नवख

ऋतुगंध वर्षा  वर्ष १३ अंक ३

मे महिन्यात अवेळी पाऊस आला, विजांच्या कडकडाटासकट आणि लोकल ट्रेन्स ठप्प झाल्या.(तशा त्या व्हायला काही कारण लागतं, असं नाही) बातम्या दाखवितांना कॅमेरा फिरत होता साऱ्या स्टेशन्सवरून. अफाट गर्दी. छ.शि.ट.वर कॅमेऱ्याने टिपलेला एक नंबर प्लॅटफॉर्मवरील कॉफीचा स्टॉल पाहिला आणि मन एकदम 2002 मध्ये गेले.

असाच मे महिन्यातील एक दिवस. भाजून निघायचेच ते दिवस आणि अचानक आभाळ भरून आले आणि काही कळायच्या आत सारी मुंबई मुसळधार पावसाने चिंब झाली. दीड तास कोसळलेला पाऊस लोकल्स बंद करून गेला. साडेसातच्या सुमारास छ.शि.ट.ला आले, तर इंडिकेटर ५.३१, ५.३७..दाखवित होते.. एकही मैत्रीण दिसेना. जरा बाजुला उभे रहावे म्हटले तर कॉफीचा गंध दरवळला. गर्दीने स्टॉल पार झाकून गेला होता. नेहमी तिकडून जाताना कॉफीचा मोह होई, पण ट्रेन पकडायची घाई. घेऊ या कॉफी म्हणून त्या गर्दीचा एक भाग झाले. एका बाजूला उभी राहून कॉफीचा आस्वाद घेतांना परिस्थिती न्याहाळू लागले. इंडिकेटर अजूनी ठप्प. सुट्टीमध्ये मुंबई दर्शनाला आलेले लोक मुलाबाळांसकट अडकले होते. बघता बघता माझे डोळे दोन मुलींवर स्थिरावले. १५/१६ वर्षांच्या, इथल्या वाटत नव्हत्या. अस्सल मुंबईकर सहज पारखतो, कोण इथलं, कोण नवखं! भांबावलेल्या, काहीशा घाबरलेल्या. आधी वाटलं, कधी नव्हे त्या दोघीच आल्या असतील लोकलने मुंबई पाहायला नि सापडल्या या प्रचंड गर्दीत. पण नाही, कपडे जरा जुने, चुरगळलेले, पाठीवर साध्या सॅक्स, साध्या चपला! कॉफी संपवून त्यांच्याकडे गेले. 

“कहां जाना है?” एक नाही की दोन नाही. 

“कोई है क्या साथ में”. मुंडी हलली, नाही म्हणून.

“ कहां रहती हो?”...... डोळ्यांत पाणी.

“मुंबई में रहती हो ?” आता बांध फुटायचाच राहिला. 

एकीच्या खांद्यावर हात ठेवीत म्हटले, ”भागके आयी क्या?”

डोळे मोठ्ठे!!..... कसं कळलं न सांगता? माझ्याच पोटात खड्डा. या कोवळ्या पोरी. अशा बावळटपणे, भांबावून उभ्या आहेत, की कोणीही फसवेल. 

“कभी आयी इधर?”

“ पांच बजे”

“किधर जायेगी?”

हळूच एक कागद पुढे केला, गोरेगाव फिल्म स्टुडिओचा पत्ता! देवजाणे कुठून मिळविला होता.

“कोई पहचानवाला है क्या?” ... मुंडी हलली. दोन मुस्कटात द्याव्या वाटल्या.( दिल्याही मनातल्या मनात)

“ कुछ खाया क्या?”

“ “

कॅन्टीनच्या दिशेने नेले. आत जाणे अशक्य. त्यांना तिथेच उभे करून, मावळ्याच्या शिताफीने आत घुसून समोसे, वडे, जे काही मिळाले ते घेऊन आले. खाल्ल्यावर जरा तरतरी आली दोघींना. बोलते केले मग. कानपूरजवळील एका गावातून पळून आल्या होत्या घरच्या गरिबीला कंटाळून. फिल्ममध्ये काम करण्यासाठी. शुद्ध हिंदीवाल्या त्यांना माझ्या भैय्याच्या हिंदीत समजाविले, “कोणाच्या हाती पडाल नि वेश्या म्हणूनच मराल”....हे चित्र उभे केले. पटले बाबा त्यांना. घाबरल्या, आईबाबांच्या आठवणीने रडू लागल्या. परत जा, मी ट्रेन दाखविते म्हटल्यावर, निघाल्या, परत थबकल्या. पैसे कुठे आहेत परत जायला? अरे देवा! या पोरी आज इथे राहत्या, तर नक्की फसल्या असत्या.

“चलो”... एकदा पाण्यात पडल्यावर पोहायला हवेच ना? तात्काळमध्ये तिकीटे घेतली. ज्या ट्रेनने आल्या तीच ट्रेन पाऊण तासाने (इंडिकेटर प्रमाणे) सुटणार होती. त्यांचे बर्थ दाखवून आजूबाजूला नजर फिरविली. एक जोडपे दोन छोटी मुले, पाहून बरं वाटलं.

“ बीचमे उतरना नही, सीधे घर जावो और आगेकी पढाई करो, समझा क्या ?”

दोघींनी मुंडी हलविली. उतरताना, १०० रुपयांची नोट हातात ठेवून, ”संभालो, दुनिया बुरी है, बेटा.” आता मात्र त्यांच्या बांध फुटला. आवेगाने बिलगत म्हणाल्या, ”शुक्रिया मौसीजी!”

“वापस कभी घर न छोडना “....... हळूच कुजबुजले. “ट्रेनमे भी कुछ न बोलना” .

पुन्हा लोकलकडे आले. साऱ्यामध्ये दीड तास सहज गेला होता. पण गाड्या सुरू होऊन गर्दी पांगली होती. गर्दीत हताशपणे उभे राहण्यापेक्षा या वेळात दोघींना वाचविण्याचे कार्य अनपेक्षितपणे झाले, असा आनंद चाटून गेला मनाला.


नीला बर्वे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा