपले गाणे मांडले आहे. अनेक पारितोषिकांचे ते मानकरी आहेत.
- गाण्यात एक चांगली उंची गाठायला काय घटक लागतात? गुरूबरोबर प्रत्यक्ष राहणे/शिकणे म्हणजे गुरूकुल पध्द्ती प्रमाणे गुरू-सहवास आवश्यक आहे का?
गुरूच्या घरी वास्तव्य करणे याला बुवा गुरूकुल पध्दती म्हणत नाहीत. मोठ्या गुरूंकडे जायच्या आधी शास्त्र आणि विद्या म्हणजे, राग आणि बंदिशी यांचा पाया तयार असणे गरजेचे आहे तरीपण वसंतरावांकडे अडीच वर्षे राग यमनचे अध्ययन सुरू होते!! वसंतराव म्हणत की एका रागाचा तुम्ही अतिशय खोल अभ्यास केलात की मग पुढचे कठीण नाही. “क्लास पध्द्तीत” राग, त्यातील ख्याल एक दोन बंदिशी, ताना एवढेच होते, ते घरी राहून केले तरी तो “अभ्यासक्रम” पुर्ण केल्यासारखे होते. पण ह्याला काही तालीम म्हणत नाहीत. वसंतराव आणि अभिषेकी बुवा यांच्या कडे वास्तव्याला नसले तरी, त्यांच्याच घरी अनेक तास अध्ययन होत असे. सकाळी प्रथम तिथेच रियाज सुरू असायचा तो गुरू ऐकत असायचे. त्याद्वारे शिष्याने किती प्रगती केली आहे हे त्यांना कळायचे. एक-एका रागात १५-२० बंदिशी घेणं, त्यात शिष्याचे आकलन व रागाची समज परिपक्व होत राहणं ही तालीम. या प्रक्रियेत गुरूचं तुमच्यावर लक्ष असणं हे महत्वाचं, त्यांच्या समोर तुमची अशी तालीम सातत्याने होत राहणं ह्यालाच बुवा गुरूकुल पध्द्ती मानतात. गुरू बरोबर वास्तव्य, सान्निध्य अशा गोष्टींना खरे महत्व नाही. गाणं शिकायला सुरूवात करायला ८ ते १० हे सर्वात उत्तम वय आहे. त्या वयात व कुमार-वयीन काळात जे संस्कार होतात ते फार प्रभावी असतात, टिकतात आणि त्या शिष्यांनाही त्या वयात ते ज्ञान-विद्या संपादन करण्यात, गाणे मनातून गळ्यात उतरवण्यात, लवचिकता असते.
- गायकी म्हणजे नक्की काय? त्याचे किती महत्व आहे?
गायकी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पहिले, शास्त्र म्हणजे वेगवेगळॆ राग, त्यांची रचना इत्यादी, दुसरे, विद्द्या म्हणजे त्यातील बंदिशी, तराणे, ताना वगैरे. ह्या दोन गोष्टी प्रथम शिकवल्या जातात. तिसरी गोष्ट म्हणजे गायकी- जी कला म्हणून अभिव्यक्त होते. पहिल्या दोन गोष्टींमधून तुमच्यावर संस्कार होतात आणि ते तुमच्या गाण्यात येणारच परंतू त्याच्या मांडणीचा तुम्ही कसा विचार करता, त्यात सौंदर्य कसं आणता, त्यात भाव कसा व्यक्त करता, गाणं रंजक-आकर्षक कसं होईल ह्यासाठी तुम्ही जे करता, ती गायकी; आणि ती प्रत्येकाची वेगळी असते, असायला हवी, कारण प्रत्येकाची विचार करायची पध्दत वेगळी असते. गुरू दिशा देतात, ते दिसते, परंतू त्यात स्वत:चे व्यक्तित्व येते आणि तीच गायकी. उद: वसंतरावांचे गाणे, त्यामागचे विचार हे अतिशय जलद, त्यांच्या ताना/हरकती, आवाजातील फिरत हे सर्व नैसर्गिक होते. ते म्हणत की ठुमरी कुणी गावी? – एक जागा घेत असताना त्याच वेळी पुढ्च्या ८ जागा आपण वेगळ्या आणि कशा घेणार आहोत हे ज्याला माहीत असते त्याने ठुमरी गावी. कारण तिथे विचार करायला ख्याला इतका वेळ नसतो! तिथे प्रतिभा व विचारांची मांडणी हीच महत्वाची आणि ती वैयक्तिक असते. त्याला वसंतरावांची गायकी ही अतिशय पूरकच नव्हे तर नैसर्गिक होती. संगीत हे मनात/बुध्दीत साठते आणि ते “process” होऊन गळ्यात उतरते. आपले, मन गाते. गळा हे माध्यम आहे! गायकीने गायकाचे स्वतंत्र अस्तित्व सिध्द होते. रसिकांसमोर मांडली जाते ती तालीम नाही, गायकी असते. शास्त्र आणि विद्या मुर्त आहेत तर गायकी अमूर्त असते.
- खरंतर आजच्या काळात तंत्रज्ञानामुळे संगीत आणि गाणे यात आपले भविष्य शोधणारे असंख्य गुणवत्ता संपन्न लोक/मुले आहेत. तुम्हांला त्यांचे भवितव्य काय वाटते, त्यांनी काय करावे?
कला ही आनंद देते. शास्त्रीय संगीत शिकल्याने आधी गाणॆ ऐकायची तयारी होते. मन शुध्द व टवटवीत होते. बुवांचं असं स्पष्ट मत आहे की सर्व सोडून पुर्ण वेळ नुसतं गाणं करावं का, ह्या प्रश्नाचं उत्तर ’नाही’, असंच आहे. विद्यार्थ्यांनी सर्व गोष्टी कराव्यात. फक्त गाण्यावर अवलंबून रहायला, गाण्यात तेवढी उंची यावी लागते. ते झाले नाही तर कलाकाराची परवड होते. आपल्या विद्यार्थ्यांना बुवा सांगतात की फक्त गाणे करायला लागले तर त्या “व्यवसायातल्या” चांगल्या नसलेल्या बाजू तुम्हांला दिसायला लागतात किंवा अनुभवायला लागतात. ’व्यवसायातल्या’ इतर लोकांचे वागणे, त्यातील वाईट करामती यांना सामोरे जावे लागते आणि ते सर्व होणारच, कारण काही लोकांचे सर्वस्वच ते असते! या उलट, तुमचे शिक्षण, इतर व्यवसाय सुरू राहूच दे. गाण्याचा अभ्यास निश्चितच आवश्यक आहे, पण सर्व सोडून ते करू नका, तुमचे व्यक्तिमत्व एकांगी आणि त्यावरच अवलंबून बनवू नका. आजच्या युगात स्पर्धा आहे पण त्याबरोबर संधी देखिल आहे. तेव्हां एकांगी होण्याची गरज नाही. जेव्हां तुमच्या गाण्याची उंची तितकी होईल, तेव्हा तुम्ही तो निर्णय घेऊच शकता. शिवाय गाणं ही आनंद देणारी एकच गोष्ट नाही आणि इतक्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात, संगीत हे तरी तसेच राहील याची खात्री कोण देऊ शकेल?
गाण्याच्या बाबतीत काय करायचे हे आपण ठरवावे लागते. शास्त्रीय संगीताला परंपरा आहे पण त्याला प्रवाह पण आहे. वसंतराव म्हणत की साठलेल्या पाण्याचे, डबके होते; ते पाणी, प्यायच्या लायकीचे रहात नाही! त्यामुळे प्रवाह असणे आवश्यक आहे. त्यात काही बदल होतील उद: मागच्या काळासारख्या लयीत आज गात नसतील पण त्याचा अभिजातपणा टिकेल, तसे पुढे जाऊन त्यातल्या काही गोष्टी टिकणार. विद्यार्थ्याने मी “शांताबाय” गाणार, की शास्त्रीय संगीत गाणार हे आधीच ठरवावे. या दोन गोष्टी अतिशय भिन्न आहेत. एक हजारो वर्ष टिकली आहे, दुसरी काही वर्ष सुध्दा नाही. शास्त्रीय संगीताचा मार्ग अवलंबणारे अतिशय होतकरू, जिज्ञासू विद्यार्थी अनेक आहेत ह्याची बुवांना खात्री आहे.
तंत्रज्ञान व वाहिन्यांचे माध्यम अर्थात चांगले आहे पण सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत हे खूप वेगळे आहे. आज वाहिन्यांमुळे, यू-ट्यूब मुळॆ काही कलाकारांना प्रचंड प्रसिध्दी, यश व पैसे मिळत असतील, पण प्रत्येक अशा कलाकारामागे, अयशस्वी ठरलेल्या कलाकारांची संख्या ही कितीतरी पटीने जास्त आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पट्कन यश हे सोपे नाही आणि त्यात नशीबाचा/संधीचा भाग मोठा असतो. यशस्वी दिसणारे कलाकार ५ असतील तर यश न मिळालेले ८० आहेत. शिवाय या सर्वांना विद्येचा पाया असेलच असे नाही आणि अशा लोकांना पुढे काय करायचे हा प्रश्न येतो. आपण पाहतो की अशा वैचारीक पोकळीने ग्रासलेल कलाकार अभिनय क्षेत्रात देखिल असतात. यशस्वी कलाकारांना मनोरंजनाकरता बोलावता येईल पण व्यासंगी शास्त्रीय गायक, संगीताबद्द्ल जेवढे सांगू शकतो, बोलु शकतो तसे हे कलाकार करू शकत नाहीत. मोठ्या कलाकारांचे गंमतशीर किस्से हे एक टाईम-पास म्हणून सुगम संगीताच्या कार्यक्रमात चालून जातात, त्यात काही विद्या/ज्ञानात भर पडत नाही. लोकांना संगीताबद्द्ल जाणून घ्यायचे असेल, शिकायचे असेल तर शास्त्रीय संगीताचेच ’वर्क-शॉप’ होतात. उदा. दौऱ्यांवर, बुवा अशा अनेक कार्यशाळा घेतात आणि रसिक प्रेक्षक, जिज्ञासू विद्यार्थी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतात.
- आपण सुगम किंवा लाईट/फिल्मी संगीतात रूची ठेऊन आहात का? या क्षेत्रात काही योगदान?
बुवा सिनेमात गायले आहेत. आनंद मोडकांच्या एक दोन सिनेमांमधे, नरेंद्र भिडेंच्या सिनेमात बुवा शस्त्रीय गायक म्हणून गायले आहेत. पण अर्थात तशा प्रसंगाची मांडणी करण्याकरिताच त्या-त्या संगीतकारांनी त्यांचे गाणे आपल्या सिनेमात घेतले आहे. “अस्तु” ह्या सिनेमात बुवांनी पार्श्वगायन केले आहे. पण एकंदरित बुवांचे म्हणणे आहे की फार क्वचित प्रसंगांमधेच त्यांच्या सारख्या शास्त्रीय गायकाची आवश्यकता येते. ते क्षेत्र अर्थात रोचक आहे पण निराळे आहे.
- ’कट्यारला’, सिनेमा म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळाली. तसे इतर अभिजात संगीत नाटकांना, ताकदीच्या कलाकारांना घेऊन करता यायला काय अडचण आहे?
’कट्यार’, नाटक म्हणून अनेक वर्षे रंगभूमी वर गाजले, सिनेमा कदाचित जास्त गाजला असेल तरी, अशा सिनेमाला व्यापारी सिनेमांइतका “मास ऑडियन्स” नाही. म्हणजे असं की नाटकाच्या प्रेक्षकांनीच कट्यार सिनेमा बघितला, त्यात वीस-एक ट्क्क्यांची वाढ झाली असेल, एवढंच... नाटकाच्या मर्यादा असतात तशाच सिनेमाच्या असतात. वसंतराव नाटकात पहिलं रियाजाचं गाणंच २०-२० मिनिटं गायचे, नाटक ६ तासांचं व्हायचं. सिनेमात काही मिनिटांचीच गाणी आहेत. असं सगळ्या नाटकांचं होऊ शकणार नाही. ते खर्चाच्या गणितात बसणार नाही. गमतीने बुवा म्हणतात की, लोकंच आणि त्यांचा वेळच सध्या महाग आहेत – कलाकार नाही..! पुण्यात सुध्दा काही अगदी कमी प्रमुख संगीत महोत्सव सोडले तर इतर अनेक महोत्सवांना येणाऱ्यांची संख्या कमीच झाली आहे. अभिजात नाटकांना/संगीत नाटकांना लोकं येतात. शिवाय अभिजात नाटकांच्या डी.वी.डी आहेत. पण बऱ्याच गोष्टींचा सध्या भडिमार आहे. त्यातल्या किती टिकतील हे काळच सांगू शकेल.
एकंदरित कालानुरूप असे संगीताचे अध्ययन व संगीत साधना, शास्त्र-विद्या गायकी, हा प्रवास आणि मुख्य म्हणजे केवळ प्रसिध्दी आणि आर्थिक यशापेक्षा आनंदासाठी संगीताचे शिक्षण घ्यावे व उत्तम संगीतासहित सर्वांगीण परिपक्व व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी योग्य, असाच मार्ग विद्यार्थ्यांनी आक्रमावा हा बुवांचा मुख्य सल्ला आहे.
-संतोष अंबिके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा