भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वास रुपिणौ | याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा: स्वान्त:स्थमीश्वरम् ||
आपल्या या विशेषांकाचा विषय विश्वास हा आहे. विश्वास म्हणजे काय हे दाखवता येत नाही, पण कशावर तरी विश्वास असल्याशिवाय व्यवहारात आपले पाऊल देखील पुढे पडत नाही. एखादी गोष्ट अनुभवाने सिद्ध झाल्याशिवाय आपण सहसा विश्वास ठेवत नाही. समर्थ सांगतात, “आधी मनोगत पाहातीं | मग विश्वास धरिती | प्राणीमात्र येणें रितीं | वर्तताहे || दा.१५.७.३१||” जगात सर्व प्राणीमात्र अर्थात माणसे सर्वसाधारणपणे आधी मनोगत जाणून घेऊन मगच त्याच्यावर विश्वास ठेवतात. कारण “जो दुसऱ्यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला |” म्हणून समर्थ पुढे सांगतात, “जो आपणचि कष्टत गेला | तोचि भला || दा. १९.९.१६||” ही सर्वसामान्य रीत झाली.
अशी व्यावहारिक बाजू मांडणारे, व्यवहार शिकवणारे समर्थ परमार्थाच्या बाबतीत मात्र जनावेगळी गोष्ट सांगतात. ती म्हणजे संत व शास्त्र यांच्यावर (अंध) विश्वास ठेवल्या शिवाय परमार्थात प्रगती होत नाही. आधी परमार्थ हा आपल्यासाठी आहे हेच सर्वांना पटत नाही, कारण त्याबद्दल अनेक गैरसमज असतात. मनुष्य पारमार्थिक नसला तरी व्यवहारात काही अडत नाही. कारण परमार्थाचे फळ दृश्य नाही. जो आनंद आपण यश, संपत्ती यामध्ये शोधतो, तो काही काळ टिकतो, पण तो नेहमी आपल्याला हुलकावण्या देत राहतो. परमार्थ आपल्याला कायम स्वरुपी आनंदाकडे, आपल्या आनंदस्वरुपाकडे नेतो. व्यावहारिक परिस्थिती कशीही असली तरी खरा पारमार्थिक मनुष्य आनंदात असू शकतो हे तुकारामांसारख्या संतांकडे पाहून कळते.
ईश्वर इंद्रियांना दिसत नाही, म्हणून तो नाहीच हे संयुक्तिक वाटते, पण स्वत:च्या देहाची रचना किंवा निसर्गातील सुनियंत्रण पाहिले की या मागे कोणी अति बुद्धिमान, अति शक्तिशाली तत्त्व आहे हे मान्य करावे लागते. अर्थात् ईश्वराचे अस्तित्त्व मानले नाही तरी जीवनक्रिया थांबत किंवा बिघडत नाही. त्यामुळे तो असला तरी बिघडत नाही आणि नसला तरी हरकत नाही असा निष्कर्ष सहज निघतो. ईश्वर जसा कर्मफलदाता तसा कृपाफल दाताही आहे असे शास्त्र सांगते. तो कोणी “शरीरधारी”, शक्तिमान शासनकर्ता अशी आपण धारणा करून घेतली असते. त्यामुळे तो असण्याची आपल्याला शंका येते आणि तो तसा नसल्याने नास्तिकांचे फावते. पण ईश्वराचे स्वरुप असे नाही. ‘अस्ति’ रूपाने तो विश्वातील जड-चेतनात स्पष्ट आहे. ‘भाति’, जाणीव-चैतन्य रूपाने तो जीवमात्रात स्पष्ट आहे आणि ‘आनंद’ देणाऱ्या ‘प्रियत्व’ रूपाने तो अधून मधून अनुभवाला येतो. ‘अहं अस्मि’ – मी आहे, ‘सदा भामि’ – मला माझी जाणीव आहे, ‘कदाचिन् न अहं अप्रिय:’ - मी मला कधीच अप्रिय होत नाही. हेच ‘सत्-चित्-आनंद’मय ईश्वर आणि मी यांचे नाते आहे. पण तो कसा हे समजून घेण्याची इच्छा असेल तर संतांना शरण जावे लागते. विवेकानंदांनी रामकृष्णांना तुम्ही ईश्वर पाहिला आहे का हाच प्रश्न विचारला होता आणि रामकृष्ण परंहंसांनी निर्विकल्प समाधीचा अनुभव देऊन विवेकानंदांचे समाधान केले होते. ईश्वर ही संकल्पना काय आहे?
व्यष्टीचा म्हणजे आपल्या देहाचा विचार केला तर तो आत राहून शरीराचे आणि जीवाचे व्यवहार चालवतो. पण हे आपण मानत नाही. आपण अन्न खातो पण ते पचविण्याची व्यवस्था कोणी केली? किंवा ते काम कोणामुळे होते याचा आपण विचार करत नाही. आपण ते करत नाही मग ते कसे होते? नैसर्गिक प्रक्रिया? ती कोणी ठरवली? तिचे नियंत्रण कोण करतो? हे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. त्याकरिता गीतेमध्ये भगवंतांना सांगावे लागते,
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: | प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् || सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च | ...... (गीता १५.१४-१५)
अन्न पचनाचे कार्य प्राण आणि अपान यांनी युक्त असलेला वैश्वानर करतो. ही अग्निरूप ऊर्जा परमेश्वराची आहे. बुद्धीला चालना देऊन स्मृतिज्ञान आणि विस्मरण हे त्याच्याच चेतनेमुळे होते. पाच वर्षाचा ध्रुव हे जाणतो. त्याला भगवंतांनी चतुर्भुज रूपात दर्शन दिल्यावरही खरा ईश्वर कोण हे हे त्याला नक्की माहीत आहे हे त्याने केलेल्या स्तुतीवरून स्पष्ट होते. भक्त ध्रुव म्हणतो,
योन्त: प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधर: स्वधाम्ना ।। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ।। (भा.४,९,६)
“प्रभो ! आपण सर्वशक्तिसंपन्न आहात. आपणच माझ्या अंतःकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्त वाणीला जागृत केले. जे हात, पाय, कान, त्वचा इत्यादी निरनिराळ्या इंद्रियांना तसेच प्राणांनाही चेतना देतात, त्या आपणा अंतर्यामी भगवंतांना मी प्रणाम करतो”. तो पुढे म्हणतो – “भगवन् ! आपण एकटेच आपल्या अनंत गुणमय मायाशक्तीने या महदादी संपूर्ण प्रपंचाची रचना करून अंतर्यामीरूपाने त्यात प्रवेश करता आणि पुन्हा त्याच्या इंद्रियादी विनाशी गुणांमध्ये त्यांच्या अधिष्ठानरूप देवतांच्या रूपात राहून अनेकरूपाने भासता”.
या पुराणातल्या गोष्टी राहू द्या. पण तुकारामांसारखे संत यापेक्षा काही वेगळे सांगत नाहीत. ते म्हणतात,
विश्वास तो देव । म्हणू धरियेला भाव ॥ माझी वदवितो वाणी । जेणे धरिली धरणी ॥”,
किंवा,
आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ।। साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । बोलविता धनी वेगळाची ।। काय म्यां पामरें बोलावी उत्तरे । परि त्या विश्वंभर बोलविले ।। तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायाविण ||”
श्री रामचरितमानस तुलसीदासांनी अवधी भाषेमध्ये लिहिले आहे, पण त्याचे मंगलाचरण संस्कृतमध्ये केले आहे. तुलसीदास मंगलाचरण करताना म्हणतात,
भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वास रुपिणौ |
याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा: स्वान्त:स्थमीश्वरम् ||
भवानी पार्वती ही श्रद्धेचे रूप आहे आणि भगवान शंकर विश्वासाचे प्रतीक आहेत. त्यांची कृपा झाल्याशिवाय स्वत:च्या हृदयात असलेल्या अंतस्थ परमेश्वराचे दर्शन होऊ शकत नाही. या ईश्वराचा आपल्याला अनुभव यायला प्रथम संत, शास्त्र आणि गुरु यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास असायला हवा.
कठोपनिषद देखील सांगते,
अस्तीत्येवोपलब्धव्यस्तत्त्वभावेन चोभयोः । अस्तीत्येवोपलब्धस्य तत्त्वभावः प्रसीदति ॥ २.३.१३॥
तो परमात्मा वाणीने मनाने वा डोळ्यानाही प्राप्त करता येणे शक्य नाही. या परमात्म्याला प्रथम “तो आहे” असे निश्चयपूर्वक स्वीकारायाला हवे म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा दृढ निश्चय करायला हवा नंतर मग तत्त्वभावाने त्याला प्राप्त करता येते. या दोन्ही प्रकारांनी ‘तो आहे’ अशा निश्चयाने परमात्म्याची सत्ता स्वीकारणाऱ्या साधकाला परमात्म्याच वास्तविक स्वरुप आपोआप शुद्ध हृदयात प्रत्यक्ष होऊन जात.
समर्थ हेच आपल्या शब्दात सांगतात, “प्रज्ञेविण अर्थ न कळे | विश्वासेंविण वस्तु ना कळे | प्रज्ञाविश्वासें गळे | देहाभिमान ||”( दा.८.६.४७) श्रद्धा आणि विश्वास असल्याशिवाय परमात्मवस्तूचे आकलन होत नाही. प्रज्ञा आणि विश्वास या दोन्हीमुळे देहाभिमान, देहबुद्धि गळून पडते. देहाभिमान, देहबुद्धि नाश पावताच सहजच आत्मवस्तुची प्राप्ती होते. “तें दिसेना ना भासेना | कल्पांतींहि नासेना | सुकृतावेगळें विश्वासेना | तेथें मन ||” (दा.१९.५.२५), देवाचे कर्तृत्व पाहण्यासाठी सूक्ष्म ज्ञानदृष्टी असावी लागते. म्हणून आपण आपले कर्तेपण बाजूला सारावे, म्हणजे त्या देवाला पाहाता येते. असे केले तरच त्या परब्रह्माचे कांहीं एक गुप्त रहस्य कळू लागते. ते शाश्वत परब्रह्मस्वरूप इंद्रियांना दिसत नाही की मनाला भासत नाही. कल्पांतीहि ते नाश पावत नाही. सुकृत अर्थात चांगले पुण्यबल नसेल तर मग त्या परब्रह्मावर मनाचा विश्वास बसत नाही.
मनाच्या श्लोकात शिष्य समर्थांना हा हृदयातला हा देव कसा असा मार्मिक प्रश्न विचारतो,
वसे हृदयीं देव तो कोण कैसा । पुसे आदरें साधकू प्रश्न ऐसा ।। देहे टाकीतां देव कोठे रहातो । परी मागुता ठाव कोठे पहातो ।।१९४।।
त्या देवाचे खरे स्वरुप समर्थ सांगतात, जो देव हृदयात असतो तोच सर्वत्र भरून राहिला आहे. इतका की तो नाही अशी तिळमात्र जागा नाही.
वसे हृदयीं देव तो जाण ऐसा । नभाचे परी व्यापकू जाण तैसा ।। सदा संचला येत ना जात कांही । तयावीण कोठें रिता ठाव नाही ।।१९५।। नभासारीखे रुप या राघवाचे । मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचे ।। तया पाहतां देहबुद्धी उरेना । सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ।।१९७।।
तो पाहण्याकरिता सूक्ष्म दृष्टी पाहिजे पण मुख्य म्हणजे तो आहे यावर श्रद्धा पाहिजे. श्रद्धा आणि विश्वास यांचा काय फायदा? “ म्हणे दास विश्वासतां मुक्ती लाहे ।“ मुक्ती म्हणजेच अखंड आनंदाची स्थिती, जी संतांनी अनुभविली. आणि त्याकरिता उपाय काय? १)नाम नामसाधना आणि २) संतसंग.
नामाचे महात्म्य समजत नसेल, पटत नसेल तर संत वाङ्मयाचा अभ्यास करावा. प्रत्येक संतानी नामाचे महात्म्य सांगितले आहे. ज्ञानदेवांचा हरिपाठ घ्या, नामदेवांच्या रचना पाहा. एकनाथांचे वाङ्मय, भागवत, गीता सर्व ग्रंथात नामाचेच महात्म्य आहे. गोंदवलेकर महाराजांचा अवतारच नामसाधना सांगण्यासाठी आहे. म्हणून “मना संत आनंत शोधूनि पाहें ।।“ (म श्लो. १५०) असे समर्थांचे सांगणे आहे. मनाच्या श्लोकांची फलश्रुती सांगताना समर्थ पुन्हा हाच निष्कर्ष सांगतात, “ मनाची शतें ऐकतां दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती ।। चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी । म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी ।।( म. श्लो.२०५)।
या करिता समर्थ म्हणतात, “जिवा संशयो वाउगा तो त्यजावा “नाम घेताना त्या नामाचा नामी समोर असतोच हे मनात ठसले पाहीजे. नाम आणि नामी एकच आहे हे एकदा पटले की सर्व शंका फिटून जातात. शंका फिटण्याचे दोन उपाय आहेत. १)पूर्ण श्रद्धेने संत आणि शास्त्र जे सांगते त्यावर श्रद्धा ठेवणे आणि ते श्रद्धेने स्वीकारणे आणि २) श्रध्दा कमी पडत असेल तर शास्त्रांचा अभ्यास करुन ते पटवून घेणे. पटल्यानंतर मग श्रद्धा बसते.
पण योग्य ठिकाणी श्रद्धा ठेवायची. ‘करिती लाभावीण प्रीती’ अशा संतांवर श्रद्धा ठेवायाला काहीच हरकत नाही. संत आपल्याकडे काही मागत नाही. नाशिवंत असेल ते सर्व मला दे असे समर्थ सांगतात ते काही त्यांना हवे म्हणून नाही, तर नाशिवंत वस्तूवरची आपली इच्छा टाकल्याशिवाय शाश्वत वस्तू मिळत नाही म्हणून. काहींची पटवून न घेता श्रद्धा बसते. काहींना पटवून घ्यावे लागते. दोन्हीचा विचार करावा. वाउगी म्हणजे उगाचच येणारी शंका सोडून द्यावी. अशी शंका जाण्यासाठी अखंड नाम घ्यावे. अखंड नामाची संवय लागली तर शंका आपोआप जातील.
भगवंत गीतेमध्ये सांगतात, “श्रद्धावान् लभते ज्ञानम् |” श्रद्धेनेच स्वरूपाचे आणि ईश्वराचे ज्ञान होते. अशी श्रद्धा ठेवणाऱ्यांना मी स्वत: कृपा करून बुद्धियोग देतो. “ददामि बुद्धीयोगं तं येन मां उपयान्ति ते ||” (गी. १०. १०). भगवंताचे वचन आहे जे मला श्रध्देने शरण येतात त्यांना मी बुद्धीयोग देतो. त्याच्या साहाय्याने ते माझ्या स्वरुपाला येऊन मिळतात, आनंदरूप होतात. सात्विक श्रद्धावंत, इंद्रियांवर संयम व ज्ञानाची सतत उत्कंठा असणारा साधक ते ज्ञान प्राप्त करून अल्पावधीत पराशांती प्राप्त करतो. ज्ञानहीन, श्रद्धारहित व संशयी मनुष्य परमार्थ दृष्ट्या अधोगतीला जातो संशयी माणसाला या लोकी किंवा परलोकीही सुख मिळत नाही. व्यवहारात तो यशस्वी दिसला तरी अंतरी शांती असेलच असे नाही. श्रद्धेचा परंपरा, तर्क, दुसऱ्यांचा अनुभव व इशकृपेने स्वत:ला आलेला किंचित् स्वानुभव अशा प्रकारे विकास होतो. संत तुलसीदास म्हणतात,
बिनु बिस्वास भगति नहि, तेहि बिनु द्रवहिं न रामु |
राम कृपा बिनु सपनेहुँ , जीव न लेह विश्रामु ||
श्रद्धा आणि विश्वास यांच्याशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय कृपा नाही आणि कृपेशिवाय स्वप्नातही शांती प्राप्त होत नाही. मग या संतांच्या वचनांवर विश्वास ठेवायला काही अडचण आहे का? कुठल्याही एका संताचे ग्रंथ वाचावे आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांना आलेला ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ हा अनुभव आपणही घ्यावा !
'अस्ति इति उपालब्धव्यो - श्रद्धा' या विषयावर अधिक माहितीसाठी पुढील video पाहावा
श्रीकांत जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा