परवाच राजश्री लेले हिचा निरोप आला आणि तिने सांगितले की पुढच्याच महिन्यात सिंगापुरचे महाराष्ट्र मंडळ रौप्यमहोत्सवाची सांगता करीत आहे. त्या निमित्ताने सिंगापूरला एक शानदार सोहळा आयोजित करीत आहे. खरं सांगू? जरा चुटपूटच लागली मनाला. कारण मी आत्ता या क्षणाला सिंगापूरला आहे आणि १८ जुलैला मायदेशी परतणार आहे. जरा आधी कळलं असतं ना! तर तो सोहळा “याचि डोळा” बघूनच गेले असते. असो. आता मात्र ती चुटपूट मनात ठेवूनच परतावे लागणार...
पण मित्रांनो !अशी चुटपूट मनाला तेव्हाच लागते ना, जेव्हा काही प्रेमबंध जुळून आलेले असतात. तसेच माझे आणि या संस्थेचे स्नेहबंध, प्रेमबंध जुळून आले आहेत. जेव्हा जेव्हा मी सिंगापूरला आले, तेव्हा तेव्हा मला या संस्थेने प्रेमच दिले. इथे आयोजित केलेलं अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे “विश्व संमेलन” असो, “अनन्वय”चे बहिणाबाई चौधरी, कवी बा. भ. बोरकरांवरील कार्यक्रम असोत, “शब्दगंध”च्या कवितेच्या बैठकी असोत, “नुक्कड” कथांचे अभिवाचन असो, “मंथन”चे कार्यक्रम असोत, आणखी कितीतरी उल्लेख करता येतील. पण हे सर्व कार्यक्रम सादर करण्याची संधी मला मंडळाने दिली. त्यामुळेच इथले कवी, लेखक, गायक, वाचक आणि रसिक श्रोते यांच्याशी प्रेमाची देवघेव करता आली आणि हा भावबंध गहिरा होत गेला. त्याबद्दल प्रथमत: सर्वांचे मन:पूर्वक आभार!
याच प्रमाणे आणखी एक सुवर्ण संधी मिळाली ती या मंडळाच्या “ऋतुगंध” या द्वै मासिकात लेखन करण्याची. “कवी शब्दांचे ईश्वर” ही दूरदर्शन मालिका करतानाचे कवींचे आणि त्या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी आलेले अनुभव मला या मासिकातून तुमच्यापर्यंत पोहोचवता आले. ते तुमच्याप्रमाणेच अनेकांना आवडले. तशी पोचपावतीही मला मिळाली आणि ऋतुगंधाच्या लोकप्रियतेचाही प्रत्यय आला. ऋतुगंधचा अंक इतका दर्जेदार निघतो की सगळेच त्या अंकाची उत्सुकतेने वाट पहात असतात. महाराष्ट्रातीलच नाहीत तर सर्व जगातील वाचक या अंकाचे भरभरून स्वागत करतात. ग्रीष्म, वसंत, शरद ,शिशिर, हेमंत इ. साऱ्या ऋतूंचे आगमन रंग, रूप, गंधाश या अंकात अवतरते आणि आपली मने त्या ऋतूंच्या सोहळ्यात न्हाऊन जणू तृप्त होतात. या अंकातील ललित लेख, कविता, कथा, मुलाखती, माहितीपर लेख, सिनेसफर ... सारी सारी सदरे वाचनीय आणि ती लिहिणारे लेखक, लेखिका कसदार लेखन करणारे. यासाठी आत्तापर्यंत झालेल्या सर्वच संपादकांचे, संपादक मंडळांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.
आता या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने “ऋतुगंध” चा पहिला छापील अंक प्रकाशित होत आहे. त्यासाठीही मंडळाचे त्रिवार अभिनंदन! आणि संपादक आणि संपादक मंडळाला मन:पूर्वक शुभेच्छा! गेली तेरा वर्षे सुरू असलेला हा “साहित्य सोहळा” असाच दीर्घ काळ सुरू राहो आणि सर्वांच्या प्रतिभेला सुंदर धुमारे फुटोत ही सदिच्छा! या निमित्ताने आणखी एक सुचवावे वाटते. या पुढील “ऋतुगंध” दृक-श्राव्य अंकही काढता येणे तुम्हाला अगदीच शक्य आहे. त्यामुळे ज्यांना वाचण्यात कोणत्याही कारणाने अडचणी येत असतील, त्यांनाही अंकाचा आस्वाद अगदी मनमुराद घेता येईल.....असो...तूर्तास पुन्हा शुभेच्छा देते आणि थांबते.
- माधवी वैद्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा