नमस्कार मंडळी, ऋतु राग लेखमालिकेच्या पाचव्या भागाकडे आज आपण वळूयात. हेमंताचा पहिला महिना मार्गशीर्ष. असे काय आहे ह्या महिन्यात की भगवान श्रीकृष्णाने “मासानां मार्गशीर्षोsहं” म्हणून ह्यालाच का गौरवावे ? हा काही बाकीच्या महिन्यांसारखा बाह्य आकर्षणाने नटलेला महिना नाही. पण ह्या महिन्यात असणारे थंड वातावरण.. गात्रांना शांतवणारे वातावरण. ते छाया प्रकाशाचे नाट्य आणि त्यातून रमणीय असे भ्रांतीजाल ! शांती, आणि भ्रांती, वेगवान आणि वास्तव अश्या जीवनाची ओढ ह्या महिन्यात जाणवू लागते. शांतीतून संभ्रमात आणि संभ्रमातून वास्तवात आपण आपल्याच नकळतेपणे येतो. स्वप्न, आणि जागृती सारख्याच तीव्रतेने रात्रं-दिवस पाठलाग करतात.
छायाप्रकाश, शांतता, व नाद, वास्तवता आणि कल्पित बेमालूमपणे एकांत एक मिसळून जातात. या चमत्कारिक संगमात मार्गशीर्षाचे रहस्य असावे. दिवस लहान लहान होत जातात.. रात्र अधिकाधिक गडद होते.. सुरुवातीला त्रासदायक वाटणारी हि रात्र, थंडीच्या आगमनासह हवीहवीशी वाटू लागते.. मग ती अचानक कधी गुलाबी वाटायला लागते.. आणि अश्या थंड दिवसांत सकाळचे ऊन, ऊबदार आणि हवेहवेसे वाटू लागते. नाहितर हेचं ऊन ग्रीष्मात नकोसे झालेले असते.. अश्या संमिश्र वातावरणाची छाया सदैव पडत असते, ती पौष आला तरी कायम राहते. धुक्याची झालर समस्त वातावरणात पसरलेली असते. पौष हा संक्रमणाचा महिना, थंडीचा कडक अधिक. आणि मग दिवस मोठे होण्याची चाहूल या दिवसांत मिळायला लागते. रुढ समजुतीप्रमाणे हेमंताची अखेर ह्या महिन्यात होते. रामायणात “इष्ट ऋतू” म्हणून हेमंताचे वर्णन आहे. कारण पावसाळ्यात उधाण आलेल्या समुद्राला पार करणे अवघड. त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी, वर्षा ऋतू नंतर शरद आणि मग हेमंत ऋतूमध्ये लंकेवर चढाई केली ह्याची पुष्टी रामायणात आहे. आपल्या समशीतोष्ण कटिबंधीय भारत देशात थंडीच्या महिन्यांना, विशेषत: गव्हाची हिरवीगार सुंदर पिके शेतात डोलत ठेवणाऱ्या ह्या महिन्यांना, पुष्टीचा महिना मानावे, ह्यात काहीच नवल नाही.
ह्या अश्या प्रस्तावनेतचं हेमंत ऋतूत गायल्या जाणाऱ्या रागाची महती आहे..किमया आहे.. फकीरुल्लाने “राग दर्पण” मध्ये वर्णन केल्याप्रमाणे मालकंस राग हेमंत ऋतूत महत्वाचे स्थान प्राप्त करतो. मालकंस हा रात्रीच्या तिसऱ्या प्रहरातला राग, त्यामुळे अर्थातच ह्या रागाची रंजकता हेमंतात अधिक येते..
मालकंस, नजरेत न सामावणारा परिसर, धुक्याची पडलेली झालर, आणि एखाद्या डोंगर माथ्यावर गेलो असता, खाली विस्तीर्ण पसरलेल्या गारठून गेलेल्या वातावरणाशी तादात्म्य पावणारा हा राग... पंचम आणि रिषभ स्वरांना इथे आरोह- अवरोहात स्थानच नाही. पण षड्ज आणि मध्यम ह्या स्वरांचा प्रभाव इतका की बाकीचे सर्व मवाळ वाटायला लागतात.
उ. आमीर खां, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर, ह्या दिग्गजांनी मालकंसला आपल्या प्रतिभेचे रंग दिले. “तुम बिन कौन सवारे” हि किशोरीताईंची बंदिश त्यांच्याकारून ऐकताना मालकंसचं धीर गंभीर गूढ रूप समोर येतं, तर आयुष्य क्षणभंगुर असलं तरी मनाला सैरभैर होऊ द्यायचं नाही, हे कुमारांचा मालकंस सांगतो. आपल्याला स्वस्थ चित्त करायचं सामर्थ्य भीमसेनांच्या मालकंसमध्ये आहे. आता लक्षात आलं असेल की वर इतकी प्रस्तावना का केली. कारण हा रागच ह्या हेमंतच स्वरुप धारण करतो.. उत्तररात्री मालकंस ऐकू येतो तेव्हा, आरती प्रभूंच्या ओळी आठवतात,
दु:ख ना आनंदही, अंत ना आरंभहि,
नाव आहे चाललेली काळी आणि आजही.. :
मालकंस रागाला मालकौश, मालव-कौशिक अशी नावं प्राचीन काळात होती. कृष्णाधन बनर्जींच्या मते मालकौश हा मल्लकौशिक या शब्दाचा अपभ्रंश आहे. कौशिकचा एक अर्थ सातपुडा पर्वत असं आहे. सातपुड्यालाचं ‘मल’ असेम्हणतात. प्राचीन काळी ह्या भागातले लोकं चांगले गाणारे- वाजवणारे होते. त्यांच्या मुलुखात लोकप्रिय झालेला राग, तो मल्लकौशिक.. हेमंतात सर्व घाटमाथे सुकून मोकळे झाले की माल देशाचे लोकं उत्तरेकडे येत. आपल्या प्रांतातला मल्लकौशिक तिथे गात असत. मालव म्हणजे माळवा भाग. तिथून ह्या रागाचा प्रवास उत्तरेकडे सरकला... मालकंसाबद्द्ल अश्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत.
भारतीय संगीतात मालकंस हा भारदस्त राग मानला जातो आणि राग संगीतात चांगली प्रतिष्ठा आहे. फक्त राग संगीतात नाही, तर सुगम संगीत, गझल, भावगीत ह्या रागात बांधलेली आढळतात. मालकंस रागात कितीतरी सुंदर गाणी आहेत. काही महान गायकांनी, वादकांनी मालकंस रागात केलेल्या त्यांच्या रचना, बंदिशी ह्या अनुषंगाने ऐकायचा योग आला, त्या इथे देतो.. यु-ट्युबवर प्रचंड प्रमाणात साहित्य, व्हिडीओ उपलब्ध आहेत.. त्यापैकी काही..
लता मंगेशकर, १९५०
केसरबाई,
कुमारगंधर्व, छब डे पिया
वसंतराव देशपांडे
उ. बिस्मिल्ला खान साहेब
जितेंद्र अभिषेकी. दिव्य स्वातंत्र्य रवि...
- ओंकार गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा