आनंदोत्सव

ऋतुगंध वर्षा  वर्ष १३ अंक ३
कधी हा आपल्यासाठी, गगनात  नाही मावत 
तर कधी ह्या मनाचे मडके, थेंब भर नाही भरत 

आनंदात सुख असतं, का सुखात आनंद असतो?
हा प्रश्न नेमका मनाला,  बुचकळ्यात  पाडतो 

कधी अकस्मात याच्यावर, विरजणही  पडतं 
तर कधी लहानशा  गोष्टीत यास, मन अनुभवतं 

पैशासारखाच हा बरेचदा,  येतो आणि जातो 
ध्यास आणि शोध याचा, अविरतच  चालतो 

मी म्हणतो हा दीर्घकाळ, मनात का नाही टिकत?
वृत्तपत्र अन  बातमी समान, शिळा का लगेच  ठरत? 

पाहुणा म्हणून तो मनात, अल्पावधीच  थांबतो 
कोंडून त्याला ठेवण्याचा, पर्यायही  नसतो 

कस्तुरी मृगासमान मन, त्याला शोधत हिंडतं फिरतं 
हाती न येणारं जणू, फुलपाखरू भिरभिरतं  

 मिळाला नाही स्वतःस तरी, दुसऱ्यांना वाटता येतो 
अन नंतर तो आपल्या दिशेने, शतपटीने येतो 

आनंद वर्धक ठरू शकतं, जगातलं प्रत्येक नातं 
पण तितकीच क्षमता त्याची, हिरावूनही ते नेतं 

कला, क्रीडा, निसर्ग, साहित्यात, कणाकणात लपला 
ज्यांनी घेतला आस्वाद त्यांच्या, रोमरोमात उतरला 

म्हणून छोट्या-मोठ्या आनंदाचा, भरणा मनी साठवा  
गुंतवणूक ही  वाढवा, सतत सहवास त्याचा आठवा 

साजरा होऊ द्या  सृष्टीचा, महाकाय महोत्सव 
सहभागात द्या वाटा आपला, एक आनंदोत्सव! 


- नंदकुमार देशपांडे 


   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा