भय इथले संपत नाही ....

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

 भय म्हटले की त्याचा अर्थ संदर्भाप्रमाणे, व्यक्तिगणिक अनेक प्रकारे बदलू शकतो. कोणाला भुताखेताचे भय वाटेल तर काहींना चक्क काही विशिष्ट माणसांचे भय वाटू शकते , कोणा विद्यार्थ्याला एखाद्या विषयाचे नाव ऐकून घाम फुटत असेल तर एखाद्याला समोर पोलीस दिसल्यावर आधार वाटायच्या ऐवजी घाबरायला होत असेल. कोणाला संभाव्य धोक्याची भीती तर कोणाला फसवणुकीची , कोणास परीक्षेचे भय तर कोणास निकालाचे , कोणाला ज्ञाताची भीती तर कोणाला अज्ञाताची, कोणाला देवाची भीती तर कोणाला राक्षसाची , भीती प्रत्येक व्यक्तीला कशाची तरी वाटत असते हे नक्की . थोडक्यात काय , भयविरहित व्यक्ती कदाचित कुणी नसेलच किंवा अत्यंत दुर्मिळ. भीती ही कोणास कशाची वाटू शकेल हे सांगणे कठीण. प्रत्येकाची कारणे वेगळी , त्याला तोंड देण्याचे प्रकार वेगळे.

भय , भीती ह्या भावनेचा नेमका उगम आपल्या जीवनात कसा होतो हा एक संशोधनाचा विषय नक्की होऊ शकतो. लहानपणी खाऊ घालताना आईने सहज वापरलेल्या बागुलबुवाची भीती जशी बाळाला पटपट जेवायला उपयोगी पडते पण तेव्हाच कुठे तरी ती मनात त्या अज्ञात बागुलबुवाला स्थान देऊन जाते.

माझ्या लहानपणी ह्या भावनेचा शिरकाव माझ्या आयुष्यात अनेक वाटांनी झाला. खरे तर माझे लहानपण अगदी गजबजलेल्या तुळशीबागेत गेले, अन ते सुद्धा चहूबाजूंनी सुंदर देवळांच्या सान्निध्यात गेले. तरीपण त्याच तुळशीबागेत रात्रीच्या वेळी एखादा नऊ ते बाराचा चित्रपट पाहून घरी आले आणि तुळशीबाग मुख्य दरवाजा बंद करून आणि हो, दिंडी दरवाजाही बंद करून निद्रिस्त झाली की मात्र एका चिंचोळ्या जिन्याने तुळशीबागेत प्रवेश करताना अंगावर काटा यायचा अन तोच जिना उतरून आपल्या घराच्या दिशेने धूम ठोकताना समोर प्रत्यक्ष मारुती उभा असला तरी घरात पाऊल टाकेस्तोवर अनेकदा रामाचा जप करून झालेला असायचा त्यात आमच्या एखाद्या खोडकर भावाने ‘अग तिकडे बघ कोणीतरी उभे आहे’ म्हटले की मी तर किंचाळतच घरी पोचत असे. अशा अनेक रात्रीचा तुळशीबागेत प्रवेश आठवून अजूनही अंगावर शहारा येतो. किर्रर्र रात्रीची सुनसान , निर्मनुष्य तुळशीबाग कशी असते हा अनुभव घेण्याचा प्रकार आहे.

अशाच भय भावनेला जर कुणी खतपाणी घालून ती माझ्या मनात पक्की अजून कोणी रुजवली असेल तर माझ्या मराठी वाचनाने. रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक आणि अनेक हिंदी , इंग्रजी चित्रपटांनी , महल, बीस साल बाद , ओमेन , हाऊस ऑफ वॅक्स , मेरा साया , सायको , ड्रॅकुला, एक्झॉर्सिस्ट हे सर्व चित्रपट माझे जीवन ह्या भयरसाने पुरेपूर समृद्ध करण्यात खूप अर्थाने यशस्वी झाले आहेत. कधीही एकटे असले तर नेमके हे चित्रपट आणि त्यातले नेमके सीन का ठेवतात हे अजूनही ना कळलेले कोडे आहे.

अशातच माझ्या बालपणी एक अगदीच जगावेगळा आणि फार कमी भाग्यवंतांच्या... की ‘भयवंतांच्या’ म्हणू ... असा एक अत्यंत रोमहर्षक आणि तितकाच सुखदायक अन रोमांचक असा अनुभव नशीबाने मिळाला आणि तो म्हणजे आमच्या आत्याच्या सासुरवाडीकडे. माझी सक्खी आत्या श्रीमती सीतादेवी (निलाराजे) रामचंद्र ऊर्फ भय्यासाहेब बावडेकरची पत्नी आणि ते ठिकाण म्हणजे तब्बल पाच छत्रपतींचा पराक्रमी कार्यकाळ पाहिलेले हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांचा पळसंबे येथील तब्बल ९० वर्षे वर्षापूर्वीचा वाडा.

लाल मातीच्या कच्च्या सडकेवरून दुतर्फा लावलेल्या गर्द झाडीतून वाड्याच्या मुख्य गेट जवळ येऊन पोचलो की डोळ्याचे पारणे फिटेल असा हा भव्य वाडा , अन तिथे आम्हाला जाण्याचा अनेकदा योग आला तो आमच्या आत्याच्या प्रेमळ आतिथ्याने , उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही अनेकदा तिथे जात असू. वाड्याचा निसर्गरम्य परिसर, बऱ्याच मराठी चित्रपटांचे चित्रीकरण होत असते.खास करून भरत जाधव यांचा 'पछाडलेला ' चित्रपटामुळे हा जनमानसात लक्षात राहिला आहे.

कल्पना करा आजपासून तब्बल ३०-३५ वर्षांपूर्वी जेव्हां त्या भागात अजिबात वर्दळ नव्हती , वीज नव्हती , चारी बाजूंनी घनदाट झाडी आणि मध्यात वसलेला हा एकाकी भव्य वाडा , आसपास मैलोनमैल काहीच वस्ती नाही , आणि तिथे आमचे सुट्टीतले वास्तव्य , संध्याकाळपासूनच आमची पाचावर धारण बसायला सुरवात व्हायची आणि एकदा मिट्ट काळोख पडला की मग तोच अत्यंत आकर्षक, सुंदर वाडा मला तरी अत्यंत भयावह वाटत असे. कंदिलाच्या उजेडात बसून ऐकलेल्या भूताच्या गोष्टी आठवून आत्ताही माझ्या मनाचा थरकाप उडतो. वातावरणात जरा हलकेपणा आणायला आमच्या गाण्याच्या भेंड्या आणि एकमेकांच्या अगदी जवळ बसून केलेल्या गुजगोष्टी आम्हा सर्व भावंडाना खऱ्या अर्थाने भीती कशास म्हणतात हे शिकवून गेला.

‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात तसे असेल पण ह्या वाड्यात जे एक गूढ , रहस्यमय वातावरण जाणवते ते अत्यंत खास आहे आणि जे लोक तिथे वास्तव्यास जातील त्यांना ते नक्कीच जाणवेल. रोजचा आमचा तेथील दिनक्रम एखाद्याला हेवा वाटण्यासारखा असे, मग ते नदीत डुंबणे असेल किंवा चुलीवरचे स्वादिष्ट भोजन असेल , जवळपासच्या डोंगरावर संध्याकाळी उशिरापर्यंत केलेली स्वच्छंद भटकंती असेल किंवा रात्री आजूबाजूच्या जंगलात 'शिकारीसाठी [तेव्हा बंदी नव्हती ] गेलेल्या अनेक रात्री असतील,रंगलेल्या पत्त्यांचे डाव वा भेंड्या , ह्या सर्व कार्यक्रमात मनात सतत जाणवत असलेली भीती , कदाचित मी अति घाबरट असल्याने 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' ह्या उक्तीप्रमाणे मला जाणवत असेल पण एवढ्या प्रचंड मोठ्या वाड्यात एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातानासुद्धा मला दिवसा ढवळ्या घाम फुटत असे.

ह्यात भर घालायला की काय अनेक मराठी चित्रपटांनी ह्या बंगल्याचा वापर भुताटकीवर आधारित चित्रपटांसाठी केला आणि माझी ही भीती अजूनच पक्की केली. असो. पण आमचे ह्या अद्भुत वास्तूतील मंतरलेले दिवस आजही मला आठवले तरी मन अति सुखावते अन माझ्या समृद्ध बालपणाचा सार्थ अभिमान वाटतो. आजही बावडेकर कुटुंबियांचे कोणतेही आमंत्रण म्हणजे आम्हाला स्वर्गसुखाची पर्वणी वाटते ते ह्याच अनुभवाच्या शिदोरीमुळे.

आता जीवन इतके वेगळ्याच चाकोरीतून चालले आहे की भय आहे पण ते भलत्याच शंकांचे आणि असुरक्षिततेचे. मग ते आंतरराष्ट्रीय आतंकवादाचे असेल किंवा बदलत्या जीवनशैलीतील आव्हानांचे असेल , दुरावलेल्या आप्तस्वकीयांच्या काळजीचे असेल किंवा वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आजारांचे , त्याबरोबर आपल्या जबाबदारीचे असेल. 'भय इथले संपत नाही' हेच खरे आहे.

- रमा अनंत कुलकर्णी







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा