विश्वास - एक अनुभूती

प्रत्येकाच्या आयुष्यात पूर्वानुभव व समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व अतिशय महत्वाचे असते. पूर्वानुभवावरूनच कोण माणूस, कोणावर किती भरवसा किंवा विश्वास ठेवायचा हे ठरवत असतो . तसेच समोरच्या व्यक्तीचे आपल्याशी नाते व त्याचे व्यक्तिमत्व त्याच्यावर विश्वास ठेवण्याकरता पुरेसे असते. एकदा जरी वाईट अनुभव आला असेल तर परत विश्वास ठेवणे जड जाते. 

दुसऱ्यावर असलेला विश्वास , अंधविश्वास आणि आत्मविश्वास हे दाखवून देणाऱ्या बऱ्याच घटना किंवा किस्से आपल्या अवतीभोवती दररोज घडत असलेले दिसतात. 

आपल्या कडे किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून जरी कोणी आपल्यावर विश्वास ठेवला तर त्यावेळी एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती होते. आम्ही इथून सुट्टीवर गेलो असताना मी व माझा मुलगा एकदा दादरला एका पुस्तकाच्या दुकानात गेलो होतो व एक महत्वाचे रुपये पांच हजाराचे पुस्तक आम्हाला हवे होते. पैसे द्यायला पर्स उघडली तर लक्षात आले की पैशाची आतली पर्स घरीच राहिली . दुकानदाराला तसे सांगितले कि आम्ही घरी जाऊन उद्या पैसे घेऊन येतो.आणि पुस्तक घेऊन जातो . त्यांने क्षणाचाही विचार केला नाही व पुस्तक मुलाच्या हातात दिले व म्हणाला, " बाळा, आईला सांग, काही काळजी करू नका. पुस्तक तुला हवे आहे ना ? घेऊन जा. पैसे नंतर आणून द्या" आम्ही दोघेही उडालोच. भारावून गेलो. का तर आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून या माणसाला आपल्यावर इतका भरवसा ठेवावासा वाटला. मुलगा घरी जाताना सतत म्हणत होता की " आई, अगं त्या दुकानदारांने आपला पत्ता विचारला नाही, फोन नंबरही घेतला नाही व इतके महाग पुस्तक तसेच घेऊन जा म्हणाला" मी त्याला म्हटले, " विश्वासाचे हे मोठं प्रमाणपत्र आहे. आता आपली जबाबदारी आहे कि त्याने दाखवलेल्या विश्वासाला आपण खरे उतरणे." ते पैसे त्या दुकानदाराला देई पर्यंत मला चैन पडेना. तासाभरातच आम्ही ते पैसे दुकानात जाऊन देऊन आलो. 

पूर्वी आमच्याकडे एक माळी बाग कामाला येऊ लागला . नवीन असल्यामुळे त्याच्या स्वभावाबद्दल काहीच माहिती नव्हती. पण नेहमी आमच्याकडे धुणी भांड्याचं काम करणाऱ्या शांताबाईंच्या ओळखीचा होता तो .त्यांच्या शेजारच्याच घरात रहायचा . बाईंनी आम्हाला आधीच सांगितलं होतं कि याला काम झालं कि त्याचे पैसे द्या. जास्तीचे देऊ नका . वर्षभर त्याने छान काम केलं. कधी एक्सट्रा पैसे मागितले नाहीत .

पण एक दिवस दुपारी आला. कामाचा दिवस नसल्यामुळे आम्हाला आश्चर्यच वाटले . बराच वेळ काही न बोलता एका कोपऱ्यात बसून राहिला .चेहरा पडलेला होता आता हा रडायलाच सुरुवात करतो कि काय असा हावभाव होता . आम्ही दोघांनीही न राहवून शेवटी विचारले, तर म्हणाला, “काय सांगू बाई, आठ दिवसापूर्वी माझी ८ वर्षाची मुलगी बाहेर खेळत होती, तिला गाडीने धक्का दिला .खूप लागलं होतं. मेंदूला मार लागला होता . हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली होती तीला .पण नाही वाचू शकली हो . सकाळीच वारली हॉस्पिटल मधे.” असं सांगून जोरात रडायला सुरुवात केली त्याने. काय करावे आम्हाला समजेना . बापरे ! एवढी मोठी घटना घडली आणि आपल्याला काहीच कळले नाही ?. आम्ही जरा सावरून त्याला विचारले ." अरे, आज तू इथे कसा आलास मग ? तुला काही मदत हवी आहे का ?" तो म्हणाला ' हो साहेब, मला पैसे दिलेत तर बरे होईल. हॉस्पिटलचं बिल भरल्याशिवाय बॉडी देणार नाही असं सांगितलंय आणि माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत हो. काय करू ? मुलीचे अंत्य संस्कार तर करायला हवे ना लौकर “ असं म्हणून परत रडायला लागला. म्हणजे हा मुलीची बॉडी हॉस्पिटलमध्ये ठेऊन पैसे मागायला आला होता तर. पटकन उठून त्याला हवे असलेले पैसे दिले आणि तो निघून गेला .

तो संबंध दिवस डोक्यातून विचार जात नव्हता .काम सुचत नव्हते . वाटत होतं काय बिचा-यावर वेळ आली .मुलगी अक्सिडेंट मध्ये वारली आणि ह्याच्याकडे पैसे नाहीत बिल भरायला. अशी वेळ येऊ नये कोणावर . पण बरं झालं, अश्या वेळेला आपली मदत झाली ते . 

दुसरा दिवस उजाडला .आमच्या शांताबाई नेहमीप्रमाणे कामाला आल्या. आल्या आल्या त्यांना या घटनेबद्दल विचारलं . त्या तर अवाकच झाल्या . म्हणाल्या “ काय सांगताय बाई ? चक्क फसवलं कि त्यानं तुमास्नी. काय बी झालेलं न्हाय मुलीला त्येच्या. माज्या शेजारीच घर हाय ना त्येचं . मला कलल्याबिगर राहील काय ? . आत्ता मी आलो तेंव्हा खेलत व्हती ना चांगली रस्त्यावर.” आम्हाला अजून एक मोठं धक्का होता तो . मनातल्या मनात एकीकडे त्याचा राग आला होता आमचा विश्वास तोडल्याबद्दल . पण बरं वाटत होतं ते त्याची मुलगी सहीसलामत असल्याबद्दल . 

पण काहीही म्हणा, कुणीतरी जर आपला विश्वास मोडला तर जन्मभर आपण ती घटना विसरूच शकत नाही . असं म्हणतात कि वेळ, तोंडातून गेलेला शब्द आणि गेलेला विश्वास कधीच परत येत नाहीत . 

आत्मविश्वास माणसाच्या स्वभावात उपजतच थोड्याफार प्रमाणात असतो . आजूबाजूला याच्या वाढीला जर पोषक वातावरण असेल ,जवळच्या माणसांचा सपोर्ट असेल, तर हा आत्मविश्वास हळूहळू वाढीस लागतो . तसाच तो माणूस जर स्ट्रॉंग असेल तर त्याचा आत्मविश्वास कधीच ढळत नाही .

आत्मविश्वासाच्या जोरावर शून्यातून जग निर्माण करण्याची क्षमता असलेले अनेक लोक आपल्या अवतीभवती दिसून येतात . आपल्याला माहित असलेल्या सिंधुताई सपकाळ हे त्यातलेच एक उदाहरण आहे . सासरच्या माणसांनी खोटा आळ घेऊन प्रेग्नन्ट असताना घरातून बाहेर काढले. गाई म्हशींच्या गोठ्यात त्यांनी मुलीला जन्म दिला . त्यातल्याच एका गाईने त्यांना आपल्या पायांच्या मधे घेऊन त्यांचे संरक्षण केले . जे एका मुक्या प्राण्याला समजले ते माणसांना नाही समजले . जिथे जगायची काही शक्यता नव्हती तिथे एका गाईने आपले संरक्षण केले हे पाहून, खचून न जाता आपल्या हातून काहीतरी चांगले काम होणार आहे हे ओळखून, तिथेच त्यांनी शपथ घेतली कि ह्यापुढे मी अनाथ मुलांना सनाथ बनविन. पुढे अनेक अडचणीतून मार्ग काढत, या अनपढ असलेल्या बाईने स्वतःचं एक वेगळ विश्व उभं केलं आणि त्यात अनेक मुलांना आसरा देऊन, त्या हजारो अनाथ मुलांची आई झाल्या. हे घेतलेले व्रत त्या पूर्ण करू शकल्या ते फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर. मनापासून प्रणाम त्यांना .. 

बऱ्याच वर्षांपूर्वी ऐकलेली " डेव्हिड हार्टमन" नावाच्या मुलाची गोष्ट आठवते . दहा बारा वर्षाचा असताना त्याला पूर्ण अंधत्व आलं . आपण मोठं झाल्यावर डॉक्टर व्हावे अशी त्याची ईच्छा होती .त्याने त्याच्या वडिलांना एकदा विचारले कि “बाबा, मी डॉक्टर होऊ शकतो का? “ बाबांना प्रश्न पडला कि काय उत्तर द्यावे याला .पण त्याला नाराज नं करता थोडासा विचार करून ते म्हणाले “बाळा, तू प्रयत्न करून पाहिल्याशिवाय कसे समजेल शक्य आहे कि नाही ते . तुझी ईच्छा जबरदस्त असेल आणि तसा प्रयत्न केलास तर कुठलीही गोष्ट तू नक्की करू शकशील “. आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास एवढा वाढला कि, पुष्कळ अडचणींमधून मार्ग काढत, तो डॉक्टर झाला, एवढेच नाही तर शिक्षणक्षेत्राबरोबरच तो त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर बेसबॉल सारख्या खेळातही पारंगत झाला .

या जगात अंधविश्वास ठेवणारे लोकही काही कमी नाहीत . बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या शेजारी एक जोडपं राहत असे. आम्ही त्यांना काका काकू म्हणून हाक मारायचो . काका असतील ५० वर्षाचे . त्यांची दोन्ही मुले परदेशात होती आम्ही मुले त्यांच्याकडे जायचो . दोन्ही कुटुंबामध्ये जिव्हाळा होता. सर्व ठीक चालले असताना काकांची तब्बेत अचानक बिघडली. त्यांना खूप खोकला झाला आणि खोकल्यातून रक्त पडू लागले . आम्ही सर्वच खूप घाबरून गेलो . त्यांच्या तपासण्या चालू झाल्या . दोनतीन डॉक्टरांचे मत घेऊन, निदानही पक्के झाले. आजार गंभीर होता पण बरा होणारा होता. आजारावर औषधे होती, तीही लगेच चालू केली गेली पण पूर्णपणे बरे व्हायला त्यांना बराच वेळ लागणार होता आणि आराम करणेही आवश्यक होते. काकांची मुलेही आली परदेशातून . 

दरम्यान ते आजारी आहेत हे कळल्यावर त्यांना भेटायला लोक येऊ लागले . त्यांचे शेजारी,लांबचे नातेवाईक रोज कोणीना कोणी भेटायला येत असे आणि आपापल्या अनुभवाप्रमाणे सल्लाही देत असे. कोणी आमच्या ओळखीचा डॉक्टर आहे त्याला दाखवा म्हणून सांगत असे , कोणी काही औषधे सुचवित असे ,कोणी मंत्रतंत्राचा उपाय करा असेही सांगत असे. कोणी अमुक देवाला नवस करा तो नक्की पावतो वगैरे वगैरे. काका सर्व एका कानाने ऐकत आणि दुसऱ्या कानाने सोडून देत. तसे ते नास्तिक नव्हते. घरात देव होते. सकाळ, संध्याकाळ पूजाही होत असे. 

. एक दिवस त्यांची मावशी त्यांना भेटायला आली. तीने काकांची ही अवस्था पाहून सल्ला द्यायला सुरुवात केली. म्हणाली "अरे विनु , तुझ्यावर देवाचा कोप झालाय नक्की. देवाला तुमच्याकडून देणं असणार काहीतरी. त्यामुळे देव रागवलाय बहुतेक तुमच्यावर. तुला आता त्याचं प्रायश्चित्त करावं लागणार आणि देवाला देणं द्यावं लागणार म्हणजे तुला लवकर बरं वाटेल" . काकांनी गालात हसत विचारले, " ठीक आहे मग यावर उपाय म्हणून मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे ?" मावशींना वाटलं याला आपलं म्हणणं पटलंय बहुतेक म्हणून त्या म्हणाल्या “अरे , आमच्या जवळच्या देवळात एक गुरुजी आहेत . त्यांना सांगितलं आणि दक्षिणा दिली तर ते देवाचा कोप घालवण्यासाठी पूजा करतात. ह्या पूजेनंतर बघ, तुझा त्रास लगेच कमी होईल आणि बरे वाटेल तुला .काकांचा देवावर विश्वास असला तरी अंधविश्वास नक्कीच नव्हता .मावशीचे बोलणे काकांना काही आवडले नव्हते. मनातल्या मनात राग वाढत होता का तर मावशीचा अंधविश्वास पाहून .. पण वरवर शांत असल्यासारखं दाखवत होते ते. पण मावशी काही बोलायच्या थांबत नव्हत्या ."मग काय सांगू ना पूजा करायला त्यांना ?" 

आता मात्र काकांना बोलण्याशिवाय उपाय नव्हता . “हे बघ , देवावर माझा विश्वास आहे पण देवाला काहीतरी द्यायचं राहिलं म्हणून तो मला आजारी पाडेल असं कसं वाटलं तुला ? मी काहीतरी दिलं नाही, म्हणून माझं वाईट करायला बसलाय का तो ? असं नसतं मावशी. तुझी चुकीची समजूत आहे ही .देव कोणाचंही वाईट करत नाही. चांगलंच करतो सगळ्याचं . पण प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतातच ते सहन करायची ताकत मात्र तो देत असतो. तेंव्हा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी दक्षिणा देईन ,गरज असेल त्याला मदत करीन पण ते माझा आजार बरा करण्यासाठी नाही . देवाच्या आणि माझ्या मधे एखाद्या मध्यस्थाची मला काही गरज वाटत नाही . असं न केल्याने मला नाही बरं वाटलं तरी चालेल . त्याचे परिणाम भोगायला मी तयार आहे “.

काकांनी औषधोपचार सांगितल्या प्रमाणे घेतला आणि ते खडखडीत बरे झाले आजारातून, आणि त्यांनी नव्वदीही पार केली . आम्हा मुलांना मात्र त्यांच्याकडून नवीन गोष्ट शिकायला मिळाली कि असल्या गोष्टींवर कधिही विश्वास ठेवू नये. आजाराने आपण हळवे झालो असलो तरीही सारासार विचार करणे आवश्यक आहे. अशा नाजूक क्षणी अंधविश्वास आपल्या सदसदविवेक बुद्दीवर मात करू शकतो. तेंव्हा मनावर ताबा महत्वाचा असतो..

विश्वास या शब्दांशी निगडित असलेल्या भावना बोलून दाखवता येत नाहीत.एखाद्यावर विश्वास ठेवणे न ठेवणे हे प्रत्येकाच्या अनुभवावरुन ,समोरच्या माणसाच्या व्यक्तिमत्वावरून ठरवावे लागते.

स्नेहल केळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा