आनंद यात्री तुम्ही आणि आम्ही

ऋतुगंध वर्षा  वर्ष १३ अंक ३

'जगी सर्व सुखी असा कोण आहे! विचारी मना तूची शोधूनी पाहे .... समर्थांनी किती सहजपणे विचारलेला हा प्रश्न - अत्यंत अवघड आहे नाही?

नजीकच्या भूतकाळात जर डोकावून एखाद्याला तुला तू खूप आनंदात आहे असे कधी वाटले बरं, असा प्रश्न विचारला तर उत्तर कदाचित 'काही क्षणापूर्वी' असे येईल आणि त्याच प्रश्नाचे उत्तर कोणालातरी खरोखर 'केव्हा बरे?' असे बराच वेळ आठवण करून ही लगेच न सांगता येईल असे .. सर्व काही ज्याच्या त्याच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर तसेच मनाच्या स्थितीवर अवलंबून असते.

आनंदाची व्याख्या व्यक्तिगणिक बदलणार आणि त्याचप्रमाणे त्याचे निकषपण. मग सर्वाना एकाच पट्टीने आपण कसे आनंदी अथवा दुःखी ठरवायचे नाही का?

गेले काही दिवस ह्या विषयावर लेख लिहायला बसले की काहीही न सुचल्याने प्रयत्न सोडून दिला आणि आज काहीही करून लेखणीतून हा उतरवायचा असा निश्चय केला. कारण असे वाटू लागले की आनंद विषयावर काही भाष्य करण्यासाठी खरोखर माझे मन आनंदी असण्याची गरज आहे की काय ?

मी खरंच आनंदी आहे का? स्वतंत्र, चिंतामुक्त , बंधमुक्त जीवन म्हणजे आनंदी जीवन म्हणायचे का? का बंधनात राहून प्रत्येक भूमिकेत आपली जबाबदारी चोख पार पाडून कृतार्थ वाटणे म्हणजे आनंद? का काही दुसरेच काही ...

लहानपणी 'सुखी माणसाचा सदरा' नावाची एक गोष्ट मनाला खूप काही शिकवून गेली, प्रत्यक्षात सदरा अंगावर अस्तित्वात नसलेल्या, आणि आनंदात शीळ वाजवत बसलेल्या सुखी माणसाच्या सदऱ्याची आशा सगळ्यांनाच असते.

'तुझे आहे तुजपाशी' ह्या उक्तीप्रमाणे सुखाच्या शोधात, आनंदाच्या यात्रेवर निघालेले तुम्ही, आम्ही सर्व मर्त्य जीव, हे सुख कस्तुरी मृगाप्रमाणे आपल्याच ठायी दडलेले आहे हे मात्र विसरून जातो, अन बाह्य, भौतिक सुखाच्या जाळ्यात स्वतःच एखाद्या कोळ्याप्रमाणे अडकून पडतो असे वाटते.

सध्या पुण्यात पंढरपूरला निघालेल्या पालख्या आल्या आहेत, पांडुरंगाच्या ओढीने त्याच्या नामाचा जप करत निघालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर तो भाव दिसत असतो ना, त्यांच्या हृदयात उडत असणाऱ्या आनंदाच्या कारंज्याचे चित्र त्यांच्या मुखावर दिसत असते. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' ह्या ओळी त्यांच्या कडे बघूनच तुकारामांना सुचल्या असाव्यात का?

गेले काही आठवडे माझी आई माझ्याकडे राहायला आली, आईबरोबर कित्येक वर्षांनी सर्व दैनंदिन कार्यक्रम पार पाडत असताना थोड्या प्रमाणात का होईना पण बालपणीच्या सुखाच्या काळाची आठवण झाली, रोज शाळेला जाताना खिडकीतून डोकावून बघणाऱ्या आईला 'अच्छा' करून जातांना निश्चिन्त आणि खुशाल मनाने जात होते, परत येतांना आई घरी आहे ह्या जाणिवेनं कामाचा ताण जाणवत नव्हता, आनंदाची पर्वणी का काय म्हणतात ती कदाचित हीच असावी. ..

आनंदीपणाचे मोजमाप करणारी काही यंत्रणा यु एन ने निर्माण केली आहे म्हणे आणि त्या नुसार ते जगातील आनंदी देशाची प्रतवारी लावतात हे आपल्या पैकी बऱ्याच जणांना ठाऊक असेलच. ठराविक प्रश्नांच्या चौकटीत सुखाला आणि आनंदाला अडकवून त्याच्या जोरावर कुणाला तरी सर्वसुखी आणि कुणाला तरी दुःखी किताब देऊन ते मोकळे होतात ह्यात कितपत तथ्य आहे हे जाणून घ्यायला आवडेल मला.

मध्ये कुठेतरी वाचनात आले 'यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची आपण स्वतः' आवडले मला हे वाक्य. 'एवढे पुरे आहे' हा निर्णय असतो ठराविक आकडा अथवा पातळी नसते, जिथे समाधान आहे तिथे सुख आहे, त्यातच आनंद असतो.

शेवटी काय 'सुख पाहता जवापाडे' , असे म्हणतात मात्र मला वाटते की हे छोटे छोटे जवाप्रमाणे क्षुल्लक वाटणारे क्षण हेच खऱ्या आनंदाची शिदोरी असतात नाही?



रमा अनंत कुलकर्णी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा