ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६
ह्या भूतलावर मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे ज्याला काही अनमोल देणग्या मिळाल्या आहेत. हसू , आसू आणि आठवणी या त्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत .
तुम्ही कधी विचार केलाय आपल्याला हसू कधी येते ?
(वर्तमानात) आपल्याला आवडणारी चांगली किंवा विनोदी घटना बघितली की आपण हसतो . आणि (भूतकाळातल्या ) चांगल्या आठवणींनी आपल्याला खुद्कन हसू फुटते . तर कधी आपल्याला नको असणाऱ्या आठवणींनी आपण दुःखी होतो. क्वचित डोळ्यातून टपकन एखादा अश्रू खाली पडतो . कदाचित (भविष्यात) या लेखाच्या आठवणीने तुम्हाला खुदकन हसू फुटेल (माणसाने नेहमी आशावादी असावे अशी एक Whatsapp वर वाचलेली ओळ आठवली).
म्हणूनच .... हसू आणि आसू बरोबर “ आठवणी” ही मानवाला मिळालेली ईश्वरदत्त देणगी असे म्हणता येईल . माणसाचा मेंदू , जन्मल्यापासून अनेक आठवणी साठवत जातो. मेंदू जसा विकसित होत जातो तशा आठवणी या वेगवेगळ्या स्तरातून साठवल्या जातात. काही आठवणी पूर्ण पुसल्या जातात तरी मेंदूच्या आतल्या स्तरात अबोध अवस्थेत असतात. कोणीतरी आठवण करून दिली तर बेधडक धडक देऊन सुळकन पृष्ठभागावर येतात . म्हणूनच कोणाची आठवण अगदी साठवणीतली. तर कोणाची आठवण अगदीच आळवाच्या पानावरच्या पाण्याच्या थेंबासारखी सुळकन निसटून जाणारी.
प्रत्येकाची आठवण वेगळी . तिचा पोत वेगळा . रंग,रूप , आकार वेगळा. व्यक्ती तितक्या प्रकृती .प्रकृती तितक्या आठवणी.
ऋतुगंधने ‘आठवणी’हा विषय निवडून आज माझ्या काही आठवणींना हलवले आहे . थंडीत जशी हलकीशी शेकोटीची ऊब हवीशी वाटते . अगदी तशीच सुखद आठवणींची शाल पांघरत मला गोष्टींची शेकोटी पेटवायला आवडेल . चला तर, लहान लहान गोष्टींची काडी काडी जमवत ह्या शेकोटीच्या उबेला राहूया .
अहो , या काड्या आहेत अर्थातच बालपणीच्या गोष्टींच्या ! कोणतीही आठवण बालपणातल्या आठवणींना बरोबर घेतल्या शिवाय पुढेच जाऊ शकणार नाही .
तर आता ही ‘पूर्वीची’आठवण असल्यामुळे ‘त्यावेळी’ह्या शब्दाचा वारंवार प्रयोग होणार ह्याची खात्री बाळगा .
“त्यावेळी”कुठे प्रवास करायचा असेल तर आता सारखी हात दाखवून टॅक्सी करायची अशी चैन ( त्यावेळी त्याला चैनच म्हणायची ) आम्हाला माहित नव्हती. ऑटो रिक्षाचा जन्म झालेला नव्हता . मुंबईला रेल्वे स्टेशनबाहेर मस्त घोडागाड्या उभ्या असायच्या . उंच , धष्टपुष्ट शुभ्र पांढरे ,तपकिरी रंगाचे घोडे आपल्या भरघोस शेपट्या हलवत उभे असायचे . त्यांच्या समोर गवताचा भारा पडलेला असायचा . त्यांचे काळेभोर टपोरे डोळे शांतपणे जग न्याहाळीत असायचे . रेल्वे स्टेशन बाहेर पडले कि त्यांच्या अंगाचा एक वेगळाच वास हवेतून तरंगत नाकात घुसायचा .अगदी गोष्टीतल्या आटपाट नगरात असल्या सारखे वाटायचे.
ते शांत वातावरण . थोडीफार माणसांची वर्दळ . बोरिवली स्टेशन बाहेर हिरव्यागार झाडांच्या वाड्या होत्या .रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा मेंदीची झाडे . विहिरीला मोट लावलेली असून एक शुभ्र रंगाचा बैल ती ओढताना अजूनही डोळ्या समोर येत आहे . आता माझ्या मुलीला किंवा आताच्या पिढीला मोट म्हणजे काय ते चित्र काढून समजावे लागेल . आणि ही काय फार जुनी गोष्ट नाही. पण काही वर्षात काळ एव्हढा झपाट्याने बदलला नाही ?. त्या धूर ओकणाऱ्या आणि कर्कश्य आवाज करीत कानाचे पडदे फाडणाऱ्या ऑटो रिक्षा आल्या आणि त्यांच्या सारखेच माणसानेही आपले रूप झटपट बदलले . सबकुछ जल्दी . कुठे थांबणे नाही . ठहराव नाही. असो.
तर त्या आटपाटनगरात प्रवास करायला खूप मजा यायची . मी असेन फार तर दोन तीन वर्षाची . कुठे गावाला
प्रवासाला निघाले की आम्ही बऱ्याचदा एस. टी.ने जात असू. लांबच्या प्रवासात एखादा हॉल्ट असे . मग एस टी कॅन्टीन मध्ये शिरून गरम गरम बटाटा वडा खाणे म्हणजे सुखाचे निधान . अहाहा! गरमागरम बटाटेवड्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.
त्यावेळी आई बाबांना आपल्या तीन वर्षाच्या चिमुरडीला कॅन्टीन आले रे आले कि बरोब्बर भूक लागणार हे माहित होते .अगदी भुकेने कासावीस होत असे मी. आता ते आठवले की हसून पुरेवाट होते . ह्या आठवणींची आणखी एक पोटआठवण;
मालाडच्या(मुंबई) रेस्टॉरंट मधला चविष्ट मसाला डोसा मला खूप म्हणजे खूपच आवडायचा .ते रेस्टॉरंट जवळ आले की माझे पाय दुखायला लागत आणि अस्मादिक चक्क रस्त्यावरच बैठक मारत . ( त्यावेळी वय असेल चार साडेचार वर्षे .रस्ते अगदी स्वच्छ आणि मोकळे असत ) . घरातील सगळेच आई - बाबा ,मामा, काका ; माझे lad करत . सगळ्यांची मी घरातील पहिलंच मूल म्हणून खूप लाडकी .अर्थात त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती . सगळ्यांना माझी ही युक्ती (?) माहीत झाली होती . तरीही बिचारे साळसूदपणे माझे लाड पुरवत .
तर या पोट आठवणीतून बाहेर येऊन पुन्हा मुख्य आठवणी कडे वळूया.
एक दिवस आम्हाला रायगड जिल्ह्यात जायचे होते . आम्ही कोकणात जाणारी एस.टी . पकडली . आईने मला छान घेरदार असा अबोली रंगाचा फ्रॉक घालून तयार केले . आम्ही एस .टी. ने निघालो . मध्येच एका ठिकाणी एस टी ने हॉल्ट घेतला . आमची स्वारी (without fail ) कॅन्टीन कडे वळली. बटाटे वड्याच्या वासाने खूपच भूक लागली होती . माझे खाऊन झाले . समाधानाची, तृप्तीची लाट लॉलीपॉप खाल्यासारखी मनावर पसरली होती .बाबा काउंटर वर पैसे देत होते .मला काय वाटले कुणास ठाऊक ? मी पटकन आईचा हात सोडला आणि समोरच दिसणाऱ्या एस.टी . त जाऊन बसले. ती एस टी कुठे जाणार होती ते कुणाला ठाऊक ? मी एस.टी.च्या खिडकीतून बाहेरची मज्जा बघण्यात दंग झाले.
इतक्यात आईच्या लक्षात आले की आपली कन्या हात सोडून कुठे तरी गायब झाली आहे .तिच्या तोंडचे पाणीच पळाले . शोधाशोध चालू झाली . कुठे शोधणार ? कॅन्टीन, बस स्टॅन्ड, दुकाने , प्लॅटफॉर्म कि रस्ता? आरे बापरे समोर अनेक लाल बसेस रांगेत उभ्या होत्या . कुठल्या बसमध्ये तर नसेल ना गेली ? आई बाबा अक्षरशः वेड्या सारखे इकडे तिकडे शोधू लागले . तेव्हढ्यात मीच त्यांना पाहिले आणि खिडकीतून हाक मारली . मला त्या बसमध्ये बसलेली बघून त्यांनी डोक्याला हात लावला आणि सुटकेचा निश्वास सोडला . ती बस भलतीकडेच निघाली होती , किंबहुना ती बस इच्छित स्थळीच चालली होती ,माझीच गाडी रूळ सोडून भलतीकडेच धावायला बघत होती.
त्या दिवशी मी आई बाबांना बघितले नसते , त्यांना हाक मारली नसती तर माहित नाही आज माझे स्टेशन कोणते असते!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा