मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उमटत असतात. कधी आसपासचा निसर्ग, माणसे, घटना, वस्तू ह्या कारण असतात तर कधी आठवणी!
हे तरंग शब्दांत उतरवता येतील का, ह्याचाच ध्यास प्रत्येक लिहू पाहणाऱ्याला असतो. कधी ते जमल्या सारखे वाटते, तर कधी शब्दांत उतरेपर्यंत भावनांनी वेगळेच वळण घेतलेले असते.
ह्या भावनांविषयी, त्या निमित्ताने स्वतःशी होणाऱ्या संवादाविषयी वृंदा टिळक लिहिणार आहेत, आपल्या 'स्वगत' ह्या सदरात!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मन करा थोर !
काही वर्षांपूर्वी माझे एक घड्याळ हरवले. मी फार हळहळले. ती हळहळ केवळ ते घड्याळ सोन्याची डायल असलेले, मौल्यवान खडे जडवलेले होते म्हणूनच नव्हती, तर ते फार प्रेमाने, भेट म्हणून मिळालेले होते म्हणूनही होती. खूप वाईट वाटले. स्वतः ला वारंवार दोष दिला. नंतर कितीतरी दिवस दुसरी घड्याळे घालताना हरवलेल्या घड्याळाची आठवण, हळहळ, परत स्वतःला दोष असे चक्र चालूच राहिले. माझ्यासारख्या सामान्य माणसांची अशीच असते प्रतिक्रिया.
हे तर झाले वस्तू हरवण्याबाबत. पण थोडक्यात ट्रेन वा बस चुकली तरी हळहळ वाटते. मन लगेच
तोपर्यंत केलेली कोणती कृती केली नसती तर वेळ वाचला असता आणि हि ट्रेन मिळाली असती हा हिशेब करते. मग आठवतो शब्द, "मुदा ". ती एक जपानी संकल्पना आहे . मुदा म्हणजे कुचकामी असणे ,निरुपयोगी असणे, उधळपट्टी करणे . मोठाल्या कंपन्यात हि संकल्पना वापरून कुठे आपल्याला वेळ, संसाधने वाचवता येतील आणि फायदा वाढवता येईल ह्याचा विचार केला जातो. कुठे आणि कशी उधळपट्टी, नुकसान टाळता येईल ह्याची यादी मोठी आहेच. पण वैयक्तिक आयुष्यात मला त्यातील काही गोष्टी फारच महत्वाच्या वाटतात. त्या आहेत, unused skills, confusion आणि self doubt.
माणसाचे मन आणि आयुष्य कुरतडणाऱ्या ह्या तिन्ही गोष्टी. किती आयुष्य, सकारात्मकता आणि उमदेपणा पाहता पाहता खाउन टाकतात. वेळोवेळी ह्या तिन्हींचा सामना करायला लागतोच. काही हरवले, आजारपण आले, प्रियजनांचा वियोग सहन करावा लागला कि ,"हे माझ्याच बाबतीत का? मीच का?" हि प्रतिक्रिया मनात उमटते. त्या विषयी एक चांगला विचार मध्यंतरी वाचनात आला कि तुझ्याच बाबतीत हे घडते कारण तू त्या दुःखावर ,संकटावर मात करू शकतेस म्हणून! आपल्याबाबत "त्या" ला असा विश्वास वाटला ह्या विचाराने देखील अंगात खंबीरपणा येतो. मनोबल वाढते. संकटाशी दोन हात करायचे सामर्थ्य अंगी येते.
काही जण दुःखावर मात करुन उभे राहतात. नुसते तेवढेच नाही, तर आत्मविश्वासाने त्या आपत्तीला एक सकारात्मक रुप देऊ शकतात. एक गोष्ट ऐकली होती.. साधारण अठराशे ऐंशीच्या काळातली.
एक साधे कपडे घातलेले प्रौढ जोडपे हार्वर्ड विद्यापीठात, अध्यक्षांच्या भेटीसाठी वाट पाहत बसले होते. खूप वेळ थांबल्यावर भेट झाली. ते अध्यक्षांना म्हणाले कि आम्ही ह्या विद्यापीठासाठी, आमच्या मुलाच्या स्मरणार्थ काहीतरी करू इच्छितो. त्यांचे कपडे आणि एकूण अवतार पाहून अध्यक्ष त्यांना म्हणाले कि तुम्ही काय करणार? विद्यापीठातील इमारती बांधायला आणि रोजचा कारभार चालवायला किती खर्च लागतो ह्याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? असे म्हणून त्यांनी खर्चाचा आकडा सांगितला. कथा पुढे असे सांगते कि आकडा ऐकल्यावर त्या बाई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या,” एवढाच खर्च येत असेल तर मग आपण वेगळे विद्यापीठच स्थापन करू या ना” आणि स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.
हि कथा कपोलकल्पित असू शकते, बहुतेक आहेच. पण स्टॅनफर्डस दांपत्याने, टायफॉईडने गेलेल्या आपल्या मुलाच्या स्मरणार्थ, आठ हजार एकरांच्या भूखंडावर, स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना केली हे शंभर टक्के सत्य आहे.
आपला एकुलता एक मुलगा गेला म्हणून नुसते दुःख करत न बसता, सर्व मुले आपलीच आहेत असे समजून त्यांच्या शिक्षणाची सोय करणारे स्टॅनफर्ड दाम्पत्य unused skills, confusion आणि self doubt ह्या तिन्ही ‘मुदां’वर मात करताना दिसते! आत्मविश्वासाचे हे रुप अतीव आदराला पात्र असेच! मानवता आणि संस्कृतीवरचा विश्वास दृढ करणारे. आज स्टॅनफर्ड विद्यापीठ संशोधनाची, नव कल्पनांची, अनेक मातब्बर कंपन्यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध झाले आहे. जग बदलणाऱ्या अनेक गोष्टी तिथल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत, करत आहेत.
“त्या” ने आपल्या खंबीरपणावर ठेवलेला विश्वास सार्थ करत, परिस्थितीशी दोन हात करून, शिवाय इतरांच्या उपयोगी पडणारे अनेक जण आपल्याला आजूबाजूला दिसतात. डोळे उघडून पाहायला मात्र हवे.
स्वतः:चे मन किती विशाल होऊ शकते, ह्याचे एक उदाहरण तर नतमस्तक करणारेच. लहानपणीच आईवडील गेल्याने आलेले पोरकेपण. आईवडील असतानाच काही कारणांनी सहन करायला लागणारा आत्यंतिक सामाजिक विरोध आणि बहिष्कार त्यांच्या मृत्यूनंतरही संपलेला नाहीच. तसाच आणि नेहमी सहन करायला लागला. वाट्याला सतत आली अवहेलना, उपेक्षा आणि तिरस्कार. कितीदा प्रायश्चित्त घेऊनसुद्धा समाज-मान्यता नाहीच. अशा परिस्थितीत कोणीही कडवट, निराश, बंडखोर झाले असते. समाजाचा तिरस्कार करायला लागले असते; पण हे पाणीच वेगळे होते. त्यांनी स्थापना केली भक्तिमार्ग सांगणाऱ्या वारकरीसंप्रदायाची. शिकवले सगळ्यांना प्रेम करायला, सहृदय राहायला. शिकवले अद्वैत तत्त्वज्ञान. स्वतः ला आलेल्या अतोनात वाईट अनुभवांनंतरसुद्धा लिहिला तो अमृतानुभवच. संस्कृतातील गीतेचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना कळावे म्हणून प्राकृतात आणले.
समाजाने दिलेले सगळे विष पचवून, समाजाला परत दिला तो अमृत कुंभ, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी! विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले अशी मनोवस्था असल्याने, स्वतःसाठी काही न मागता, 'त्या'च्याकडे मागितले काय तर, ”भूतां परस्परे मैत्र जडो” आणि “जो जे वांछील तो ते लाहो!” .ज्ञानेश्वरांचे अवघे एकवीस वर्षांचे आयुष्य मला एखाद्या अद्भुत चमत्काराप्रमाणे वाटते. त्यांच्या आयुष्यातील पहिला भाग जणू सर्वसामान्यांना हे दाखवायलाच, की हालअपेष्टा कोणालाच चुकल्या नाहीत आणि दुसरा भाग ह्यासाठी की सर्व दुःखांवर मात करून मन बुद्धी किती विशाल होऊ शकते! संपूर्ण विश्वाला जणू त्यांनी आपल्या कवेत घेतले. ज्ञान दिले ते देखील अत्यंत ऋजुतेने, कोमलपणे, प्रेमाने. उगीच नाही त्यांच्या नावापुढे ‘माउली’ हा शब्द जोडला जात! आकाशाच्या पार जातानाही त्यांनी वर्षाव केला तो कैवल्याच्या चांदण्याचा! शांतीचे, विश्वकल्याणाचे मागणे मागणारे ज्ञानेश्वर विश्वास दृढ करतात दुःखावर मात करता येण्याचा, मन विशाल करता येण्याचा!
समाजाने दिलेले सगळे विष पचवून, समाजाला परत दिला तो अमृत कुंभ, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी! विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले अशी मनोवस्था असल्याने, स्वतःसाठी काही न मागता, 'त्या'च्याकडे मागितले काय तर, ”भूतां परस्परे मैत्र जडो” आणि “जो जे वांछील तो ते लाहो!” .ज्ञानेश्वरांचे अवघे एकवीस वर्षांचे आयुष्य मला एखाद्या अद्भुत चमत्काराप्रमाणे वाटते. त्यांच्या आयुष्यातील पहिला भाग जणू सर्वसामान्यांना हे दाखवायलाच, की हालअपेष्टा कोणालाच चुकल्या नाहीत आणि दुसरा भाग ह्यासाठी की सर्व दुःखांवर मात करून मन बुद्धी किती विशाल होऊ शकते! संपूर्ण विश्वाला जणू त्यांनी आपल्या कवेत घेतले. ज्ञान दिले ते देखील अत्यंत ऋजुतेने, कोमलपणे, प्रेमाने. उगीच नाही त्यांच्या नावापुढे ‘माउली’ हा शब्द जोडला जात! आकाशाच्या पार जातानाही त्यांनी वर्षाव केला तो कैवल्याच्या चांदण्याचा! शांतीचे, विश्वकल्याणाचे मागणे मागणारे ज्ञानेश्वर विश्वास दृढ करतात दुःखावर मात करता येण्याचा, मन विशाल करता येण्याचा!
वृंदा टिळक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा