मुक्त्ती

ट्रेनने वेग धरला होता, रिमझिम पाऊस आणि त्यामुळे खुलणारे निसर्गाचे रूप मोहित करत होते. विश्वाच्या त्या अलौकिक सौंदर्याने मी भारावून गेले होते. किती सुंदर आहे हे जग आणि त्यापेक्षा सुंदर हि तरुणाई. मुलांचे हास्य विनोद,टाळ्या,गप्पा कानावर पडत होत्या आणि त्यांचा आनंद माझं मन नकळत अनुभवत होतं. 

‘मॅडम, थॅन्क यू’ तिचा आवाज आला आणि मी तिच्याकडे पहिले. सुमन शर्मा, काहीशी सावळी, तरतरीत, मृदु, मितभाषी, नाकी डोळी नीटस, नीटनेटकी, लाजरी, बुद्धिमान अशी ती माझ्यासमोर अदबीने उभी होती. 

‘कशाबद्दल?’ 

‘माझ्या वडिलांची समजूत घालून मला केरळला नेता आहात त्या बद्दल!’

‘अगं, त्यात काय इतके? साधी ट्रीप आहे. आपण काही कंपनी पाहणार आहोत, तुम्हा मुलांना फायदा होईल या अनुभवाचा’

‘अनुभवाचे माहित नाही पण.. मी पहिल्यांदाच घराबाहेर पडले आहे, मी आमचे गाव सोडून कधीच शहराबाहेर गेलेली नाही. घर, शाळा, महाविद्यालय आणि आजोळ या पलीकडे कुठेही नाही.. ’

‘का?’

‘आमच्यात तशी पद्धत नाही, पदवीधर होणारी माझ्या घराण्यातील मी पहिलीच स्त्री असेन, माझ्या वडिलांच्या मित्राने माझे मार्क पाहून त्यांची समजूत काढली कि हिला पुढे शिकव, पदवीधर कर, गरज आहे काळाची. मी खूप विनवण्या केल्या तेव्हा कुठे तयार झाले पण अनेक अटींवर.. कि मी महाविद्यालय सोडून कुठेही जायचे नाही, कुठल्याही मुलाशी बोलायचे नाही, मैत्रिणीचं वाढदिवस, त्यांच्याबरोबर फिरणे, फोनवर बोलणे व सिनेमा पाहाणे वगैरे काहीही नाही. मी तयार झाले कारण मला घराबाहेरचें जग पाहायचंय, मित्रं मैत्रिणींबरोबर हसायचं आहे आणि सुंदर आयुष्य जगायचे आहे.’

…आणि माझ्याकडे तिच्याशी पुढे संवाद करायला शब्दचं उरले नाहीत. ती तिथून निघून गेली पण तिचा कारावास मला उघड्या डोळ्यांनी दिसू लागला. या जमान्यात एखाद्याशी अशी वागणूक? एखाद्याच्या जगण्यावर, हसण्यावर आणि वागण्यावर इतकी बंधने? कारण तुम्ही त्या व्यक्तीला जन्म दिलात? कोणी दिला हा हक्क? कुठच्या कायद्यानें? वयाची २० वर्षं ही मुलगी कैदेत आहे आणि त्याला आईवडील ‘शिस्त’ हे नाव देत आहेत? शिस्त असावी पण अशी जीवघेणी नाही! योग्य अयोग्य गोष्टी मूलांना जरूर शिकवाव्या परंतु ती शिक्षा नसावी. 

सुमन रात्री माझ्या खोलीत झोपायला यायची...कारण तिच्या वडिलांची तशी अट होती. सर्व मुलं गप्पा गोष्टी करत रात्रभर जागी असत पण ती निमूटपणे १० वाजताच खोलीत यायची. कधी तक्रार नाही का नाराजी नाहीं. मग आम्ही दोघी खूप वेळ गप्पा मारायचो, तीला आवडणारी पुस्तकं, लेखक व तिच्या मैत्रीणींबद्दल खूप दिलखुलास बोलायची. बस्स, इतकेच विषय होते तिच्याकडे! घरच्यांबद्दल काही बोलली नाही ती. एक भाऊ आणि अजून २ बहिणी आहेत इतकेच कळले. जगाशी फारसा संबंध नसल्याने तीला अनेक गोष्टी माहीतच न्हव्त्या पण ईच्छा होती सुंदर आयुष्य जगण्याची, स्वतःचे विश्व निर्माण करण्याची. ४ दिवस कसे गेले कळलेच नाही. निघताना पुन्हा एकदा मनापासून आभार मानून गेली. 

वर्ष सरलं….पदवीच्या परीक्षा संपल्या आणि सुमनचा आणि माझा प्रवासही… 

त्यानंतर जवळजवळ २ वर्षांनी फेसबुकने तिच्या वाढदिवसाची आठवण करून दिली आणि मी मनापासून तिला शुभेच्छा दिल्या. काय करत असेल आता ती? खुश असेल ना? नोकरी करत असेल का? विचारांचा ओघ वाहत होता आणि माझा फोन वाजला. सुमनची मैत्रीण पलीकडे बोलत होती. 

‘मॅडम, सुमन गेली..’

‘काय?.. कधी?...कशी?’ मी स्तब्ध झालें… डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. गळा दाटून आला. तिचा निरागस चेहरा डोळ्यांसमोर उभा राहिला. 

‘तिने आत्महत्या केली...तिला १ वर्षाची मुलगी होती, तिचाही विचार नाही केला तिने. सासरी मारहाण होत होती आणि माहेरच्यांनी कधीही साथ नाही दिली तिला…तू आणि तुझं नशीब असं बोलत राहायचे तिला.’

‘हे तुला कोणी सांगितले?’

‘एकदा पळून आली होती ती माहेरी, तेव्हा भेटले होते तिला... म्हणाली जीव नकोसा झाला आहे मला, जगावेसे नाही वाटत. नैराश्य आले आहे. तहान भूक काही कळत नाही मला, झोप येत नाहीं आणि त्यावर मारहाण, माहेरचे सांभाळून घे असे बोलतात,जगात लाज जाईल आमची तू परत आलीस तर असे सांगून पुन्हा नवऱ्याकडे सोडून येतात आणि मग पुन्हा तेच चक्र चालू होतं…’ ‘काय करेल ती...कोणाचा आधार नाही...जीव नाही देणार तर काय करेल?’

मी फोन ठेवला आणि स्वतःची लाज वाटू लागली. तिला उत्तम अभ्यास शिकवला पण कसं जगायचं हे शिकवायला विसरले?आयुष्यभराचा घोर लावला हिने. 

पण शिक्षक म्हणून ते माझं काम होतं कि ती तिच्या जन्मदात्यांची जबाबदारी होती? खंबीर राहणे, स्वतःचा आत्मसन्मान जपणे आणि आलेल्या प्रसंगाचा धीराने सामना करणे हे कोणी शिकवायचे? 

आपण जगरूपी एका भ्रामक विश्वात जगात असतो, कोण काय म्हणेल याचा जास्त विचार करतो आणि बळी त्या निष्पाप जीवाचा देतो ज्याला त्याची साधी कल्पनाही नसते. लोकं काय म्हणतील या पेक्षा तुला काय हवं आहे याचा जर विचार केला तर असे अनेक अपराध टळू शकतील. सुमन तर तशीच वागली जशी तिच्या जन्मदात्यांची इच्छा होती मग तिला का साथ नाही मिळाली त्यांची? जर तीला तिच्या नशिबावर सोडायचे होते तर का नाही जगू दिले तिच्या 

मनासारखे? तिला नैराश्याच्या गर्तेत का ढकलले कि ती इतके कठोर पाऊल उचलेल?

मी असे अनेक पालक पहिले ज्यांना त्यांच्या पाल्याच्या भवितव्यापेक्षा जगाचे जास्त पडले होते. आम्ही लोकांना काय तोंड दाखवू जर आमचा पाल्य नापास झाला तर असे विचित्र प्रश्न मला विचारात असत. म्हणजे त्या मुलाची प्रगती, आवड निवड ही जगाच्या इच्छेवर अवलंबून असावी हा किती हीन विचार आहे. कित्येक प्रतिभाशाली मुलें हि नैराश्यमय जीवन जगात असतात कारण त्यांना पालकांचा पाठिंबा नसतो. काही मुलें मूकपणे हे दुःख पचवू शकतात तर काही मुलें हताश होतात. त्यांच्यावर घरी होणारा अन्याय ती कधीही सांगत नाहीत आणि त्यामुळे शिक्षकांना मुलांना अशा बिकट परिस्थितीतून बाहेर काढणे कठीण असते. माझ्या मते संस्कार करणं म्हणजे मुलांच्या तोंडची स्तोत्रं किंवा त्यांनी दबून राहणं नाही तर त्यांना एक मनमोकळं, सरळसोट आयुष्य देणं आहे. 

काय मिळवले असेल सुमनच्या आईवडिलानी? कुठचा मानसन्मान? कुठची प्रतिष्ठा?

पण सुमनने तिच्या या निर्णयाने कदाचित खूप काही मिळवले असावे...तुरुंगातून सुटका, यातनेतून बचाव, नात्यांमधून निसटणे आणि आयुष्यातून मुक्ती…. 


तेजश्री दाते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा