नमस्कार,
वसंतात फुललेली कोवळी पालवी शिशिर येता येता पिकून पिवळी होते आणि झाडाचा निरोप घेऊन भिरभिरत खत व्हायला निघते. पिकून खत झालेलं पान पुनरपि तेच पान म्हणून कधीच फुटणार नसतं; पण ते पिकून गळतं झाडाला नवीन पान फुटावं म्हणून. सृष्टीचं एक चक्र पूर्ण होतं; पुढच्या नव्या चक्राची सुरुवात व्हावी म्हणून. प्रत्येक आरंभाचा अंत असतो तो नव्या आरंभाला अवकाश मिळावा म्हणून.
ऋतुगंधच्या २०१८-१९ च्या संपादन समितीच्या कार्यकाळाचाही अंत ह्या अंकासोबत होत आहे; तोही नव्या ताज्या समितीच्या नव्या प्रतिभांच्या आरंभाची नांदी म्हणूनच.
गेल्या वर्षात महाराष्ट्र मंडळाच्या सभासद असलेल्या व नसलेल्याही अनेक मराठी लेखक-कविंनी आम्हाला आपलं लेखन पाठवून सगळेच अंक बहारदार होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
त्याचबरोबर मंडळाच्या अध्यक्ष नलिनी थिटे व जनसंपर्क अधिकारी भाग्यश्री गुप्ते यांनी पूर्ण स्वातंत्र्य व वेळोवेळी मोलाचे सहकार्य दिले.
यशवंत काकड यांनी लेखक-कविंना व्यक्तिश: संपर्क साधण्यासाठी फार मोठी मदत केली.
या सर्वांचे आम्ही कृतज्ञतापूर्वक आभार मानतो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या लेखक-कविंना मन:पूर्वक प्रोत्साहन देणाऱ्या सर्व वाचकांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो. आपले प्रेम ऋतुगंधला असेच मिळत राहो ही प्रार्थना.
ऋतुगंधचा हा अक्षरविलय अंक आपल्याला आवडेल अशी आशा आहे. शेवटाच्या, अंताच्या, निरोपाच्या क्षणी दाटून येणाऱ्या भावना पकडणाऱ्या काही लेख-कवितांबरोबरच इतरही विषयांवरील लेख व कविता या अंकात आहेत.
शिवाय ‘कवी शब्दांचे ईश्वर साकारताना..’ व ‘सिनेसफर’ या दोन सदरांचे शेवटचे भागही या अंकात आहेत. अंकाच्या मांडणीबद्दल, अंकातल्या साहित्या बद्दल काहीही प्रतिक्रिया असल्यास ब्लॉगवर नक्की नोंदवा किंवा आम्हाला थेट कळवा.
ह्या अंकासोबत आपला निरोप घेतानाच पुढच्या समितीलाही आपले असेच प्रेम मिळो ही शुभेच्छा!
धन्यवाद!
-सस्नेह
ऋतुगंध संपादन समिती
२०१८-१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा