युगांत

ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६

प्रासादाच्या रुंद पायऱ्या सावकाश चढून दारूक वरच्या मजल्यावर पोचला; तेव्हा त्याला किंचीत धाप लागली होती. ह्याच पायऱ्या चढण्या-उतरण्यात त्याचा निम्मा जन्म गेला होता; पण वृद्धापकाळाने आपल्या आगमनाची आता जाणीव करून द्यायला सुरुवात केली होती. थोडंसं थांबून, दोन-तीन खोलवर श्वास त्याने घेतले व मग छातीवर हात जोडून, मान खाली घालून तो कक्षात प्रवेशला. दोन-तीन पळे तसाच प्रणाम करत उभा राहूनही नेहमीचा तो मृदु, पण खर्जातला आवाज कानी पडला नाही म्हणून त्याने मान वर करून पाहिले. पश्चिमेकडच्या क्षितीजापर्यंत पसरलेल्या समुद्राकडे गवाक्षातून पाहात त्याचा स्वामी कठड्यावर दोन्ही हातांवर रेलून उभा होता. मावळतीच्यावर कासराभर राहिलेल्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर त्याची सावळी व एकेकाळची पिळदार मूर्ती अधिकच काळी दिसत होती आणि खांद्यावरचे व डोक्यावरचे पांढरे केस मात्र आग लागल्याप्रमाणे झळाळत होते.

“स्वामी…”, बराच वेळ झाला तरी त्याची तंद्री भंगेना म्हणून दारूकाने हाक मारलीच. त्याने मागे वळून पाहिले. नेहमी हसणारे त्याचे काळे टपोरे डोळे आजही हसले; पण दारुकाला नेहमीसारखं प्रसन्न वाटलं नाही.

तो शांतपणे चालत दारुकाजवळ आला, “कसा आहेस दारुका?”, मंद हसत त्याने विचारले. 

दारुकाची नजर खाली वळली, “ठीक आहे”, तो जेमतेम पुटपुटला. 

त्याच्या स्वामीने दणकट हातांनी त्याचा खांदा थोपटला, “चल निघूया”, तो मंद हसतच म्हणाला.

“स्वामी….”, दारूक अजूनही खालीच पाहात होता, “स्वामी..”. त्याला पुढे बोलवेना. नुसतेच आवंढे गिळत राहिला.

थोड्या वेळाने मग एकदम आवेगाने बोलू लागला,

“परिस्थिती फार बिघडली आहे स्वामी! संपूर्ण नगरीत अशांतता माजली आहे. समुद्राचं पाणी वाढत चाललंय आणि किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना घरं सोडून अंतर्भागात यावं लागतंय. मासेमारी, मोत्यांचा व्यापार पूर्वीसारखा फायदेशीर राहिला नाहीय. गेली काही वर्षे दुष्काळ पडल्याने शेतीही धड होत नाहीय. पण कोणाचंच तिकडे लक्ष नाहीय. आपली नगरी बुडायला आलीय; पण नगरवासी एकमेकांशी लढण्यात मग्न आहेत. आपल्याच वंशातल्या एका नेत्याने अनिरुद्ध महाराजांना आव्हान दिलंय. आपण आश्रय दिलेल्या सोळा हजार कुटुंबातल्या लोकांविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. उच्चवंशातले लोक त्या आश्रितांमुळे आमच्यावर अन्याय होतो म्हणतात; त्यांना विद्यालयांतल्या बहुतेक गुरुजनांचीही साथ आहे. काही विद्वानांनी ह्याविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करून पाहिला; पण जमावाच्या शक्तीपुढे त्यांचे काय चालणार? अशा तुरळक विद्वानांबद्दल लोकांच्या मनात तीव्र तिरस्कार निर्माण करण्याचे काम केले जात आहे. नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी एकत्र येऊन नवीन उपाय शोधण्याची गरज असताना नगरीत अशांतता माजली आहे. आश्रित कुटुंबांतले लोक, व्याध, कोळी वगैरे लोक भरडले जात आहेत. त्यांना अंतर्भागात येऊ न दिल्याने त्यांचा असंतोष खदखदतो आहे. अशा वेळी आपण असं किनारपट्टीच्या भागात एकट्याने जाणे…..”

त्याला हातानेच थांबवत त्याचा स्वामी प्रासादाच्या पायऱ्या उतरू लागला. दारुकाचा नाईलाज झाल्यासारखा तो त्याच्या मागे जड पावलांनी चालू लागला.

दारूक खाली पोचला तेव्हा तो नेहमीच्याच डौलदारपणे रथात चढून उभा होता. दारुकाने घोड्यांचे लगाम हातात घेतले व सवयीनेच त्यांना हलकासा झटका देऊन घोड्यांना इशारा केला. ती चारही उमदी जनावरे एका लयीत अलगदपणे चालू लागली.

“दारुका, तू व्यर्थ चिंता करू नकोस”, रथ नगराच्या मुख्य रस्त्यावरून धावू लागल्यावर तो बोलायला लागला, “मला ह्या गोष्टींचे ज्ञान नाही असे तू का समजतोस? किंबहुना मला जे जे होईल असे वाटत आहे ते तेच सगळे घडत आहे.”

“होय स्वामी, आपण तर जाणते आहातच त्यामुळे आपल्याला ह्याची कल्पना असेलच; पण मग ह्याला उपाय काय?”

“उपाय?”, तो नेहमीप्रमाणे निश्चिंत मंद हसत म्हणाला, “उपाय कशावर? मनुष्य स्वभावावर कसला उपाय? ही सगळी माणसं स्वधर्माप्रमाणे वागत आहेत; त्यावर काहीही उपाय नाही. हे जे काही होतंय ते अटळ आहे. ह्याला कोणतीही मानवी शक्ती अडवू शकत नाही.”

“स्वधर्म, स्वामी? दुसऱ्यांचा द्वेष करणे, वंचितांना मदत करण्याऐवजी त्यांना त्रास देणे हे कोणत्या धर्मशास्त्रात लिहिले आहे?”, दारुकाने विचारले. त्याच्या कंपित आवाजावरून त्यानेही भेदाभेदाचा दाह अनुभवला असेल हे कोणालाही कळले असते.

“धर्मशास्त्राचा काय संबंध इथे?’, तो युगंधर स्वामी किंचित हसून म्हणाला, “धर्मशास्त्रेही माणसांनीच बनवली आहेत ना? मी स्वधर्म म्हणालो तो कोणताही कृत्रिम धर्म नव्हे तर सजीवांचा नैसर्गिक जीवनधर्म आहे. अरे, पक्ष्यांच्या घरट्यातल्या चार अंड्यांपैकी पहिल्या अंड्यातून पिलू बाहेर आले की ते लगेच बाकीची अंडी घरट्यातून ढकलून द्यायचा प्रयत्न करते. जीवनस्पर्धेत स्वत:चा विजय व्हावा, स्वत:चा वंश पुढे चालावा, स्वत: आणि स्वत:च्या वंशजांचे भरणपोषण व्हावे म्हणून येनकेनप्रकारेण दुसऱ्याचा काटा काढणे, दुसऱ्याला वंचित ठेवणे हाच सजीवांचा जीवनधर्म आहे हे कटू असले तरी सत्य आहे. जेव्हा निसर्ग भरभरून देतो तेव्हा स्पर्धा कमी तीव्र असते. एकमेकांना न दुखवता प्रत्येकाला स्वार्थ साधता येईल तोवर सुखेनैव जीवनप्रवाह वाहत असतो. हळूहळू भरभराट होते, जिवांची संख्या वाढू लागते. कालांतराने निसर्गाचे देणे ह्या वाढलेल्या संख्येला पुरेसे नाही असे वाटायला लागले की स्पर्धा तीव्र होते. मग समान परिस्थितीतले लोक गट बनवून गटागटात संघर्ष सुरू होतो. अशा स्पर्धेत दुर्बळ गट आधी बळी पडणार, ज्यांच्याकडे आधीच संसाधने कमी आहेत ते आधी पराभूत होणार हे साहजिकच आहे. सृष्टीचा नियमच आहे तो. मनुष्य कितीही बुद्धिमान असला तरी निसर्गधर्म चुकवू शकत नाही. एक सजीव म्हणून आपले कर्म करणे त्याला भाग पडते. हेच मी इतकी वर्षे सांगत आलोय ना? ह्या निसर्गधर्मापुढे कोणतीही शिष्टाई चालत नाही. तू म्हणालास की काही विद्वान ह्याला उत्तेजन देताहेत; तर काही विरोध करताहेत; नाही का? असा संघर्ष होऊ नये असं वाटणाऱ्यांची अशी समजूत असते की मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे म्हणून संकटाच्या काळी एकजूट होऊन आलेल्या परिस्थितीवर सगळे मिळून मार्ग काढतील. पण त्यांना हा सजीवांचा निसर्गधर्म कळत नाही आणि कळला तरी मानव त्याला अपवाद नाही हे त्यांना पचायला जड जाते. जसजशी स्पर्धा तीव्र होत जाईल व गटांचा परीघ अधिकाधिक संकुचित होत जाईल तसतसे ह्या विद्वानांनाही परिस्थितीचे चटके बसू लागतील व एक कोणतातरी गट आपला म्हणावा लागेल. त्याला पर्याय नाही. निसर्गधर्मात कोणालाही दयामाया नाही. पण त्यात दु:ख मानायचे कारण नाही. आपण सगळेच ह्या विश्वरुपी चक्रातल्या पाळण्यात बसलो आहोत. आज जे मरतात, ते निसर्गतत्वात विलीन होतात; त्याच तत्त्वातून उद्या वेगळ्या स्वरूपात जन्म घेतात. सृष्टीचे हे चक्र अव्याहत चालू असते.”

इतकं तो बोलेपर्यंत रथ पूर्वेकडच्या समुद्रकिनारी असलेल्या त्याच्या आवडीच्या उद्यानापर्यंत येऊन पोचला. शांतपणे तो रथातून उतरला व उद्यानाकडे जाऊ लागला. दारुकही चटकन रथातून उतरला व त्याच्या मागेमागे पळत जाऊ लागला. त्याने दारुकाला हाताने थांबवले, “मला थोडा वेळ एकांतात माझ्या आवडीच्या जागी घालवू दे दारुका. खूप दिवसांनी मी इथे आलोय. मुख्यभूमीचा तो किनारा मला एकदा डोळे भरून पाहू दे. जे मी तिकडे सोडून आलोय त्या आयुष्याची, त्या लोकांची आठवण मला काढू दे.”

“पण स्वामी…”, दारूक रडकुंडीला येऊन म्हणाला, “इथे खूप धोका आहे. समुद्रकिनाऱ्यावरचे आश्रित आणि व्याध लोक खवळून उठलेले आहेत. नगरीतल्या लोकांबरोबर त्यांचे छुपे युद्धच चालू आहे म्हणा ना! आपल्या बरोबर आपण काही सैनिकही घेतलेले नाहीत. किमान मला तरी तुमच्या बरोबर येऊ द्या!”

“ठीक आहे तू ये; पण माझ्या मागे वीस पावले तू चालले पाहिजेस ही माझी अट आहे. मला माझा एकांत भंग झालेला चालणार नाही.”

इतके बोलून तो दमदार पावले टाकत चालू लागला. त्याला थोडं पुढे जाऊ देऊन दारूकही वीसएक पावलांचे अंतर ठेवून चालू लागला. सूर्य आता जवळजवळ अस्ताचलाला पोचला होता. झाडांच्या सावल्या लांबतच चालल्या होत्या. अंधारत चाललेल्या त्या दाट उद्यानात पुढेपुढे निर्भयपणे चाललेल्या आपल्या स्वामीला पाहून दारूकाचे मन अघटिताच्या चिंतेने काळवंडत चालले होते. सगळ्या प्रकारचा धोका माहित असूनही, नगरीत काय चालले आहे हे माहित असूनही आपला स्वामी असे का करतोय हे त्याला कळत नव्हते. तरीही आज्ञेप्रमाणे वीस पावलांचे अंतर ठेवून तो चालत राहिला. डोळे चौफेर फिरवत, झाडातली किंचित सळसळही कानाने टिपत तो चालत राहिला.

अखेर पूर्व किनाऱ्यावरच्या त्या डेरेदार वृक्षाखाली बांधलेल्या पारावर जाऊन त्याचा स्वामी विसावला; तेव्हा दारूक थोडे अंतर ठेवून तसाच ताठपणे उभा राहिला. त्याचे जुनाट हृदय वेगाने धडधडत होते आणि पापण्या न मिटता डोळे विस्फारून इकडे तिकडे पाहात राहिल्याने डोळे चुरचुरायला लागले होते.

काही क्षण तिथे नीरव शांतता पसरली; अगदी झाडाची पानेही हालायची थांबली; आणि मग अचानक त्याला दोन्ही बाजूंनी झाडांमध्ये जोरदार सळसळ जाणवली. इकडेतिकडे पाहून तो मागोवा घ्यायचा प्रयत्न करत असतानाच सप्प सप्प करून दोन तीन आवाज आले आणि मग परत जोरदार सळसळ होऊन सगळं शांत शांत झाले.

“स्वाऽऽऽऽमीऽऽऽऽऽ”, त्या शांततेला भेदत त्याने आतड्यापासून एक टाहो फोडला आणि डोळ्यातल्या पाण्यात धूसर होत जाणाऱ्या पाराकडे जीव तोडून धाव घेतली.

झाडाला टेकून त्याचा राजस स्वामी शांत चेहऱ्याने बसला होता आणि तीन बाण त्याच्या छातीत विशाल पठारावरच्या ताडवृक्षासारखे रुतून थरथरत होते.

“स्वामी.. स्वामी.. स्वामी..” असा जप करत त्याने पारावर उडी मारली आणि आपल्या स्वामीच्या पाठीमागे हात नेऊन त्याला उठवायचा प्रयत्न करू लागला.

आपल्या बळकट हाताने त्याच्या स्वामीने त्याला दूर ढकलले.

“दारुका, नको प्रयत्न करूस मला वाचवायचा. मला नाही परत नगरीमध्ये जायचं. जी नगरी मी माझ्या बंधु-सख्यांच्या मदतीने आपल्या माणसांसाठी वसवली; त्याच नगरीतले अराजक मला नाही पाहवणार. माझ्या आयुष्यभर मी माणसांना युद्धापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला; पण प्रत्येक वेळी कोणाच्या ना कोणाच्या अहंकारापोटी, अंधस्वार्थापोटी, पुत्रमोहापोटी मला युद्धे करावी लागली. काहींचे शेकडो अपराध सहन करूनही जेव्हा त्यांना काहीही समजण्याइतकी त्यांची कुवत नाही हे कळले तेव्हा त्यांचा नाश करण्यावाचून मला पर्याय राहिला नाही. वंचितांना पाच गावे देण्याइतकीही दानत जेव्हा संपन्न सम्राटांनी दाखवली नाही तेव्हा त्यांच्या विरोधात होणाऱ्या अटळ युद्धात माझे कित्येक सखे-सोबती मृत्युच्या काळ्या पडद्याआड जाताना मला पाहावे लागले. आताही मला भविष्य मला स्पष्ट दिसते आहे. माझ्या ह्या प्रिय नगरीची वाताहत मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही; पुन्हा एकदा माझे आप्तच माझ्या आप्तांचा बळी घेताना मी पाहू शकणार नाही. तू जा आणि मला माझ्या पुढच्या प्रवासाला निघू दे. कोणाला कितीही समजावले असते तरी हे आज ना उद्या झालेच असते. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून, माझ्यासाठी रडणाऱ्यांना माझ्या बोलण्याची आठवण करून दे. त्यांना सांग की आपले पूर्वज, आपले आप्त आणि आपले शत्रूही कोठेही जात नाहीत. ते इथेच आहेत, ह्याच सृष्टीत आहेत. आपणही त्यांच्यातच विलीन होणार आणि त्यांच्यातूनच नव्याने जन्मणार! जा तू”.

पूर्वेकडे दिसणाऱ्या मुख्यभूमीकडे आपल्या काळ्या टपोऱ्या डोळ्यांनी स्थिर नजर लावून बसलेल्या, अंधारात हळहळू एकरूप होऊ लागलेल्या आपल्या श्यामल स्वामीकडे पाहून दारुकाने मनापासून हात जोडले व छातीतून उसळणारे हुंदके दाबत नगराच्या दिशेने जोरात धावू लागला.

- निरंजन नगरकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा