भिती की सकारात्मक धाक

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

ह्या महिन्यात मदर्स डे चे जोरदार वारे वाहात असतात. वात्सल्य निसर्गदत्त असलं तरी सुजाण पालकत्वाचं तसं नाही. मी या विषयातली तज्ञ नाही आणि माझा काही सखोल अभ्यास वगैरेही नाही. पण सज्ञान पालक ( सज्ञान पाल्याचा पालक) हा शिक्का लागण्याच्या बेतात आहे त्यामुळे सज्ञान झाल्यावर मत मांडण्याचा जो हक्क मिळतो तो बजावू पाहात आहे असं म्हणा हवंतर. गमतीचा भाग सोडून देऊ, आत्तापर्यंत जे काही वाचनात किंवा पहाण्यात आलं त्यातलं जे पटलं, आवडलं, यातलं काही आधी माहिती असतं तर बरं झालं असतं असं वाटलं ते शेअर करते आहे. एक मूलगा होमवर्क करतोय आणि आई तो काय करतोय ते बघायला आली आहे- या एकाच प्रसंगात कसे वेगवेगळ्या पद्धतीने संवाद होऊ शकतात याची चार उदाहरणं-

1."गाढवा, हे असं गणित सोडवतात का? मधल्या स्टेप्स का खाल्ल्यास, आत्ताच गिळलीस धिरडी ती पुरली नाहीत का? अक्कल वाटत होते तेव्हा नक्की आता सारख्या काढतोस तशाच झोपाच काढत असशील"

"अगं आई पण टीचरनी सांगितलंय की स्टेप्सना मार्क्स नाहीएत. मग कशाला लिहायच्या स्टेप्स?"

एक चापटी

" तू गप्प बस आणि मुकाट्याने सांगते ते ऐक. रडायला

काय झालंय, तेवढं बरं चांगलं जमतंय"

2."अरे मधल्या स्टेप्स का लिहील्या नाहीस?"

"आई तुला आजकालचं काही कळत नाही. तू ना डायनासाॅर्सच्या काळातच असतेस. तुझं ऐकलं तर मी मेलोच त्या डायनासाॅर्ससारखा, आज स्पीडनी काम करावं लागतं. मी स्टेप्स लिहीत बसलो तर वेळ कमी पडेल, मी असंच करणारे कारण स्टेप्सला मार्क्स नाहीएत. उगाच कटकट करू नकोस. 'ए' ग्रेड आल्याशी मतलब ना ती असं करूनच मिळेल."

3."अच्छा, एकदम उत्तरच लिहीलंस, कोणती पद्धत वापरून सोडवलंयस?"

"अगं शाळेत सांगितलंय कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी चालेल आणि स्टेप्स ला मार्क्स नाहीएत."

"अरे पण प्रत्येक गोष्ट मार्कांसाठीच नसते करायची, आणि मार्क्स नसले तरी स्टेप्स लिहील्यास तर त्यात थोडा वेळ मोडेल खरा पण तुला रिचेक करायला बरं पडेल आणि चुकलं तर टीचरला पण नक्की कुठे चुकतंय ते कळेल ना."

"ओके आई."

4."काय रे होमवर्क आला होता का गणिताचा, स्निग्धा मावशीला फोन केला होता तर म्हणाली ध्रुवचा अभ्यास घ्यायचाय नंतर बोलू. तुझा झाला ना करून?"

वरती चार पद्धतीने संवाद कल्पिलेले आहेत त्याची खरंतर आणखी पर्मिटेशन्स-काॅम्बिनेशन्स होऊ शकतात. पण पालकत्वाच्या ढोबळमानाने ज्या चार पद्धती मानल्या जातात त्याचं प्रतिनिधित्व करणारे हे चार प्रकारचे संवाद

ते प्रकार अनूक्रमे असे- 1. Authoritarian, 2.Permissive, 3. Authoritative, 4. Uninvolved

Authoritarian पद्धत ही तशी परंपरागत चालत आलेली आहे. 

लालयेत् पंचवर्षानि, दशवर्षानि ताडयेत्|

प्राप्ते तू षोडशेवर्षे पुत्रंमित्रवदाचरेत्||

हे सुभाषित, तसंच छडी लागे छम् छम् असं सगळं ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो आणि थोडं तसंच अनुभवतही.

पण त्याचबरोबर 'कालाय तस्मै नमः' हे कसं विसरून चालेल? बदलत्या काळाबरोबर पाटे वरवंटे जाऊन मिक्सर आले, आता तर बाटलीतल्या टिकाऊ चटण्या किंवा इंस्टंट मिक्स. त्यात काही अडचण नाही पण पालकत्वासाठी, अरे आमच्या वडिलांनी नुसतं बघितलं तरी आम्ही चळाचळा कापायचो, वर डोळे करून बघायची आमची हिंमत नव्हती.. असा अजूनही जुन्याच फाॅर्म्युला? मान्य आहे की गेली कित्येक दशकं हा छडी लागे पॅटर्न सरधोपटपणे चालू आहे (अपवाद वगळता) मग आताच बदल का? तर पूर्वी पालकांना, शिक्षकांना मुलांपेक्षा जास्ती माहिती असायची. पण आज माहितीसाठी मुलं आपल्यावर अवलंबून नाहीत, किंबहूना आपल्यालाच टेक्नाॅलाॅजीचा वापर करताना त्यांची मदत घ्यावी लागते. अर्थात आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या मुलांना मिळावा हा विचार चुकीचा नाही. मुलांना नुसतीच माहिती असणं पुरेसं नसतं, ती योग्य त-हेने, योग्य तिथे आणि योग्य वेळी वापरता यायला हवी यासाठी आपली प्रगल्भता, अनुभव कामी येणार आहे. पण हे सांगण्यासाठी 'मी सांगते/तो म्हणून' ही पद्धत योग्य आहे का? हे वाक्य मनात भिती निर्माण करणारं आहे. आज इतर तणाव, स्पर्धा खूप वाढले आहेत. 

तर मग दुसरा Permissive चा पर्याय योग्य आहे का? तर म्हणजे मुलांना डोक्यावर चढवून ठेवावं, त्यांनी उद्धटपणे बोलावं असंही माझं म्हणणं नाही. मोठ्यांचा सकारात्मक धाक जरुर असावा. अर्थात दरवेळी हे इतकं सुटसुटीत सरळ असतंच असं नाही मुलं खूप चतूर असतात, ती आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल, मॅनिप्युलेटही करू शकतात. त्यामुळे सगळ्या दो-याही त्यांच्या हातात द्यायच्या नाहीत पण ती आपल्या तालावर नाचणा-या कळसुत्रीच्या बाहुल्या ही नाहीत हेही लक्षात ठेवलं पाहिजे. मुलांच्या मनात भिती निर्माण झाली तर एकतर ती घुमी होतात किंवा खोटं बोलू लागतात नाही तर बंडखोर होतात. त्याऐवजी त्यांच्याशी एक व्यक्ती म्हणून आपण वागलो तर आदरयुक्त, प्रेमयुक्त धाक निर्माण करू शकू. म्हणजे थोडक्यात मुलांना असा विचार करायला शिकवावं की अमुक एक गोष्ट केली तर आई-बाबांना आनंद वाटेल की वाईट वाटेल? 

यासाठी तिसरी Authoritative पद्धत अधिक प्रभावी ठरते. त्यात शिस्त तर लावायची पण मुलांना विश्वासात घेऊन सामंजस्याने नियम ठरवले जातात, त्याची कारणमीमांसा होते. 

चौथा Uninvolved ह्या प्रकाराशी आपला संबंध नाही असं वाटेल पण नवराबायकोतले ताणतणाव, करीयरमधल्या आकांक्षा, वेळेची गुंतवणूक यामुळे कितीदा कर काय करायचं ते असा autopilot mode दिसतोच की. 

तसं बघितलं तर वयानुरूप, परिस्थितीनुरूप चारही पद्धतीने पालक वागत असतात आणि एखाद्या वेळी एखाद्या पद्धतीने वागण्याची गरज असू शकते फक्त ते जाणीवपूर्वक असावं असं मला वाटतं. म्हणून हा लेखनप्रपंच. एकूण काय भितीचं वलय निर्माण करून काय साध्य होणार आहे? त्यापेक्षा ही आदरयुक्त, प्रेमयुक्त धाकाची सकारात्मक पद्धत अधिक परिणामकारक ठरेल नाही का? 

-अर्चना रानडे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा