दु:ख तो अपना साथी है

हाऊसबोटीच्या गवाक्षात मी उभा. सरोवरातील हिरवाळू लागलेल्या पाण्यात हलकेच उतरणारी संध्याकाळ, मिटणाऱ्या कमळकलिकांना कोणत्या शब्दात समजावत असेल या विचारात मग्न. देवदारी काष्ठगंधात माखलेला चिनारकाष्ठांचा करकरीत वास. चुबुकsचुबुक वल्ही हलवित सळसळणाऱ्या छोट्या तरफ-होड्या. चारही बाजूंनी स्वप्नांचा झगमगता जिवंत खच दिसावा तशा पाण्यावर संथ हलणाऱ्या बोटींकडे बघताना, माझा आत्मा त्या जलात हिंदकळू लागलेला. काही तासांपूर्वी मी ‘शहनवाझ’ वरच्या पापामियाँला विलक्षण धुंदीने हुक्का ओढताना बघितले होते... 'साऱ्या जगाला जणू स्वतःकडे खेचून घ्यावे' अशा तल्लफ उर्मीने तो उग्र धूर रासवटपणे खेचत होता... त्याचे डोळे, जणू विश्व कवेत घेतल्याप्रमाणे सुखासीन मिटलेले होते. अगदी दुपारपासून हिमपहाडातून इथवर निथळत आलेल्या शिरशिरीत गारव्याने आसमंत आकुंचलेला. एखाद्या शिल्पात आतून प्रकाश भरावा तशा दुतर्फा शुकशुकाटातही लुकलुकणाऱ्या हाऊसबोटी कुणाच्या तरी प्राणप्रतिक्षेत. तसल्या अर्ध-अंधारातही तरफ-होड्यांतून नित्याची संथ जा-ये करणाऱ्या, आणि लावण्याने ओतप्रोत काश्मिरी ललना... अजीजीने केशर विकणाऱ्या. मुघल गार्डनच्या अनोख्या पुष्पसंभाराचे गंधसत्व निपटून, अलवार इथवर वाहत आलेला केशरी सुगंधी वारा... आत सुखासीन नजर टाकावी तर खानदानी लोलक झुंबरातून निथळणारे आसक्त प्रकाशकिरण... त्यांना साक्षी ठेवूनच तर स्वर्गसुखाच्या चरणसीमेला मी स्पर्श करून आलो होतो, काही क्षणांपूर्वी... अतीव सुखाने ग्लानी यावी तशी ती, अद्याप तिच्याच धुंदीत डोळे मिटून शयनमंचावर... मला वाटले, एखाद्या सुखाच्या तरल स्वप्नचित्रांचा आस्वाद घेता घेता आपण त्या स्थिरचित्राचाच एक भाग होऊन गेलो आहोत. अन त्याच... त्याच... बेसावध क्षणी फार दुरुन साद आल्याप्रमाणे त्या अज्ञात प्रदेशात स्वरलहरी आसमंतातून तरंगत आल्या...

दुःख तो अपना साथी है...
ssराही मानवा दु:ख की चिंता क्यू सताती है... दु:ख तो...

माझ्या स्वर्गसुखात तरंगणाऱ्या आत्म्याचे टोक कुणी वेगाने खेचावे, तसा मी सैरभैर झालो... त्या साऱ्या चित्राशी या ओळी विसंगत होत्या म्हणून नव्हे... तर अतीव सुखाच्या परमोच्च क्षणीच, माणसाला दुःखाच्या गर्तेत कोसळण्याची आशंका भेडसावू लागते... रफीच्या त्या आर्त स्वरांनी मी इतका व्याकुळ झालो की माझ्याही नकळत मी त्या सुरांना... स्वरांना स्पर्श करून बघण्यासाठी कासावीस झालो. म्हणजे माझा वेध घेत, इथवर आलेल्या त्या मोहिनीस्वरांनी मला जाणवले होते ते इतकेच की... या स्वप्नचित्राची रेखीव चौकट परिपूर्ण करण्याचे सामर्थ्य, त्या दर्दभऱ्या गीतातच आहे. सुख-दु:खाला स्पर्श लाभतो-मानवतो तो असा... मी स्वत:ला पूर्ण विस्मृतीत ढकलून दिले आणि आणि स्वत:चा शोध घेऊ लागलो. एका विशाल अंतराळात आपण एखादया स्वरपिसाप्रमाणे तरंगत आहोत, असा अनुभव त्या ओळी गुणगुणताना मला आला. पृथ्वीच्या नंदनवनात मी ऐन सांध्यसौंदर्यक्षणी गुणगुणत होतो... “दु:ख तो अपना साथी है” पाठीमागून माऊथ ऑर्गन आर्तविव्हळ विलापस्वरांनी ह्दयाला धडका मारतोय. मी डोळे मिटून घेतले नि क्षणात केवढी कल्पांताची प्रदक्षिणा मारुन आलो मी...एखाद्या स्वरांत अशी आयुष्यात परिक्रमा घालण्याचे सामर्थ्य एका पर्याप्त क्षणी प्राप्त झाले की आपण आपले आस्तित्व त्या स्वरांच्या स्वाधीन करत मी म्हटले... “गर्भवती” लिहिताना... पुढे कधी तरी...

गर्भवतीचे जड पाऊल ते
वाहतात जोडवी
दुःख तळाशी जाता जाता
सुखास ये पालवी

या अंतिम ओळीपाशी मी सुख-दु:खाचे अद्वैत वैर बघून धास्तावलो... दु:खाला तारण ठेवण्यासाठी सुखलोलुप व्हायचे कि, सुखाला गहाण ठेवून दु:खव्याकुळ व्हायचे हे नेमके ठरविता न आल्यासारखे... खरे तर “स्वान्तसुखाय” पेक्षा “स्वान्तदु:खाय” लिहिणाऱ्या, अशा माझ्यासारख्याला असा पेच अभिप्रेत नव्हताच. सुखाच्या माझ्या संकल्पना फार वेगळया आहेत... सुख ते काय, असे कुणाला दुसऱ्याचे वाईट चिंतून, इतरांचे दु:ख बघून फार सहज प्राप्त होते !. इतकेच कशाला तर मांडी खाजवण्यात, नखांवर उवा चिरडून मारण्यात,‍ रिकाम्या मुखात जिव्हा घोळवून दातांच्या फटीत अडकलेला डेख उपसण्यात... या व अशा किती तरी गोष्टींमध्ये सुखाचे पोकळ क्षण शोधणाऱ्यांची या जगात कमतरता नाहीच. सुखी होऊ इच्छिणाऱ्याला दु:खी माणसांतच वावरावे लागते, तेव्हाच तो स्वतःला खऱ्या अर्थाने सापेक्षतेनुसार सुखी मानू शकतो.

भलत्या सलत्या लहान आणि सुक्ष्म वेदनांना माणूस दुःख समजून कवटाळतो... चिंधीला पैठणी समजण्याची गल्लत करतो. दुःख कसे भरजरी वस्त्रासारखे असते- किंबहुना ते तसेच असावे... त्या वैभवी दुःखाला कोणाची दृष्टही लागू नये... प्रत्येक विदुषकाच्या विनोदी चाळ्यांच्या तळा-मुळांशी नीट शोधा... सगळे दिसेल तुम्हाला तिथे...

हिमखंडांना स्पर्शून इथवर आलेली माऊथ-ऑर्गन आणि व्हायोलीन यांची आर्त जुगलबंदी ऐकलीय मी... माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक बिंदूरेषेवर दु:ख-धुमारे फुलविणारी... गीताची लकेर संपली तसा मी भानावर आलो... डोळयासमोरचं गडद धुके विरळ होऊ लागले आणि ते स्वप्नचित्र लख्ख डोळयांनी माझ्याकडे बघू लागले. विस्तीर्ण अशा दल-सरोवरात स्फुंदत, रिक्त व निमूट उभ्या असलेल्या कितीतरी नक्षीनकाशी हाऊसबोटी बघून, माझ्यातली दु:खाची हावरी नस जागी झाली. खानसाम्याची हाक फार दुरुन... सप्तक्षितिजाकडून आल्यासारखी भासत होती. श्रुतीनक्षत्रांच्या एका भव्य पटलावर मी उभा आहे, या जाणिवेने मी इतका मोहरुन गेलो होतो की, माझ्याकडे विस्मयाने बघणारा... निळे केशरफुल चोचीत धरणारा लाल मधस्वरांचा बुलबुल, हाऊसबोटीवरच्या छतावरुन माझ्याकडे बघतोय हे माझ्या ध्यानातही आले नाही.

गुलमर्गला मी शिल्पगोठ अवस्थेत असताना... त्या स्वच्छ नितांत आसमंतात, नुकताच सोलून निथळत ठेवलेला माझाच जीवश्च आत्मा... आता या क्षणीही तोच तो, बुलबुल स्वरुपाने माझ्याकडे तावून सुलाखून पाहत असेल... सुख-दुःखाची अस्तरपुटे गळून पडलेला, स्वच्छ केवळ आत्मा... निर्विकार आत्मा...

दुःखा, माझ्या परममित्रा, दुखावले गेलेले सुख आता माझ्यासमोर उभे राहून माझी मनधरणी करते आहे रे... सुखाला झिडकारण्यात मला मिळणारे सुख मी कसे नाकारू हे मलाही समजत नाहिये... आणि आपले दुःख म्हणजे तरी काय? आपल्या माणसांचे दुःख ते आपले दुःख.

चंद्रशिंपणीचा खेळ करत रात्र चढत चालली आहे. आता समोरून दोन मधुचंद्रिका गेल्या... गुलछबी प्रणयी आणि बहुधा नवपरिणीत जोडप्यांना बेहोष मिठीत ढकलून होड्या चुबुकsचुबुक चालत गेल्या... आणि शेवटी मी तरी वेगळे असे काय करतोय? या आसमंतात तात्पुरते वावरणाऱ्या प्रत्येकालाच स्वर्ग हाताशी आल्याचा आभास अपरिहार्यच... पण त्याच त्याच क्षणी इथले नितांत दारिद्र्य... सौंदर्यागुंठीत गरिबी बघून काळजात कालवाकालव होते... All happy families are alike; but every unhappy family is unhappy in its own way...

वेगळ्या भाषेत आईकडून मिळालेली एक संथा अशी होती,

मी आणू कुठूनी उसने
अवसान असे रे बाळा
मज ज्ञात नव्याने झाले
दुःखाचा कोळसा काळा

हे मनोमन पटल्याप्रमाणे हाऊसबोटीच्या डेकवर उभा असूनही मला का कोण जाणे... पण वाटले... एका विशाल निळ्या पाराखाली आपण उभे आहोत... चिनारवृक्षाला पार नसतो हे ज्ञात असूनही असे वाटले खरे.

पारावर घेऊनी येई पारंबी एक उदासी
चांदण्यांच्या फेसामधुनी तम वेगाने तळाशी
कोणत्या ज्वराने दुःख हृदयास सामोरे जाई
अन पाण्याने मेघांचे व्हावेच कसे उतराई

सुखाने दुःखाचे आभार कसे मानायचे? उतराई कसे व्हायचे? या प्रश्नांना माझ्याजवळ उत्तर नाही. सुटकेचा मार्ग माझ्यासमोर आहे. श्वासात केशरगंध पेरुन व अंगांगांना बेहोष करणारा तो देवदारी पाईनचा उबदार स्पर्श मला आठवतोय... “ती” माझी केव्हाचीच वाट बघतेय... प्रश्नोत्तरांचीदेखील एक वेळ असते... हि ती नव्हे... मग “दुःख तो अपना साथी है...” गुणगुणत समजुतदारपणे मी पुन्हा नव्याने नव्या सुखाकडे वळालो....

तर शेवटी माझ्या प्रिय दुःखा...

माझ्या सर्वसुखी आयुष्याला तीट लावण्यासाठी का होईना, तुला शोधतोय मी प्राणपणाने... कारण मला नीटच माहितीय... कि... माणसाचे अतीव सुख नियतीला-दैवाला कधी पाहवत नाही... सुखाच्या शिखरासमोर दरीच उभी असते कि...

तुझ्याशी एकदा बसून गप्पा मारायच्यात... ‘समझोता गमों से कर लो’ च्या धर्तीवर जमलाच तर एक अंतःस्थ करारदेखील करायचाय तुझ्याशी... माझ्या हृदयमंदिरात ते कलम करायचेय... कारण, आजवर माणूसपण-माणुसकी जिवंत ठेवलीय ती फक्त दुःखानेच... हृदय प्रत्येकालाच असते, पण दुःख तुम्हाला सहृदय बनवते. सुख माणसाला नेहमीच बेसावध ठेवते, पण दुःखात माणूस सतर्क होतो.

पण मी तर आजवर नेहमी आव्हान देत आलो त्या दैवत्वाला... माझे दुःख पाहून अनावर दुःखाने शोकावेग करणाऱ्या त्या दैवाला मी समजावतो,

मंदिरात आहे बसुनी
दुःखाचे कासव दगडी
रडतोस कशाला देवा
मी हसतो आतून अगदी...

कारण मला दुःख असलेच तर एकाच गोष्टीचे आहे की,

The real tragedy is,
Nobody knows the real tragedy.

महेश आफळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा