आजोबांची ओसरी - दु:ख आणि निराशेची भुतावळ

आजोबांची ओसरीवरील गोष्ट ऑडिओ स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा:

निराशा. माणसाचे सगळ्यात जास्त नुकसान करणारे भूत! आपल्या कामात अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत की हे भूत आपल्या भेटीला येतेच. ते टाळता येत नाही. पण निराशा नावाच्या या भुताला बघता क्षणीच बाय बाय करून दूर पाठवून द्या. एकदा का निराशा बोकांडी बसली, की माणूस जणू पांगळाच बनून जातो. त्याला खात्री पटते की यश मिळणारच नाही. अशाच विश्वासाने तो सगळी कामे करतो. आणि मग खरंच, त्याचे कुठलेच काम धडपणे होत नाही. हे भूत सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखे घट्टपणे माणसाच्या मानेवर बसून त्याला आपला गुलाम बनवते. माणूस कुचकामी बनतो. इथेच हे थांबत नाही. निराशेचे भूत आपल्या इतर गोतावळीला म्हणजे दु:खांना बोलावते. ही भुतावळ माणसाच्या आयुष्यातील आनंद संपविते. 

हे टाळायचे असेल तर सोप्पा उपाय आपल्या हातात असतो. दु:ख आणि निराशा या भुतांना चार हात दूरच ठेवायचे. दु;ख शारीरिक असेल तर ते डॉक्टरी उपायांनी बरे किंवा कमी तरी होऊ शकते. पण दु:ख जर मनात तयार झाले असेल तर त्याचा इलाज तुमच्या मनानेच तयार करायला हवा नां? निराशा हे केवळ आणि केवळ तुमच्या मनातच तयार होणारे भूत असते! आपल्या मनावर केवळ आपल्या विचारांचे नियंत्रण असते. हे विचार नेहमी चांगले म्हणजे सकारात्मक ठेवणे आवश्यक असते. आनंदी विचार येण्यासाठी आनंदी वातावरणात रहायला हवे. चांगले वाचायला हवे, चांगले बघायला हवे. चांगल्या मित्रांची संगत ठेवायला हवी. वाईटामधून चांगले कसे निर्माण करता याचा विचार करायला हवा. आपल्यापुढे कोणते पर्याय आहेत ते तपासून चांगले घडेपर्यंत सतत प्रयत्न करायला हवे. याची सातत्याने जाणीव ठेवून वागले तर दु:ख आणि निराशा ही चार हात दूर नक्कीच रहातील. 

तुम्ही मॅालमध्ये गेलात तर लहान मुलांना खेळण्यासाठी राईड्स किंवा खेळांगणे दिसतील. आई बाबांबरोबर शॉपिंग करून मुले कंटाळली की त्यांना खुष करायला हे बक्षीस मिळतेच! अशा राईड्सवर खूप गर्दी असते. पण तरीही लहान मुले लाईन लावून आपला नंबर येण्याची वाट पहात उभी राहतात. एका खोलीत प्लास्टिकचे ढीगभर रंगीबेरंगी चेंडू पसरले होते. छोटी मुले त्यात उडी मारून लोळण घेत होती. अगदी हलके असलेले चेंडू एकमेकांवर फेकणे, चेंडूंच्या ढिगाऱ्याखाली स्वत:ला बुडवून घेणे अशी मौज मस्ती चालली होती. छोटा अंशू मॅालमध्ये गेला की ही मौज केल्याशिवाय गप्पच बसायचा नाही. पण आज बहुतेक त्याचा चांगला दिवस नव्हता! दहा मिनिटे लाईनमध्ये उभे राहिल्यावर त्याचा नंबर आला तेव्हा त्याला उंची मोजण्याच्या पट्टीपुढे उभे राहायला सांगितले. या खेळात फक्त छोट्या मुलांनाच प्रवेश होता. त्यामुळे १२० सेंटीमिटरपेक्षा कमी उंचीचीच मुले यात भाग घेऊ शकायची. अंशू काही महिन्यापूर्वीच इथे खेळला होता. तेव्हा त्याला आत जाऊ दिले होते. आज मात्र त्याला अडविले . त्याची उंची १२४ भरली होती! अंशुच्या बाबांनी तिथल्या माणसाला खूप समजावले. थोडासाच तर फरक आहे, याला खेळू द्या वगैरे! पण काहीही चालले नाही. अंशू खूप हिरमुसला झाला. किती आशेने तो चेंडूंमध्ये खेळायला आला होता! आतापर्यंत त्याला कधीच असे अडविले नव्हते. त्यामुळे आज हे दु:ख तो पचवू शकत नव्हता. त्याचे डोळे भरून आले.

अंशुच्या बाबांनी त्याला खूप समजावले. “चल, आपण आईसक्रीम कोन घेऊया म्हणून तिथून दुसरीकडे घेऊन गेले. अंशुचा मूड काही ठीक होईना. इतक्यात समोर एक बंपी राईड दिसली. बाबांचे डोळे आनंदाने चमकले. “चल आज हे राईड घेऊया!” ते म्हणाले. “पण या आधी तुम्ही मला ती राईड कधीच घेऊ दिली नाही” अंशू म्हणाला. “आज घे ती राईड!” बाबा उदारपणे म्हणाले. झाले! अंशूची कळी खुलली! या राईडवर जाण्यासाठी कमीत कमी १२० उंची हवी होती! अंशू आता मोठ्ठा झाला होता नां! त्याचे दु:ख कुठल्या कुठे पळाले! तो राईड घ्यायला आत गेला. राईडची मजा तर आलीच, पण त्याही पेक्षा जास्त खुषी “आपण आता मोठ्ठे झालो याची होती!

मित्रांनो, अंशूच्या बाबतीत असेच झाले. “चेंडूंच्या खेळात १२० पेक्षा जास्त उंची चालत नाही” ह्या दु:खाचे रुपांतर, “बंपी राईडवर १२० पेक्षा जास्त उंची पाहिजे” असे झाले! एक दार बंद झाले की कुठेतरी दुसरे उघडतेच! ते शोधायला मात्र हवे!

कुठलेही काम करायला घेतले की ते यशस्वी होण्यासाठी आपण योग्य ते प्लानिंग करतो. काम बिघडू नये म्हणून खबरदारी घेतो. भरपूर कष्ट देखील घेतो. इतके सगळे आपण केले आहे तर काम चांगलेच होईल अशी आपल्याला आशा वाटते. आशेचा आपल्याला यशस्वी करण्यात मोठा सहभाग असतो. आशा हे आपले महत्वाचे शक्तिस्थान असते. या उलट, आपण जर योग्य प्लानिंग केले नसेल, कष्ट घेतले नसतील, तर कुठेना कुठे आपल्या मनात एक भिती असते की काम होणार नाही. अशा निराशेत काम करताना सगळे मार्ग बंदच आहेत असे वाटायला लागते. इतकेच नव्हे तर आपणच असलेले मार्ग बंद करायला लागतो. 

संक्रांतीचा सण आला. सगळीकडे पतंगीचे वारे वहायला लागले. सुधीर-शशीच्या बाबांनी पतंगी, चक्री, सगळे साहित्य आणले. दोन भावांमध्ये सुधीर मोठा होता. त्याला पतंग उडवण्याचा अनुभव होता. शशीला फक्त अधूनमधून चक्री पकडायला मिळायची. या वर्षी मात्र बाबांनी दोघांसाठी वेगवेगळ्या पतंगी आणल्या होत्या. त्यामुळे शशी मोठ्या उत्साहाने कामाला लागला. सुधीर स्वत:ची पतंग तयार करण्यात गुंतला होता. छोट्या शशीला मदत करण्यात तो फारसा उत्सुक नव्हता. तेव्हा बाबांनी शशीला कन्नी बांधून दिली. शशीने त्याच्या एका मित्राला बरोबर घेतले, आणि ते दोघे मिळून मैदानावर जाऊन पतंग उडवायचा प्रयत्न करू लागले. इकडे सुधीरची पतंग सरसर वर चढली देखील. शशीची मात्र सारखी खाली आपटत होती. मदत करायचे सोडून सुधीर शशीला हिणवू लागला. “तुझी पतंग वर जाणारच नाही.” खूप वेळा प्रयत्न करून पतंग उडली नाही तेव्हा शशी खूप निराश झाला. 

तो रडवेला होऊन बाबांकडे गेला. “मला नाही पतंग उडवायची.”

“का रे? काय झाले?”

“मला नाही जमत. मला TV बघायचाय”

त्याचा रडवेला चेहरा बघून बाबांना खरे काय झाले असेल ते कळले. “अरे दादाला विचार नां, तो मदत करेल.”

“दादा म्हणे तुला कधीच जमणार नाही पतंग उडवायला.”

“असं म्हणाला काय! अरे, कधीच जमणार नाही असं म्हटलं तर खरंच जमणार नाही. तुझ्या दादाला सुद्धा येत नव्हती. चल मी सांगतो तुला.” बाबा शशीला घेऊन मैदानावर गेले. त्यांनी शशीला पतंग कशी धरायची, कशी वर ढकलायची आणि कशी दोरी खेचायची सगळे नीट करून दाखवले. तसे सगळे करून देखील शशी आणि त्याच्या मित्राची पतंग उडतच नव्हती. दादा ते बघून हसत होता. शशीने जोराने चक्री खाली फेकली. “मी कधीच पतंग उडवू शकणार नाही.” असे म्हणत पाय आपटीत तो घरी जायला निघाला.

बाबांनी शशीला थांबवले. “हे बघ शशी. तुझी पतंग उडेल. अगदी सुधीरपेक्षाही वर जाईल. पण आधी तू ‘माझी पतंग उडणारच नाही’ असे म्हणणे थांबव. आणि एकदा नाही उडाली तर पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. पहिल्यांदाच कुठलीच नवी गोष्ट जमत नसते. पण त्यामुळे निराश होऊन प्रयत्न थांबवायचे नसतात. इतर सगळे कसे उडवतात आहेत ते नीट बघ. वाऱ्याची दिशा ओळखून उडव. पुन्हा पुन्हा उडव. एकसारखे ‘माझी पतंग उंच उडणारच’ असे स्वत:ला सांग.” 

आणि झालेही तसेच. शशी पुन्हा आशेने पतंग उडवायचा प्रयत्न करू लागला. आणि ती सरसर वर चढलीच. 

पतंग उडतेच. ती उडण्यासाठीच बनविली असते. फक्त तिला उडविणारे तुमच्या मनातले दोर तुम्ही कापून टाकू नका. निराशा ही यशाची कात्री आहे, ती रद्दी सामानात दूर टाकून द्या! 

मग काय? दु:ख आणि निराशा या भुतावळीला दूर हाकलून देण्याचे ठरवले नां? 

एक दार उघडल्यावर जेव्हा निराशा समोर येते नां, त्या दाराच्याच थोडे बाजूला कुठेतरी दुसरे दार आशेचे असतेच! निराशेत बुडून न जाता, आशेचे दुसरे दार शोधावे लागते. आणि ते नक्की मिळते!

- अरुण मनोहर 



















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा