आनंदवर्षा

ऋतुगंध वर्षा  वर्ष १३ अंक ३

खरा आनंद मानण्यात असतो, हे तत्त्वज्ञानयुक्त वाक्य आपण सहज बोलतांना अनेक वेळा वापरतो. आनंद खरंच मानण्यात असतो की आयुष्याशी केलेली ती एक तडजोड असते? असो. या विषयावर विचार करून उगीचच गांभीर्य न वाढवता आपण पुढे जाऊ. 

एखादी गोष्ट हवीहवीशी वाटत असतांना, कधीतरी त्याचा हव्यास होऊन जातो हे खरं. मग त्या हव्यासाच्या पूर्ततेसाठी, महत्त्वाकांक्षेच्या शिडीवर चढण्याची चढाओढ सुरु होते आणि मग प्रयत्नांना यश आले, कि होतो एक, आनंद! पूर्ततेचा, पूर्णतेचा, आत्मबलाचा आणि त्या बरोबरच ‘स्व’ च अस्तित्व रुजवणारा - आनंद!

खरंतर, अगणित प्रयत्नांची पराकाष्ठा करून मिळवलेला हा आनंद, चिरकाल टिकायला हवा… पण तसे होत नाही. कारण पुन्हा नव्याने अपुर्णतेची जाणीव तीव्रतेने होते आणि पुर्णतेच्या शोधासाठी निघून आपण, एखाद्या चक्रव्युहात अडकावे तसे अडकतो .. याचे मुख्य कारण आपणच आपल्या आनंदाला ‘अटी-बद्ध’ केले आहे. आपला आनंद हा बाह्यगोष्टींवर अवलंबून असतो असा गोड गैरसमज करून घेतला आहे. झोपलेल्याला जागे करता येते, परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्याला नाही. त्याप्रमाणे, या चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे कठीण नसूनही त्या दिशेने जास्त प्रयत्न होत नाहीत. 

घरी प्रथम फोन आला होता, त्या वेळचे सुरूवातीचे दिवस आठवतात? रिंग वाजली रे वाजली की फोन घेण्यासाठी सर्वांचीच धावपळ सुरु व्हायची. नव्याची नवलाई संपली आणि फोन घेण्यासाठी टाळाटाळ कशी सुरु झाली ते आठवतंय? बदलत्या कालमानाप्रमाणे आता तर, बाजारातून वस्तू फक्त घरी आणण्याचा अवकाश.. त्याची नवलाई लागलीच संपते. कागदी चलन वापरून आपण आनंद विकत घेण्याचा सपाटा लावलाय, असं नाही वाटत?

सृष्टीची निर्मितीच मुळात आनंदातून झाली आहे. एखादी वाऱ्याची झुळूक, पाण्यावरचे तरंग, पक्ष्यांची चिवचिव, खळखळत्या पाण्याचा मंजुळ आवाज, विविध छटांची पाने-फुले , आकाशात रंगणारी रोजची नवीन रांगोळी, पावसाने तृप्त झालेली, वाऱ्याने डोलणारी, सोनेरी किरणांनी न्हालेली सृष्टी. अगदी रोज नवनवं रूप घेऊन आपल्या समोर भरभरून आनंद घेऊन येते. आणि आपण मात्र त्या वेळी कागदी चलन हातात घेऊन आनंद विकत घ्यायच्या रांगेत उभे असतो.

आनंद आपल्या आजुबाजुच्या पंचतत्त्वात भरून राहिला आहे. याच पंचतत्त्वांनी बनलेले आपण, आनंदाच्या कोषात आहोत. याचा अर्थ पंचतत्त्वात भरभरून असणारा आनंद-अमृताचा कुंभ आपल्याकडेही आहेच की! असे असूनही आनंद सापडत नाही, कारण ती नजर अजून आपल्याला लाभली नाही . 

पंचतत्त्व, निसर्ग, सृष्टी नावं वेगवेगळी, परंतु त्यात ठसठसून भरलेला मातृत्वाचा आनंद, ती जगाला कायम वाटत आहेत अगदी विश्वाच्या आरंभापासून. युगानुयुगे विश्वाची ओंजळ भरूनही, तो आनंद संपलेला दिसत नाही आणि पुढेही अनंत काळ संपणार नाही. ‘सदैव बरसणारी आनंद- वर्षा !! हीचा मनसोक्त आनंद लूटा आणि सभोवार उधळा…’, सृष्टी आपल्याला हा संदेश देत आहे जणू!

हाच असावा तो खरा आनंद- मातृत्वाचा, जो देण्यात असतो! कसल्याही अपेक्षेशिवाय, स्वतःला विसरून देण्यातला आनंदच चिरकाल टिकणारा असेल. आजपर्यंत भरभरून दान देऊनही तो आनंदकुंभ रिता झालेला, हरवलेला नाही. उलट विश्वाला आनंदात पाहून तो आनंदकुंभ पुन:पुन्हा तुडुंब भरतो आहे. 

देणाऱ्याने देत जावे, 
घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस, 
देणाऱ्याचे हात घ्यावे! 

कदाचित, आनंदाची गुरुकिल्ली यातच कुठेतरी दडलेली असावी. 


-युगंधरा परब

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा