ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
जीवन संगीत? हे कोणतं संगीत आहे? कधी ऐकलं ,वाचलं नाही! काय असेल यात? याचं शिक्षण कुठे मिळतं? कोणतं घराणं नावाजलेलं आहे? हे पूर्वी होतं का? आत्ता याविषयी आम्हाला माहिती मिळेल?
नुसतं जीवन संगीत हा शब्द समोर आला आणि इतके प्रश्न पडले! खरंतर हे संगीत आपण प्रत्येक जण रोज ऐकत असतो. फक्त त्याची जाणीव आपल्याला झालेली असतेच असे नाही. त्याचा खरोखर मनापासून आस्वाद घेतलेला असतोच असं नाही.
जीवन संगीत म्हणजे शतकानुशतके युगानुयुगे चालत आलेला मनुष्याचा माणूस होण्याचा प्रवास! त्या प्रवासातील प्रत्येक आरोह अवरोह आणि राग बांधणीत पडत गेला सांस्कृतिक, भौगोलिक असा फरक. तरीही सर्वदूर ते एकसारखंच आहे, तितकंच श्रवणीय आणि आनंद देणारं आहे. या संगीतातही नृत्य,गायन आणि वादन या तिन्हींचा समावेश आहे. घराणीही आहेत. प्रत्येक घराण्याची स्वतंत्र तरीही एकत्रित अशी वैश्विक स्वर धून आहे.
जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी जन्माला आलेल्या नवजात अर्भकाचा पहिला स्वर टॅ ssहँ ,टॅ sssहँ च असतो. यात फरक इतकाच की कोणी जन्मल्या जन्मल्या पंचम् लावतो तर कोणी षड्ज! 'स्व' ची जाणीव होणारा हा पहिला क्षण, हा पहिला स्वर! सत्य युगापासून कलियुगा पर्यंत वसंत आगमनाची चाहूल देणारा कोकिळेचा पंचम् स्वर असो, विणीचा ऋतुकाल सुरू झाल्यावरचा पक्षीगणातील नराचा 'केकारव' असो की 'मोरनाची' असो. गाईचा हंबरडा असो की बुलबुलचं गाणं असो हा सर्व किलबिलाट जीवन संगीतातील 'जीवनबहार' असतो! निसर्गातील पशुपक्ष्यांची आजही हीच 'स्वरभाषा' आहे. दरबारी कानडयासारखी 'मृग नयनी रसिक मोहिनी' मानवी मनावर घालणारी.
पावसाची वाट पाहणाऱ्या चातकाची आर्त विनवणी असो की तहानलेल्या प्राण्याची आटलेल्या तळ्याकाठी तहान भागवतांनाची 'चटचट' असो. भेगाळलेल्या जमिनीची चरचर असो की सुकलेल्या पालापाचोळ्याची कर्र कर्र असो, वसंतातील अनेक रंग गंधाने बहरलेली ही सृष्टी जणू काही 'मल्हार' कधी सुरू होतोय याची वाट पाहत असते. मधमाशीचा गुंजारव टिपेला पोहोचलेला असतो. नकळतपणे सर्व सृष्टी या अशा सुप्तावस्थेत निपचित पडून जणू काही 'ओंकार साधना' करीत तप करत असते. ग्रीष्म कहर अत्यंत आर्त स्वर आळवित असतो. "सूर ना सजे क्या गाऊं मे, सूर के बिना जीवन सुना", अशी अवस्था झालेल्या या निसर्गाची आर्त विराणी त्या स्वर शारदे प्रति समर्पित होते खरी आणि मग या सृष्टीला, तृषार्त धरेला चिंब करण्यासाठी तिचे मेघदूत आकाशात जमा होतात. आभाळ भरून येतं 'गडगडाटा'सह सुरू होतो तो त्या विद्युल्लततेचा नृत्याविष्कार ! आतापावेतो गायन, वादनात दंग असलेल्या या सृष्टीच्या रंगमंचावर अवतरते ती ही 'लखलखणारी' दामिनी! मल्हाराच्या आरोहाची सुरवात करणारी टपोऱ्या थेंबांची 'टपटप' सुरू होते. सगळा आसमंत मृदगंधाने भरून जातो. या स्वरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात 'मेघमल्हार' सुरू होतो. धैवताच्या कणासहित आंदोलित कोमल निषाद, लगोलग येणाऱ्या शुद्ध निषादासह कोमल गंधार यावर पंख फुलवून प्रत्येक मनमोर नाचू लागतो. हळूहळू तालात बदल करत अस्ताई, अंतरा पूर्ण होतो. तोपर्यंत सर्व सृष्टीमन हरखून गेलेले असते आणि मग सुरु होतो तो तराणा! निसर्गातील प्रत्येक घटकाने किती सहज हे जीवनसंगीत आत्मसात केलंय! संथ लयीतून द्रुत लयीकडे जातांनासुद्धा तो किती नजाकतीने हे पेश करत असतो. हे सर्व स्वरांसह रस, रंग, गंधासहित नटवून, सजवून, खुलवून आपल्यासमोर मूर्तिमंत सगुण साकार स्वरूपात त्या 'विश्वकर्म्याची' पूजा बांधत असतो. मालकंसातील कोमल धैवत, गंधार आणि निषादासह हा 'दिव्य स्वातंत्र्य रवी' आपल्या मनोराज्यावर षड्ज, मध्यमाचे वर्चस्व गाजविण्यास हा सज्ज होतो.
एक ओझरती स्वर सर येते आणि क्षणात त्यामागून येणारी स्वरमंजुषेची सोनेरी तिरीप. हा खेळ कितीतरी वेळ या रंगमंचावर सुरू राहतो. त्यातून मग "इंद्रधनुषी" मल्हाराच्या नव निर्मितीचा सृजनाचा आनंद देऊन जाते. हे इंद्रधनुष्य सात रंगांसाह सप्तसुरही घेऊन अवतरते. ते मानवाच्या जीवनात कधी येऊन अलगद उतरते ते कळत देखील नाही. 'रागेश्वरी'तील रिषभासह दोन निषाद घेऊन जणूकाही 'शुभ दिन आयो' असे हे सर्व अनुभवणाऱ्या मानवाच्या मनाचा ठाव घेत निसर्ग आणि मनुष्य जीवन यातील मिलाफाने तयार झालेले जीवन संगीत साकारते. अग्नी प्रदीप्त करणाऱ्या गारगोट्यांचा एकमेकींवर घासल्यावर होणारा खर्रर्रर्र खटक स्वर असो की त्या अग्नीने पेट घेतल्यावर लपलपणाऱ्या ज्वाळांचा 'चट् चट्' असा स्वर असो. या प्रत्येक स्वरांनी सुरू होते एक नवी राग निर्मिती. आरोह अवरोहाची विविधप्रकारे साकारलेली एक स्वरनक्षीच! या नाद निर्मितीचा मग छंदच लागतो. प्रत्येक स्वर, ताल नकळत टिपला जातो. सूर्यपक्षाचे सादस्वर आणि सुतार पक्ष्याची 'ताल चक्री', हे निसर्ग संगीत उमजायला लागते अन इथे सुरू होतात 'भूपाळी'चे स्वर. त्या सुरांनी पहाट उगवते. पक्ष्यांची किलबिल, झऱ्यांची खळखळ, पानांची सळसळ, पाणवठ्यावर घडा भरायला आलेली 'बागेश्री' तील पैंजणांची 'पायल बाजे मोरी'ची रूणझुण, घटभरणीची 'बुडबुड'. त्याच वेळी त्या प्रवाहात कोणीतरी स्वतःला झोकून दिल्याचा 'धा तीनक धिं धा'! आणि मग सूर मारत पैलतीरावर पोहोचतांना उस्फूर्तपणे येणारा आनंदी चित्कार म्हणजेच सम!शेताकडे निघालेल्या बैलगाडीचा घुंगुरवाळ, शिवारातील मोटेचा फिरता 'चक्री'स्वर, नांगरतांना फाळाला लागलेला खण् चा नाद, तो सारून पुढे सलग सुरू झालेला स्वरविहार म्हणजे तिन्ही सांजेला थकल्या भागल्या क्लांत जीवाला शांत करणारा शांत रसाची अनुभुती देणारी 'हंसध्वनी'ची रागधून! अशावेळी घराघरातून ढणाणलेली चूल, कट् कट् होत तिच्या यज्ञात पडणाऱ्या समिधेचा स्वर, तापलेल्या तव्यावरचा भाकरीवर हात फिरवतांना उडणाऱ्या पाण्याची 'चर्रर् चर' भुकेलेल्या जिवांना दिलासा देणारा हा स्वर, तापलेल्या कंदिलाच्या काचेचा तडकणारा 'काचस्वर' असो की देवघरातल्या समईतील मंद ज्योतीची 'फडफड' आणि त्या बरोबरच ऐकू येणारे शुभंकरोतीचे 'कोवळे' स्वर!
काय हे तुम्हाला ऐकू येत नाहीयेत आता? का बरं?
आपणच तर या सुरेल संगीतापासून आपणा स्वतःला दूर नेलंय नं! का? कशासाठी?
नाव, पैसा, प्रसिद्धी या हव्यासाने आपल्याला या नैसर्गिक स्वराविष्कारांपेक्षा कृत्रिम संगीताकडे वळवलंय का? का आपणच हे स्वर आळवणे बंद केलयं? त्या आनंदाची किंमत आम्हाला कळलीच नाही का? हा वारसा आपल्याकडून जपला का गेला नाही? हे इतकं अवघड होतं का?
पहाटेची जात्याची 'घरघर', ओवीची सुरेल लकेर यापेक्षा रात्रभर पंख्याची 'घरघर' बरी वाटू लागली. मशीनची 'खडखड' आणि रेल्वेची 'धडधड'च आधुनिक जीवनशैलीची कृत्रिम स्वररचना होऊ लागली. एक एक सूर शांतपणे आळवत, त्याची आराधना करत त्याचा मागोवा घेण्याऐवजी त्याच्यामागे शर्यतीत धावतोय त्याप्रमाणे उरफुटेस्तोवर धावतच राहण्याची सवय. मग संपूर्ण दिवस घड्याळ्याच्या काट्यावर चालण्याची कसरत करून घेणारी ती 'टिकटिक'. ती देखील ऐकू येईनाशी होईपर्यंत! मग सगळं काही बधिर, सुन्न अवस्थेत, रस्त्यावरील रहदारीतील हॉर्न देखील दुसऱ्या हॉर्नशी स्पर्धा करत धावत सुटलाय. त्या कर्कश्श पॉम पॉम मधून, ब्रेकस् च्या कचकचाटातून कसंबसं स्वतःला वाचवत, सावरत एखादा जीव कपबशीच्या किणकिणीत, मुलांच्या कोलाहलात तर एखादा जीव दिव्यांच्या लखलखाटात, पडद्यांच्या सळसळीत आणि कर्णकर्कश्श संगीत(?) चालू असलेल्या 'पबलहरीं'ची हवा खात झिंगू पाहतोय! कुठे आहे ते सुरेल संगीत?
ज्या अंगाईने मनाची सहजावस्था पोसली जात होती, ज्या मंजुळ स्वरांनी पहाटेची मंगल सुरूवात सोनेरी किरणांनी होत होती, किणकिणणाऱ्या हिरव्या चुड्याने अंगणी सडा पडत होता. ज्या किलबिलाटाने अंगणातील झाडं, वेली शहारत होती. हे सगळं शहरीकरणाच्या, आधुनिकतेच्या वेडापायी कुठेतरी हरवलंय हे खरं! हे संगीत जपणारे एखादे मन, एखादे घर, एखादे गाव आता उरलंय का? की हे जीवन संगीत ऐकण्यासाठी, ही 'रागदारी' आळवण्यासाठी पुन्हा एकदा 'अरण्यवासी'च व्हावं लागणार आहे?
बहुतेक हे सगळं अनुभवण्याचा एक केविलवाणा प्रयत्नही होतोय. दोन दिवसाच्या 'विकएंड' मधून किंवा सेकंड होम, फार्महाऊसवर जाऊन. परंतु ज्याला अभिजात संगीताची ओढ आहे त्याला असे कृत्रिम रस, भावहीन वातावरण कसे रुचणार? त्याच्या आयुष्यातील हे जीवन संगीतच हरवलंय! मग रंगातदार मैफिलचा आनंद कसा घेणार? जीवन बहार तो कसा अनुभवणार?
हे प्रश्नचिन्ह मी असंच ठेवतेय!
विचार प्रत्येकाने आपापला करायचाय, उत्तर प्रत्येकाला विचार मंथनातून मिळणारच आहे. मला खात्री आहे की यासाठी प्रत्येकजण या गोष्टीची जाणीव झाल्यावर मनापासून झटणार आहे, कारण हे 'जीवनसंगीत' आपल्या आत्मानंदाचा विचार आहे. काय हवंय त्यासाठी काय गमवायचे? का जे हवंय त्यासाठी काय जपायचं? हे आत्मपरीक्षण व्हावं आणि आपापल्या 'संगीतविश्वाकडे' प्रत्येकाला पुन्हा वळता यावं यासाठी प्रोत्साहनपर हा लेखनप्रपंच!
कारण या संगीताचे घराणे हे आदिमाया, आदिशक्तीचे आहे. ते नावाजलेले तर आहेच पण त्याची आराधना करणाऱ्या प्रत्येकाला आत्मानंद देणारे आहे. याचा प्रत्येक स्वर हा हृदयाला जाऊन भिडतो. त्यातील पंचम्, षड्ज जीवन बहार खुलवतो. याचे कुठेही शिक्षण घ्यावं लागत नाही, तर ते मुक्त हस्ताने श्री शारदेने सर्व सृष्टीला दान केलेलं आहे. हे कुठे मिळेल त्याचा शोध मात्र ज्याने त्याने घ्यायचा आहे. त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यायचाय. आपल्या स्वतःच्या मैफिलीत रंग भरून, हा स्वरानंद सर्वदूर पसरवायचाय!
या स्वर लहरींची स्पंदने जाणवू लागली की 'शंकरा'तील नांदीने पुन्हा एकदा येईलच ती 'जीवन बहार'!
- शुभदा बर्वे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा