ऋतुगंध हेमंत वर्ष १२ अंक ५
नमूनी नटवरा आता पसारा आवरा /नाचता येईना अन् सूर पण लागेना!
“नमस्कार मंडळी. प्रेक्षागृहात काहीही खाण्याची वा पिण्याची परवानगी नाही ह्याची नोंद घ्यावी. तसेच आपल्या मोबाइल फोन्सचे आवाज बंद करावे.” ह्या असल्या भाषेत शेकडो लोकांना ताकीद देण्याची संधी काय रोज मिळते होय! एरवी, घरी मुलं, कामावर सहकर्मचारी, झालच तर हाॅटेलात वेटर किंवा अगदी टॅक्सी ड्रायवर, यांतलं कुणीही आपलं ऐकत नसतं. (हा शेरा समस्त विवाहित पुरुष वर्गासाठी आहे, हे वेगळं सांगायला नको!)
असो, तुम्ही माझं ऐकायचं, म्हणजे वाचायचं, थांबवण्याआधी मूळ मुद्द्यावर येतो.
तर नुकताच महाराष्ट्र मंडळाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी ‘मर्मबंधातली ठेव ही’ हा नाट्यसंगीत, भरतनाट्यम व कथ्थक नृत्याचा एक दिमाखदार कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात निवेदक म्हणून वरील सूचना जाहीर करायची संधी आपला कृपाभिलाषी यास मिळाली.
नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाची कल्पना काही काळ मंडळात फिरत होती. पण ती अमलात येईपर्यंत त्यात भरतनाट्यम व कथ्थक नृत्याचा समावेश झाला.
म्हणजे कोमल मध्यम वगैरे स्वर लावायचा नाहीच; थेट काळी सात! विचार करा, ४ मराठी माणसं एकत्र येऊन (स्त्रिया म्हटलं तर... जाऊ द्या ना) एक साधा कार्यक्रम करणं म्हणजे एक दिव्य, मग त्यात गायक, वादक, नर्तकांची भर टाकली तर अशक्य कोटीचं काम! म्हणजे कुठल्याशा मोठ्या राष्ट्राच्या खाक्यात मंडळानेही आरोळी ठोकली, “येस, व्ही कॅन!!”
मंडळात प्रतिभेची कमी मुळीच नाही पण नाट्यसंगीत हा एक औरच प्राणी आहे.
आता हेच पहा ना. कार्यक्रम करायचं ठरलं तेव्हा नाट्यगीतांची यादी तयार करण्यात आली. एक ना दोन, तब्बल पाचशे गाणी निघाली! मग सार्वमताने.. अहो, खोटं नाही बोलत आहोत. खुद्द महाराष्ट्र मंडळात सार्वमताने गाण्यांची संख्या कमी करण्यात आली व ती यादी ५० वर आली. पण ५० गाणी देखील फार होती. मग आणिक हाणा-माऱ्या, म्हणजे चर्चा हो, झाल्या आणि २० गाणी निवडली गेली. हुश्शं!
पण गाणी कोण गाणार? आपल्याला माहितच आहे मंडळाचा व सदस्यांचा उत्साह. असो... १६ गायक गळा काढायला तयार झाले. म्हणजे अनेकांना ‘इकडून’ सागणं झालं ना: “अहो, ते जोशी (सुरक्षा हेतू नाव बदललं आहे) पुन्हा मंडळाच्या कार्यक्रमात मंचावर येतायत म्हणे.” ह्या अशा उद्गाराला सुरक्षित असं उत्तर नसतच. म्हणून ‘हे’ उत्तरले असतील, “आय सी, आय सी”. तर ‘इकडून’ तडाखा: “तुमच्या ‘आय सी, आय सी’ ची मजल फक्त ‘एन.टी.यू.सी’! भोपळा नुसता. जा जरा, प्रयत्न करा आॅडिशनला.”
थेंबे थेंबे तळे साचे
सौं च्या तालावर श्री नाचे
असे ‘इकडून तिकडून’ गायक रूपी थेंब जमा झाले व कार्यक्माचा नाला, माफ करा, प्रवाह वाहू लागला. आता सगळे गवई गांधर्वीच, पण जरा परंपरेसाठी तरी तबलजी, पेटीवादक हवेतच ना. बडवत बडवत, म्हणजे गळ घालत घालत, त्यांनाही जमवले गेले.
सुदैवाने नाचातल्या मंडळींनी निवडीची जोखीम मंडळाला दिली नाही आणि नृत्यांगनांची थेट यादीच सादर केली. हुश्शं नंबर २.
बरंररर... “मंचावर गायक पुढे का नर्तक?” पुढचा पेच. छे छे, पुढे पुढे करायचं म्हणून नाही हां. केवळ मंडळाच्या काळजीने कलाकारांना हा प्रश्न पडला. म्हणजे असं की जर त्यांची थोबाडं... पुन्हा माफी... त्यांचे चेहरे मंचावर सुस्पष्ट दिसले नाहीत तर मंडळाला कळणार नाही ना फेसबुकवर कुणाला टॅग करायचं ते... (हो का रे, टग्या?!). तसं झालं तर जगाला कळणार नाही मंडळात यंदा कुणाचं ‘चालतय’... अहो, “द कन्ट्री वाॅन्ट्स टू नो”!
मंडळाची निर्णायक सूचना: “सुरूवातीच्या नांदीला सर्व गायकांनी मागे उभे रहा, पुढे नृत्य होईल. नंतरच्या गाण्यांना गायक व नर्तक पुढे येतील, असे नर्तकींच्या बाजू-बाजूला.”
एवढ्यात तांत्रिक प्रश्न येतो:
गवई: “नर्तकी कोण कोण आहेत, हो?”.
मंडळाचं उत्तर, “ओ गवई, सोडा आता ह्या लंपट सवई”.
गवई: “नाही, मी आपलं माहितीसाठी...”
मंडळ: “अहो बाजीराव, होणार का चांगी-राव?”
गवई: “काय जोक करता ना तुम्ही. राहू द्या. हॅहॅहं...”
तर मंडळी, अशा निष्ठेने तालमी सुरू झाल्या आणि “तू आधी लाव... सूर; मला उशीर होतोय”, तसच, “प्रत्येक नाचात तीच का पुढे? कथ्थक काय नाच नाही का?” प्रत्युत्तर: “भरतनाट्यम नावातच नाट्य पण आहे. आम्हीच पुढे!”... अशा प्रेमळ विचारांच्या देवाण-घेवाणीत दिवाळी आणि ‘मर्मबंधातला’ कार्यक्रम एका आठवड्यावर येऊन थबकले.
रंगीत तालमीची वेळ. नेहमीच्या शाळेनेच प्रेमाने प्रेक्षागृह देऊ केले पण बाकी व्यवस्था?!
शाळा: “अहो, काॅलर माइक्स कशाला हवेत. एरवी गणपतीत मागता का ?!”
मंडळ: “अहो, नाट्यसंगीताचा कार्यक्रम आहे. काही गाण्यांत गायकांना हालचाल आहे, थोडं नाट्य आहे. हाती माइक धरून कसं व्हायचं?”
शाळा: “ठीक ए, ठीक ए. बघतो काय जमतय ते”.
अशा ह्या जत्रेवर त्या नटेश्वर शिवशंकारालाच काय ती दया आली असणार आणि सोहळा कसाबसा पार पडला: चाफेकळी फुलली काय, ऋतुराज वनी आला काय आणि सर्वत्र नंद वन आनंदी आनंद झाला!
तळ टीप:
इथवर वाचलत याबद्द्ल धन्यवाद. हे वर्णन पूर्णत: काल्पनिक असून आपल्या कर्मणुकीसाठी प्रस्तुत केले होते. मंडळाचाच कार्यक्रम तो; कसा होणार? जणू ‘मर्मबंधातली ठेव ही’ !
- केशव पाटणकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा